सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

बाकी शून्य (कविता)

काहीही होत नाही, फक्त आपलीच तडफड होत रहाते..
काहीही बदलत नाही, फक्त आपणच बदलत जातो..
तरीही काही हाती लागत नाही,
नेमकं काय हवय तेच शेवटपर्यंत कळत नाही..
मन - आत्मा जागा झाला की सतत छळत रहातो..
फार खरं असू नये, फार बरं असू नये
जीव तळमळत रहातो उगा, इतकं सोपं असू नये..
साधंसोपं असणं खरंतर असतं फार सुंदर
पण, समजण्यासाठी मात्र कृत्रिमताच होते नेहेमी वरचढ
म्हणूनच वाटतं, कृत्रिमताच खरी,
मनाच्या सच्चेपणापेक्षा रंगरंगोटीच खरी..
पण पुन्हा प्रश्न उरतोच, नेमकं आपल्याला हवंय काय,
कशासाठी सतत चालत रहातात आपले पाय
दोन वेळचं पोट भरलं, सुखासुखी निवांत निजलं..
तरीही आपण रहातो आनंदी, सुखी आणि समाधानी
उभा जन्म जळत जातानाही मात्र जेव्हा
गवसत नाही हाती काही
बाकी शून्य म्हणता म्हणता कळतं,
आपल्या हाती काही नाही
- मोहिनी घारपुरे - देशमुख

२ टिप्पण्या:

Translate

Featured Post

अमलताश