शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

शुभेच्छापत्र (ग्रीटींग कार्ड्स)


दुकानात किंवा कोणत्याही गिफ्ट शॉपीमध्ये खच्चून भरलेल्या एका विभागात निरनिराळे ग्रीटींग कार्ड्स बघताना मला फार मजा यायची. साधा कागदाचा तुकडाच म्हणा तो, पण तरीही, त्यावर लिखीत स्वरूपात किंवा कार्टून स्वरूपात इतक्या कल्पकतेने शुभेच्छा संदेश लिहीलेले असत. शिवाय त्या शुभेच्छा पत्रांचा गुळगुळीत आकर्षक कागद, उत्कृष्ट छपाई, त्यावर केलेलं सुंदर डिझाईन .. अगदी त्यांची गुळगुळीत आणि पेस्टल कलरची आकर्षक लहानमोठी पाकीटंदेखील मला फार फार भुरळ पाडत असत. पण ही शुभेच्छाकार्ड नेहमीच वेगवेगळ्या किंमतीची आणि बरेचदा असं व्हायचं की आपल्या पसंतीस जे कार्ड उतरेल त्याची किंमत नेहमीच आपल्या बजेटच्या बाहेर .. हो म्हणजे शाळा कॉलेजच्या दिवसात खिशात पैसे ते कुठून असणार नै एवढे .. पण तरीही कोणाचाही वाढदिवस असो किंवा अन्य कोणतंही ऑकेजन असो, कॉलेजरोडच्या आर्चीस गॅलरी नि तत्सम अनेक गिफ्ट शॉपींचे उंबरठे मी आनंदाने झिजवायचे कारण तिथली ही आकर्षक ग्रीटींग कार्ड्स पहात रहाणं मला नेहमीच आनंदाचं असायचं.

ते दिवस मनात खोलवर दबून गेलेले .. पण तेव्हापासूनच ही ग्रीटींग कार्ड्स बनवायची मनाला फार फार उत्सुकता होती. पण त्यासाठी लागणारा वेळ आणि निवांतपणा या दोन गोष्टी सापडणं कठीण .. यंदा कोरोनाची अवकृपा आणि सगळेच जण लॉकडाऊन .. मग अशातच ही ग्रीटींग कार्ड बनवून पहायची मनातली बऱ्याच वर्षांची सूप्त इच्छा एक दिवशी डोकं उफाळून वर आली नि मी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माझ्या मुलीला साथीला घेऊन ही ग्रीटींग कार्ड्स बनवण्यासाठी वेळ काढला. 



लॉकडाऊनमध्ये जिथे जुजबी सामान उपलब्ध होत होते तिथे आम्हाला केवळ एका छोट्याशा दुकानात हे कार्डशीट्स मिळाले. पण तरीही मी खचले नाही. घरात मजजवळ असलेली रंगपेटी सोबत घेतली नि रोज एक ते दीड तास खर्चून आठ पंधरा दिवसात लहान आकाराची दहाबारा ग्रीटींग कार्ड्स बनवली. मी ग्रीटींग कार्ड्स तयार करत असताना माझ्या मुलीलाही एक एक कागद देऊन तिलाही शिकवत गेले. थ्रेड पेंटींग, कोलाज काम, कार्टून्स, मॅजिक पेंटींग असे काही प्रकार तिला यानिमित्ताने मी आवर्जून शिकवले आणि तयार झाली आमची सुंदर सुबक ग्रीटींग कार्ड्स .. 

आता हा एवढा घाट घातला तर याला जरा मोठ्या लेव्हलवर न्यावं असं वाटलं पण ते कसं घडावं .. म्हणून सोशल मीडियावर निहीमोही ग्रीटींगकार्ड्स कंपनी या नावाने (अद्याप आमची कंपनी वगैरे नाहीये पण भविष्यात होऊ शकते हा आशावाद बाळगून हे नाव दिलं) प्रमोशन केलं. मला आशा होती की थोड्याफार ऑर्डर्सही मिळू शकतील तर आणखी जोमाने काम करू .. पण ऑर्डर्स काही आल्याच नाहीत. मग आता या बनवलेल्या ग्रीटींग कार्ड्सचं काय करायचं हा विचार मनात सुरू असतानाच आणखी एक भन्नाट आयडीया मला सुचली. नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्ये आमच्या अहोंमुळे वैयक्तिकरित्या जाऊन आम्हाला तेथील काही स्टाफ मेंबर्सना ही आमची कार्ड्स देता आली. या कोरोनाच्या काळात हॉस्पिटल स्टाफ समाजाची मनोभावे काळजी घेऊन खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याची आणि माझ्या मुलीत ही भावना, ही समज ऋजवण्याची ही एक उत्तम संधी असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी तातडीने ही कल्पना अंमलात आणली. अर्थात, हे सगळं शक्य झालं ते माझ्या पतींनी व मुलीने मला योग्य साथ दिल्यानेच .. त्यामुळेच माझ्यापेक्षाही निहीराचेही विशेषत्त्वाने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.. आणि आमची दिवाळी अत्यंत वेगळ्या पद्धतीने .. गोडवा देतघेत साजरी झाली.



- मोहिनी घारपुरे - देशमुख


( आपल्यालाही जर आमच्याकडून अशी सुबक, सुंदर हँडमेड शुभेच्छापत्र हवी असतील तर मला जरूर संपर्क करा. कमेंटबॉक्समध्ये आपली रिक्वायरमेंट कळवा .. आम्ही आपल्या ऑर्डरनुसार ग्रीटींग कार्ड्स बनवून देऊ. प्रति ग्रीटींग कार्ड रूपये 20 पासून सुरू )
( If any one of you need such beautiful handmade greeting cards for any occasion, feel free to contact me .. " Nihi_Mohi Greeting cards company" is ready to serve you.
20/- per greeting card (Bulk orders accepted) )




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश