गुरुवार, ९ जुलै, २०२०

A folded wish ...

अ फोल्डेड विश 

'ओरिगामी' म्हणजे कागदाच्या नुसत्या घड्या घालून निरनिराळ्या वस्तू तयार करणे.. जपानमध्ये 'ओरिगामी' हा त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. असं म्हटलं जातं, की तेथील लोकांचा एक समज आहे की 'ओरिगामीचे हजार क्रौंच पक्षी जर तुम्ही बनवलेत तर देव तुमची एक इच्छा पूर्ण करतो ' .. मग भले ती इच्छा एखाद्या दुर्धर आजारातून बरं होण्याचीच का असेना .. पण ती पूर्ण होते असं मानलं जातं. 
दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जपानमधील हिरोशिमावर अमेरिकेने अणुबाँब हल्ला केला तेव्हा 'सादाको सासाकी' ही मुलगी अवघी दोन वर्षांची होती. या हल्ल्यामुळे तिला ल्युकेमियासारखा दुर्धर आजार झाला. या आजारातून बरं होण्याची मनीषा धरत चिमुकल्या 'सादाको'नी मिळतील त्या कागदांचे ओरिगामीचे क्रौंच पक्षी बनवायला सुरूवात केली होती. पण दुर्दैवाने ती केवळ 644 च क्रौंच बनवू शकली आणि तिचा मृत्यू झाला. पुढे तिच्या एका मैत्रिणीने तिच्यावतीने ते हजार पक्षी बनवले आणि एका लेखिकेनं सादाकोवर आधारित एक कादंबरीही लिहीली. 
नुकतीच, आर्टअमीबा प्रॉडक्शन्सतर्फे तयार करण्यात आलेली एक कार्टून शॉर्टफिल्म, ' अ फोल्डेड विश ' पाहिली तेव्हा त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेण्याच्या प्रयत्नात असताना हा सगळा करूण इतिहास समजला. 
दोन छोट्या जुळ्या बहिणी आणि त्यांची आजी असं त्रिकोणी कुटुंब. या कुटुंबातल्या या दोघी बहिणी ओरिगामीचे क्रौंच पक्षी रोज बनवत असतात. हजार पक्षी प्रत्येकी बनवायचे हे जणू मिशनच त्यांनी मनातून ठरवलेलं असतं. अशातच, एकेक करून दोघींनाही एकेक करून कोरोनासदृश आजार होतो. पिंक आणि ब्लू अशी तूर्तास या मुलींची नावं म्हणूयात. त्या दोघींपैकी ब्लू गर्ल  दिवसेंदिवस आजारामुळे खरंतर अधिक खंगत चाललेली असते.. आणि अशातच आता पिंक गर्लमध्ये त्या आजाराची लक्षणं दिसायला सुरूवात झालेली असते. 
एका रात्री जेव्हा पिंक गर्लला जाग येते आणि तिला दिसतं की तिची बहीण चमकत्या चंद्रप्रकाशात पक्षी बनवत बसलीये, तेव्हा तीही तिच्या बरोबर पक्षी बनवायला सरसावते.. त्या रात्री दोघी मोठ्या खूश असतात .. कदाचित त्यांचे हजार पक्षी आता पूर्ण होण्याच्या बेतातच असतात आणि त्यानिमित्ताने देव त्यांची एक इच्छा पूर्ण करणार असतो हा विश्वास त्यांना आनंद देत असतो.
जसजसे दिवस सरत असतात, आजार बळावतच असतो.. ब्लू गर्लचा आजार वाढतोय असं वाटत असतानाच इकडे पिंक गर्ल आजारी पडले आणि दुर्दैवाने एका सुंदर सकाळी जेव्हा ब्लू गर्ल डोळे उघडते तेव्हा आपली जुळी बहीण, पिंक गर्ल हे जग आपल्याआधी सोडून गेल्याचं तिला समजतं. ब्लू गर्लला रडू फुटतं .. आपल्या बहिणीचे किती पक्षी पूर्ण झाले हे पहाण्यासाठी ती तिची लाकडी पेटी उघडून बघते तो तिला त्यात हजारावा पक्षी दिसतो. त्या पक्ष्यावर तिने लिहून ठेवलेलं असतं, ' thousand crane = always together ' ( थाऊसंड क्रेन इझ इक्वल टू ऑल्वेज टुगेदर ) ... हा संदेश वाचून ब्लू गर्ल ओक्साबोक्शी रडते.. कारण, पिंक गर्ल हे जग सोडून गेलेली असते नं .. !
मग थोड्याच दिवसात ब्लू गर्लचेही हजार पक्षी पूर्ण होतात पण तिला देखील तो दुर्धर आजार गिळून टाकतो आणि ती देखील हे सुंदर जग सोडून जाते .. पण तरीही आता पिंक आणि ब्लू गर्ल, ज्यांनी प्रत्येकी हजार क्रौंच पक्षी पूर्ण केलेले असतात, त्यांची एक एक अंतिम इच्छा देवाने एकप्रकारे पूर्ण केल्यातच असते .. कारण आता त्या स्वर्गात तरी कायम सोबत असतील याची काळजी खुद्द विधात्याने घेतलेली असते..
एक छोटीशी, आशयसंपन्न, ट्रॅजिक पण तरीही एकप्रकारे सुखांत असलेली ही शॉर्टफिल्म पहाताना डोळ्यात पाणी आलं.. एकदा, दोनदा नव्हे तब्बल चार पाच वेळा ही फिल्म मी पाहिली पण दरवेळेला दुःखाचा कढ मनात आल्यावाचून राहिला नाही. 
सध्या जगात कोरोनामुळे जी काही भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात कित्तीतरी निष्पाप जीव असेच भरडले गेले आहेत. कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली आहेत. कुणाच्या तरी फार फार जवळची कुणीतरी माणसं अचानक दिसेनाशी झाली आहेत आणि मुख्य म्हणजे ही परिस्थिती नियंत्रणात येण्याचंही चिन्ह दूरदूर पर्यंत दिसत नाहीये. या अशा प्रचंड कठीण काळात जेव्हा ही अशी फिल्म समोर येते तेव्हा ती निश्चितच मनात एक धुगधुगता प्रकाश निर्माण करून जाते. 
आपल्या माणसांचा सहवास आणि प्रेम भरभरून मिळणे, त्यांच्यासोबत सुखाचे चार क्षण आनंदाने घालवता येणे यासारखं अन्य दुसरं सुख नाही. पण म्हणूनच, कोरोनासारख्या आजारापासून आपला बचाव देवानं करावा ही इच्छा मनात ठेऊन कुणी ओरिगामीचे हजार क्रौंच पक्षी बनवेल तर खरंच होईल का ही इच्छा पूर्ण ..? असा विचार मनात उगाचच येत राहिला...
खरंच,
कुणी करतंय का असे हजार क्रौंच पक्षी तयार .. ??

जे करत असतील त्यांची एक सदीच्छा देवा तू जरूर पूर्ण करशील हा मला मनोमन विश्वास आहे.. !!

- मोहिनी घारपुरे - देशमुख 



(शॉर्टफिल्म यूट्यूबवर या लिंकवर पहाता येईल - https://www.youtube.com/watch?v=9HEkdFzHLHs&t=3s )

५ टिप्पण्या:

Translate

Featured Post

अमलताश