बुधवार, २० जानेवारी, २०२१

बाजरीचा घाटा आणि पापडाची भाजी

हिवाळ्यात जर तुम्ही एखादा छानसा पौष्टीक आणि फटाफट तयार होणारा पदार्थ शोधत असाल तर बाजरीचा घाटा एकदा नक्की करून पहा. करायला फार सोपा, अतिशय कमी साहित्यात होणारा असा हा पदार्थ चवीला तर चांगला लागतोच तसंच फार पौष्टीकही आहे. विशेषतः बाळंतीणीसाठी हा बाजरीचा घाटा एक उत्तम पौष्टीक पदार्थ आहे. माझ्या आईने ही रेसिपी मला शिकवली आणि आज ही खास रेसिपी माझ्या वाचकांसाठी मी ब्लॉगवर देते आहे. नक्की करून पहा आणि मला जरूर कळवा.

बाजरीचा घाटा

साहित्य - बाजरीचं पीठ, गूळ, तूप, दूध आणि ड्रायफ्रूट्स
कृती - 
1. एका भांड्यात चमचाभर तुपावर दोन तीन टेबल स्पून बाजरीचं पीठ जरासं भाजून घ्या.
2.आता त्यात साधारण एक ते दोन कप दूध घाला व गुठळ्या न होऊ देता सतत ढवळत रहा.
3. तुम्हाला जितकं गोड आवडतं त्याप्रमाणात या दूधात गूळ घाला व छान लापशीसारखं घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहा.
4. आता गॅस बंद करून हा घाटा एका बाऊलमध्ये काढून घ्या व वरून तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घाला. ड्रायफ्रूट्स नाही घातलेत तरीही चालतील. 
5. आता हा बाजरीचा घाटा थोटासा कोमट होऊ द्या आणि मग लगेचच त्याचा आस्वाद घ्यायला सज्ज व्हा. 

मी केलेला बाजरीचा घाटा

...................

पापडाची भाजी 

घरात जेव्हा कोणतीही भाजी नसेल तेव्हा चक्क पापडाची भाजी करून वेळ मारून नेता येते हे ग्यान मला जेव्हा फेसबुकवरून मिळालं तेव्हा मी हा पदार्थ करून पाहिला आणि खरोखरच, हा एवढा चविष्ट पदार्थ माझ्या पसंतीस उतरला. अगदी टेन ऑन टेन मार्क्स देता येतील असा हा मस्त चमचमीत आणि झटपट पदार्थ आहे.

साहित्य
घरातले मूग किंवा उडदाचे पापड, तेल, जिरं मोहोरी, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, मेथीदाणे, हिंग आणि कोथिंबीर 

कृती
1.
 कांदा टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या किंवा बारीक चिरून घेतलात तरीही चालेल.
2. आता एका कढईत तेल, जिरं, मोहोरी, हिंग, हळद आणि मेथीदाणा घालून फोडणी करायला ठेवा. आवडत असल्यास कढीपत्ताही घालू शकता. (फोडणीची बेसिक कृती सगळ्यांनाच माहिती असते त्यामुळे ती पुन्हा देण्याची गरज नाही असे वाटते.)
3. आता यात कांदा टोमॅटोची पेस्ट किंवा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो छान परतून घ्या.
4. तुमच्या अंदाजाने गरम पाणी घालून छान ग्रेव्ही बनवून घ्या. 
5. एक उकळी आली की यात पापडाचे तुकडे घाला व शिजू द्या.
6. वरून मस्त कोथिंबीर भुरभुरवा आणि पोळी, पराठे वा नानसोबत मस्तपैकी खा. 

टीप - या ग्रेव्हीत घरातल्याच आंब्याच्या लोणच्याचा खार व एखाद दोन फोडी घातल्या तर आणखी चमचमीत चव होते. किंवा कसूरी मेथी आणि गरम मसालाही घातला तरीही चव आणखी छान येते. 

पापडाची भाजी करून पहा आणि मला नक्की कळवा. 

मी केलेली पापडाची भाजी





- मोहिनी घारपुरे - देशमुख 





३ टिप्पण्या:

Translate

Featured Post

अमलताश