तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची पूर्ण अनुभूती घेता त्यानंतर एकतर तुम्हाला त्या गोष्टीविषयी नीट, नेमकं लिहीता येतं किंवा, याउलट, जेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्ही पूर्ण अनुभूती घेतलेली असते त्यानंतर तुम्ही त्या अनुभवातच राहू इच्छिता म्हणून कधीच त्या गोष्टीला शब्दात मांडण्याचा वृथा प्रयत्न तुम्ही करतही नाही. पिंजरा या चित्रपटाबद्दल मी या दोन्ही भावनांच्या मधोमध आखलेल्या रेषेवर उभी आहे.. म्हणजे मला खूप लिहायचं आहे, आणि त्याउलट, मला जे त्या चित्रपटाने दिलंय त्यानंतर मला त्याविषयी काहीच न लिहीताही ते अनुभवत रहायचं आहे, स्मरणात ठेवायचं आहे... पण तरीही, केवळ, लेखन करताना अधिकही काही गवसेल या आशेने मी पिंजरा हा माझा अनुभव लेखात मांडणार आहे..
तर .. ही एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाची कथा. या कथेत कसलेले कलाकार, आणि अत्यंत उच्च दर्जाचे दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि अन्य संपूर्ण टीम .. यामुळे ही कथा आपल्याला मानवी जीवनाचं मूल्य देऊन जाते. जगणाऱ्या माणसाची नैतिक अनैतिकता हे तर येथे आहेच, त्याचबरोबर माणसामाणसांची कित्तीतरी दर्जात्मक, गुणात्मक आणि परिस्थितीजन्य रूपं हा चित्रपट दाखवतो.
गं ... साजणी ....
कुण्या गावाची कंच्या नावाची
कुण्या राजाची तू गं राणी ...
गं .... आली ठुमकत नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी
अशा ठसकेबाज गाण्यानं चित्रपट सुरू होतो. बैलगाड्यांचा एक छोटा ताफा एका दुतर्फा हिरव्यागार वनराजीनं नटलेल्या रस्त्यानं खुळूखुळू घुंगरांचा नाद करत पुढे पुढे जाताना स्क्रीनवर दिसत रहातो. एका सुंदर, सुखसंपन्न आणि मुख्य म्हणजे नीतीमान म्हणून गौरवलेल्या गावात या बैलगाड्या येऊन थांबतात नि आतून उतरते ती एक तमाशामध्ये नाचणारी सुंदर स्त्री .. जिला पहाताच गावातल्या माणसांना, अगदी थेट वृद्ध माणसांनाही तिची भुरळ पडावी अशी अदाकारा .. गावात तमाशाचा खेळ करून पुन्हा पुढल्या गावी निघून जावं आणि असं करत गावोगावी फिरावं हाच काय तो या मंडळींचा पोटापाण्याचा उद्योग... म्हणून तर ही मंडळी या गावात उतरण्याचं ठरवतात पण छे .. हे गावच मुळी निराळं असतं. इथे तमाशा वगैरेला मान्यता नसते.. इथे नैतिकता, शिक्षण, सद्वर्तन यांचे धडे गावाला गावच्या शाळेच्या गुरूजींनी आधीच दिलेले असतात. गुरूजींची नीतीमत्ता इतकी की सारा गाव त्यांना आदर्श मानत असतो.. आणि गुरूजींच्या अथक प्रयत्नांनी गावालाही 'आदर्श गाव' म्हणून पंचक्रोशीत नाव आणि पुरस्कारही मिळालेला असतो. अशा या गावात तमासगिरीणीचा खेळ तो कसा चालवून घेतला जाणार ..? आणि अर्थातच तिला विरोध करणारे जनतेचे पुढारी म्हणजे हे आदर्शवादी गुरूजी हे ओघाने आलंच. गावात तमाशाचा ठोकलेला तळ गुरूजींच्या पुढाकाराने गावकरी उलथून लावतात. विरोध करणाऱ्या मास्तरांवर संतापून ती अदाकारा जणू शपथच घेते, ' नाही या 'मास्तरड्या'ला एक दिवस तमाशाच्या फडावर तुणतुणं हातात घेऊन उभं केलं तर शप्पथ ...!' आणि पुढे खरोखरीच त्या सद्गुणी, सद्वर्तनी गुरूजींच्या नशीबाचे फासे असे काही पलटतात की खुद्द त्यांच्यासारख्या भल्या माणसालाही दुर्दैवाचे दशावतार पहायला लागतात.
नियतीचा खेळ असा अजब असतो.. किंवा, कदाचित असं असेल का, की गुरूजींचं गर्वहरण करण्यासाठीच जणू दैव असे फिरते ... ? कुणास ठाऊक .. पण घडतं खरं असं..!
शेवटी गावातल्या नदीच्या पलीकडच्या तीरावर तमाशाचा तळ टाकला जातो. आता रोज संध्याकाळनंतर तिथं तमाशाचा खेळही रंगायला लागतो.
गावची रोजची संध्याकाळची शाळा .. पण नदीच्या पल्याड जशी तमाशाच्या फडावर लावणीची धून अन् ढोलकीची थाप कानी पडते तशी एकेक करून एके दिवशी सारेच गावकरी काही ना काही बहाण्याने शाळेतून गुरूजींना शेंडी लावून बाहेर पडतात.. आणि मग हे रोजचच व्हायला लागतं. गावकरी शाळा सोडून तमाशाला जाऊन बसायला लागतात. अखेरीस एकदा गुरूजी स्वतः गावकऱ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी त्या रात्री नदी पोहून पार करत पलिकडच्या तटावर चंद्रकलेच्या फडावर जाऊन पोचतात.. गुरूजींचा धाक तर इतका, की ते नुसते तिथे आलेत ही वार्ता कानावर येताच एकेक करत तिथून गावकरी पोबारा करतात.. आणि ही आयतीच संधी चंद्रकलेला मिळते. गुरूजींना जाळ्यात ओढण्यासाठी ती पाय मुडपल्याचा बहाणा करते आणि आपल्या सौंदर्याचा गळ फेकते. बिचारे गुरूजी, एवढी वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करून सत्शील, सद्वर्तन यांचा आदर्श निर्माण करणारे, ते एका क्षणात त्या मेनकेच्या (चंद्रकला तिचं नाव) सौंदर्याला भुलणार नाहीत तर काय.. आणि तसंच होतं.. मग औषधाचं निमित्त पुरतं आणि गुरूजी तिच्याकडे आकर्षित होऊन पुन्हा पुन्हा तिला भेटायला, गावकऱ्यांचा डोळा चुकवून, नदी पार करून जात रहातात. अशातच गुरूजींच्या मुळावरच जणू उठलेला गावच्या सरपंचाचा वाया गेलेला मुलगा एक दिवशी गुरूजींना तिच्याकडे जाताना पहातो... आणि गावकऱ्यांना, सरपंचांना जाऊन सांगतो. एकच गदारोळ माजतो. सारीजण गुरूजींना शोधत तमाशाच्या त्या फडावर पोचतात. गावकरी गुरूजींना शोधत येत आहेत ही खबर वाऱ्यासारखी पसरते आणि गुरूजींच्या पायाखालची जमीन सरकते. लोकांना आता जर आपण इथे सापडलो तर आपल्यावरचा त्यांचा विश्वास कायमचा उडेल, आपण आजवर जे कष्टानं कमावलं ते सारं क्षणार्धात मातीमोल होईल याची कल्पना येतात आणि तत्क्षणी, गुरूजींचे डोळे खाडकन् उघडतात. आपण या मेनकेच्या मोहपाशात किती नि कसे गुरफटलो याबद्दल त्यांना स्वतःचीच लाज वाटते. खरंतर चंद्रकलाही गुरूजींकडे आकर्षित झालेली असतेच ( त्यांचं व्यक्तिमत्त्वच तसं असतं की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं ) .. म्हणून त्या वेळी ती लोकांपासून गुरूजींना वाचवते, ती त्यांना आपल्या खोलीत, जिथं कोणी गावकरी आत शिरण्याची हिंमतही करणार नाही, तिथे लपून बसायला सांगते आणि खुद्द स्वतः लोकांना सामोरी जाऊन वेळ निभावून नेते. फडावर गुरूजी न सापडल्याने पाटलाच्या पोरालाच शाब्दीक चोप देत सारे गावकरी परतात... आता शरमेनं मेलेले गुरूजी सगळ्यांच्या नजरा चुकवत आपल्या घरी काळोख्या रात्री परतात पण ते या संपूर्ण प्रकाराने फार फार अस्वस्थ झालेले असतात. त्यांचं मन थाऱ्यावर नसतं. अशा अवस्थेतले गुरूजी पाहून गावकऱ्यांना वाटतं, की आपण आपल्या गुरूजींवर शंका घेतली म्हणूनच आता त्यांना ही अस्वस्थता आली असावी.. गावकरी ठरवतात आपण त्यांची दुसऱ्या दिवशी सकाळीच क्षमा याचना करूया.
इकडे चंद्रकला रात्रीच्या अंधारात नदी पार करत, पोहत एकटीच गुरूजींच्या घरी पोहोचते. तिला तशा अवस्थेत तिथे आलेलं पाहून गुरूजींना आश्चर्याचा धक्का बसतो. तिला आपलं प्रेम गुरूजींसमोर व्यक्त करायचं असतं म्हणून हे अचाट अफाट साहस करत ती तेथे येते .. तिचं ते आपल्यावरील प्रेम पाहून गुरूजींचं ब्रह्मचर्य क्षणात गळून पडतं आणि तेही तिचा स्वीकार काहीशा द्वीधा मनःस्थितीत करतात.. पण एव्हाना त्यांचा सूड घ्यायला त्यांच्या दाराशी आलेला पाटलाचा गुंड पोरगा सगळा कानोसा घेत तिथे असतो आणि आतला प्रकार ओझरता कानावर आल्याने चांगलाच चवताळतो. बाहेरून ओरडत तो गुरूजींना धमकावून दार उघडायला लावतो. अशातच गावातली एक बाई, जिच्यावर थोड्या वेळापूर्वीच त्याने हात टाकायचा प्रयत्न करून तिथून पळ काढलेला असतो, तिचा नवरा ..तो या गुंडाला ठार करण्यासाठी त्याचा माग घेत तेथे येतो. पाठमोऱ्या गुंडावर चाकूने वार करत आणि दगडाने त्याचं तोंड ठेचत तो त्याला ठार करतो... बाहेरच्या सगळ्या झटापटीचे आवाज आत ऐकून चंद्रकला नि गुरूजी दोघेही जीव मुठीत घेऊन आता पुढे काय होणार अशा विचारात असतानाच एक दीर्घ किंकाळी ऐकू येते आणि पहातात तो दारात हे संकट .. आता कोणत्याही क्षणी गावकरी जमणार, आणि घरात आपल्याबरोबर ही चंद्रकला.. दारात हे पाटलाच्या पोराचं प्रेत .. आता हा सगळा आळ आपल्यावर येणार ... गुरूजी सैरभैर होतात .. तशी चंद्रकला आता तिचं जाळं आणखी घट्ट करण्याची ही संधीही सोडत नाहीच.. ती म्हणते, गावकरी यायच्या आत तुमचे कपडे या प्रेतावर घाला नि तुम्ही माझ्याबरोबर चला.. हे संकट तर टळेल मग पुढचं पुढं पाहू.. विनाशकाले विपरीत बुद्धी या न्यायानं जणू गुरूजीही त्या क्षणी तिचं ऐकतात नि तिथून निसटतात.
गावकरी तिथे पोचतात, तो प्रेताला पाहून लोकांना वाटतं हे तर गुरूजीच .. म्हणजे पाटलाच्या पोरानं सूडापायी गुरूजींची निर्घृण हत्या केली... गावकरी शोकाकूल होतात. आता पाटलाच्या पोराला पोलीस शोधू लागतात..
इकडे चंद्रकला गुरूजींना सोबत घेऊन येते नि लगोलग दुसऱ्या गावी तळ हलवते.. आणि इथून पुढे गुरूजींच्या नशीबाचं चाक आणखी रसातळाला जातं. गुरूजी म्हणून सारा गाव ज्यांच्या शब्दात त्या गुरूजींना ही चंद्रकला अखेर तमाशाच्या फडाचा मास्तर बनवून टाकते. स्वतःची शपथ पूर्ण झाल्याचा विजयी आनंद तिच्या सवंगड्यांबरोबर साजरा करते जणू ..
गुरूजींसारख्या भल्या माणसावर, केवळ क्षणीक मोहापायी जी वेळ येते ती पाहताना आपण मनातूनच अक्षरशः धाय मोकलून जणू रडतो.
या जीवनाचं चाक कधीही मागच्या दिशेनं वळत नाही कायम पुढेच पळत असतं.. म्हणूनच माणसाने प्रत्येक कृती विचारपूर्वक करायला पाहिजे असं थोरमोठे म्हणतात ते काही खोटं नाही.
दुसऱ्या गावी या तमाशाच्या फडाबरोबर आता गुरूजींसारख्या भल्या माणसाचीही जणू वरातच निघते. दुर्दैव म्हणजे, या प्रवासात त्यांची सारी खरी आभूषणं .. म्हणजे त्यांचा विवेक, सद्वर्तन, ब्रह्मचर्य पालन, शिस्तबद्ध आणि नैतिक जीवनाचरण ही सारी सारी केव्हाच गळून पडतात. माणसाची खरी कमाई हीच तर असते.. बाकी सगळ्या भौतिक गोष्टी तर जात येत रहातात पण जी व्यक्ती जीवन एक आदर्श म्हणून जगते अशा व्यक्तीचं जेव्हा नैतिक अधःपतन होतं तेव्हा त्या व्यक्तीचं जगणं तिला स्वतःलाही सहन होत नाही.
दुसऱ्या गावी तमाशाचा खेळ झाल्यावर तिथल्या पाटलाशी (केवळ कामाचा भाग म्हणून आणि पोटाची गरज म्हणून) त्या कलावंतिणीला लगट करावी लागते ते पहाताना मास्तरांना ची़ड न येईल तरच नवल. मग तिथं सगळ्यांबरोबर जेवायच्या पंक्तीत अक्षरशः कुत्र्याच्या ताटाशेजारी मांडलेल्या ताटावर मास्तरांना जेवायला बसवतात तेव्हा तर अरेरे .. अशी एक आर्त भावना खुद्द आपल्याही मनातून उफाळून येते. पंक्तीतली स्वतःचीच झालेली ही अशी विटंबना सहन न होऊन मास्तर तेथून उठून जातात तशी फडातला सरकार नामक एक कलाकार (निळू फुले) त्यांच्यावर नेहमीप्रमाणं हसतो.. आज गुरूजी शेवटी त्याला श्रीमुखात भडकवतात आणि त्याच्या हसण्याचं कारण विचारतात .. तेव्हा तो सांगतो, माझ्याही संसाराची मी अशीच दशा करून यांच्या जाळ्यात अडकलो त्याची कर्मकहाणी .. आणि आता कशाचच काही वाटत नाही हे म्हणताना त्याच्याही डोळ्यात पाणी दाटतं.
आयुष्याची माती झालेले गुरूजी तमाशाच्या फडावर तुणतुणं हातात घेऊन अखेर उभं रहातात आणि आज आपली कर्मकहाणी गातात ...
माझ्या काळजाची तार आज छेडली .. कशी नशीबानं थट्टा आज मांडली
गंगेवानी निर्मळ होतं, असं एक गाव .. असं एक गाव
सुखी समाधानी होतं रंक आणि राव .. रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं कीर्ती वाढली .. ।।
अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत ... भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला कुणी म्हणे संत .. कुणी म्हणे संत
त्याला .. एका मेनकेची दृष्ट लागली .. ।।
.
.
.
खुळ्या जीवा कळला नाही .. खोटा तिचा खेळ .. खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा .. पुरा जाई तोल .. पुरा जाई तोल
त्याला कुत्र्यामांजराची दशा आणली .. ।।
.
.
.
जन्मभरी फसगत झाली .. तिचा हा तमाशा .. तिचा हा तमाशा
जळूनिया गेली सारी जगायची आशा .. जगायची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गायली.. ।।
.
.
याची देही याची डोळा पाहिले मरण .. पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण .. रचिले सरण
माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली .. ।।
कशी नशीबानं थट्टा आज मांडली ....
अरेरे ... एका सज्जन माणसाची किती ही वाताहत ...
कशी नशीबानं थट्टा आज मांडली हे गाणं म्हणजे या चित्रपटाचा 'मास्तर'पीसच (मास्टरपीसच) !
चित्रपट इथे संपायला हवा असं जरी वाटत असलं तरीही कथा पूर्ण इथे होतच नाही कारण मास्तरांचीच नव्हे तर चंद्रकलेच्या कर्माचीही गत आता खरी फळत आलेली असते. देवाचा न्याय हा नेहमी सर्वांना समान असतो हेच खरं.
शेवटी तमाशा आणि त्यातल्या संपत्तीवर लाथ मारून केवळ आपल्या प्रेमापायी आणि गुरूजींच्या आयुष्याची माती केल्याच्या अपराधी भावनेपायी चंद्रकला गुरूजींबरोबर संसार थाटायचं स्वप्न मनात घेऊन निघते पण तिचे सवंगडी .. ते तिला असंच थोडी जाऊ देणार.. ते गुरूजींना चांगलंच झोडपतात. इतकं की त्यात त्यांच्या डोळ्याला मार लागतो नि त्यासाठी शेवटी अर्ध्यापेक्षा जास्त चेहरा गुरूजींना फडक्यानं बांधून एकप्रकारे लपवावा लागतो. दोघे तिथून पुढे जात नाहीत तो पोलीस त्यांना गाठतात. गुरूजींच्या मारेकऱ्याच्या शोधात पोलीस खुद्द गुरूजींनाच पकडतात. मनाशी प्रामाणिक असलेल्या गुरूजींना दैवाचा खेळ कळतो आणि देवाचा न्यायही ओळखता येतो म्हणूनच ते कोणताही विरोध न करता पोलीसांबरोबर निघून जातात. चंद्रकला त्यांच्या मागे पोलीस स्टेशनात येऊन त्यांना पोलीसांना सगळं खरं खरं सांगण्याची विनंती करते .. माझं तुमच्याबिगर कसं व्हनार .. मी आता कुठं जाऊ .. या विचाराने ती वारंवार विनंती करते.. पण मास्तर आता पोलीसांना स्वतःची खरी ओळख न सांगण्याविषयी ठाम असतात. कारण, हाच दैवाचा योग्य न्याय आहे .. मी लोकांचा विश्वास तोडला त्यामुळे आता मला हीच शिक्षा झाली पाहिजे असा विचार ते करतात. शेवटी चंद्रकला म्हणते, तुम्ही नका सांगू हवंतर .. पण मी स्वतः न्यायालयात खरं काय ते सांगेन ..
प्रत्यक्ष खटला भरतो.. एक अजब खटलाच असतो हा .. गुरूजींना स्वतःच्याच खुनासाठी शिक्षा होणार असते.. गावातल्या सर्व लोकांना या मारेकऱ्याबद्दल ( म्हणजे खरंतर खुद्द गुरूजींबद्दलच ) प्रचंड चीड आलेली असते.. कारण, ते कोणीही ओळखू शकलेले नसतात की हेच तर खरे गुरूजी आहेत. अखेरीस न्यायाधीश शिक्षा सुनावणार तोच चंद्रकला तिथे येते आणि घाईघाईन सत्य सांगायला सुरूवात करणार तोच तिची वाचाच जाते... अरेरे ... खाणाखुणांनी ती सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही जो खूनी समजताय तो तर केव्हाच मेला .. आणि हेच खरे गुरूजी आहेत .. पण छे ... कोणालाच तिचं सांगणं कळत नाही.. हाय रे कर्मा .. अखेरीस गुरूजींना स्वतःच्याच खुनासाठी फाशीची शिक्षा होते आणि त्यांची शिक्षा अंमलात येण्यापूर्वी त्याच धक्क्याने चंद्रकलाही मरते...
गावात आदर्श गुरूजी म्हणून लोकांनी मोठ्या आनंदाने गुरूजींचा पुतळा उभारलेला असतो त्याकडे पहात पहातच खरे गुरूजी जिवंत असूनही स्वतःच्या कर्मांची फळं भोगायला आनंदाने फाशीची शिक्षा पत्करतात.
किती ही करूण कथा ... अरेरे ..
चित्रपट पुनःपुन्हा पहावासा वाटतो कारण तो आपल्याला मानवी जीवनाची मूल्य शिकवून जातो. एकदा लोकांच्या नजरेत आदर्श या पातळीपर्यंत गेल्यावर माणसाने जर चुकूनही कोणतेही कुकर्म कळत नकळत केले तर लोक त्या माणसाला जगूच देत नाही .. कारण, लोक अशा व्यक्तीला इतकं जवळचं मानतात, इतका आदर, इतकं प्रेम आपुलकी अशा माणसाला दिल्यानंतर त्याचं झालेलं नैतिक अधःपतन पचवणं लोकांसाठी निव्वळ अशक्य असतं.
पण म्हणूनच कधीकधी वाटतं, की जो माणूस जन्मभर एवढा चांगला, एवढा आदर्श वागला असेल त्याच्याबाबतीत त्याला केवळ माणूस म्हणून चूक करण्याची मुभा लोकांनी द्यायला काय हरकत आहे..?
काळ बदलला तशी माणसंही बदलली .. म्हणूनच आता माणसांनी स्वतःत, स्वतःच्या मनोवृत्तीत एक महत्त्वाचा बदल करायला पाहिजे तो म्हणजे कोणत्याही माणसाला देवत्व देऊ नये.. माणसांकडे माणूस म्हणून पहावं.. म्हणजे कदाचित लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यानेच केवळ एखाद्या गुरूजींसारख्या आदर्श आणि खरोखरीच चांगल्या माणसाची अशी दैना होणार नाही .. प्रत्येकाला माणूस म्हणून आपले जीवन आनंदाने जगता येईल आणि हातून झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी कोणी इतकी गंभीर शिक्षा भोगणार नाही .. त्याला माफी मिळेल.. कदाचित चंद्रकलेची वाचा गेली नसती तर गुरूजींचीही शिक्षा कमी झाली असती .. कदाचित, त्यांनाही माफी मिळाली असती ..पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गुरूजींच्या मनाने केव्हाच त्यांना गुन्हेगार ठरवलं होतं. गुरूजींचं मनच त्यांना खात होतं.. आणि म्हणूनच कर्माचं चक्र जेव्हा पूर्ण झालं तेव्हा न्यायदानाचे वेळी गुरूजींनी सुखाने मरणाची शिक्षा स्वीकारली.
शेवटी म्हणतात ना, ' जगसे चाहे भाग ले कोई .. मन से भाग न पाए .. तोरा मन दर्पण केहेलाये ..'
तर असा हा 'पिंजरा' चित्रपट ..
कित्तीतरी गोष्टी आपल्या नकळत आपल्याला शिकवून जातो.
डॉ. श्रीराम लागू, संध्या, निळू फुले आणि अन्य कलाकारांच्या अभिनयाबद्दल तर बोलण्याचीही गरज नाही. 'श्रेष्ठतम' आणि 'दर्जेदार' या दोन्हीही उपाधी या कसलेल्या कलाकारांना, गीतकार, संगीतकारांना आणि दिग्दर्शकासाठी चोख बसतात.
या चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही. शांताराम, गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम, आणि कलाकार व संपूर्ण टीम यांना तर शतशः नमन..
- मोहिनी घारपुरे - देशमुख
(copyright@mohineeg)
खूपच सुंदर लिहिलेय तुम्ही . अगदी चित्रपट पुन्हा डोळ्यासमोर उभा राहीला. छान लेखनशैली, ओघवती भाषा म्हणून छान वाटलं वाचताना.
उत्तर द्याहटवाफक्त एका गोष्टीचा उल्लेख राहीला असं वाटतय की हा चित्रपट The blue angel या इंग्रजी चित्रपटावर आधारित आहे. यात Merline Dietrich आणि Emil Jannings हे मुख्य कलाकार होते. यामधे एक नावाजलेला प्राध्यापक कॕब्रे डान्सरच्या नादाला लागून स्वतःची शोकांतिका करून घेतो असं दाखवलय. मी पाहिलाय हा चित्रपट.
तुम्ही खूप छान लिहीलेय आणि परीक्षण करायची पद्धत आवडली.
मनःपूर्वक शुभेच्छा.
Ohh ..अच्छा .. मला याबद्दल माहिती नव्हती .. मनःपूर्वक धन्यवाद .. आपलं नाव कळू शकेल का ?
उत्तर द्याहटवामी अजय प्रभुदेसाई औरंगाबाद
हटवाBajaj Auto मधे Manager
अच्छा .. धन्यवाद .. :) :)
हटवा