ती उठली. तो अजूनही अंथरूणातच होता. शांत झोपलेला. तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं. तिला आठवलं, रात्री तो तिला हळूच स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. हलकेच तिच्या छातीवर तो हात फिरवणार इतक्यात तिने त्याचा हात दूर सारला होता. पुन्हा काहीवेळानं तो तिच्या जवळ सरकायला लागला तेव्हा पुन्हा तिनं झटकन त्याला अडवलं होतं.
आताशा, दोघांच्या रात्री विझल्या होत्या कारण तीच आता विझली होती. खरंच, कसं ना, जेव्हा स्पर्शातला रोमांच कळू लागतो त्या वयात आपण स्वतःला अडवत रहातो. आणि नंतर ती उत्सुकता कमीकमी होत जाते .. अलिकडे तिचंही हेच झालं होतं. कारण हल्ली तो पूर्वीसारखा राहिलाच नव्हता. दारूच्या विळख्यात अडकलेल्या त्याला फक्त त्याच्या जाणीवा आणि त्याच्या वासना कळायच्या. चांगला सुशिक्षित असूनही, बायकोच्या कामवासनेविषयी त्याला काहीच देणंघेणं नव्हतं.
एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झपाट्याने प्रगती करत त्याने भरपूर ऐशोआराम, सुखं कमावली नि दारूही सोबत आलीच. आणि इकडे ही त्याच्यासाठी झुरत राहिली.. आपलाच नवरा आणि आपल्यासाठीच त्याला वेळ नाही या गोष्टीनं खंतावून जाई. पण त्याची त्याला फिकीर नव्हती. तिची शरीरसुखाची गरज त्याच्यादृष्टीने बिनमहत्त्वाची होती.
लग्नानंतरच्या सुरूवातीच्या दिवसातही तिला जेव्हा इच्छा होई तेव्हा हा सतत बिझी .. आज काय नाईट शिफ्ट .. उद्या काय अमक्या उद्योगपतीची हॉटेलमध्ये खासगी पार्टी म्हणून सगळी व्यवस्था चोख लागणार .. अशी एक ना अनेक कारण .. काहीतरी मोठं, स्टेटस को फंक्शन रोजचंच आणि मग याला जातीने हजर रहाणं आलंच ! म्हणूनच याला मिळेल त्या आणि तेवढ्याशा वेळात हा तिच्याबरोबर सगळं घाईघाईने उरकून घेई आणि पुन्हा कामावर हजर होई.
अशातच एकदा तिचं कोडं सुटल्यागत झालं. त्याची वाट पहाता पहाता एकदा तिनं स्वतःच स्वतःला सुखी केलं.. आणि मग हे कायम घडू लागलं.. कारण असंही तो घरी येईपर्यंत तिच्या सगळ्या इच्छा मरून गेलेल्या असत. किंबहुना, तो जर नशेतच घरी आला तर हिचा संताप संताप होई, पण सांगायचं कोणाला आणि कशाला .. म्हणून ती सगळं सहन करत राहिली.
तोडण्यापेक्षा जोडणं महत्त्वाचं अशा संस्कारी घरातून आलेली ती, लग्न मोडताना लाख वेळा विचार करणारंच .. नाही का ? शिवाय घरातल्यांना सांगून मार्ग निघेलच याची खात्री नाही पण बदनामी तर होईलच हे तिला पक्क ठाऊक होतं.
तसं पाहिलं तर लौकीकार्थानं त्यांचं सगळं छानच सुरू होतं. फक्त अलिकडे त्याची तब्ब्येत खराब झालीये एवढच सगळ्यांना दिसे. हा असा सगळा चांगला माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर एवढं मातेरं करून ठेवेल यावर कोण विश्वास ठेवणार ? आणि मुळात तिलासुद्धा त्याचे तसे धिंडवडे काढायचे नव्हतेच .. कारण, कसा का असेना .. तो तिचा नवरा होता .. इथे पुन्हा तिच्यावर केलेले संस्कारच डोकं उफाळून वर येत आणि ती अगतिक होऊन जाई.
मुळात या लग्नातून आताशा तिच्या वाट्याला तिच्या हक्काचं शरीरसुख काही येत नव्हतं. ती घुसमटून जात होती आणि वाट शोधत होती. तिला हाक मारायची होती, आपल्या जवळच्या कुणाला .. तिला हा कोंडमारा सांगायचा होता.. पण एकदिवशी तिचीच तिला आत्मतृप्तीची वाट सापडली आणि सुखाचं दार उघडलं गेलं. त्यामुळेच मग, आता कशाला कोणासमोर रडायचं नि आपलं गाऱ्हाणं सांगायचं .. लोक काय रडून ऐकतील नि हसून सांगतील. त्यापेक्षा नकोच ते .. आपण आपल्या वाटेनं जाऊ .. जात राहू .. हेच तिनं एका निसटत्या क्षणी मनात पक्क करून टाकलं.
पहिल्या एकदोन आत्मतृप्तीच्या क्षणानंतर तिनं स्वतःला थांबवलं खरं पण तिला काय माहीत .. की ही वाटही निसरडीच होती .. आणि हल्ली, हल्ली तर तिला झपाटल्यागत झालं होतं. कारण, त्याच्या बेताल वागण्याने तिच्या हातून निसटून गेलेल्या अनेक अतृप्त रात्री ! आणि आता जणू या साऱ्या रात्रींचं कर्ज तिच्या डोक्यावर असल्यागत, अलिकडे सतत तिची अर्धवट शमलेली भूक उफाळून वर येई ... मग कसंही करून ती आतल्याआत हे वादळ शमवण्याचा प्रयत्न करीत राही. मग तिचंच तिला आश्चर्य वाटे. आपल्यातून वर डोकावणारी ती खरी की तिला विझवण्याचा खटाटोप करणारी मी खरी या अशा अनेक भासआभासांच्या गुंत्यात ती अडकत चालली होती. सतत डोक्यात अशीच द्वंद्व सुरू त्यामुळेच खरंखोटं कळेनासंच झालं होतं हल्ली तिला.
तो आपल्या बाजूला आहे आणि आपल्याला स्पर्श करू इच्छित आहे ही जाणीव झाली की तिचा गोंधळ उडायला लागे. हा खरंच आहे ना शेजारी .. की हे सगळं आपल्या कल्पनेतच घडतंय, आजवर त्याच्या अनुपस्थितीत आपण घडवत होतो तसं.. ? खरंच त्याला हवंय का आपलं मीलन .. ? की फक्त त्याला हवेत ते आपल्या देहाला चिकटलेले आपले अवयव ? की त्याला काही क्षण जी मजा येते .. तेवढीच हवीये फक्त.. ?
हल्ली, ती अशा आभासातच हरवत चालली होती आणि तो व्यसनात आकंठ बुडालेला..
दोघंही आपापल्या आभासी लाटांवर झुलत होते. आयुष्याची नौका आता कोणत्याही क्षणी पूर्ण बुडणार होती .. पण त्याची चिंता करायला मुळात वास्तवात यायला हवं ना .. तेच तर जमत नव्हतं.
ना तिला, ना त्याला ..
आणि हे सगळं कशामुळे ?
तर दारूच्या विळख्यात अडकलेल्या त्याने तिच्या भावनांचा, वासनेचा आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाचा जो काही कोंडमारा करून ठेवला होता, केवळ त्यामुळेच !
तिला कालची रात्र आठवली ! तिला जाणवलं, आपली उमेदीची वर्ष सगळी निघून गेलीत.. आता वासनेचा तो थरारच संपत चाललाय आणि आता हवे आहोत आपण त्याला..? आता स्पर्शातून फक्त वेदनाच होतात जेव्हा आपल्या मनाला, अशा टप्प्यावर ..?
तिच्या मनात चीड, घृणा, तिरस्कार आणि संताप सारं काही उफाळून आलं आणि पुन्हा काही क्षणातच तिला बेचैनी आली.
अंथरूणावर त्याचं शरीर निजलं होतं.. आता सतत त्याच्या अंगाला येणार उग्र दर्प तिला किळसवाणा वाटू लागला होता .. या दारूपायी त्यानं स्वतःच्या सुंदर शरीराचं जे काही मातेरं केलं होतं ते तिला बघवत नव्हतं. त्याचं घटलेलं वजन, खप्पड झालेले गाल, डोळ्याभोवती आलेली काळी वर्तुळ, बलहीन शरीर आणि विझलेली गात्र .. त्याचं ते ओंगळवाणं रूप पाहून तिला शिसारी आली.. या अशा माणसाने आपल्याला स्पर्श करावा .. ई .. तिला स्वतःचंच शरीर नकोस वाटलं क्षणभर ..
तिला आठवलं, तिच्या लहानपणी दारूडा माणूस नुसता शेजारून जरी गेला तरी आई हात धरत असे तिचा चटकन् आणि आता आपलाच नवरा दारूडा होऊन आपल्या बिछान्यात झोपतोय .. कारण त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहून आपण त्याला निवडलं म्हणून ..?
पण मग याला उपाय काय .. सोडून द्यायचं त्याला ? पण असं केलं तर आपण आपल्याच नजरेतून उतरू हे तिला माहित होतं.
आणि म्हणूनच आताशा ती आभासच खरा मानत होती.. तो आता माघारी येणार नव्हता हे तिला ठाऊक होतं. तो असूनही नसल्यासारखाच, त्यामुळेच तीही तिच्या वेळेला तिच्यासाठी कधीच अव्हेलेबल नसलेल्या नवऱ्याला, तो सोबत आहेच हे मानून स्वतःला तृप्त करत निघाली होती .. तिच्या रस्त्यानी .. कारण शेवटी, हे आयुष्य जितकं त्याचं होतं, तितकंच तिचंही होतंच ना ..आणि तिला जगायचं होतं.. घुसमटायचं नव्हतं .. कधीच .. म्हणूनच ती जगायला लागली होती... आणि आयुष्य ? ते आपल्या निश्चित गतीने पुढे सरकत होतं. पुढे सरकत रहाणार होतं..
अहोरात्र ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख