सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

कथा

हिरवा चाफा 
मोहिनी घारपुरे - देशमुख 

लपवलेल्या हिरव्या चाफ्याचा गंध खोलीभर दरवळला होता. ती खोलीत शिरली आणि तिनं तो गंध श्वासात भरून घेतला. हा दरवळ नेमका कुठून येतोय हे तिला आता शोधायचं होतं. त्या दोघांचा तो आवडीचा आणि नेहमीचाच खेळ..हिरव्या चाफ्याचं एखादं फुल त्यानं संध्याकाळी फिरून परतताना खिशात आणायचं नि कोणाच्याही नकळत बेडरूममध्ये लपवून ठेवायचं.
घरात नकळतपणे हा चाफा शिरला की त्याच्या सुगंधाने ती फुलून जायची. घरातल्या इतर मंडळींना चाफ्याचं तेवढंस वेड नव्हतं त्यामुळे त्यांना या दरवळीने अस्वस्थ व्हायचं नाही. ते फक्त तिलाच व्हायचं आणि तिचं असं अस्वस्थ होणं त्याला फारच गोड, मादक वाटायचं. म्हणून हा सारा खट्याळपणा तोही आवर्जून करायचा. लग्नाला सात आठ वर्ष झाली असली तरीही..!
हिरवा चाफ्याचा सुगंध गोड आणि मादक..अगदी तिच्यासारखा..
" ए मला ना या चाफ्याने नुसतं वेडं व्हायला होतं...असं वाटतं, आपल्या प्रत्येक तशा क्षणांपूर्वी खोलीभर चाफ्याची फुलं अंथरलेली असावीत...हिरव्या चाफ्याची फुलं आणि आपल्या निर्मळ, निर्वस्त्र देहाला या फुलांनी स्पर्श करावा. या फुलांचा गंध आपल्या शरीरावर अलगद भरून रहावा. आपल्या त्या धुंद क्षणांना या अलवार गंधानी सुंगंधित करावं आणि तो दरवळ घेऊनच नंतर कितीतरी वेळ आपल्या शरीरांनी या जगात वावरावं. मग तू कितीही दूर गेलास तरीही नंतर तुझा हा गंध आठवून मी स्वतःला तुझ्यात मिसळून घेईन. एकेका फुलाने तू माझा देह सजवत जा आणि मी तुझा..अशा क्षणांना खोलीत ते गाणं, जयतीर्थ मेऊंडींच्या आवाजातलं, 'तुझा गंध येता मनी छंद वाजे मला वेधणारा पुन्हा पुन्हा ...' , तेही सुरू असावं म्यूझिक सिस्टीमवर .. काय रोमँटीक वाटेल नै ..?"
लग्नानंतर एकमेकांच्या मिठीत निवांत पहुडलेले असताना तिनं एकदा त्याला मोठ्या अधीरतेने तिची फँटसी सांगितली होती. तिची फँटसी ऐकल्यावर त्यालाही खुदकन् हसू आलं होतं त्या क्षणी. किती गोड, किती साधं आणि किती सुंदर बोलली होती ती! या अलवार क्षणांना बंद कुपीतल्या अत्तरासारखं चिरकाल दरवळत ठेवण्यासाठी इतका विचार? आणि तोही हिच्यासारख्या एका साध्या गोड मुलीने केलेला असावा...त्याला आश्चर्य वाटलं आणि कौतुकही वाटलं तिचं.
"पण हिरवा चाफाच का? कोणतंही फुल चालेल की..त्यात काय .. !"
त्यानं तिला घट्ट मिठीत ओढत विचारलं. तिचे टप्पोरे बोलके डोळे आणि रसरसलेले ओठ पाहून तो पुन्हा धुंद झाला आणि त्यानं तिच्यावर स्वतःला स्वार केलं. तिही त्याच्या अशा उन्मादक स्पर्शाने रसरसून बहरली. हे क्षण आता दीर्घ झाले होते. शरीराच्या धुंदीला चाफ्याच्या गंधाची आठवण येऊन दोघांच्याही संवेदना फुलून आल्या होत्या. खोलीत चाफा कुठेच नव्हता पण चाफ्याचा दरवळ त्याक्षणी त्या दोघांनाही अनुभवला होता. तो तिच्या फँटसीत तनामनाने फुलून आला होता. ती रात्र सुकुमार झाली होती..आणि चांदण्यांच्या मंतरलेल्या पांघरूणाखाली ते दोघं एकमेकांच्या कुशीत निवांतपणे झोपली होती.
रात्र सरली आणि दुसऱ्याच दिवशी त्याला संध्याकाळी घरी परतताना हिरव्या चाफ्याने खुणावलं. त्यानं गाडी झट्दिशी थांबवली. काल रात्रीच्या आठवणीनं तो तहानला झाला. तो सरसावला आणि त्यानं भराभर हिरव्या चाफ्याची दोन टप्पोरी फुलं तोडली आणि खिशात ठेऊन थेट घर गाठलं.
तिनं दार उघडलं आणि त्या मदमस्त सुगंधानी ती क्षणभर गोंधळली ..
" चाफा .. ? हिरवा चाफा आणलाएस का तू ..? खरंच ..?" आश्चर्याने त्याच्याकडे बघता बघताच तिच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरलं. तिच्या डोळ्यात कालची रात्र तरळली. तिचे गाल लाजेनं लाल लाल झाले..आणि तो खुदकन् हसत बेडरूममध्ये जाऊन झट्दिशी ते फूल लपवून आला..
ती खोलीत शिरली.. आणि वेड्यासारखं ते फूल शोधू लागली.
"आहा..सापडलं ..!" असं म्हणून ती वळते तोच त्यानं तिला बिछान्यावर लोटली आणि दोघांच्या मर्जीने हा चाफ्याचा क्षण पुन्हा साजरा झाला.
या गोडगोड दिवसापासूनच तर हा लपवाछपवीचा खेळ त्या दोघात सुरू झाला होता. नवथर प्रणयाचा उन्माद आणि त्यातलं ते अवर्णनीय सुख आज लग्नाला एवढी वर्ष झाली तरीही त्या दोघांनी टिकवून ठेवलं होतं.
खोलीभर चाफ्याचा दरवळ हा असा रेंगाळत राहिला होता .. आजतागायत.. !

copyright @ mohinee_gharpure

(नुक्कड साहित्य संमेलनाच्या फेसबुक पेजवर दिनांक 14 जून 2019 रोजी प्रकाशित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश