तेव्हा मी दिव्य मराठीसाठी रिपोर्टींग करायचे. माझ्याकडे प्रामुख्याने युवा व महिला हे मुख्य बीट देण्यात आले असले तरी मी जॅक ऑफ ऑल असल्याने अन्य अनेक बीटच्या बातम्या आणि सांस्कृतिक कार्यक्रम (विशेषतः गाण्यांचे कार्यक्रम तर हमखास ) अटेंड करून त्याविषयीचे वार्तांकन, मुलाखती घेणे वगैरे काम आनंदाने करायचे.
तर तेव्हा असं झालं, की नाशिकमध्ये गुणिजन महोत्सवाच्या निमित्ताने त्या आल्या होत्या. तेव्हा पसा नाट्यगृहाच्या आतील बाजूस असलेल्या एका खोलीत कार्यक्रमापूर्वीचा त्यांचा थोडाफार रियाझ सुरू होता आणि तेव्हाच त्यांना भेटायला म्हणून काही ज्येष्ठ पत्रकार आणि व्यक्तींची तेथे सतत ये जा सुरू होती. कार्यक्रम संध्याकाळचा होता आणि मला त्यांना भेटायचंच होतं .. शक्य झाल्यास त्यांची मुलाखतही घ्यायचीच होती. मग काय, दिवसभराचं रिपोर्टींगचं काम भराभर आटपून मी या कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले. दिव्य मराठीने आम्हा रिपोर्टर्सना मिनी लॅपटॉप आणि सायबर शॉट कॅमेरेही दिलेले असल्याने आम्हाला अशा कार्यक्रमाचं थेट वार्तांकन लॅपटॉपवरून करता येई त्यामुळे संध्याकाळच्या कार्यक्रमाला उशीर झाला तरीही ऑनलाईन बातमी सहज कार्यक्रमाचा आनंद घेत घेत टाईप करता येई (अर्थात, मी एरवीही कॉलेजेसच्या कार्यक्रमांच्या वगैरे बहुतेक बातम्या ऑनलाईनच टाईप करून फील्डवरूनच पाठवायचे, अनेकांनी मला माझे असे काम करताना पाहिलेले असेलच .. )
तर, मी पोहोचले तर त्या खोलीच्या बाहेर अनेक जण खोळंबलेले होते .. वाढती गर्दी पाहून एक ज्येष्ठ पत्रकार, कॉलम्नीस्ट खोलीच्या दारापाशी येऊन सगळ्यांना अडवायला लागले. परवीनजींनी भेटायला नकार दिलाय असं परस्पर सांगू लागले. त्यांच्या सांगण्यामुळे बरेचजण तेथून निघून गेले... पण मी ... मला तर त्यांना भेटण्याची ही संधी अजिबात सोडायची नव्हती. मग धिटाईने मी त्या ज्येष्ठ पत्रकार काकांना म्हटलं, मला त्यांची मुलाखत घ्यायची आहे .. तरीही ते मागे हटेनातच उलट मला तेथून निघून जायला काहीशा जरबेनेच सांगायला लागले. ( थोडक्यात वाटेला लावण्याच्या प्रयत्नात होते, म्हणजे, दुसऱ्या दिवशी त्यांची लिहीलेली मुलाखत एक्स्लूझिव्ह झाली असती नं .. हा हा ) .. पण छे .. मी गेलेच नाही. इतक्यात दारापाशी आमची चाललेली हुज्जत पाहून खुद्द परवीनजींनी आतून बाहेर एक कटाक्ष टाकला आणि मला पाहून त्यांनी स्वतःच, आने दीजीये उनको असं म्हणत मला आत बोलावलं. आता, माझ्या ह्रदयाची धडधड प्रचंड वाढली होती. मी आत शिरले आणि खाली अंथरलेल्या गालिचावर नोटपॅड आणि पेन घेऊन गपगुमान बसले. त्या गात होत्या, मध्येमध्ये थांबत होत्या आणि त्या थांबल्या की ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याशी गप्पा मारत होते. मग नेहमीप्रमाणे माझ्याकडे कटाक्ष टाकून, ये नयी पीढी के पत्रकार .. इनको क्या पता होगा आपके बारेमें .. असा कुत्सित सूर लावत होते. मी माझ्या नवख्या बुद्धीने आणि जेमतेम अनुभवाने मला जे जे सुचले ते प्रश्न परवीनजींना विचारत होते आणि त्याही समोर नवखी पत्रकार बसली आहे हे जाणूनच ( माझ्या वयावरून ते सहज कोणाही ज्येष्ठ व्यक्तीला ताडता आलंच असतं ) मला समजतील असे संदर्भ देत माझ्या प्रश्नांना अवघ्या पाच सात मिनीटात उत्तरं देऊन कार्यक्रम सुरू करण्यासाठी रंगमंचावर गेल्या. आमच्या जवळ तेवढाच वेळ होता त्याला त्याही काय करणार म्हणा .. तरीही त्या पाच सात मिनीटात जे जे मुद्दे मिळाले त्यावर मी एक छानशी छोटीशी मुलाखत लिहीली आणि ऑफीसमध्ये पाठवून दिली. कार्यक्रमाची बातमी केल्यावर पुन्हा पंच करण्यासाठी ऑफीसमध्ये डोकावले तो तिथे पुन्हा माझ्या मुलाखतीवरून गहजब माजलेला .. मला कळेचना, की माझं नेमकं काय चुकलंय .. डेस्कवरच्या उपसंपादकांनी नाराजीचा सूर लावलेला .. त्यांनी ही मुलाखत किती वाईट आहे हे त्यांच्यापेक्षा सिनीयर व्यक्तींना पूर्णतः पटवून दिलंच होतं आणि तितक्यात मी तिथे पोहोचले. हे सगळं वातावरण पाहून मी काहीशी खट्टू झालेच .. कारण, इतक्या मेहनतीनी .. पाच मिनीटांचं का होईना .. पण फूटेज ( हो एकप्रकारचं फूटेजच नं ) गोळा केलं तर त्याचं पुढे हे असं होणार आणि मुलाखत छापून येणारच नाही अशी चिन्ह दिसत होती. खरंतर, रिपोर्टरला फील्डवरून मिळालेल्या माहितीला तो कमीतकमी वेळात आणि शक्य तितका फटाफट आपापल्या दैनिकाकडे पाठवत असतो आणि त्याने लिहीलेल्या बातमीला अधिक सुंदर व वाचनीय करण्याचं काम , त्यातील चुका काढून टाकण्याचं काम हे उपसंपादकाचं असतं पण बरेचदा असं होताना दिसत नाही (आणि त्यामागची कारणंही अनेक असू शकतात) . अखेरीस, जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही मुलाखत आता काटकूट करून उरलेल्या जागेतही बसवली जाणार नाही तेव्हा पुन्हा त्यासाठी स्टँड घ्यावाच लागला. ही मुलाखत कशी कशी मिळवली आणि ती फक्त आपल्याच दैनिकाकडे असेल उद्या (कारण, ज्येष्ठ पत्रकार बातमी नव्हे तर कॉलम लिहीणार हे नक्की माहीती होतं) असं सगळं समजावल्यावर अखेरीस ती मुलाखत प्रसिद्ध झाली.. आणि अर्थातच जेवढाही मजकूर लिहीला तेवढाही वाचकांनी कौतुक केल्याने मला समाधान मिळाले.
खरा आनंद तर तेव्हा झाला, जेव्हा परवीनजी नंतर पुन्हा एकदा नाशिकला दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यक्रमासाठी आल्या होत्या (आणि बहुधा, तो कार्यक्रम दिव्य मराठीतर्फेच आयोजित केलेला होता ) तेव्हा त्या कार्यक्रमाचं रिपोर्टींगही मलाच करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी पुन्हा बॅकस्टेजला अन्य पत्रकारांसमवेत पोहोचले तेव्हा परवीनजींनी मला सगळ्यांसमोर चक्क ओळखले आणि अगदी छान प्रसन्न हासत प्रश्न केला, "नमश्कार कैसी है आप .. कैसी चल रही है आपकी कलम .. ?" त्याक्षणी पहिल्यांदा चार लोकात आपली कॉलर ताठ होणे याचा अनुभव मिळणारा पहिलावहिला क्षण जगले ..
बस .. इसी का नाम है जिंदगी ..
बरोबर नं दोस्तांनो ..?
जन्मदिनकी बहुत सारी शुभकामनाएँ परवीनजी .. और प्रणाम ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख
(मुलाखतीच्या प्रिंटचा फोटो सोबत जोडते आहे.. कृपया लिंक मागू नये, कारण आता तो ऑनलाईन उपलब्ध असणे केवळ अशक्य आहे. )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा