गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

हा माझा मार्ग एकला ...

 

तसं पहायला गेलं तर 'हा माझा मार्ग एकला' हे तर प्रत्येकाच्याच जीवनाचं सत्य आहे. कदाचित म्हणूनच इथे जन्माला आलेल्या नवजात अर्भकापासून ते अगदी जर्जर झालेल्या वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणावरही कधीही वाईट दिवसांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, आणि येतेही!

ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून काम केलेला आणि तुफान गाजलेला हा पहिला चित्रपट, आणि म्हणूनच 'हा माझा मार्ग एकला' पहाण्याची मला खूप उत्सुकता होती ती अलीकडेच यूट्यूब कृपेने पूर्ण झाली. काहीही म्हणा हे जुने श्वेतश्यामल चित्रपट फार खोल असा काहीतरी जीवनाचा आशय आपल्यापुढे सुंदर आणि सहजतेने उलगडून ठेवतात यात दुमत नाही. 

लहानगा मुलगा ... अतुल त्याचं नाव. त्याची आई त्याला जन्म देताच देवाघरी जाते. अतुलला आई मिळावी म्हणून अतुलचे वडील लवकरच दुसरं लग्न करतात. सावत्र आई घरी येते आणि नात्याप्रमाणेच या छोट्याशा बालकाशी मनातून आकस ठेवते. याच्या जबाबदारीचं लोढणं आपल्या गळ्यात नको, मग यापासून सुटका कशी करून घेता येईल या हेतूने निरनिराळे कट रचून सावत्र आई अतुलला खूप त्रास देते. वर घरात कांगावा की हा वाया जाईल, मोठा झाला की चोऱ्या करील म्हणून आपण याला शिस्त लावण्यासाठी अशा वागतो. 

एक दिवशी सावत्र आई लहानग्या अतुलला काहीतरी क्षुल्लक कारणावरून उपाशीच ठेवते. वडील तिला समजावयला जातात तर ती लगेच त्यांना माहेरी जाण्याची धमकी देते. वडील गरीब बिचारे गप्प बसतात, वर म्हणतात, 'तुम्हा माय लेकरांच्यात मी इथून पुढे कधीच पडणार नाही'. मग काय, आईला आणखीनच बरं होतं. रात्री वडील आपल्या पोराला लपून छपून दोन पेढे आणि पाणी आणून देतात, बाळ खाऊन घे म्हणतात, पण मुलगाही स्वाभिमानी... तो ठामपणे नकार देतो. 

दुसऱ्या दिवशी त्याची वरच्या खोलीत रहाणारी चिमुकली मैत्रीण त्याला बोलवायला येते. ती म्हणते, "अतुल चल ना, माझ्या बाबांनी मला नवी झुकझुकगाडी आणलीये, ती कशी चालते मी तुला दाखवते." अतुल म्हणतो, "नको, आईला आवडणार नाही मी आलेलं..." तशी अलका म्हणते... "हे काय रे अतुल ... तुला नै दाखवली तर मला पण मजा नै येणार... चल की ..." इवलुसा अतुल तिच्या या गोड बोलण्याचा मान ठेऊन भरकन तिचा हात धरून तिच्या घरी जातो. अलका आईला सांगते, "आई अतुलला दाखव ना माझी नवी आगगाडी, आई म्हणते आणते हं, तुम्ही बसा इथे खेळत... "आई स्वयंपाकघरात जाते मुलांसाठी खायला आणायला आणि आगगाडी आणायला तर इकडे अतुलचं लक्ष फोनकडे जाते. तो अलकाला विचारतो, "अलका हे काय आहे गं ?" अलका सांगते "अरे यावरून माझे बाबा लांब लांब कोणाशी तरी बोलत असतात. हा फोन आहे." अतुल म्हणतो, "अलका, यावरून माझ्या देवाघरी गेलेल्या आईशीपण बोलता येईल का गं ?" अलका म्हणते ..." हो ... येईल की ...!"

दोघं झटक्यात पुढे होऊन फोनवरून काहीतरी नंबर डायल करतात. जुन्या काळी दोन नंबर जोडून देण्याचं काम फोन ऑपरेटर्स करत असत. तसा हा फोन एका ऑपरेटरला येते. पलीकडून अतुल बोलतो, "मला की नै माझ्या देवाघरी गेलेल्या आईशी बोलायचंय..." ऑपरेटर आपल्या सहकारी मैत्रीणीला कुजबुजत सांगते... "बघ ना.. दोन छोट्या मुलांनी खेळाखेळात फोन लावलाय आणि मुलगा म्हणतोय त्याला त्याच्या आईशी बोलायचंय .. ती देवाघरी गेलीये..." ही मैत्रीण गमतीत लगेच म्हणते, "हो .. आण मी बोलते त्याच्याशी ..." आणि मग ती चिमुकल्या अतुलशी त्याची देवाघरी गेलेली आई बनून बोलते. तो सांगतो, "आई तू का गेलीस देवाघरी...? नवी आई मला खूप त्रास देते, उपाशीच ठेवते, मारते. ती वाईट आहे... मला तू हवीयेस आई ... परत ये ना...!" त्याच्या व्याकूळ आर्त सादेला उत्तरं देताना ही टेलीफोन ऑपरेटरही द्रवते. तिला जणू मायेचा पाझर फुटतो, फोन ठेवताक्षणी तिच्या डोळ्यातून आसवं ओघळू लागतात. 

इकडे सावत्र आई अतुलला शोधत कानोसा घेत वरती आलेली असते. लहानगा अतुल अलकाच्या आईनं आग्रहाने दिलेला खाऊ खात आईविषयी काहीतरी सांगायला लागतो तोच सावत्र आई आत शिरते आणि अतुलला, "इथे येऊन माझ्या काड्या करतोस काय रे ?" म्हणत पुन्हा चांगला चोप द्यायला लागते. अतुल बिचारा भुकेला, मार खाल्लेला घरी येतो. संध्याकाळी वडील येतात, त्यांच्यापुढे पुन्हा ही आई त्याच्याशी गोड वागते पण खायला देत नाही, त्याला घराबाहेर उंबरठ्यावर झोपायला लावते. वडील आपले बायकोवेडे... मधे पडत नाहीत. 

दुसरा दिवस उजाडतो. आता अंतिम डाव. आई अतुलला गोड बोलून किराणा आणायला लावते. लहानगा अतुल ओझं कसंबसं उचलून पायऱ्या चढत वर येत असतो तर सावत्र आई समोर येते आणि त्याच्या हातातलं ओझं घेऊन त्याच्याशी गोड बोलू लागते. आता लवकर हातपाय तोंड धुवून घे म्हणजे छान गरम जेवायला वाढते असं बोलून त्याला आत पाठवते. तो इवलुसा पोर मातेच्या त्या शब्दांनी हुरळून जातो. आतमध्ये जाऊन आवरायला लागतो, तो इकडे कारस्थानी आई काय करते माहितीये ... दोरीवर लहानग्या अतुलची चड्डी वाळत असते त्याच्या खिशात दहा रूपयाची नोट ठेऊन देते आणि अतुलला कपडे बदलायला देताना जाणीवपूर्वक ही चड्डी घालायला देते. वडील घरी येतात तो ही कांगावा करू लागते, "सकाळी तुम्ही मला दिलेली दहा रूपयाची नोट हरवली, कुठे सापडत नाही." वडील चटकन अतुलला विचारू लागतात, "तू तर नाही ना घेतलीस... ?" आई मुद्दाम नाटक करते म्हणते ... "काय आता याची झडती घ्याल का तुम्ही ...?" तर वडील तिच्या बोलण्यात अडकतात आणि रागात अतुलची झडती घेण्याच्या उद्देशाने त्याच्या खिशात हात घालतात, तो त्याच्या खिशातून ती नोट बाहेर येते. आईचा कट चांगलाच यशस्वी होतो. अतुलला बिचाऱ्याला त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून रात्रभर घराबाहेर झोपावं लागतं. रात्री आईवडील आपापसात बोलत असतात तेव्हा आई म्हणते असते, "उद्या की नै पोलीस बोलवा आणि त्याला पोलीसांच्याच ताब्यात द्या, म्हणजे तो सुधारेल, बघा.. नाहीतर मोठा होऊन अट्टल गुन्हेगार होईल तो... " अतुलच्या कानावर हे शब्द पडतात आणि त्या रात्री तो चिमुकला रडत रडत घरातून पळून जातो. 

आता पुढे काय ...?

म्हणतात ना, देवासारखं कोणीतरी पाठीशी उभं रहातंच लेकरांच्या...अगदी त्याच न्यायाने अतुलला एक घर दिसतं. तो त्या घराच्या अंगणात झोपलेल्या माणसाला पाहतो. ही व्यक्तीरेखा साकारलीये, ज्येष्ठ अभिनेते राजा परांजपे यांनी...

नशेत धुंद असलेल्या त्या माणसाच्या खाटेखाली आपल्या अंगाची मुटकुळी करून अतुल बिचारा झोपतो. सकाळ होताच माणूस उठतो, खाट उचलून ठेवायला जातो तो खाली हा दिसतो. हा कोण छोटा आला म्हणून त्याची चौकशी करतो. दोन दिवस पोटात अन्नाचा कणही नसलेल्या अतुलला चहा आणि पाव खायला देतो. हळुहळू अतुलची गोष्ट त्याला कळते. त्याच्याही मनात या चिमुकल्यासाठी मायेचा पाझर फुटतो. पुढे एका प्रसंगात उलगडा होतो की हा माणूस अतुलच्या खऱ्या आईचा लग्नापूर्वीचा प्रियकर असतो. अतुल आपल्या प्रेयसीचा मुलगा आहे हे कळताच आता या माणसालाही जीवनाची दिशा सापडते. या मुलाचा नीट सांभाळ करायचा, त्याला शाळेत घालायचं या विचारात हा माणूस स्वतःचं जीवनही मार्गी लावतो. त्यात राजा परांजपेंचा एक जवळचा मित्र म्हणून ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकरांचीही भूमिका आहे. मग एकदा ते या मुलाचं दैव आझमावून पाहू म्हणून मुलाच्या हातानी लॉटरीचं तिकीट काढतात. 

उत्तरार्धात चित्रपटाचं कथानक ज्या काही बऱ्या वाईट वळणांनी पुढे नेलं आहे ते शब्दात मांडणे खरंतर सोपे आहे, पण त्यातील माधुर्य अनुभवण्यासाठी, बालकलाकार सचिनचा गोंडस अभिनय पहाण्यासाठी हा चित्रपट पहायलाच हवा.

अखेर चिमुकल्या जिवाला उदंड प्रेम लाभतं आणि सगळं नीट होतं असा सुखांत असलेला हा चित्रपट मराठीतला मैलाचा दगड न ठरला असता तरच नवल.

या चित्रपटाचा उल्लेख जर बाबुजींचं स्मरण न करता झाला तर ते फारच अयोग्य ठरेल. चित्रपटाचे शीर्षक गीत, हा माझा मार्ग एकला ऐकताना आणि जर अलीकडेच तुम्ही स्वरगंधर्व हा बाबुजींच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहिला असेल तर त्यातील आर्तता, बाबुजींच्या स्वरात किती आणि कशी उमटली आहे याची जाणीव होईल आणि तुमचेही डोळे भरून आल्यावाचून रहाणार नाहीत. तुमचंही मन क्षणात द्रवेल हे निश्चित.

जीवनाचं चाक कोणाचं कोणत्या दिशेनं जाईल हे सांगू शकत नाही, म्हणूनच, हा माझा मार्ग एकला हे त्रिकालाबाधीत सत्य आहे !

मित्रांनो, 

आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत. माझा ब्लॉग अनेक लोकं वाचतात, पण आपण जर कमेंट करून खाली आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, आपली ओळख मला कळवलीत तर ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या प्रामाणिक वाचकांपर्यंत पोचण्याचा माझाही एकला मार्ग एक नवी दिशा आणि ओळख माझ्या आयुष्याला देण्यात यशस्वी ठरेल. 

म्हणूनच, ब्लॉग वाचलात आणि आपल्याला तो आवडला किंवा आवडला नाही तरीही मला कमेंट करून जरूर कळवत रहा. तसंच इतरांनाही ब्लॉगची लिंक शेअर करा जेणेकरून ब्लॉगमधील विचार इतरांपर्यंत पोचतील.

धन्यवाद

- मोहिनी घारपुरे देशमुख

mohineeg40@gmail.com

( Photo Credit - Google and Times of India )


८ टिप्पण्या:

  1. अतुल देवाघरी गेलेल्या आईशी बोलतो (टे ऑपरेटर)शी हे वाचताना डोळ्यात अश्रू आले अगदी माझ्या बाबांचं लहानपण आठवलं त्यांचे आईवडील दोघेही लवकर देवाघरी गेल्याने त्यांच्या पश्चात त्यांचे इतरांनी केलेले हाल ...आठवले ,छान लिहिले आहे मोहिनीजी आपण

    उत्तर द्याहटवा

Translate

Featured Post

अमलताश