गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

'स्पार्कल' शाळा - उपक्रमशील शाळा

'सृजनत्व' अन् 'कल्पकतेचा' रंगतो इथे सोहळा

नाशिकमधील 'म्हसरूळ' भागात नव्यानेच सुरू झालेल्या 'स्पार्कल प्रायमरी अँड प्री-प्रायमरी' शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही द्विभाषिक शाळा आहेच मात्र या शाळेत उपक्रमशीलतेला अतिशय महत्त्व दिले जाते. शिक्षण देणे हे एखादे कार्य उरकण्याप्रमाणे न करता विद्यार्थ्यांना कृतिशील, उपक्रमशील पद्धतीने शिक्षण देण्यावर या शाळेतील शिक्षकांचा भर असतो. यापूर्वीच्या अनेक उपक्रमांचा दाखला त्याकरीता येथे आवर्जून देता येईल.. जसं, भाज्यांची ओळख हा विषय जेव्हा शाळेने घेतला तेव्हा नुसती भाज्यांची चित्र दाखवून नावं सांगणं एवढ्यावर हा विषय संपवला नाही तर मुलांना भाज्यांचं महत्त्व कळावं यासाठी पालकांना मुलांच्या डब्यातून भाज्यांचे निरनिराळे पदार्थ द्यायला सांगितले, शाळेने मुलांना चक्क शेतात तर फिरवून आणलंच तसंच बाजारातही भाजी दाखवायला नेलं. भाजीचं शेतात उत्पादन कसं होतं इथपासून ते बाजारात भाजी कशी विकली जाते, विक्रीची परिमाणं, वजन कसं करतात, भाजी विकत आणण्याकरीता पैसे कसे आणि किती मोजावे लागतात या साऱ्यासाऱ्याची तोंडओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात करून दिली होती. इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी भाज्यांची एक नाटुकलीही शाळेने बसवली होती.. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक विषय घेतला की त्याचा पाठपुरावा करायचा आणि त्या विषयाशी गुंफत इतर विषय विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि ते देखील वर्गात बसून नव्हे तर प्रत्यक्ष कृती करायला उद्युक्त करून हेच तर स्पार्कल शाळेचं वैशिष्ट्य .. !
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून विद्यार्थी जरी घरी असले तरी शाळेने विद्यार्थ्यांनी घरातही टीव्ही व मोबाईलपासून जास्तीत जास्त वेळ लांब रहावे याकरिताही शाळेने सतत विद्यार्थ्यांना निरनिराळ्या उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवलेले आहे. जसं, शेंगदाण्यांचा एक निराळाच उपक्रम या विद्यार्थ्यांना घरातच राहून शिक्षकांनी करायला सांगितला होता आणि ज्याबद्दल मी गेल्यावेळी लिहीलंही होतं ते वाचकांना आठवत असेलच.. !
कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे शाळा सुरू होण्याची चिन्ह काही दिसेनात, अशावेळी शिक्षकांनाही आता विद्यार्थ्यांना सतत काय उपक्रम द्यावेत हे आव्हानच झालेले आहे. मात्र, असे असले तरीही, हे आव्हानही स्पार्कलच्या शिक्षकांनी लीलया पेललेले आहे. नुकतंच या शाळेतील शिक्षिका मृणाल जोशी यांनी आपल्या सिनीयर केजीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील एकक - दशक ही संकल्पना शिकवण्यासाठी एक छान कल्पक उपक्रम घेतला आणि तो देखील विद्यार्थी घरी असतानाच .. त्या उपक्रमाविषयी खुद्द मृणाल ताईंनीच त्यांचा अनुभव लिहून पाठवला आहे, त्यांच्याच शब्दात तो इथे देते आहे -
" उपक्रमशील शिक्षण पद्धती असं म्हटलं की पालकांना हमखास प्रश्न पडतो, "म्हणजे नेमकं कसं शिकवतात तुमच्या शाळेत ?" तर याचंच एक उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे आपण सगळेच घरात बसलोय. त्यामुळे मुलांना शिकवायचं कसं आणि उपक्रम कसे व कोणते द्यायचे हा मोठा प्रश्न पालकांना जसा पडला आहे तसाच आम्हा शिक्षकांनाही पडला आहेच. पालकांचा विचार केला तर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलांचा वेळ कुठे सत्कारणी लावायचा ? नाहीतर उरलेल्या वेळेत ते फक्त मोबाईल किंवा टीव्ही बघत बसतात ! पण आपण घरातल्या घरातही नानाविध कल्पक उपक्रम मुलांना करायला देऊ शकतो. विशेषतः असे उपक्रम ज्यातून विद्यार्थ्यांचं अध्ययन सोपं जाईल.
मला सिनियर केजीच्या वर्गात 'एकक आणि दशक' ही संकल्पना शिकवायची होती. मग त्यासाठी मला एक छान कल्पना सुचली. अनायसे पावसाळा आहे. बाहेर झाडं छान बहरली आहेत आणि अनेक फुलझाडांवर भरपूर फुलं बहरलेली दिसू लागली आहेत. मग प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वा तिच्या घराजवळील फुलझाडांची फुलं गोळा करून आणायला सांगितली आणि मग एकक आणि दशक ही संकल्पना लक्षात यावी म्हणून मी दहा फुलांचा हार करायला सांगितलं. दहा फुलांना एकत्र केलं म्हणजे एक दशकाचा हार तयार झाला आणि वर जितकी फुलं राहिली ते झाले एकक ही संकल्पना विद्यार्थ्यांना छान लक्षात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने दशकाचा हार तयार केला आणि तो करताना पालकांनी विद्यार्थ्यांना फुलं मोजायला शिकवलं. यामुळे मोजणी (काऊंटींग) अन् एकक- दशक विभागणी शिकवणं सोपं झालं आणि मुलांच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहीलं. माझ्या वर्गातला एक उत्साही विद्यार्थी त्रिशील, त्याने तर स्वतः दोऱ्यात सुई ओवली आणि मला दाखवलं.. 'किती छान, किती एकाग्रतेने त्याने ती सुई धाग्यात ओवली..!' ते बघताना मला खूप आनंद झाला तसंच लॉकडाऊनपूर्वी शाळेत केलेल्या अनेक उपक्रमांचीही फार तीव्रतेने आठवण झाली.निसर्ग नावाच्या विद्यार्थ्याने तर घराजवळ खूप फुलं नाही मिळाली तर चक्क एका फुलाच्या दहा पाकळ्या करून त्याचा हार ओवला.
एकूणच काय आपण छोट्या छोट्या वस्तू वापरून नवीन सृजनशील उपक्रम मुलांना देऊ शकतो आणि अध्ययन व अध्यापन सुखकर करु शकतो."
तर अशी ही उपक्रमशील शाळा... स्पार्कल शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रत्येक विषय शिकवला जातो. सध्या लॉकडाऊन सुरू असलं तरीही शिक्षिका एवढ्या उत्साहाने, तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि भविष्यातही त्यांची शिकवण्याची आस्था अशीच कायम राहील यात मला शंका नाही.

- मोहिनी घारपुरे - देशमुख



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश