शुक्रवार, २८ मे, २०२१

बॅरिस्टर ..


मराठी रंगभूमीनं आपल्याला जे काही दिलंय त्याचं ऋण शब्दात फेडणं निव्वळ अशक्य.. एकेक अफलातून विषय आणि त्यावर आधारित नाटकं. कधी जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी, कधी समाजातील चुकीच्या रूढीपरंपरा, विषमता, भेदाभेद यावर घणाघाती टीका करणारी, कधी जीवनमूल्यांना प्रकाशझोतात आणणारी तर कधी हलकीफुलकी विनोदी .. औटघटकेची करमणूक देऊन आपल्याला आपल्या दैनंदिन समस्यांपासून चार घटका मुक्त करणारी .. 
मराठी माणसानं मराठी नाटकांवर इतकं भरभरून प्रेम केलं आहे याचं कारणही हेच आहे की या रंगभूमीला मराठी माणसांचं जीवन, त्याची मूल्य, त्याचं जगणं, त्याचे दोष आणि गुणही, त्याची सुखदुःख आणि स्वप्न हे सारं सारं कळलं आहे. ही रंगभूमी आपल्या या लेकरांना म्हणूनच आपलं मन जाणणारी माय न वाटली तरच नवलं.. 
या रंगभूमीवर वावरणारे एक से एक कलाकार, नटश्रेष्ठ आणि मराठी माणसाचं मन.. त्यांचं जगणं ज्यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या कुशलतेने कागदांवर उतरवलं ते लेखक .. त्यांच्या लेखणीला तर त्रिवार सलाम.. मग या लेखणीने साकारलेली नाटकं प्रत्यक्षात जेव्हा ताकदवान अभिनेते, अभिनेत्री मिळून पडद्यावर साकारतात तेव्हा त्या नाटकाचं सोनं झाल्याशिवाय रहात नाही..आणि अर्थातच ते सोनं व्हावं यासाठी अहोरात्र झटणारे समस्त लहानमोठे पडद्यामागचे कलाकार.. त्यांच्या कष्टाचे आणि त्यांच्या प्रतिभेचे ऋणही फेडणे अशक्य.. 
असंच एक या रंगभूमीवर तुफान गाजलेलं नाटक .... 'बॅरिस्टर' 
जयवंत दळवी लिखीत हे नाटक त्यांच्याच 'अंधाराच्या पारंब्या' या कादंबरीवर आधारित आहे. हे नाटक ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पूर्वी साकारयचे. त्यानंतर हे नाटक माझे अत्यंत आवडते असे ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी साकारले. 
सचिन खेडेकर या अत्यंत श्रेष्ठ कलाकाराविषयी लिहीताना लेखणीचे शब्द अपुरे पडावेत.. पण तरीही मी तो प्रयत्न करणार आहे. एरवीही एखाद्या साध्याशा चार ओळींच्या कवितेला सचिनजींचा परीसस्पर्श होतो आणि ती कविता उजळून निघते मग या नाटकातील बॅरिस्टरची मध्यवर्ती भूमिका तर किती उजळून निघाली असेल याचा वाचकांना सहज अंदाज बांधता यावा.. हे संपूर्ण नाटक आपल्या अभिनयाच्या ताकदीवर एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं श्रेय या नाटकातील अन्य कलाकारांनाही तितकंच जातं खरं, पण तरीही मध्यवर्ती पात्राच्या एकूण एक छटा ज्या ताकदीने सचिनजींनी साकारल्या आहेत त्याला मात्र तोड नाही. 
ही कथा साधारण 1920 सालातली असावी.. तो काळ जेव्हा हिंदू धर्मात विधवा विवाहाला मान्यता नव्हती. विधवेचा जन्मतःच मिळालेला सुंदर दिसण्याचा अधिकारही सक्तीने काढून घेण्यात येई, तिचे केशवपन करणे, तिच्या साजशृंगारावर बंधनं घालणे, आलवणात लपवलेला तिचा देह की ज्याचे कोणतेही लाड तिने नवऱ्याच्या मृत्यूपश्चात करायचे नाही, चवीढवी मारायच्या.. स्वखुशीने तसंच देहाच्या नैसर्गिक वासनांनाही मारून टाकायचं.. कधी मनाविरूद्ध सक्तीने तर कधी आपलंच नशीब म्हणत गप्प बसायचं. एकीकडे स्त्रियांची ही कथा तर पुरूषांनाही धर्म पालनाची सक्ती. मोठाल्या पिळदार मिशा ठेवायच्या, डोक्यावर शेंडी, गळ्यात जानवं, धोतरपगडी हाच एकमेव पोषाख. असं सगळं समाजातलं चित्र. 
अशा सामाजिक परिस्थितीत त्या काळी विलायतेहून शिकून आलेले बॅरिस्टर .. ( राऊ .. अर्थात सचिन खेडेकर ), त्यांचा एक छान चौसोपी वाडा, वाड्याबाहेर बॅरिस्टरांनी मुद्दाम आवर्जून फुलवलेली बाग, बॅरिस्टरांनी जग पाहिलंय म्हणून ते सुधारणावादी झालेले.. जीवनाकडे सुंदरतेने बघण्याची त्यांची दृष्टी विकसीत झालेली, इथल्या रूढी परंपरा आणि स्त्रियांना मिळणारी काहीशी अमानवीय वागणूक या सगळ्या सगळ्याप्रती त्यांच्या मनात काहीसा संताप, तिडीक .. याला कारणं तसं म्हटली तर अनेक.. पण महत्त्वाचं कारण म्हणजे, अगदी लहान वयातच त्यांची विधवा झालेली मावशी ( इला भाटे ) .. या मावशीवर जेव्हा आभाळ कोसळतं तेव्हा राऊ लहान असतो. पण तरीही नवऱ्याच्या मृत्यूपश्चात होणारा आपल्या मावशीचा छळ त्याला तेव्हाही पहावत नाहीच म्हणून तो तिच्या सासऱ्याशी अगदी मारामारी करून मावशीला आपल्या घरी घेऊन येतो. त्याची खूप इच्छा असते की मावशीनं असं आलवणात (लाल रंगाचं अंगवस्र) वावरू नये, तिनं केशवपन करू नये.. त्यापेक्षा तिनं तिचं जीवन पुढे फुलवावं, तो तिचा.. नव्हे तमाम विधवा महिलांचा हक्कच आहे, कारण नवरा मेला यात त्यांचा काय दोष .. पण छे.. मावशीला हे सगळं पटलं तरीही धर्माविरूद्ध उभं राहून पुढे जाण्याची तिची काय बिशाद .. म्हणून ती बिचारी विधवेचा धर्म स्वीकारूनच राऊकडे रहात असते. राऊचे वडील .. आप्पा .. तेही कोर्टातील मातब्बर असामी.. पण अचानक एके दिवशी त्यांना कसलंतरी वेड लागतं, तेच आणि तसंच वेड राऊच्या मोठ्या भावाला म्हणजे नानासाहेबांनाही कालपरत्वे लागतं. सतत वाड्यातल्या एका खुर्चीवर ही दोन वेडी माणसं समोरासमोर बसलेली पाहून राऊच्या उमलत्या मनाला भय न वाटलं तरच नवल.. तीच भीती वारंवार त्यांना छळत असते. एकीकडे प्रवाहाविरूद्ध वागण्याचं, जमल्यास प्रवाहाला आपल्या दिशेने नेण्यासाठी मनाची धडपड आणि त्यात ही अगतिक भीती की न जाणो .. भविष्यात आपल्यालाही आपल्या वडिलांसारखं, भावासारखं वेड लागेल की काय .. याचा कळत नकळत फार खोल परिणाम बॅरिस्टरांवर होत असतोच.. पण हे सगळं मनातलं वादळ खरं तेव्हा बाहेर पडायला लागतं, जेव्हा त्यांचे भाडेकरू असलेले भाऊराव ( अनिकेत विश्वासराव ) आपल्या नव्या नवरीला, मनोरमा ऊर्फ राधाक्काला ( सुजाता जोशी ) घेऊन वाड्यावरच्या आपल्या खोलीत बिऱ्हाड थाटतात. 
जातीवंत सुंदर असलेली, विनम्रतेने, मर्यादेने वागणारी राधाक्का बॅरिस्टरांच्या एकदम डोळ्यात भरते. याचं कारणही कुठेतरी त्यांच्या भूतकाळात दडलेलं असतं. विलायतेला जिम नॉर्टन नावाच्या त्यांच्या मित्राच्या बहीणीबरोबर, ग्लोरियाबरोबर एक अलवार नातं बॅरिस्टरांचं जुळतंही पण त्यांचं खरं प्रेम मात्र इथे, मायदेशी असलेल्या देवयानी गोरेवर असतं.. तिच्याशी त्यांना लग्न करायचं असतं म्हणून ते ग्लोरियाचं प्रेम स्वीकारत नाहीत आणि पुढे भविष्यात मात्र देवयानीशीही त्यांचं लग्न होऊ शकत नाही कारण बॅरिस्टरांच्या घराण्यात असलेलं वेड ..
अशा एकट्याने वाढलेल्या या बॅरिस्टरांना काय तो आधार फक्त मावशीचा. घरात दिवसभर नानासाहेबांचं ते एकासुरात सतत, दत्त दत्त .. दत्ताची गाय.. गायीचं दूध .. दूधाची साय ... ही टकळी दर थोड्या थोड्या वेळाने सुरू.. अशा घरात बॅरिस्टरला मुलगी तरी कोण देणार..?
खरंतर विलायतेहून आल्याने बॅरिस्टरांचे शौकही फारच उच्च दर्जाचे.. उच्च दर्जाची अत्तरं, सुकामेवा, बागेतली सुगंधी फुलं .. या साऱ्या साऱ्याबरोबरच त्यांचा रूबाब, एटीकेट्स मॅनिरिझम यांनीही त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व नि विचार छान बहरलेले.. पण तरीही नशीब मात्र काहीस जणू त्यांच्यावर रूसलेलं.. 
म्हणूनच आपल्यासमोर दिसणारी राधाक्का त्यांना आकृष्ट करत असते पण तरीही त्यांनी स्वतःची मर्यादा कधीही ओलांडलेली नसते. भाऊरावांची ते निरलसपणे.. एखाद्या मित्राने करावी तशी थट्टा करत असतात, राधाक्कांना रोज आनंदाने बागेतली सुवासिक फुलं देत असतात पण त्या सगळ्यात कधीही वासनेचा स्पर्शही नसतो. 
अशातच एकदा बॅरिस्टरांना विलायतेहून पत्र येतं आणि त्यात ग्लोरियाला वेड लागल्याचं कळवलेलं असतं. या पत्राने बॅरिस्टर सैरभैर होतात.. त्यांचा मानसिक तोलच ढळतो, अगदी बिथरल्यासारखी त्यांची अवस्था होते .. मग भाऊरावांशी मोठ्यामोठ्याने आक्रंदत ते आपलं मन मोकळं करत जातात आणि अखेरीस धाय मोकलून रडतात. जीवनाचं हे विद्रुप रूप बॅरिस्टरांसारख्या हळव्या मनाच्या माणसाला पचवणं निव्वळ अशक्य.. पण त्यापुढे ते असहाय्य होत असतात वारंवार आणि त्यानंच त्यांचं मन त्यांना खात असतं. अखेर त्यांच्या मनातलं मळभ थोड्या वेळानं दूर होतं.. नि दिवस पुढे जात रहातात. 
सारं कसं छान सुरू असतं.. राधाक्का भाऊरावांच्या संसारात छोटा गोड बाळ जन्माला येतो तशी वाड्यावर बॅरिस्टरांच्या आणि मावशीबाईंच्याही जीवनात एक नवी दरवळ पसरते. छोट्या बाळाचं अगदी मायेने करण्यासाठी जणू बॅरिस्टर, मावशीबाई आणि राधाक्काची चुरसच चाललेली असते.. पण वरवर दिसणाऱ्या या निखळ प्रेमामागे प्रत्येकच पात्राची राहिलेली अपूरी इच्छा त्या बाळाच्या माध्यमातून पुरी होत असल्याचं प्रसंगानुरूप कळतं तेव्हा आपल्या मनात कालवाकालव होते. एकदा राधाक्काची नजर चुकवून मावशीबाई बाळाला आपल्या पदराखाली धरतात नि ममतेचा पाझर फुटतो का हे देखील तपासून पहातात. नंतर खुसुखुसु हसत जेव्हा ते राधाक्काला ही गोष्ट सांगतात तेव्हा राधाक्काला क्षणभर कसनुसंच होतं.. पण एक स्त्री म्हणून ती मावशीबाईंना शब्दानेही दुखावत नाही उलट मनावर दगड ठेऊन समजूनच घेते.
अशातच एके दिवशी वाड्यातून नानासाहेब कुठेतरी निघून जातात नि घराच्या सुखाला सुरूंग लागतो. बॅरिस्टर नि मावशी हादरतात. आपल्या मोठ्या भावासाठी बॅरिस्टरचं मन तळमळतं. त्यांचा शोध घेणं सुरू होतं. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस असतात. बॅरिस्टरांचे मित्र भाऊसाहेब देखील नानासाहेबांच्या शोधासाठी तब्बल आठवडाभर पावसापाण्यात कुठे कुठे फिरत रहातात आणि अखेरीस तेच आजारी पडतात. अक्षरशः तडकाफडकी पुढल्या अवघ्या दोनच दिवसात भाऊसाहेबांचा मृत्यू होतो. साऱ्या घरादारावर अवकळा पसरते. आता राधाक्का आणि बाळाचं कसं होणार या काळजीने मावशीबाई नि बॅरिस्टर फार फार अस्वस्थ होतात.. पण तरीही ते तिची साथ देणार असतात.. आणि अशातच भाऊरावांचे वडील तात्याराव पोरगा आजारी आहे कळताच गिधाडासारखे राधाक्कावर नजर ठेऊन वाड्यावर आलेले असतात. 
तात्याराव तसा काही फार बरा माणूस मुळातच नसतो. बाई बाटली यांना सोकावलेला तात्याराव .. त्याच्या याच अवगुणांमुळे भाऊराव त्याच्यापासून दूर इथे वाड्यावर स्वतंत्र बिऱ्हाड थाटून रहात असतात. राधाक्कालाही आईवडील नसतात त्यामुळे आज जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तिच्या पाठीशी मावशीबाई आणि बॅरिस्टरांशिवाय कोणीच नसतं. तात्याराव फारच बनेल आणि रंगेल माणूस.. बॅरिस्टरांची आणि मावशीबाईशी आल्या दिवशीच भांडण काढतो नि आपल्या मार्गातील अडथळा मोठ्या शिताफीनी बाजूला करतो. 
दुसऱ्या दिवशी वाड्यातील शांतू न्हाव्याला गुपचुप खोलीवर बोलावतो नि राधाक्काचं केशवपन करून टाकतो. बॅरिस्टरांना हे मुळीच खपत नाही.. राधाक्काचा आक्रोश ऐकून बॅरिस्टर व्याकूळ होतात .. कारण असंही या सगळ्या हिंसक, अमानुष प्रथांवर त्यांचा राग असतोच पण तरीही त्या क्षणी ते असहाय्य झालेले असतात. आता पुढल्या दोन दिवसातच तात्याराव राधाक्का आणि बाळाला घेऊन जाणार आणि पुढे राधाक्काचं कसं मातेरं करणार याची चाहूल मावशीबाई, बॅरिस्टर आणि खुद्द राधाक्काला लागलेली असतेच... 
दुसऱ्याच दिवशी उत्तररात्रीला राधाक्का स्नानासाठी विहीरीवर जाते तेव्हा अर्धवट झोपेतून उठून तिचा सासरा तिच्यापाठी जाऊन उभा रहातो. "तू आंघोळ कर .. पण मी तुला बघनार .. मी तुझ्यावर नजर ठेवनार .. तू कुठं पळून गेलीस म्हंजे .." असलं काहीतरी अर्धवट झोपेत मद्यधुंद अवस्थेत तो बरळतच राधाक्कावर हात टाकतो आणि राधाक्का त्याच्या डोक्यात कळशीच घालते नि त्याला ठार करते. बॅरिस्टर आणि राधाक्कानी मिळून हा कट रचून आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढलेला असतो. राधाक्का आणि बाळाला आता वाड्यावरून कोणीही हलवू शकणार नसतं, तसंच लोकांची तोंडही आपसूकच बंद रहाणार हे आता उघड असतं.
पुढे तीन चार महिने होतात.. एकाकी असहाय राधाक्काला आता केवळ बॅरिस्टरांचा आणि मावशीबाईंचाच आधार असतो.. तसंच मावशीबाईलाही आपल्या या वाड्याची आणि बॅरिस्टरची काळजी वाटत असतेच .. तितकंच स्वतःचं असं अर्धवट राहिलेलं आयुष्य .. त्यालाही राधाक्का सून म्हणून आली तर अर्थ येईल असं वाटून ती एके दिवशी राधाक्काला बॅरिस्टरशी लग्न करायचा सल्ला देते. बॅरिस्टरनी विचारलंच तर नाही म्हणू नकोस पोरी .. असं ती सांगायला आणि त्याच दिवशी सकाळी बॅरिस्टरनं राधाक्काला मागणी घालायला अगदी बोलाफुलाची गाठ पडते.. 
बॅरिस्टरांना असं भुंड डोकं केलेली विधवा, असं विद्रूप झालेली स्त्री अजिबात आवडत नाही हे जाणून राधाक्का केस वाढवायला लागलेली असते, हातात बांगड्या घालायला लागलेली असतेच.. आणि अशातच आता मावशीबाईंचाही आपल्याला विरोध नाही हे लक्षात येऊन ती बॅरिस्टरांना लग्नासाठी रूकार भरायला विषय काढते..पण हाय रे .. नियतीचा खेळ काही निराळाच असतो असं म्हणतात ना.. 
आजही तेच होतं.. राधाक्काशी लग्न करायचं, बाळाचं बाप व्हायचं, पुढे राधाक्काला घेऊन परदेशात जायचं, ग्लोरियाच्या समाधीवर फुलं अर्पण करायची हे सारं सारं स्वप्न जेव्हा सत्यात उतरवण्याची वेळ येते तेव्हा हळव्या मनाच्या बॅरिस्टरांना ते झेपतच नाही.. त्यांना आजवर जी भीती असते तीच खरी ठरते... नानासाहेबांची खुर्ची जणू बॅरिस्टरांना खुणावत असतेच आणि नेमक्या याच क्षणांनी दगा देत बॅरिस्टरलाही अखेर वेड लागतं.. 
प्रभु मजवरी कोपला ... या आर्त सुरांनी नाटकाची सांगता होते आणि आपल्या मनात मात्र एक व्याकूळ सूर दाटून रहातो..
माणसाची स्वप्न, माणसाचं मन नि नियतीचे क्रूर गुंतागुंतीचे खेळ या साऱ्यासाऱ्यापाशी आपलं भावविश्व ठेचकाळत रहातं. 

- मोहिनी घारपुरे - देशमुख


सोमवार, २४ मे, २०२१

'हॉट' मुलींची खरीखुरी गोष्ट



एक ट्रेसा नावाची मुलगी, अवघी एकोणीस वर्षांची..

भरपूर पैसे कमावण्याच्या नादात आयुष्याची एक अशी वाट निवडते ज्याचं तिला सुरूवातीला काहीच वाटत नसतं, ना त्या वाटेचं गांभीर्य, त्यातले धोके नि त्या वाटेनं आयुष्याचं होणारं मातेरं हे काही काही कळण्याची कदाचित तिची क्षमता नसते किंवा त्याकडे ती सहज दुर्लक्ष करत पुढे निघालेली असते.

ही वाट असते .. पॉर्न इंडस्ट्रीची..

ट्रेसा आपल्या पायावर उभं रहाण्यासाठी या इंडस्ट्रीत काम करण्याचा पर्याय स्वेच्छेने निवडते. शहराबाहेर दूर कुठेतरी एकांतातील एका बंगल्यात एका पॉर्न व्यावसायिकाने तळ ठोकलेला. तिथे तो अशा मुलींना पैशाचं अमीष दाखवून तर कधी प्रसिद्धीचं अमीष दाखवून घेऊन येतो. कधी काही ट्रेसासारख्या मुली स्वेच्छेनं पैसाप्रसिद्धीला भुलून या वाटेनं येतात.. आणि मग स्वतःच्या शरीराचा उघडानागडा बाजार मांडतात. या इंडस्ट्रीत पुढे रहाण्यासाठी त्यांना जे काही करावं लागतं ते किती जास्त विकृत ..

नेटफ्लिक्सवरती काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली वेबफिल्म " HOT GIRLS WANTED" ही याच साऱ्या प्रवासाची, जीवनाच्या या आडवळणाची खरीखुरी कथा.

ट्रेसाच्या जीवनात तिचा बॉयफ्रेंड येतो, खरंखुरं प्रेम करणारा, तिच्यासाठी त्याच्या मनात आदर नि प्रेम याशिवाय काही नाही .. आणि तो जेव्हा तिला ही जाणीव करून देतो की तू पैशांसाठी काय करतीयेस बघ .. त्यानंतर ट्रेसाचं मन जागं होतं. त्याच्या प्रेमाने तिचं मतपरिवर्तन होतं. जेव्हा ट्रेसा आपल्या कबिल्यातून काही दिवस सुट्टी घेऊन घरी परतते तेव्हा ती पहिल्यांदा आपल्या या कामाविषयी आईला कल्पना देते. आईचा जीव कासावीस होतो. डोळ्यात पाणी तरळतं. तिचे बालपणीचे फोटो, तिच्या गोड गोड आठवणी सांगून आई तिला पुन्हा आपलसं करू पहाते. ट्रेसाचा निश्चय मात्र पक्का असतो. तिला वाटत असतं या दिशेने जीवन सोपं होईल.. आपल्याला ओळख मिळेल, पैसा तर भरभक्कम मिळेल नि नंतर आपण आपल्या बॉयफ्रेंडसोबत आरामात राहू शकतो.. आईच्या समजावण्याने ट्रेसाचा निश्चय ढळत नाही.

दरम्यान तिचा बॉयफ्रेंड तिला अधूनमधून भेटत रहातो.. एकदा तिला आपल्यासह एका नातेवाईकाच्या वाढदिवसाला नेतो. ट्रेसा तिथे पोचते तो साऱ्यांच्या तिच्याकडे पहायच्या नजरा एका क्षणात बदलतात आणि यावेळी तिला ते जाणवतं. ट्रेसाला काहीतरी वेगळं जाणवतं. परतताना तिच्या मनात योग्य अयोग्यचं द्वंद्व सुरू झालेलं असतं. मग एकदा तिचा बॉयफ्रेंड तिला नीट समजावतो, तो सांगतो .. की हे बघ तू जर हे काम करणार असशील तरीही माझं तुझ्यावरचं प्रेम अबाधीतच आहे आणि राहील .. पण मी मनापासून सांगतो, की या अशा निरर्थक आणि उथळ कामासाठी आपलं जीवन नाही.. आणि मग तो बरंच काही समजावतो. आता ट्रेसाला त्याच्या प्रेमाची मनोमनी खात्री पटते. तोवर पॉर्न व्हिडीओ मध्ये काम करताना तिच्या गाठीशी बरेच अनुभव जमा झालेले असतात. शारीरिक दुखापती तर होतातच पण त्याचबरोबर जगातल्या काही विकृत माणसांच्या विकृती शमवण्यासाठी आपला होणारा वापर म्हणजे नेमकं काय याची जाणीव तिला झालेली असते.

ट्रेसा पुन्हा एकदा सुट्टी घेते नि आपल्या घरी जाते. यावेळी ती आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या आईबाबांना भेटवणार असते. वडीलांना तिने आजवर तिच्या कामाविषयी कळू दिलेलं नसतं, त्यांच्या पुढ्यात उभं राहून आपल्या चुकांची कबूली देणार असते.. ती घरी जाते आणि यावेळी हिंमत करून आपल्या वडीलांना आपल्या कामाविषयी सांगते.. ती सांगते तेव्हा तिचे वडील म्हणतात, मला अंदाज आला होता मुली तू हे काम करतेस पण मी वाट पहात होतो तुझ्या स्वतःहून माघारी फिरण्याची .. वडिलांच्या या उद्गारांनी ट्रेसाचं मन गलबलतं, तिला जाणवतं आपल्या वडीलांचं मोठेपण.. नि आपण किती उथळ वागत होतो आजवर .. तेही केवळ भौतिक सुखांसाठी .. आणि ट्रेसा बदलते.. तिचा बॉयफ्रेंड, तिची आई यांचे प्रयत्न यशस्वी होतात.. ट्रेसा कायमची माघारी परतते..

या फिल्ममध्ये ट्रेसाप्रमाणेच आणखी चार मुलींचीही अशीच खरीखुरी कथा आहे. त्यांपैकी काहींना बदलायची इच्छा आहे, तर काही स्वतःहूनच या मार्गाला आलेल्या आहेत.. काहीजणी इतक्या पुढे गेलेल्या आहेत की त्यांचे परतीचे मार्ग केव्हाच बंद झालेले आहेत.

ही फिल्म पहावीशी वाटली कारण इंटरनेटच्या युगात पॉर्न हा विषय आम्हा तरूण मुलामुलींना अजिबात वर्ज्य नाही ( मी विषय म्हटलंय, व्हिडीओ नाही.. पॉर्न व्हीडीओ पहाण्यावर कायदेशीर बंदी आहे ). इंटरनेटमुळे जग आमच्या मुठीत आलं तशी दूर देशातली माणसंही आमच्या अगदी जवळ येऊन ठेपली. एकवेळ आपल्या शेजारी कोण रहातं हे आम्हाला माहिती नसेल पण इंटरनेटवर निरनिराळ्या देशातले आमच्यासारखे तरूण मुलंमुली आमच्यापैकी अनेकांनी जोडले असतील. अशावेळी, अमेरिकेसारख्या देशात सुरू झालेल्या या पॉर्न इंडस्ट्रीबद्दल आणि तिथे मोठ्या स्वखुशीने काम करण्यास उत्सुक असलेल्या या ट्रेसासारख्या तरूणी आणि तरूणांबद्दल, त्यांच्या भावविश्वाबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या विचारपद्धतीबद्दल आम्हाला उत्सुकता वाटणं स्वाभाविकच आहे.. म्हणूनच केवळ ही फिल्म पाहिली.. आणि अखेर हाताशी लागलं ते फार फार ह्रदयद्रावक होतं. बेगडी, प्लास्टीक दुनियेसाठी प्लास्टीकच्या बाहुल्या बनून माणसांना वागवणारी ही इंडस्ट्री .. यांना मानवी भावभावनांची खोली कशी कळणार .. ? यांना नीतीमत्ता कशी कळणार ..? जे विकलं जातं ते विकत सुटणारे हे लोक .. यांना केवळ भरपूर पैसा हवा नि भरपूर प्रसिद्धी हवी, पण ती कोणत्या टर्म्सवर आपण मिळवतोय याचं त्यांच्यालेखी काहीही महत्त्व नाही. विस्कटलेली आयुष्य नि चुरगळून गेलेली स्वप्न .. पण कदाचित त्याचंही त्यांच्यालेखी काही मोल नाही.. अशा इंडस्ट्रीत ट्रेसासारखी एखादीच कुणी सापडते .. तिच्यासाठी मन तुटतं .. इतकंच .. बाकी काही नाही ..!!

- मोहिनी घारपुरे - देशमुख

शुक्रवार, १४ मे, २०२१

मुंगभजी, खेकडाभजी, बटाटाभजी .. भजीच भजी

तर मंडळी .. माझ्या ब्लॉगला तब्बल पंचवीस हजारांहून अधिक पेजव्ह्यूज मिळाल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार... 
आज यानिमित्ताने ब्लॉगवर खुसखुशीत, खमंग भज्यांची मेजवानी माझ्या लेखनाच्या  माध्यमातून देण्यासाठी मी सज्ज झाले आहे. घरबसल्या काहीतरी खमंग, खुसखुशीत खाण्याची जेव्हा तुम्हाला मनापासून इच्छा होईल तेव्हा तुम्ही झटपट या रेसिपी फॉलो करून भजी बनवून त्यावर सहकुटुंब यथेच्छ ताव मारू शकता..😊😊😊
तर माझ्या मते, भजी बनवण्यासाठी फार महत्वाचं म्हणजे तुमचा अंदाज.. पाणी किती घालायचं याचा अंदाज.. म्हणजे भज्याच्या पिठाची कन्सीटन्सी नेमकी असण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात असलं पाहिजे आणि ते नेमकं किती असावं हे तर आपल्या नजरेनीच आपल्याला कळतं. बर ... बरर... मला जरा हे सगळे अंदाज अनुभवानी बांधता येतात म्हणून .. कदाचित तुम्हाला नेमका अंदाज यायला आधी दोन चार वेळेला भजी बनवणं ट्राय करायला लागेल .. कदाचित .. 
तर .. आज मी तुम्हाला चार प्रकारच्या भज्यांची रेसिपी देते आहे. 

१. मुंगभजी - 
मी केलेली मुंगभजी

- साधारण तीन माणसांसाठी एक ते दीड वाटी मुंगडाळ याप्रमाणात डाळ तीन ते चार तास किमान भिजत घालावी.
- आता मिक्सरमध्ये ही डाळ वाटून घ्यावी
- वाटतानाच त्यामध्ये चार लसाणाच्या पाकळ्या, एक सुकी लाल मिरची, जिरे किंवा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालावे. 
- थोडंसं म्हणजे अगदी दोन चार टेबलस्पून इतकं पाणी तेही गरज वाटल्यास घालून डाळ, भजी तळण्याइतपतच सरसरीत करून घ्यावी.
- आता त्यात एक छोटा चमचा हळद व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि मग छान तापलेल्या तेलात मध्यम आचेवर गरमागरम भजी तळावीत. 
- या भज्यांमध्ये सोडा अजिबात वापरावा लागत नाही तसेच मोहनही घालावे लागत नाही. उलट ते घातल्यास ही भजी जास्त तेलकट होतात हा स्वानुभव आहे. 
- ही खमंग भजी चिंचेच्या आंबटगोड चटणीबरोबर फारच झक्कास लागतात. मात्र ती नसल्यास तुम्ही घरातील कोरड्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर देखील ही भजी खाऊ शकता.

2. खेकडाभजी - 
माझ्या माहेरी, म्हणजे आमच्या नाशकात खेकडा भजी फार प्रसिद्ध आहेत बरं का.. घाबरू नका ही खेकडाभजी म्हणजे खेकडे तळलेले नसतात तर कांदा इतका पातळ चिरायचा आणि त्याची भजी तळायची की जणू त्याला खेकड्याचा आकार येतो म्हणून ती खेकडाभजी ! या खेकडाभजीची रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही कोणत्याही वेळी अवेळी अक्षरशः पंधरा वीस मिनीटं ते अर्धा तासात ही भजी तळून त्यावर यथेच्छ ताव मारू शकता. 
मी केलेली खेकडाभजी

- चार सहा मध्यम आकाराचे कांदे उभे आणि शक्य तितके पातळ चिरायचे.
- आता त्यावर आपल्या चवीनुसार मीठ, तिखट घालायचं आणि झाकून पंधरा मिनीटं बाजूला ठेऊन द्यायचं.
- पंधरा मिनीटात या कांद्याला मस्त पाणी सुटतं.
- आता या पाणी सुटलेल्या कांद्यात जितकं बसेल तितकंच बेसन त्यात घालून मिश्रण छान कालवायचं. अगदी घट्ट वाटत असल्यास एखाद दोन चमचे पाणी घालू शकता पण शक्यतो  पाणी घातलंच नाही तर उत्तम !
- आता या पिठात दोन चार चिमूटभर ओवा हातात मळून मग घालायचा आणि चिमटीभर हळद घालायची. तिखटपणा जास्त आवडत असल्यास आणखी तिखट घालायचं.
- मग गरमागरम तेलात मध्यम आचेवर ही खेकडाभजी थोडं थोडं मिश्रण घालत तळून घ्यायची. 
- ही भजी तळलेल्या हिरव्या मिरच्यांवर मीठ भुरभुरवून त्यासोबत किंवा लसणाच्या कोरड्या चटणीबरोबर खायला भन्नाट लागतात. 
- या भज्यांमध्ये आवश्यक वाटल्यास चमचाभर गरम तेलाचं मोहन किंवा अगदी चिमूटभर सोडा घालू शकता पण न घातला तरीही चालतो. भजी तेल जास्त न पिता खुसखुशीत होतात.

3. बटाटा भजी - 
मी सासरी आले तो एका वर्षी महालक्ष्मीच्या वेळी पंक्ती बसल्या. गरमागरम बटाटा भजी करायचं ठरलं. तेव्हा माझ्या हातची ही भजी खाऊन सारीजण खूश झाली होती अशी एक गोड आठवण या भज्यांसह माझ्या मनात कायमची कोरलेली आहे. या भज्यांना त्या दिवशी माझ्या सासरी 'चिप्सची भजी' असं छान नामकरणही कोणीतरी केल्याचं स्मरणात आहे. तर ही अशी बटाटा भजी ..
- बटाटा भजी करण्यासाठी आधी चार मध्यम ते मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या.
- मग त्याच्या पातळ पातळ चकत्या, बटाट्याच्या चिप्ससाठी कापतो नं तशा कापा. अगदी चक्क स्लायसरचाही वापर करू शकता. 
- या चकत्या लगेचच मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा.
- आता भज्यांसाठी भिजवतो तसं बेसन किंचितशी हळद, चवीनुसार मीठ, तिखट आणि छोटा चमचाभर ओवा हातावर मळून मग त्या पिठात घाला व पाणी घालून फार घट्ट नको नि फार सैल नको अशा कन्सिस्टन्सीत भिजवून घ्या. 
- आता बटाट्याची एक एक चकती त्या पिठात बुडवून गरमागरम तेलात मंद ते मध्यम आचेवर तळा. सोडा किंवा मैहन घालण्याची तशी गरज नाही.
- ही भजी गरमागरमच खा, नाहीतर ती लवकरच मऊ पडतात हे लक्षात ठेवा. 
- कोरडी कोणतीही चटणी या भज्यांबरोबर अफलातून लागते तसंच हिरव्या मिरच्या तळून त्याही या भज्यांबरोबर मस्त लागतात. 
मी केलेली ओव्याच्या पानांची आणि बटाट्याची भजी


4. ओव्याच्या पानांची भजी किंवा गिलक्याची भजी - 

वरीलप्रमाणे पीठ भिजवून त्यात ओव्याची पानं किंवा गिलक्याच्या चकत्या घालून भजी तळा .. ही दोन्हीही प्रकारची भजी फारच अप्रतिम लागतात. विशेषतः सणावाराला पंक्तीत वाढण्याकरीता गिलक्याच्या भज्यांना अग्रक्रम दिला जातो हे काही ठिकाणी मी निरीक्षले आहे.. 

- मोहिनी घारपुरे - देशमुख 


Translate

Featured Post

अमलताश