गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

अपने पराए


साधारण नावावरूनच कथानक लक्षात आलं तरीही कथेची मांडणी आणि प्रत्येक पात्राचा अभिनय पहाण्यासाठी तरी हा चित्रपट नक्की पहायला हवा असं मी सांगेन. शरत् चंद्र चॅटर्जी यांच्या निष्कृती कथेवर आधारित 1980 साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक बासू चॅटर्जी तर प्रमुख कलाकार आशालता वाबगावकर, शबाना आझमी, भारती आचरेकर आणि गिरीश कर्नाड, अमोल पालेकर आणि उत्पल दत्त .. 
गंमत म्हणजे, चित्रपटाच्या शीर्षक गीतात "नई तारकाएँ" म्हणून आशालता वाबगावकर आणि भारती आचरेकर यांचा नामोल्लेख आहे.. अर्थात शबाना आझमी वयाने (कदाचित) या दोघींपेक्षा लहान असूनही चित्रपटसृष्टीत ती या दोघींना सिनीअर कलाकार म्हणून तोवर नावाजली होती. 
कथेत कोणतीही भव्यता नाही, त्यामुळेच अगदी आपल्याच घरातली ही गोष्ट आहे की काय असं चित्रपट पहाताना वाटून जातं. त्यातून एक से एक कसलेले कलाकार चित्रपटाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवतात की चित्रपट पुन्हा एकदा पहाण्याची इच्छा नकळत होऊन जाते. 
तर होतं असं की उत्पल दत्त (बडे भैय्या) आणि आशालता(बडी माँ / सिद्धेश्वरी) , आणि अमोल पालेकर (चंंदर) आणि शबाना आझमी (शीला) हे आपल्या मुलाबाळांसमवेत एकत्र कुटुंबपद्धतीत सुखाने नांदत असतात. तसं तर बडे भैय्या आणि चंदर एकमेकांचे चुलत भाऊ .. पण घरात सख्ख-चुलत वगैरे विचारही कधी कोणाच्या गावी नसतो. बडे भैय्या आणि त्यांचा सख्खा लहान भाऊ (गिरीश कर्नाड (हरीश)) दोघंही व्यवसायाने वकील असतात आणि चंदर तसा काहीच कामधंदा करत नसतो. त्याचा रस गाण्यात वगैरे असतो त्यामुळे फार काळ कोणताही व्यवसाय वा नोकरी करण्याचा त्याचा पिंडच नसतो. हरीश आणि त्याची बायको नयनतारा तोवर दुसऱ्या शहरात रहात असतात पण कथेची सुरूवातच अशी होते की आता हरीश, त्याची बायको आणि मुलगा पुन्हा घरी सगळ्यांसोबत एकत्र रहायला येणार असतात. हे कुटुंब येतं तोवर शीलाने सगळ्या घरावर आपला प्रेमाचा, संस्कारांचा हक्क गाजवत आपलं वर्चस्व निर्माण केलेलं असतं. मोठी असूनही सिद्धेश्वरीला शीलाच्या गुणांचं कौतुक असतंच शिवाय तिच्या अधिपत्याखाली घर सुरळीत चाललंय हे पाहून ती त्यात समाधानी असते. शीलाही एकदम रोखठोक स्वभावाची .. जे योग्य ते योग्य आणि जे अयोग्य ते अयोग्य अशा सडेतोड स्वभावाची.. त्यामुळे घरातील लहानग्यांवर तिचा प्रभाव जास्तच असतो. घराच्या किल्ल्याही शीलाकडेच कारण ती व्यवहारात चोख असते. मोठ्यांना मान देत, सगळ्यांचा सन्मान ठेवत शीला घर उत्तम चालवत असते. एकीकडे तिच्या मनात हे देखील शल्य असतंच की आपला नवरा काहीच करत नाही त्यामुळे आपण या घरात शक्य तितकं काम करावं म्हणजे आपल्याला कोणी बोल लावणार नाही.. 
अशातच हरीश (गिरीश कर्नाड) आणि नयनतारा (भारती आचरेकर) परत येतात आणि मग सगळं चित्र पाहून  आपोआपच मनात असूया निर्माण होते. मग लहान मुलांची भांडणं, त्यावरून मोठ्या माणसांची भांडणं .. चुगल्या, रूसवे फुगवे टोकाचे वाद .. सतत सुरू होतं. इतकं टोकाला जातं की शेवटी शीला आणि चंदर गावच्या घरात रहायला निघून जातात. पण हरीश आणि नयनताराला तेही बघवत नाही .. शेवटी बायकोच्या बोलण्यात येऊन हरीश  आपल्या मोठ्या भावाला साथीला घेत चंदरवर पैसे खाल्याची केसच ठोकतो .. खरंतर मोठे भाऊ आणि सिद्धेश्वरी फार प्रेमळ असतात, चांगले असतात, नाती जपणारे असतात.. पण या दोघांच्या बोलण्यात येतात आणि एक एक करत घराचं घरपण जातं.. शेवटी सिद्धेश्वरीला शिलाच्या मुलांची आठवण यायला लागते .. स्वप्न पडायला लागतात आणि ती तिच्या नवऱ्याला एकदा गावी जाऊन चंदरची चौकशी करून यायला सांगते. तोही जातो .. आणि पहातो तर शीलाची रयाच गेलेली असते.. चंदरही कोर्टात केसच्या सुनावणीसाठी निघालेला असतो .. मुलं तापाने फणफणलेली असतात. हे सगळं पाहून काहीसा वेंधळा असलेला बडा भैय्या शीलालाच रागवायला लागतो, चंदर किती नाकारा आहे हे बोलायला लागतो .. तेव्हा शीलाच्या डोळ्यात पाणी तरळत .. प्रत्येकजण आपल्या भोळ्या नवऱ्याला बोलतात पण दुसरीकडे आमच्यावर ही वेळ कशाने आली ते कोणीच बघत नाही असं बोलून जाते ..आणि मोठ्या भावाला काय वाटतं कुणास ठाऊक तो सरळ आपली सगळी संपत्ती शीलाच्या नावावर करून मोकळा होतो.. इकडे घरी तोवर हरीश आणि नयनतारा सगळं काही गिळण्याच्या बेतात असतात आणि जेव्हा मोठ्या भावाचं हे कृत्य कळतं तेव्हा दोघंही हातावर हात चोळत रहातात. हरीश लगेचच परत दुसऱ्या शहरात जायला कुटुंबाबरोबर निघतो आणि इकडे मोठा भाऊ चंदर आणि शीलाला आपल्या घरी पुन्हा घेऊन येतो .. सगळा आनंदीआनंद होतो .. सिनेमा संपतो. 
खरंच, ज्यांना आपलं मानतो ते आपले असतात का .. आणि ज्यांना परकं समजतो ते परके असतात का .. जगाचे नियम काही वेगळेच आहेत. केवळ पैशापोटी नाती जोडणारी मंडळी ही आपल्या जवळच्या नात्यातलीही असू शकतात हे आपल्याला जाणवून देणारा हा सिनेमा, आणि परके किंवा दूरचे नातेवाईक म्हणवणारेही कधीकधी एवढं प्रेम, आत्मीयता देऊन जातात की तेच खरे जवळचे वाटतात असंच हा सिनेमा दाखवत जातो. 
हा चित्रपट एवढा सहजसाधा आहे की पहाताना आपणही त्या काळात हरवून जातो. कदाचित हे घर आपलंच तर नाही ना असा भासही क्षणभर आपल्याला झाल्याशिवाय रहात नाही. विशेष म्हणजे प्रत्येक कलाकाराचा अभिनय इतका सुंदर झालाय की त्यामुळे ती पात्र अगदी जिवंत झाल्यासारखी वाटतात. प्रेमळ सिद्धेश्वरी, भांडखोर आणि लावालाव्या करणारी नयनतारा आणि न्यायनिष्ठुर कर्तव्यदक्ष शीला या तिघी जावांनी जे काय काम केलंय ना त्यास तोड नाही. आणि तसंच काहीसे वेंधळे पण जबाबदार बडे भैय्या, काहीसा लालची हरीश आणि बेकार परंतु मनाने सच्चा चंदर हे तिघे भाऊही अतिशय हुबहू वठवले आहेत. 
एकंदरीत, गाणी वगैरे फारशी नसूनही मूळ कथाच अगदी सहजसुंदर असल्याने हा चित्रपट आपल्याला आवडल्यावाचून रहात नाही हे नक्की... 

- मोहिनी घारपुरे- देशमुख 

#मला_भावलेला_चित्रपट

(Photo credit - youtube)


शनिवार, १९ जानेवारी, २०१९

नमकीन

स्वप्न, नाती आणि वास्तव, व्यवहार यांच्यातलं अंतर जर कधी कोणाला कायमचं पुसून टाकता आलं ना .. तर त्याने ते नक्की करावं , कारण, या भूतलावर सगळ्यात जास्त आवाज असेल ना तो या मोडलेल्या स्वप्नांचा आणि तुटलेल्या नात्यांचा ..
एक अशीच चटका लावून जाणारी कथा आहे नमकीन या चित्रपटाची.. खुद्द गुलझार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली कथा आणि त्यांच्या दिग्दर्शनांतर्गत बनलेला हा चित्रपट आयुष्याच्या खाणाखुणा आपल्या आत खोलखोल उमटवून गेल्याशिवाय रहात नाही. एक नाही, दोन नाही तर तब्बल चार पाच पात्रांच्या आयुष्याची गोष्ट ही कथा मांडते .. सगळे एकाच नावेचे प्रवासी तरीही प्रत्येकाच्या जीवनाची वाट वेगवेगळ्या वळणांवर वळते, बघता बघता जो तो आपापल्या वाटेने पुढे निघून जातो .. आणि आपण प्रेक्षक जागीच खिळतो .. आपले पाय जड पडतात .. ही कथा सुखाची की दुःखाची हेच मुळी आपल्याला कळेनासं होतं .. आणि शेवटी डोळ्यावरून गालावर आपल्याही नकळत ओघळलेल्या खाऱ्या पाण्याची चव नकळत आपण चाखतो तेव्हा कळतं हा चित्रपट खऱ्या अर्थाने 'नमकीन' आहे ..
गेरूलाल (संजीव कुमार) ट्रकचालक असतो. ठेकेदाराकडे कामाला असतो. एका गावात कामानिमित्ताने येतो. तो काही दिवस रहाण्यासाठी घर शोधत असतो. धनीराम एक साधारण होटलवाला गेरूलालला, जुगनी तथा अम्मा (वहीदा रेहमान) हिच्याकडे भाडेकरू म्हणून घेऊन जातो. जुगनी आणि तिच्या तिघी मुली, निमकी (शर्मिला टागोर), मिठू (शबाना आझमी) आणि चिंकी (किरण वैराले) या एका पडक्या घरात रहात असतात. घरात पुरूषमाणूस नाही.. त्यामुळे धनीरामच्या होटेलकरिता मसाले विकून आणि शेणाच्या गोवऱ्या बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करत असतात. वरच्या बाजूची खोली भाड्याने देत असत पण बरेचदा भाडेकरू भाडंबिडं न देताच पसार होई असा अनुभव.. अशातच गेरूलालला धनीराम घेऊन येतो.. नुसता ओळखीवर व्यवहार ठरतो आणि गेरूलाल तिथे राहू लागतो. आपल्या तरण्याताठ्या मुलींकडे पहायचं नाही आणि वेळेवर भाडं द्यायचं या दोन अटींवर अम्मा गेरूलालला ठेऊन घेते. घरात आलेला हा अनोळखी पुरूष आणि या तिघी मुली .. त्यांना हा ' नवा प्राणी ' म्हणजे येता जाता टपली मारायला गिऱ्हाईकच (चांगल्या अर्थाने) मिळतं जणू .. सुरूवातीला खोडसाळपणे वागणाऱ्या या मुली, कटकट करणारी अम्मा आणि तरशींगरावाप्रमाणे वागणारा गेरूलाल यांचं हळूहळू एकमेकांशी नातंच तयार होतं. तो अगदी त्या कुटुंबातला होऊन जातो. गावात वेगळीच चर्चा सुरू झालेली असते, कोणी म्हणतं, हा नवा भाडेकरू तिघींपैकी एकीला जरी लग्न करून नेईल तरी अम्माचं ओझं कमी होईल.. कोणी म्हणतं, ती म्हातारी कसली नेऊ देईल एका तरी मुलीला या भाडेकरूला .. एखाद्या पक्षिणीप्रमाणे बसलीये आपल्या अंड्यांवर ..
असेच दिवस जात असतात .. मग हळूच एकेका पात्राची कथा जन्म घेत जाते.. बडबडी चिंकी, घराच्या जबाबदारीपोटी पोक्तपणा आलेली निमकी आणि अबोल असलेली मिठू यांच्या आयुष्याची रेष गेरूलालबरोबरच पुढे पुढे सरकत जाते..
इथवरचा सगळा चित्रपट अगदीच साधा पण गोड ..
मग एकदा गेरूलालची चिठ्ठी येते, ती कोणीतरी वाचल्याची शंका येऊन तो मिठ्ठूला त्याविषयी विचारणा करतो. मिठ्ठू बोलत नाही .. तेव्हा तो जोरात ओरडून विचारतो, बोलती क्यू नही.. मूँहमें जुबान नहीं है क्या आणि मिठ्ठू पळत जाते ... हमसून रडते .. नंतर निमकी गेरूलालला या वर्तनाविषयी जबाब विचारायला येते .. आणि ओघात कळतं, की मिठ्ठू मुकीच असते .. तिला लहानपणी कोणीतरी उचलून नेलेलं असतं आणि ती परत येते तेव्हा तिची वाचाच गेलेली असते... इथे आपल्याला पहिला धक्का बसतो.. आणि इथून चित्रपट एका वेगळ्याच वळणावर .. एका वेगळ्याच उंचीवर जातो. मग गेरूलालला फार वाईट वाटतं, आता तो तिचा राग काढायचा प्रयत्न करतो .. ती कविताही करते हे कळल्यावर तो त्या माध्यमातून तिचा राग काढायचा प्रयत्न करतो आणि मग पुन्हा गट्टी होते.
तोवर चिंकी, निमकी यांची गेरूशी दोस्ती झालेली असते. निमकी सगळ्यात मोठी .. तिला वाटत असतं, गेरूने मिठ्ठूशी लग्न करून टाकावं .. तर चिंकीला आणि अम्मालाही वाटत असतं गेरूने निमकीशी लग्न करावं आणि आपल्या कुटुंबाशी कायमचं जोडलं जावं.. सगळ्याच जणी आपापल्या मनातली इच्छा संधीसाधून त्याला बोलूनही दाखवतात .. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रसंगात .. खरंतर त्यालाही निमकी आवडत असते पण त्याची नोकरी फिरतीची .. त्यामुळे तो काहीसा विचारात पडलेला असतो.. तरीही एकदा तो निमकीला लग्नाचं विचारतोच .. तेव्हा ती जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात आपण अडकलेलो असल्याने लग्नाचा विचारच करू शकत नाही असं सांगते आणि त्याला मिठ्ठूशी लग्न कर अस सुचवते .. पण त्याच्या मनात असं काही नसतंच मिठ्ठूविषयी .. त्यामुळे तो थांबतो..
आता पुढे काय .. हा कोणाशीतरी लग्न करतो की नाही करत या प्रश्नावर आपण प्रेक्षक रेंगाळत असतानाच पुन्हा एक महत्त्वाचं वळण कथानक घेतं. गेरूलालला नव्या ठिकाणी काँट्रॅक्टवर जायचंय असं त्याचा मालक सांगतो. क्षणभर गेरूही मनातून हलतो, त्याला तिथून जावसं वाटतचं नसतं ना मुळी .. पण शेवटी काम महत्त्वाचं .. त्यामुळे तो सामान बांधायला घेतो .. सगळ्यांनाच वाईट वाटतं. निघण्यापूर्वी गेरू चौंघींनाही काही ना काही भेट देतो .. निमकीला सांगून जातो, की मिठ्ठूला मी जी कविता करण्यासाठी वही दिलीये त्यात पत्ता दिलाय माझा नवा .. तुला वाटेल तेव्हा, गरज लागेल तेव्हा मला या पत्त्यावर संपर्क कर .. आणि तो निघतो .. पुढच्या मुक्कामाला निघून जातो ..
इकडे जुगनीच्या परिवाराला गेरूच्या निमित्ताने लागलेला आशेचा अंकूर त्या क्षणी मरून गेलेला असतो आणि होतंही तसंच ..
जुगनी म्हणजे अम्मा पूर्वी एका नौटंकीत नाचत असते . अशात तिचं नौटकीतला सारंगीवाला किशनलाल याच्यावर प्रेम जडतं आणि ते लग्न करतात. जुगनीला घर संसार मुलं हवी असतात आणि किशनलाल तिला ते सगळं देतोही पण तो स्वतः एक अय्याश माणूस असल्याने केव्हाच कुटूंबाला, घरादाराला तिलांजली देऊन नाटकाच्या दुनियेत बुडून जातो. जुगूनी म्हातारी होत जाते आणि तिघी मुली वयात येत जातात तेव्हा अधूनमधून किशनलालची पावलं घराकडे घुटमळत जातात, आता त्याला मुलींना नौटंकीत नाचवायचं असतं ना .. एकदिवशी लहानग्या मिठ्ठूला तोच तर उचलून नेतो .. तिच्यावर अत्याचार करतो आणि परत आणून सोडतो .. याच धक्क्याने खरंतर तिची वाचा जाते, कायमची ..
मग एकदा गेरूच्या तिथल्या वास्तव्याच्या काळात रात्री धारदार सुरा घेऊन हा म्हाताऱ्या किशनलाल जुगनी आहे का अशी विचारणा करत घरात घुसण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गेरू त्याला अडवतो, इथे कोणी जुगूनी बिगनी रहात नाही चल निघ असं म्हणून हाकलून देतो .. कारण गेरूला स्वतःलाच जुगनीची म्हणजे अम्माची ही पार्श्वभूमी माहीत नसते.
मग एकदा कधीतरी गावात नौटंकीवाले येतात तेव्हा अम्मा पिसाटल्यासारखी धावत घरी येते .. तिघी मुलींना खोलीत डांबते आणि स्वतः पहारा देत रात्रभर बाहेर बसून रहाते .. तेव्हा गेरूलाल तिला याबद्दल विचारतो आणि तिची ही कहाणी ऐकून सुन्न होतो..
अशा या एकाकी पडलेल्या कुटुंबाचा आधार झालेला गेरू सोडून गेल्यावर काय होणार ना .. जे व्हायचं तेच होतं..
तीन वर्षांनंतर गेरू जेव्हा नौटंकी पहायला जातो तेव्हा समोर नाचणारी मुलगी म्हणजे अम्माची चिंकी आहे हे पाहतो आणि त्याची पायाखालची जमीन हादरते.. तो ताबडतोब तिची भेट घेतो. तिला खडसावतो, अम्मानी नौटंकीत यायचं नाही बजावलं होतं ना तरीही तू का आलीस ... आणि ती आता एक अवखळ मुलगी राहिलेली नसते.. तिने विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला असतो .. कारण तिला जगायचं असतं.. मनासारखं .. ती म्हणते, आईनी आम्हाला जगूच दिलं नाही, ना ती स्वतः जगली, ना आम्हाला जगू दिलं.. जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून लोकांची खोटी सहानुभूतीच तर मिळतेय फक्त .. आम्ही सगळ्याजणी एकमेकींसाठी कुर्बानीच तर देत बसलो जन्मभर .. जगलो कोणीच नाही .. मला मरायचं नव्हतं निमकीसारखं म्हणून मी तिथून पळून आले.. आणि तू, तू तरी काय केलंस आमच्यासाठी .. मी धीटाईने तुला तेव्हा म्हटलं होतं निमकीशी लग्न कर पण तू तूही खोटी सहानुभूती दाखवून निघून गेलास आमच्या आयुष्यातून .. तेवढ्यात तिचा बाप किशनलालला तिथे पाहून गेरूला फार राग येतो, वाईट वाटतं पण त्याच्या हातात काहीच उरलेलं नसतं. किशनलाल विचारतो, तूच होतास ना त्या रात्री .. आता जुगुनीला भेटशील का पुन्हा .. भेटलास तर सांग, आयुष्यात सुखी तीही नाही झाली, मीही नाही झालो .. पण काय करणार आयुष्य ज्या वाटेनं नेतं त्या वाटेनंच पुढे जगत जावं लागतं ..
आता गेरूच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ झरझर निघून जातो. तो तत्क्षणी जुगूनीच्या गावाला जातो. तिच्या घरी जातो आणि बघतो तर काय त्या पडक्या घरात एकाकी उरलेली निमकी .. ती त्याला बघताच तिचा बांध फुटतो .. ती ढसाढसा रडते .. गेरूलाल तुला मी आज जाऊ देणार नाही असं हक्कानी सांगते आणि सतत तिचे डोळे भरून येतात.
तीन वर्षात तिची रयाच गेलेली असते .. कारण घडलंही तसंच असतं सगळं.. ती सांगते, तुझ्या जाण्यानंतर चार पाच महिन्यातच मिठ्ठू वेडी झाली.. त्या वेडातच उंच कड्यावरून कोसळून मरण पावली. कळलंच नाही ..हे सगळं कसं झालं .. तिच्या जाण्यानंतर अम्मानही अंथरूण धरलं .. बघता बघता कधीतरी तिचीही प्राणज्योत विझली .. चिंकीही घरातून पळून गेली ..जाता जाता चिठ्ठी लिहून गेली, मी तुम्हा तिघींसारखी वेडी होऊन मरू इच्छीत नाही .. माझा शोध घेऊ नका .. मी शेवटपर्यंत अम्माला सांगूच शकले नाही की चिंकी निघून गेली..
आता गेरूला भरून येतं.. तो म्हणतो, निमकी त्या दिवशी तू म्हणाली होतीस मी या सगळ्यांना सोडून येऊ शकत नाही आणि बघता बघता सगळ्याजणी तुला सोडून गेल्या.. आता तू एकटीच उरलीस .. आता तू माझ्याबरोबर चल ..
तरीही, तिला भाबडी आशा वाटते, की मी येते पण चिंकी परत आली तर .. तेव्हा गेरू सांगतो, मी तिला भेटलोय आणि ती जिथेकुठे आहे तिथे आनंदात आहे .. ती आता कधीच परत येणार नाही ..
आणि अखेरीस गेरूलाल आणि निमकी त्यांच्या जीवनाच्या पुढल्या वळणावर निघतात ..
चित्रपट संपतो .. आणि आपण नमकीन चित्रपटाने पाणावलेल्या आपल्या डोळ्यातून गालावर ओघळलेल्या खाऱ्या पाण्याची चव जीभेवर चाखूनच निघतो..
आयुष्याचं गणित गुलझार नावाच्या या माणसाला जे कळलंय ना ते केवळ आहाहा ..
इतकी साधी सुंदर कथा, किती साधी सुंदर मांडणी .. आणि तरीही किती आशयपूर्ण ..
या चित्रपटातलं सर्वात सुंदर गाणं म्हणजे .. फिरसे आईयो बदरा बिदेसी तेरे पंखोंपे मोती जडूंगी .. पहाडी धुक्यातून शबानाच्या मिठास अभिनयाचा आस्वाद घेत आपण गाणं पहात रमतो आणि अशा पहाडातून आशाताईंचा एक निर्व्याज स्वच्छ सूर त्या पहाडीतून घुमत घोंगावर आपल्या कानातून मनात पोचतो तेव्हा अत्यानंदाची लकेर शरीरातून घुमत जाते.
तसंच दुसरं गाणं राहपे रेहते है, यादोंपे बसर करते है, खुश रहो एहेदे वतन हम तो सफर करते है ऐकताना आपल्याही जीवनातील अशी अवघड एकाकी वळणं क्षणभर आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात.
आंकी चली बाकी चली गाणं होईपर्यंतही आपल्याला कळत नाही की ती मिठ्ठू मुकी आहे .. आणि नंतर ज्या क्षणी कळतं तेव्हा आपल्याला चित्रपट मागे फिरून पहावासा वाटतो .. पुन्हा एकदा .. आणि वाटतं, अरे खरंच आपल्याला कसं लक्षात आलं नाही एवढा वेळ की ती मिठ्ठू (शबाना आझमी) मुकी आहे म्हणून ..
संजीव कुमारनं रंगवलेला गेरूलाल, किरण वैरालेनी रंगवलेली रंगवलेली चिंकी आणि वहीदा रेहमान यांनी रंगवलेली जुगनी तर अप्रतिमच .. अगदी तस्सच शबाना आणि शर्मिला यांचेही अभिनय तोडीसतोड ..
आपल्याला आयुष्यात भेटलेली ही सगळी पात्र आणि हा चित्रपट या सगळ्या बारकाव्यांमुळे आपल्या लक्षात राहून जातो तो कायमचाच ..
आणि गुलझार साहेब ..
त्यांच्या लेखणीला, प्रतिभेला आपण प्रेक्षक शतशः प्रणाम करून निघतो पुन्हा .. आपल्या नमकीन आयुष्याची कथा आपली आपण पुढे लिहायला .. पूर्ण करायला ..


- मोहिनी घारपुरे देशमुख



 

(Photo credit - youtube)

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

घर


एक सुंदरसं घर आपलं स्वतःचंही असावं असं स्वप्न घेऊन प्रत्येक माणूस जगतो. घर विकत घेण्याचं स्वप्नं लग्नानंतर तरी अनेकांचं पूर्ण होतं. पण खरं सांगू, घर म्हणजे नुसत्या भिंती आणि मालकी हक्काची आपली खाजगी जागा नव्हे, तर त्यातील माणसांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि बिकट प्रसंगात एकमेकांना दिली जाणारी घट्टमुट्ट साथ यावरच खरं घर उभं रहात असतं.
1978 साली रेखा, विनोद मेहरा यांच्या जोडीने अजरामर केलेला घर हा हिंदी चित्रपट सुपरहिट ठरला तो अनेक कारणांनी ...
मुळात त्या काळात अशी कथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडणं हेच फार प्रबोधनात्मक होतं.. पण तरीही मूळ आशयाला धक्का न देता आणि चित्रपट प्रेक्षकांना प्रबोधनात्मक वगैरे न वाटता, विचार करण्यास प्रवृत्त करेल अशा पद्धतीने दिग्दर्शक माणिक चॅटर्जी यांनी मांडला आहे.
भौतिक सुखं माणसाला नेहमीच हवीहवीशी वाटतात, त्यातलं महत्त्वाचं सुख म्हणजे हक्काचा निवारा .. हा निवारा मिळेपर्यंत आयुष्यही आपल्या गतीनी सुरू असतं. आणि मग, या वेगात, आयुष्याच्या वळणावर सगळेच सुखद प्रसंग येतील हे माणूस गृहीत धरूनच पुढे पुढे जातो.. पण कधीतरी, एखाद्याच्या नशिबी काही निराळंच लिहून ठेवलेलं असतं.
अशीच कथा आरती (रेखा) आणि विकास चंदरा (विनोद मेहरा) या नवविवाहित जोडप्याची ..
दोघंही सुशिक्षित, चांगल्या घरातले..
विकासचं वडिलांशी पटत नसतं, अशातच आरतीच्या तो प्रेमात पडतो.. वडिलांना हा विवाह मान्य नसतो म्हणून विकास घर सोडून जातो. आरतीशी नोंदणी पद्धतीने विवाह करतो.. या साऱ्यात त्याचे ऑफीसचे सहकारी, बॉस त्याच्या पाठीशी असतात.
स्वाभिमानी विकासकडे लग्नानंतर रहायला घर नसतं तेव्हा थोडे दिवस त्याची सोय त्याच्या ऑफीसचे बॉस स्वतः परगावी जाणार असल्याने त्यांच्या बंगल्यावर करतात. मग ते परत आल्यावर विकास आरतीला भाड्याचं घर मिळेपर्यंत काही दिवस माहेरी सोडतो आणि स्वतः एका होस्टेलवर रहातो. पण नवविवाहित असल्याने एकमेकांची ओढ वाटणं तर स्वाभाविकच.. एकदा तो न रहावून आरतीचं मन वळवून तिला एका हॉटेलच्या रूमवर नेतो. नवरा बायको असूनही केवळ स्वतःचं घर नाही म्हणून औट घटकेच्या या रूममध्ये जायला आरती, तिच्या मनाविरूद्ध तयार होते.. पण हाय रे .. या हॉटेलमध्ये पोलिसांची धाड पडते आणि दोघांना पोलिस पकडून नेतात. आम्ही नवराबायको आहोत हे सांगूनही पोलिस विश्वास ठेवत नाहीत तेव्हा विकास आपल्या बॉसना बोलावतो आणि शेवटी दोघांची सुटका होते.
कदाचित पुढे घडणाऱ्या घटनेची चाहूलच या प्रसंगातून दिग्दर्शकाने दिली असावी..
कारण, या घटनेनंतर काहीच दिवसात त्यांना एक भाड्याचं घर मिळतं. नव्यानवलाईचे दिवस आयुष्यात आनंद पसरत असतात. अशातच एकदा विकास आरतीबरोबर लेट नाईट मूव्हीला जाण्याचा प्लॅन ठरवतो. तो ऑफीसमधून परस्पर थिएटरमध्ये येईल आणि आरती टॅक्सीने तिथे नियत वेळेत पोहोचेल असं ठरतं. दोघंही पोहोचतात, पिक्चर संपेस्तोर फार उशीर झालेला असतो .. घरी परतण्यासाठी दोघंही टॅक्सी शोधत असतात पण मिळत नसते. आणि अशातच तो भयंकर प्रसंग घडतो..
एका टॅक्सीतून चार गुंड, दारूडे तिथूनच जात असतात, त्यांची नजर या दोघांवर पडते आणि हाय रे ..पुढे गेलेली टॅक्सी पुन्हा मागे वळते आणि आरतीवर चौघेजण पाशवी बलात्कार करतात.. विकासवर हल्ला करतात आणि तो बेशुद्ध होतो ..
जे व्हायचं ते घडतं आणि भयंकर वळणावर आयुष्य येऊन थांबतं. आता दवाखान्यात आरतीवर उपचार सुरू होतात.. विकासलाही वैद्यकीय मदत मिळते आणि तो लवकर भानावर येतो. आरती शुद्धीवर येते खरी पण तिची जगण्याची इच्छाच मरून गेलेली असते. ती दोनदा आत्महत्येचा प्रयत्न करते पण कोणी ना कोणी तिला वेळीच थांबवतं. इकडे विकास अस्वस्थ असतो.. लोकांच्या नजरा त्याला घायाळ करत असतात, लोकांचे वाईटसाईट शब्दबाण तो रोजच झेलत असतो .. एव्हाना एवढ्या मोठ्या घटनेची न्यूज झालेली असते .. पोलीस, कोर्ट, न्यूजपेपर आणि लोक या सगळ्यांशी विकास एकटा झुंजत असतो. मधल्या काळात तर बिचारा चक्क दारूचे गुत्ते शोधत ते चौघं गुंड कुठे सापडले तर चांगला धडा शिकवू अशा हेतूने शहरभर वेड्यासारखा फिरतो आणि शेवटी एका ठिकाणी, आपण अशा दुष्ट शक्तींशी दोन हात करण्यास असमर्थ आहोत हे एका घटनेनंतर स्वीकारून काहीसा अपयशी मनोवस्थेत घरी परततो.. आणि इकडे आरती, ती आपल्या मनाशी, तिच्या घायाळ शरीराशी लढाई लढत असते.
विकासला ती हवी असते .. पण तिची स्वप्रतिमा डागाळलेली असते. अशा मनोवस्थेत ती घरी येते .. तो तिची वाट पहात असतो.. किंबहुना तो तिला दवाखान्यातून घरी आणण्यासाठी जाणार असतो पण डॉक्टर तिला अँब्युलन्सनी घरी पाठवून देतात. ती दारात उभी पाहून तो खूश होतो .. तुम आ गयी हो तो घर लग रहा है असं तो म्हणतो .. नंतर अनेक दिवस तो तिला अधिक प्रेम देण्याचा प्रयत्न करतो. पण इथे ती चुकते.. तिला त्याच्या प्रेमात आता सहानुभूती दिसते .. आणि एका क्षणी ती त्याला म्हणते, मला सहानुभूती नकोय .. तुझं प्रेम खोटं आहे .. तो सांगायचा प्रयत्न करतो, अगं जे काही झालं ते फार वाईट झालं पण ती घटना घडून गेली, आता पुढे जायला हवं .. आपण दोघांनी .. तुझ्याइतकंच मीही या घटनेत पोळलो आहे गं .. पण तिला त्याचं दुःख समजण्यापेक्षा त्या क्षणी स्वतःचाच विचार योग्य वाटतो..
ती निघून जाते .. जाता जाता आठवणीने तिच्याजवळची घराची चावी घरात ठेऊन देते .. तो आता ठाम होतो .. जा तुला कुठे जायचं तिथे .. मी अडवणार नाही तुला ..असं म्हणून हा व्याकूळ क्षण सावरत तिथेच बसलेला असतो .. त्याची इच्छा नसते तिला जाऊ द्यावं पण आता तिचं तिला उमगेल अशी त्याची अपेक्षा असते .. तो म्हणून थांबतो, वाट पहातो .. पण ती जाते .. ती घरातून तिचं सामान घेऊन निघून जाते ..
ती गेल्यावर हा सैरभैर होतो ..अवघ्या काही क्षणात तिला परत आणण्यासाठी धावत सुटतो .. ती दिसत नाही .. पण त्याला अंदाज असतो .. तो रेल्वेस्टेशन गाठतो.. रेल्वे नुकतीच फलाटावरून निघालेली असते .. तो धावतो, रेल्वेचा पाठलाग करतो पण .. गाडी सुटते .. निघून जाते ..आता त्याच्या डोळ्यात पाणी तरळते .. तो वळतो.. गर्दीकडे बघतो आणि एका कोपऱ्यात आरती दिसते .. नजरानजर होते आणि दोघंही एकमेकांकडे धावतात ..
पिक्चर संपतो ..
आणि जाता जाता आपल्या मनात अनेक भावनांची गर्दी लोटते. घर म्हणजे काय हो.. तर जिथे नवरा बायकोच्या नात्यात एवढी खोली आहे, एवढं प्रेम आहे आणि नात्याची वीण एवढी भक्कम आहे की एकमेकांवर काहीही प्रसंग गुदरला तरीही साथ सुटत नाही ते घर ..
आणि नवरा बायकोचं नातं ..? आणि त्याहीपेक्षा नवरा ? तो तर किती समंजस, किती प्रेमळ आणि किती मोठ्या मनाचा..
केवळ शरीर म्हणजे स्त्री नाही हे ज्याला समजतं, ज्याला बायको म्हणजे उपभोगाची वस्तू वाटत नाही तर सहचरिणी वाटते, ज्याला तिचं मन हवंय असा असतो खरा नवरा.. जो तिची साथ सोडत नाही .. कदापि ..
अशा सर्व कंगोऱ्यांनी विनोद मेहरांनी रंगवलेला विकास हा इतका चपखल ठरलाय की तो आपल्याला आवडल्यावाचून रहात नाही. रेखाजींचा अभिनय, साधेपणा आणि सौंदर्य हे सगळं या चित्रपटातही उजवच आहे.
चित्रपटातली मधाळ गाणी तर अजरामर आहेतच.. आजकल पाव जमीं पर नही पडते मेरे, आप की आखोंमे कुछ, तेरे बिना जिया जाएना ही सगळी गाणी चित्रपट गुंफत जातात.
मला सगळ्यात सरप्राईजिंग वाटलेलं एक गाण म्हणजे, फिर वही रात है .. कारण आजवर हे गाण इतक्या वेगळ्या मूडच वाटत होतं पण प्रत्यक्षात, आरती दवाखान्यातून जेव्हा घरी येते तेव्हा रात्री विकास हे गाणं म्हणतो असं चित्रपटात दाखवलंय .. फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाबकी, रातभर ख्वाबमें देखा करेंगे तुम्हे ..
हे गाणं अशा संदर्भाने असेल असा विचारही मी यापूर्वी केला नव्हता त्यामुळे हे गाणं लागलं तेव्हा मी चमकले.. तो विकास खरंच किती किती गोड म्हणायचा ना ..
तर असा हा चित्रपट .. एक वेगळीच कथा सशक्तपणे मांडणारा आणि आपल्याकडील अनेक नवऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ..
तुम्हीही वेळ काढून कधीतरी नक्की पहा ..


- मोहिनी घारपुरे-देशमुख


#मला_भावलेला_चित्रपट









(Photo credit - youtube)

Translate

Featured Post

अमलताश