साधारणतः दहाएक वर्षांपुर्वीची मी..
छानच दिसायचे .. शिवाय दहाएक वर्षांपूर्वीची, म्हणजे अत्ता आहे त्यापेक्षा अधिक तरूण, सळसळत्या उत्साहाची ..आपल्या सुंदर रूपाला पाहून करिअरच्या वाटेतलं मॉडेलिंगचं ग्लॅमरस जग मलाही अन्य चारचौघा उमद्या, सुंदर मुलींसारखं खुणावल्यावाचून राहिलं नाही. पण तरीही या वाटेतले खाचखळगे ऐकून चांगलेच माहीत होते म्हणून मी काहीशी बावरलेली होते, नेमकी सुरूवात कशी कुठून करावी हे लक्षात येत नव्हतं.
मग माझ्या लहान भावाच्या एका फोटोग्राफर मित्राशी एकदा गप्पांच्या ओघात मी माझी मॉडेलिंगची प्रचंड इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. त्याने त्याच्या ओळखीच्या एका फोटोग्राफरकडे मला नेलं आणि त्यांच्याशी या क्षेत्राविषयी आम्ही बोललो. मला या क्षेत्रात काम करायला आवडेल, किंबहुना यातच मी करिअर करू इच्छिते वगैरे सांगितल्यावर फोटोग्राफर काकांनी चेहऱ्यावर पूर्ण प्रोफेशनॅलिझम आणून मला जुजबी मार्गदर्शन केलं, शिवाय काही असाईनमेंट्स असतील तर संधी देईन असंही म्हणाले. मीही आनंदाने त्यांचा निरोप घेतला.
त्या काळात मी एका वाचनालयात पार्टटाईम, म्हणजे संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत जॉब करत होते. फोटोग्राफर काकांना भेटल्यानंतर अगदी आठवडाभरानंतरच ते संध्याकाळच्या वेळी योगायोगाने याच लायब्ररीचे सदस्य असल्याने तेथे आले. पुस्तक बदलून परत निघताना त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले, त्यांनी मला त्यांच्याकडे एक असाईनमेंट असल्याचे सांगितले.
ही असाईनमेंट एका सुप्रसिद्ध चित्रकार काकांची होती. त्यांना पोर्ट्रेट मॉडेल हवी होती. त्या मॉडेलचे फोटो काढून नंतर त्या फोटोंवरून ते पोर्ट्रेट काढणार होते. फोटोग्राफर काकांनी मला त्याची माहिती दिली आणि तुला इंटरेस्ट असेल तर स्टुडीयोत येऊन भेट असंही सांगितलं. या असाईनमेंटचं मानधन चित्रकार काका देतील ते पैसे आणि शिवाय मी माझ्याकडून तुला एक फुल मेकअप वगैरे करून तुझा पोर्टफोलिओ देईन असं फोटोग्राफर काकांनी कबूल केलं. मला या क्षेत्रातलं काहीही ज्ञान नसल्याने पहिली संधी, ती देखिल इतकी चांगली चालून आली आहे या संधीचं आपण सोनं करायचं या विचारानी मी सहज तयार झाले.
मग, भावाच्या त्या मित्राला, ज्यानी फोटोग्राफर काकांची आणि माझी ओळख करून दिली होती त्याला भेटून ही असाईनमेंट मिळाल्याचे सांगितले व त्याचे आभार मानले. नंतर आम्ही दोघंही त्या असाईनमेंट करीता आवश्यक ते कपडे जमवण्यासाठी काही आणखी मैत्रिणींना भेटलो आणि कपड्याची जमवाजमव करून ठरल्या दिवशी मी स्टुडीयोत हजर झाले.
............
पहिलीच असाईनमेंट असल्याने मी काहीशी घाबरलेली होते. पण सेटवर कॅमेरा ऑन झाला आणि मी एक से एक पोझेस देऊ लागले. चित्रकार भावंड तर माझ्यावर बेहद खूश होते. ते सांगतिल तशा पोझेस मी आत्मविश्वासाने देत होते. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही असाईनमेंट सुरू होती. या वेळात माझे तब्बल 850 फोटोज क्लिक करण्यात आले पण मला आपले एवढे फोटो काढले गेले आहेत याची सुतराम कल्पना नव्हती. असाईनमेंट संपली. प्रत्येकजण माझ्या कामाचं भरभरून कौतुक करत होता. मीही आपलं काम लोकांना आवडलं म्हणून हुरळून गेले होते. त्यामुळेच की काय अनेक गोष्टी माझ्या त्या क्षणी लक्षातच आल्या नाहीत.
निघताना चित्रकार काकांनी माझ्या हातावर 1000 रुपयांचा चेक ठेवला, तेव्हाही मला त्या कमाईचं मोल खूप वाटलं होतं इतकी मी निरागस होते. 850 क्लिक्सच्या बदली केवळ 1000 रूपये ... पण मला वाटलं, की चित्रकार काका पुढे चित्रावर मॉडेल म्हणून आपल्या नावाचा उल्लेख करतीलच .. म्हणून मी वाद घातला नाही आणि मिळालेलं मानधन स्वीकारलं.. फोटोग्राफर काकांना नमस्कार करून मी निघाले.. आनंदाच्या भरात, करिअरची नवी सुरूवात चांगली झाली, अशा विचारात घरी आले.
.............
त्यानंतर अधेमधे मी फोटोग्राफर काकांना फोन करून असाईनमेंट आहे का, काही काम मिळेल का विचारत राही पण ते मला टाळून देत. चार पाच महिन्यांनी मला जाणवलं, की यांनी आपल्याला आपली फुल मेकअप वाली असाईनमेंट त्यांच्याकडून देणार होते ती तर अजून दिलीच नाही, म्हणून मी त्याबाबत त्यांना विचारणा करू लागले. मध्यंतरीच्या काळात जवळपास पोर्ट्रेट म़ॉडेलिंगला वर्ष होत आलं होतं. मग असंच एकदा मी फोटोग्राफर काकांना फोन केला, तेव्हा त्यांनी अचानक मला मेकअपवाली असाईनमेंट करूया म्हणून संमती दर्शवून अमक्या तारखेला स्टुडीयोत ये असं सांगितलं. पिंक आणि ब्ल्यू थीम ठरली. त्यानुरूप मी पुन्हा कपड्यांची जमवाजमव करून स्टुडीयोत हजर झाले. पहाते तर तिथे एक मेकअप आर्टीस्ट हजर होता. त्याला मुंबई सोडून नाशिकला जम बसवायचा होता. म्हणजे हा मेकअपवाला फोटोग्राफर काकांना माझ्या असाईनमेंटसाठी आयताच मिळाला होता तर .. मग त्याने ट्रायल मेकअप करून दाखवा अशा बरहुकूम माझ्या चेहऱ्यावर मेकअप केला, पिंक आणि ब्लू थीमच्यानुसारे.. फोटोग्राफर काकांनी माझे बरेच फोटो काढले.. ही माझी दुसरी असाईनमेंट होती, यावेळी मी माझ्या आजीला सोबत घेऊन आले होते. आपल्याला काम मिळतेय, पुढे मागे चांगली कामं मिळतील या विश्वासावर मी याही वेळेला फोटोग्राफर काकांवर पूर्ण विश्वास ठेवला.
या असाईनमेंटमधले माझे सगळेच फोटो फारच छान आले होते. त्यानंतर एक दिवस फोटोग्राफर काकांनी मला बोलावून माझा एक फोटो स्टुडीयोच्या होर्डींगवर वापरण्याकरीता विचारणा केली.. मीही मानधनाची अपेक्षा न करता त्यांना संमती दिली आणि आनंदाने घरी गेले. होर्डींग किती दिवसांकरीता लावणार, त्याबदली मला काय मिळणार, मानधन कोणत्या स्वरूपात देणार हे प्रश्नही मला भाबडीला तेव्हा पडले नाही, याची आजही खंत वाटते.
..............
स्टुडीयोचं होर्डींग माझ्या फोटोसकट मोठ्या दिमाखात रस्त्याच्या एका कडेला लागलं. ते पाहून मलाही फारच आनंद झाला.. आता हे होर्डींग पाहून आपल्याला आणखी काम नक्कीच मिळेल असा विश्वासही वाटायला लागला होता... पण हाय रे .. ना काम मिळालं, ना पैसे .. नुसतीच वाट पहात राहीले... चित्रकार काकांना तर माझ्या फोटोवरून काढलेल्या पोर्ट्रेटवर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं.... नंतरही अनेक ठिकाणी त्यांनी प्रदर्शनं भरवली, स्पर्धेत ती चित्र पाठवली ...
पण मी.... मला या असाईनमेंट्सच्या मोबदल्यात माझ्या मेहेनतीच्या मोबदल्यात काहीही मिळालं नाही. ना माझं कुठे नाव आलं, ना माझ्या फोटोंचा मी कुठे वापर करू शकले.. कधीही.
........................
त्यानंतर पाच एक वर्षांचा काळ गेला असेल. मी एकदा अशीच अचानक त्या फोटोग्राफर काकांच्या स्टुडीयोत धडकले तेव्हा मला जे दिसलं त्यानी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काकांनी पर्सनलाईज्ड वस्तूंचा व्यवसाय सुरू केला होता. म्हणजे उशा, कीचेन, कॉफीमग, फोटोफ्रेम वगैरे वस्तुंवर तुमचे फोटो .. आणि या सर्व वस्तुंच्या सँपलवर ठिकठिकाणी माझे फोटोज वापरलेले होते. हे पाहून मी चिडले... काकांनी परस्परच माझ्या फोटोंचा वापर व्यावसायिक हेतूने सुरू केला होता. आता मी त्यांना मला काही काम तरी द्यावे अशी विनंती केली किंवा मला या सर्व फोटोजच्या तुम्ही करत असलेल्या वापराच्या बदल्यात एक ठोक रक्कम देऊन टाकावी अशी मागणी केली ... आता काकांनी आपल्या वयाचा फायदा घेत माझ्या घरीच येऊन माझ्या आईवडीलांना मध्ये घेतलं, संपूर्ण चित्र असं की, तुमची मुलगी आमच्या प्रगतीमुळे जळून आता आमच्याकडे पैसे मागायला लागली आहे ... यावर मी माझ्याशी व्यवहार झाला आहे, आईबाबांना मध्ये घेऊ नका असं म्हटलं तर फोटोग्राफर काकांनी सर्व सँपलच्या वस्तू माझ्या हवाली करून टाकल्या... अगदी कॅलेंडरमधलं माझा फोटो वापरलेलं एक पान फाडून मला दिलं... पण पैसे मात्र दिले नाहीत.. खरंतर पाच वर्षांचा कालावधी, माझ्या फोटोजचा तेवढ्या मोठ्या काळपर्यंत केलेला बिनधास्त वापर या सगळ्याच्या बदल्यात मला फोटोंची ओरीजीनल प्रिंट, आणि योग्य तो मोबदला देणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही ...
.......
त्या दिवशी मला या मोहमायी दुनियेचं खरं रूप कळलं... केवळ आणि केवळ कॉंट्रॅक्ट करण्याचं शहाणपण न दाखवल्याने आणि स्वतःच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा वय लहान असल्याने म्हणा, या सगळ्यात माझ्या पदरी केवळ मनस्तापच आला... मी असाईनमेंटच्या वेळी नुसतीच झिजत गेले, काम मिळेल या आशेवर आयुष्याची महत्त्वाची वर्ष सरून गेली, पण माझ्या हाती काहीही लागलं नाही.. ना पैसे, ना नाव , ना यश, ना भविष्याची सुंदर स्वप्न ..
इतकेच काय तर चित्रकार काकांनी कुठेही माझं नाव येऊ दिलं नाही, शिवाय, त्यांच्या असाईनमेंटमधल्या 850 फोटोजपैकी एकही फोटो मी कुठेही वापरू शकत नाही अशी त्यांची अट आजही आहे.. कारण, त्या असाईनमेंटमधल्या फोटोजवरून अन्य चित्रकार सहज चित्र काढू शकेल व काकांची मोनोपोली जाईल, स्पर्धा निर्माण होईल वगैरे म्हणून ... सोशल मीडियावरही मी त्या असाईनमेंटमधला फोटो एडीट वगैरे करून वापरला तर त्यांचा मला लगेचच फोन येतो आणि ते फोटो काढून टाकावेत अशी सौजन्यपूर्वक धमकीच मिळते. खरंतर काकांची अडचण होईल म्हणून मला माझे फोटोज वापरू न देणे चुकीचेच आहे ... जर मी ते फोटो वापरू नयेत असं वाटत असेल तर काकांनी मला 850 फोटोजचा आर्थिक स्वरूपात योग्य मोबदला दिला पाहिजे आणि ठिकठिकाणी जेव्हा, जिथेही ते माझ्या पोर्ट्रेटवरून चित्र काढत असतील तिथे माझा नामोल्लेखही
मॉडेल - मोहिनी घारपुरे असा करायलाच पाहिजे .. तरच तो माझ्याशी न्याय असेल असं मला वाटतं. गंमत म्हणजे, काकांनी मला त्यांनी माझं काढलेलं चित्र माझ्या बेडरूममध्ये एनलार्ज करून वापरण्याची अनुमती दिली आहे बरं का .. (तसं मी वापरलेलं नाही कारण मला त्यात काहीही इंटरेस्ट नाही, मला माझे फोटोज वापरता यायला हवेत कारण मुळात ते माझे आहेत आणि त्यांनीच माझी संमती घेऊन वेळोवेळी माझे चित्र प्रदर्शनात मांडायला हवे .. पण दुनिया बघा कशी आहे .. मलाच माझे फोटो वापरण्याला बंदी करताएत हे तिऱ्हाईत व्यक्ती .. )
पण तरीही माझ्यातल्या चांगुलपणाखातरच केवळ मी काकांच्या सांगण्याला मान देऊन माझे हे फोटो कुठेही वापरत नाहीये..
फोटोग्राफर काकांशी तर त्यानंतर मी कोणताही कॉंटॅक्ट ठेवलेला नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या एवढ्या फोटोजचं नेमकं काय केलं हे मला आजपर्यंत माहीती नाही ...
माझे एवढे सुंदर फोटोज मीच कुठेही वापरू शकत नाही असं माझं या क्षेत्रातलं दुर्दैव ..
.................
तुम्हीही मॉडेलिंगच्या क्षेत्रात चमकू इच्छित असाल तर माझ्याकडून झालेल्या या चुका तुम्ही मात्र नक्कीच, जाणीवपूर्वक टाळा -
- कोणावरही विश्वास ठेऊ नका.
- काहीही गृहीत धरू नका.
- कॉंट्रॅक्ट केल्याशिवाय कोणतीही असाईनमेंट, मग वरवर ती कितीही साधी वाटत असली तरीही अजिबात करू नका.
- किती क्लिक्स करणार, किती फोटोज वापरणार हे लेखी ठरवून घ्या.
- कामाच्या मोबदल्यात किती पैसे मिळतील ते आधीच ठरवून घ्या.
- भविष्यात तुमच्या असाईनमेंटचे फोटोज कुठे कुठे, किती वेळा आणि कोण कोण वापरू शकेल हे आधीच लिखित स्वरूपात ठरवून घ्या. तसेच दरवेळी तुमचे फोटो वापरले गेले की त्याबदल्यात तुम्हाला किती मानधन वापरकर्त्याने दिले पाहिजे हे कॉंट्रॅक्टमध्ये ठरवलेले असलेच पाहिजे.
- शिवाय कोणत्या असाईनमेंटमधले तुमचे कोणते फोटो भविष्यात किती वर्षांपर्यंत वापरले जातील याचीही लेखी नोंद सर्वांसमक्ष करून घ्या.
- तुमच्या फोटोजचा सोशल मीडियावर वापर होणार असेल तर तो कोण, कधी व किती साईझच्या फोटोजचा वापर करेल हे कॉंट्रॅक्टमध्ये ठरवून घेतलेले असलेच पाहिजे.
- तुमच्या फोटोजचा अधिकार तुमच्याजवळ हवा, फोटोग्राफरकडे किंवा अन्य ग्राहकाकडे नाही, अन्यथा, तुम्हीही माझ्यासारखेच अडकू शकाल व स्वतःच स्वतःचे नुकसान करून घ्याल.
- कितीही ओळखीचा छायाचित्रकार असो, कितीही जवळचा, परिचित ग्राहक असो, आणि कितीही कंटाळा येत असला तरीही कॉंट्रॅक्ट करूनच कामाला सुरूवात करा.
- अगदी शॉर्ट नोटीसवर, अगदी घाईघाईत कोणीही कोणतीही असाईनमेंट देत असेल तर सावधपणेच व्यवहार करा.
- मॉडेलिंग, लेखन, नोकरी, अगदी कोणतंही काम, जे व्यावसायिक पातळीवर केलं जाणार असेल तिथे पारदर्शकता फार फार महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा व त्यामुळेच काम करायला सुरूवात करण्यापूर्वी वरील सर्व मुद्द्यांनी काळजी घ्या.
- मोहिनी घारपुरे - देशमुख