आज यानिमित्ताने ब्लॉगवर खुसखुशीत, खमंग भज्यांची मेजवानी माझ्या लेखनाच्या माध्यमातून देण्यासाठी मी सज्ज झाले आहे. घरबसल्या काहीतरी खमंग, खुसखुशीत खाण्याची जेव्हा तुम्हाला मनापासून इच्छा होईल तेव्हा तुम्ही झटपट या रेसिपी फॉलो करून भजी बनवून त्यावर सहकुटुंब यथेच्छ ताव मारू शकता..😊😊😊
तर माझ्या मते, भजी बनवण्यासाठी फार महत्वाचं म्हणजे तुमचा अंदाज.. पाणी किती घालायचं याचा अंदाज.. म्हणजे भज्याच्या पिठाची कन्सीटन्सी नेमकी असण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात असलं पाहिजे आणि ते नेमकं किती असावं हे तर आपल्या नजरेनीच आपल्याला कळतं. बर ... बरर... मला जरा हे सगळे अंदाज अनुभवानी बांधता येतात म्हणून .. कदाचित तुम्हाला नेमका अंदाज यायला आधी दोन चार वेळेला भजी बनवणं ट्राय करायला लागेल .. कदाचित ..
तर .. आज मी तुम्हाला चार प्रकारच्या भज्यांची रेसिपी देते आहे.
- साधारण तीन माणसांसाठी एक ते दीड वाटी मुंगडाळ याप्रमाणात डाळ तीन ते चार तास किमान भिजत घालावी.
- आता मिक्सरमध्ये ही डाळ वाटून घ्यावी
- वाटतानाच त्यामध्ये चार लसाणाच्या पाकळ्या, एक सुकी लाल मिरची, जिरे किंवा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालावे.
- थोडंसं म्हणजे अगदी दोन चार टेबलस्पून इतकं पाणी तेही गरज वाटल्यास घालून डाळ, भजी तळण्याइतपतच सरसरीत करून घ्यावी.
- आता त्यात एक छोटा चमचा हळद व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि मग छान तापलेल्या तेलात मध्यम आचेवर गरमागरम भजी तळावीत.
- या भज्यांमध्ये सोडा अजिबात वापरावा लागत नाही तसेच मोहनही घालावे लागत नाही. उलट ते घातल्यास ही भजी जास्त तेलकट होतात हा स्वानुभव आहे.
- ही खमंग भजी चिंचेच्या आंबटगोड चटणीबरोबर फारच झक्कास लागतात. मात्र ती नसल्यास तुम्ही घरातील कोरड्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर देखील ही भजी खाऊ शकता.
2. खेकडाभजी -
माझ्या माहेरी, म्हणजे आमच्या नाशकात खेकडा भजी फार प्रसिद्ध आहेत बरं का.. घाबरू नका ही खेकडाभजी म्हणजे खेकडे तळलेले नसतात तर कांदा इतका पातळ चिरायचा आणि त्याची भजी तळायची की जणू त्याला खेकड्याचा आकार येतो म्हणून ती खेकडाभजी ! या खेकडाभजीची रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही कोणत्याही वेळी अवेळी अक्षरशः पंधरा वीस मिनीटं ते अर्धा तासात ही भजी तळून त्यावर यथेच्छ ताव मारू शकता.
![]() |
मी केलेली खेकडाभजी |
- चार सहा मध्यम आकाराचे कांदे उभे आणि शक्य तितके पातळ चिरायचे.
- आता त्यावर आपल्या चवीनुसार मीठ, तिखट घालायचं आणि झाकून पंधरा मिनीटं बाजूला ठेऊन द्यायचं.
- पंधरा मिनीटात या कांद्याला मस्त पाणी सुटतं.
- आता या पाणी सुटलेल्या कांद्यात जितकं बसेल तितकंच बेसन त्यात घालून मिश्रण छान कालवायचं. अगदी घट्ट वाटत असल्यास एखाद दोन चमचे पाणी घालू शकता पण शक्यतो पाणी घातलंच नाही तर उत्तम !
- आता या पिठात दोन चार चिमूटभर ओवा हातात मळून मग घालायचा आणि चिमटीभर हळद घालायची. तिखटपणा जास्त आवडत असल्यास आणखी तिखट घालायचं.
- मग गरमागरम तेलात मध्यम आचेवर ही खेकडाभजी थोडं थोडं मिश्रण घालत तळून घ्यायची.
- ही भजी तळलेल्या हिरव्या मिरच्यांवर मीठ भुरभुरवून त्यासोबत किंवा लसणाच्या कोरड्या चटणीबरोबर खायला भन्नाट लागतात.
- या भज्यांमध्ये आवश्यक वाटल्यास चमचाभर गरम तेलाचं मोहन किंवा अगदी चिमूटभर सोडा घालू शकता पण न घातला तरीही चालतो. भजी तेल जास्त न पिता खुसखुशीत होतात.
3. बटाटा भजी -
मी सासरी आले तो एका वर्षी महालक्ष्मीच्या वेळी पंक्ती बसल्या. गरमागरम बटाटा भजी करायचं ठरलं. तेव्हा माझ्या हातची ही भजी खाऊन सारीजण खूश झाली होती अशी एक गोड आठवण या भज्यांसह माझ्या मनात कायमची कोरलेली आहे. या भज्यांना त्या दिवशी माझ्या सासरी 'चिप्सची भजी' असं छान नामकरणही कोणीतरी केल्याचं स्मरणात आहे. तर ही अशी बटाटा भजी ..
- बटाटा भजी करण्यासाठी आधी चार मध्यम ते मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या.
- मग त्याच्या पातळ पातळ चकत्या, बटाट्याच्या चिप्ससाठी कापतो नं तशा कापा. अगदी चक्क स्लायसरचाही वापर करू शकता.
- या चकत्या लगेचच मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा.
- आता भज्यांसाठी भिजवतो तसं बेसन किंचितशी हळद, चवीनुसार मीठ, तिखट आणि छोटा चमचाभर ओवा हातावर मळून मग त्या पिठात घाला व पाणी घालून फार घट्ट नको नि फार सैल नको अशा कन्सिस्टन्सीत भिजवून घ्या.
- आता बटाट्याची एक एक चकती त्या पिठात बुडवून गरमागरम तेलात मंद ते मध्यम आचेवर तळा. सोडा किंवा मैहन घालण्याची तशी गरज नाही.
- ही भजी गरमागरमच खा, नाहीतर ती लवकरच मऊ पडतात हे लक्षात ठेवा.
- कोरडी कोणतीही चटणी या भज्यांबरोबर अफलातून लागते तसंच हिरव्या मिरच्या तळून त्याही या भज्यांबरोबर मस्त लागतात.
![]() |
मी केलेली ओव्याच्या पानांची आणि बटाट्याची भजी |
4. ओव्याच्या पानांची भजी किंवा गिलक्याची भजी -
वरीलप्रमाणे पीठ भिजवून त्यात ओव्याची पानं किंवा गिलक्याच्या चकत्या घालून भजी तळा .. ही दोन्हीही प्रकारची भजी फारच अप्रतिम लागतात. विशेषतः सणावाराला पंक्तीत वाढण्याकरीता गिलक्याच्या भज्यांना अग्रक्रम दिला जातो हे काही ठिकाणी मी निरीक्षले आहे..
- मोहिनी घारपुरे - देशमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा