सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

अनुभवांती शहाणपण

अनुभव हा गुरू असतो. अनुभवानी माणसं समृद्ध होतात. काही अनुभव स्वतःहून घेतलेले, काही अनुभव वाटेला आलेले.. काही अनुभव इतरांच्या झोळीतून सांडलेले.. 
लहान असताना काळजी घेणारी आपली आई आपण मोठे होता होता आपल्याला बोलायचं थांबवते आणि अनुभवांच्या कडेवर आपल्याला देऊन टाकते. आपलं पोर, तान्ह, शेंबडं, रडकं .. अगदी कसंही असलं ना तरीही ते अनुभवाच्या कडेवर बसलं की आपोआपच शहाणं होत जाणार याची जणू तिला खात्री असते. 
थांबा, होऊ द्या तिच्या मनासारखं, तिला अनुभव घेऊ देत.. मगच कळेल तिला आपोआप खरं आयुष्य किती अवघड आहे ते .. 
माझ्याही आईच्या तोंडी हेच वाक्य असायचं, आणि मी क्षणाक्षणाला आसुसून जगण्यासाठी सतत सज्ज झालेली असायचे.. विशेष म्हणजे हे अनुभव नेहेमीच नातेसंबंधांमधलेच जास्तकरून माझ्यागाठीशी आहेत. 
एखाद्या सकाळी उठलं आणि दिवसभरात काहीतरी फार रोमांचक करायला सज्ज झालं असलं कधीही मला वाटलं नाही, वाटत नाही. 
त्यापेक्षा, छान छान माणसं जोडावीत, माणसांशी गप्पागोष्टी, हितगुज करत ज्ञान वाढवावं, अनुभवांची देणी घेणी करावीत आणि मस्त आरामशीर एखाद्या घरात किंवा कॅफेमध्ये कॉफी घेत गप्पाष्टकं रंगवावीत असंच वाटायचं. 
वयात यायला लागले आणि आपोआपच जगाचं लक्ष माझ्याकडे आहे हे पावलागणिक जाणवायला लागलं... तासन्तास फोनवर बोलण्याचा छंदही तेव्हाच लागला, तो आजही आहे... 
खूप खूप शेअरींग करण्यात जितका आनंद आहे तितका आनंद अाणखी कशात नाही असंही मधेच वाटून जातं. 
खरंतर माणसाला आजही एक गोष्ट लक्षात आलेली नाही की, तुमच्या आयुष्यात जो आनंद माणसं देऊ शकतात तो आनंद अन्य कशानेही तुम्हाला मिळू शकत नाही. माझ्या कृतीला प्रतिक्रीया देण्यासाठी माणसंच हवीत ना .. पण हेच न कळल्यामुळे माणसं माणसाला दुरावली आहेत. त्यांना निर्जीव वस्तूंमध्ये आनंद शोधावा लागतो किंवा आनंद विकत घ्यावा लागतो हे काहीसं दुर्दैवीच.. 
माणसांच्या गर्दीत राहूनही एकाकी पडलेली माणसं हे आजच्या घडीचं विदारक सत्य आहे. 
रामराज्यातली माणसं म्हणे खूप सुखी होती... का .. कारण त्यांच्याजवळ माणसं होती, माणसांपासून मिळणारं सुख त्यांना मुबलक प्रमाणात मिळत होतं.. 
आणि आजच्या काळातल्या माणसांजवळ सुख मिळवण्याची शेकडो साधनं असूनही माणसं खूप खूप दुःखी आहेत, त्यांच्या पोटातली माया दाखवायला त्यांना कुणी नाही, त्यांच्यावर जीव लावणारी माणसंही त्यांना मिळालेली नाहीत. 
गणित वगैरे कधीही फारसं न आवडलेल्या मला म्हणूनच, माणसं आवडतात. पण तरीही माणसांच्या निवडी करण्यात मी आजवर शेकडो चुका केल्या आहेत. चुकीच्या माणसांवर विश्वासाने विश्वास ठेऊन गाठीशी फक्त निखारेच घेऊन परतले आहे. अपमान, अवहेलना, राग, मत्सर, द्वेष अशा सगळ्या विखारी भावना माझ्यावर निघाल्यात असे अनेक प्रसंग मी सहन केलेले आहेत पण तरीही तत्कालीन राग शांत झाला की पुन्हा मी त्या माणसांना तितक्याच प्रेमाने आणि मनात काहीही न ठेवता संधी देते .. हे कसं जमतं हे कोडं माझं मलाही सुटलेलं नाहीच आजवर, पण असं आहे .. 
शब्दाशब्दाने दुखावलो गेलो तरीही मनामनाने तेव्हाच जवळ येत असतो आपण हे मनाचं गणित मला कळतं. मी संवेदनशील आहे तशीच सहवेदना जाणणारीही आहे.. दुःखाची अनुभूती मला चटकन होते, आणि दुःखाच्या भावनेत रहायला मला आवडतं. मग वरवर जाणणाऱ्या माझ्या परिचितांना मी कायम रडत असते असं वाटतं खरं, पण ते तसं नसतं, कारण मी आलेला क्षण तितक्याच आनंदाने जगत असते. इतरांसाठी सुखाच्या आठवणी निर्माण करते, आणि इतरांच्या सुखदुःखात सहभागी होते, समरसूनही जाते .. 
हे सारं जमतं कसं ... तर याचं उत्तर आहे, अनुभवांती आलेलं शहाणपण .. 
वेगवेगळे बरेवाईट अनुभव घेताना मी आसुसून जगले आहे हेच खरं.. 
आता जगायचं म्हटलं तर बरेवाईट अनुभव येणारच.. कोणाचंही आयुष्य एका सरळ रेषेत गेलेलं नाही, जाऊ शकत नाही, किंबहुना जाऊ नये.. 
आयुष्याची रेष वळणावळणाची असते अन् त्या रेषेवरून माणसाला इच्छा असो, वा नसो, चालावच लागतं.. 
म्हणूनच जे आलं ते भरभरून जगायला शिकलं पाहिजे. वाईट अनुभव आले तरीही चालणं थांबवायचं नाही, चांगले अनुभव आले तर उड्या मारत सुटायचं नाही.. 
शहाणपण गाठीशी तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही जगता, आणि जगता जगता शिकता .. 

- मोहिनी घारपुरे - देशमुख 

८ टिप्पण्या:

  1. Wow... भारी लिहिलय. Facebook वर share करायचा option नाहीये.

    उत्तर द्याहटवा
  2. आयुष्याबद्दल अगदी चिंतनशीलतेने लिहिले आहे..आयुष्य म्हणजे खरोखरच अनुभवांचे गाठोडे असते आणि अनुभवच आपला गुरू असतो असं मला वाटते.

    उत्तर द्याहटवा
  3. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही. जितके आपण एकमेकांशी बोलत राहतो शेअर करत राहतो तितके ज्ञान वाढत जाते. शेअर करण्यात खरंच आनंद आहे फक्त समोरची व्यक्ती त्या कॅलिबर ची हवी...

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद .. अगदी बरोबर आहे तुमचं अजीतजी ..

    उत्तर द्याहटवा

Translate

Featured Post

अमलताश