मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

बाजरीचा खिचडा ..


ही एक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक पाककृती !

हिवाळ्यात अनेक घरांत हमखास हा पदार्थ बनवला जातो आणि आवडीने खाल्ला जातो.

याची पाककृती इतकी सोपी आहे.

बरेचदा बाजरी आधी भिजत घालावी असा आग्रह असतो पण मी अगदी ऐनवेळेला सुद्धा बाजरी आणि तांदूळ प्रेशर कुकरमध्ये मस्त शिजवून हा खिचडा केलेला आहे. 

याची ऑथेंटीक रेसिपी अशी की यात बाजरी आधी दोन चार तास भिजवायची व मग ती खलबत्त्यात कुटून तिची वरची फोलपटं काढून टाकायची आणि मग तांदूळाबरोबर ती एरवी जशी मुगाची खिचडी करतो त्या प्रकारे शिजवायची.



पण माझी झटपट पद्धत अशी आहे की 😊 -

1. एक वाटी बाजरी असेल तर अर्धा ते पाऊण वाटी तांदूळ आधी स्वच्छ धुऊन घ्यायचे. ( दोन्ही एकत्र धुतले तरीही चालतात.)

2. मग प्रेशर कुकरमध्ये थोडं तेल, मोहोरी, जिरं, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, लसूण आणि खोब्र्याचं वाटण आणि मूठभर शेंगदाणे घालून परतून घ्यायचे.

3. आता त्यात धुतलेली बाजरी व तांदूळ घालून पुन्हा छान परतायचे. 

4. आता यात तीन चार वाट्या ( थोडं जास्तही चालेल .. ) गरम पाणी घालायचं आणि प्रेशर कुकरला मस्त सात आठ शिट्ट्या करून हा खिचडा शिजवायचा.

5. कुकर थंड झाल्यावर उघडून पहावा आणि वरून जर हवं असेल तर आणखी पाणी घालून खिचडा जरा सरसरीत करून घ्यावा. तसेच जर बाजरी कच्ची वाटत असेल तर आणखी दोन तीन शिट्ट्या करायला हरकत नाही. मात्र बाजरी अगदी छान पूर्ण शिजवण्यापेक्षा थोडी कमी शिजलेली असेल तर खिचडा खाण्यात खरी मजा येते हं.. 

6. या खिचडावर नंतर पुन्हा वरून लसणीचा जिवंत तडका चर्र आवाज करत द्यायचा की असला खमंग दरवळ घरात भरून रहातो .. आहाहा .. 

ऐन थंडीत गरमागरम बाजरीचा खिचडा आणि त्यावर मस्तपैकी भरपूर साजूक तूप .. सोबत दही किंवा ताक, पापड आणि आवडत असल्यास लोणचं ..

आहाहाहा .. जन्नत यार जन्नत ..

करणार ना मग हा पदार्थ ट्राय ??



- मोहिनी

#गुलाबी_थंडीच्या_गोष्टी

#Myकिचनkey


(All pics by myself clicked last year while making this recipe )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश