शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

केक .. केक .. केक ..!

बेसिक स्पॉन्ज केक
बेसिक चॉकलेट केक
केक बनवायला मला फार्फार ... हो फार फारच आवडतं.. आणि केक खायलाही.. प्रचंड आवडतं. तो दिल चाहता है मधला फेमस डायलॉग आहे नं.. 'केक खाने के लिए हम कही भी जा सकते है ...' अगदी तस्संच काहीसं.. !

गेल्या काही वर्षात साधा स्पॉन्ज केक बनवण्यात मी तरबेज झालेली आहे. त्यामुळे मनात येईल तेव्हा निरनिराळ्या आकारांचे आणि चवींचे केक बनवण्याचा जणू एक नवा छंद मी जोपासला आहे.

'तुझा केक हमखास कसा चांगला होतो?' असा प्रश्न अलिकडे मला बऱ्याच जणांनी विचारला आहे आणि अनेकांनी माझी केकची रेसिपीही मला विचारली आहे. मी जो केक बनवते त्यात वेगळं, विशेष असं काहीच नाही. पण ही सुयोग्य कृती शिकण्यासाठी मी दीर्घकाळ बरेच प्रयत्न केलेले आहेत. अनेकदा माझे केक सपशेल फसलेले आहेत पण तरीही मी स्वतःला कोणतीही दूषणं न देता, वारंवार केक बनवण्याचा घाट घालत गेले आणि चुकत चुकत शिकत गेले आहे. केकवरचं आयसिंग शिकायचं म्हणून केवळ एका बेकरीत केक बनवण्यासाठीचा एक दिवसाचा वर्कशॉप बरीच यातायात करत अटेंड केलेला आहे.. त्याबद्दल पुन्हा कधीतरी .. तर असा हा माझा केकचा छंद !
केक बनवण्याचा छंद जोपासणारे माझ्यासारखे अनेक तरूण तरूणी माझ्या माहितीत आहे. त्या सगळ्यांनीच आपली स्वतःची अशी केकची खास रेसिपी स्वतःपुरती हातची राखून ठेवलेली असते. प्रत्येकाचं केकचं गुपीत त्याच्यापाशी पण माझ्याकडचं गुपीत आज ख्रिसमसच्या सुमुहूर्तावर मीच खास तुम्हा वाचकांसाठी फोडतेय .. माझ्याकडून माझ्या वाचकांना ही एक सुंदरशी भेटच जणू ..

तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

साधासोपा बेसिक स्पॉन्ज केक (अंडेविरहीत) -

साहित्य -

दूध (सायीसह) - एक ते दीड कप

दही - पाव ते अर्धा कप

पिठीसाखर वापरत असाल तर दीड ते दोन वाटी

जाडीसाखर वापरत असाल तर एक वाटी

मैदा ( किंवा कणीकही वापरू शकता ) - दीड ते दोन वाटी

तेल ( किंवा तूप किंवा बटर किंवा मार्जरिनही वापरू शकता ) - पाव ते अर्धा कप

बेकींग पावडर बेकींग सोडा - पाव ते अर्धा चमचा प्रत्येकी 

व्हॅनिला इसेंस - चार थेंब किंवा वेलची पावडर अर्धा चमचा

चिमटीभर मीठ (चवीसाठी)

कृती -

1. दूध, दही आणि साखर छान एका बाऊलमध्ये एकत्र करून एका चमच्याने किंवा बीटरने किंवा hand blender / whisker ने एकजीव करून घ्या आणि झाकून बाजूला ठेऊन द्या. जर वेलची पावडर वापरणार असाल तर याच वेळी ती या मिश्रणात घालावी.

2. आता दुसरीकडे मैदा, बेकींग पावडर व बेकींग सोडा एकत्र चाळून घ्या. जर चॉकलेट फ्लेवरचा बेस हवा असेल तर कोको पावडरही याच वेळी चाळून घ्या.

3. आता झाकून ठेवलेला बाऊल उघडा आणि त्यात चाळलेले सर्व कोरडे साहित्य घटक घाला, दोनचार थेंब व्हॅनिला इसेन्स घाला आणि छान एकत्र करा.

4. केकचं मिश्रण तयार .. आता यात पाव ते अर्धा कप तेल घाला .. यामुळे केकला छान ग्लेझ येते आणि केक आतून कोरडा होत नाही.

5. केकचं मिश्रण फार घट्ट वाटत असेल तर आपल्या अंदाजाने थोडंस दूध घालून सैल करायला हरकत नाही.

6.  केकच्या टीनला तेल किंवा साजूक तुपाचा हात लावून सगळीकडून कोटींग करून घ्या व वरून मैदा भुरभुरवा. खरंतर मैदा नाही भुरभुरवला तरीही चालतो .. कारण तेलातुपाच्या कोटींगमुळे केक भांड्याला चिटकत नाही हा माझा आजवरचा अनुभव आहे.

7. केकचं मिश्रण केकच्या भांड्यात ओता. भांडं दोनचारदा टॅप करा आणि मायक्रोवेव्ह असेल तर कन्व्हेक्शन मोडमध्ये 180 डीग्री सेल्सिअसवर वीस ते पंचवीस मिनीटं केक बेक करा.

8. मायक्रोवेव्ह नसेल तर हा टीन चक्क गॅसवर एका मोठ्या कढईत स्टँन्डवर ठेवा व कढईवर झाकण ठेऊन मंद आचेवर हा केक पंचवीस ते तीस मिनीटं बेक करायला ठेवा.

9. केक बेक होत आला की एखादी सुरी किंवा टूथपिक केकच्या मधोमध खालपर्यंत टोचून केक आतूनही छान बेक झालाय की नाही हे चेक करा. केक जर छान बेक झाला असेल तर सुरी वा टूथपिकला तो अजिबात चिकटत नाही.

अर्ध्या तासातच घरात मस्त दरवळ पसरेल आणि छानसा केक खायला तय्यार होईल..

माझी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटबॉक्समध्ये तुमचे अनुभव नक्की कळवा.

(एक खास गुपीत सांगते हं .. बरेचदा दुधाच्या पातेल्यात साधारण एखाद दीड वाटी दूध शिल्लक राहिलेलं दिसलं की मी झटपट त्याच पातेल्यात केक बनवायला घेते.. अगदी अर्ध्या तासात केक तयार होतो आणि दूधाच्या पातेल्याला चिकटलेली सगळी साय सत्कारणी लागते.. शिवाय येताजाता तोंडात टाकायला एक छानसा पदार्थही होतो. जर मैद्याऐवजी कणिक वापरलीत तर फारच छान. तुमच्या आवडीनुसार खाण्याचे रंगही वापरू शकता. )







....................................................

ख्रिसमस स्पेशल सोपा प्लम केक

मी विचार करत होते की आपल्याकडे ना रम, ना ऑरेंज ज्यूस ना काही .. मग आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवायचाच नाही का .. तर माझ्या मनानी उत्तर दिलं .. की अगं आपण घरगुती पातळीवर जो पदार्थ बनवतो ना तो तर फक्त आपणच आपले खाणार असतो. मग एखाद्या घटकासाठी आपण आपला आनंद का मारायचा .. आणि मग मी ठरवलं, की जे नाही त्याचा विचार न करता जे आहे किंवा जे सहज उपलब्ध होईल असं सामान वापरून केक बनवायला काय हरकत आहे नै ..
आणि मग .. तयार केला, चमचमता चॉकलेट प्लम केक (विदाऊट एग्स आणि विदाऊट सोक्ड ड्रायफ्रूट्स) तर आज माझ्या वाचकांसाठी ही रेसिपीही येथे देत आहे.. कदाचित तुम्हाला करून पहावीशी वाटली तर जरूर करा .. अर्ध्या तासात केक तयार होतो.

साहित्य -

1. बेसिक केकसाठी लागणारे सर्व घटक
2. ड्रायफ्रूट्स, कोको पावडर आणि गार्निशिंगसाठी लागणारे साहित्य तुमच्या आवडीचे.
3. दोनचार लवंगा कुटून केलेली लवंग पावडर, दालचिनीचा लहान तुकडा कुटून केलेली दालचिनी पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर


कृती -

1. आता कोको पावडरचा वापर करून वर दिलेल्या कृतीप्रमाणे बेसिक बॅटर बनवून घ्या.
2. त्यात वरील सर्व साहित्य मिक्स करा आणि मिश्रण एकजीव करून केक बेक करा.
3. छान बेक झालेल्या केकला गार्नीश करा आणि मस्त आस्वाद घ्या. 







- मोहिनी घारपुरे - देशमुख

#mykitchenkey

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश