सोमवार, २५ जानेवारी, २०२१

चीझ पनीर कोफ्ता करी आणि तवा नान

घरात दोनचार दिवसाचं दूध उरलं की घरीच त्याचं पनीर करायचं हा उद्योग मी बरेचदा वेळ मिळेल तसा करत असते. घरी बनवलेलं पनीर हे बाजारातल्यासारखं होत नाही तर ते जरासं वेगळं असतं म्हणजे त्याचे छान असे क्यूब्स करता येत नाहीत तर त्याऐवजी ते चटकन कुस्करता येतं हे मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा या कुस्करलेल्या पनीरपासून काय काय करता येईल याचा विचार मी करत गेले. तेव्हा घरातल्या घरात सहज उपलब्ध सामानापासून चमचमीत असे चीझ पनीर कोफ्ते बनवण्याची आयडीया सुचली. चीझ पनीर कोफ्ते हे नाव ऐकल्यापासूनच तोंडाला पाणी न सुटेल तरच नवल नाही का..? शिवाय घरी कोणीही पाहुणे येणार असले की तुलनेने झटपट करता येण्याजोगी ही माझी पाककृती. यात फार काही वेगळं केलंय असं नाही, किंबहुना बऱ्याच हॉटेलमध्येही ही डिश सहज मिळते पण हीच पाककृती घरच्या घरी आपण स्वतः बनवण्यात खरोखरीच खूप आनंद आहे. मनापासून पनीर बनवायचं, मनापासून कोफ्ते बनवायचे, त्यासोबत मनापासून बनवलेले नान किंवा पराठे बनवायचे .. वाह .. खूप खूप आनंद आहे हा सगळा.. 
तर, आज खास ही पाककृती तुमच्यासाठी येथे देत आहे. जरूर ट्राय करा आणि मला कमेंटबॉक्समध्ये कळवा. 
  
(दोन ते तीन माणसांसाठीचे प्रमाण येथे नमूद करत आहे)

कोफ्त्यासाठी साहित्य -

1. उकडलेले बटाटे ( 3 ते 4, मध्यम आकाराचे )

2. मैदा ( 2 ते 3 टेबलस्पून )

3. कॉर्नफ्लोअर ( 2 ते 3 टेबलस्पून )

4. मीठ (चवीनुसार)

5. चीझ ( 2 क्यूब्स )

6. पनीर ( 125 ग्रॅम्स अंदाजे ) (किंवा घरी बनवलेले पनीर कुस्करून ) 

7. किसमिस ( आठ ते दहा )

8. तळण्यासाठी तेल चार सहा मोठे चमचे

9. जिरेपूड (पाव चमचा)

कृती -

1. उकडलेले बटाटे एका किसणीने किसून घ्या.
2. चीझ व ( विकतचे पनीर असल्यास तेही ) चीझ किसणीवर बारीक किसून एका बाऊलमध्ये एकत्र करून घ्या त्यात चवीनुसार मीठ घाला.  
2.  उकडलेल्या बटाट्याच्या किसामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी जिरेपूड आणि दोन ते तीन चमचे मैदा व दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालून गोळा एकजीव मळून घ्या. 
4. आता बटाट्याच्या किसाच्या गोळ्याचे लहान लहान गोळे करून त्यांची तुमच्या आवडीनुसार लहान वा मोठ्या आकाराची पारी बनवा.
5. यामध्ये चीझ व पनीरचा कीस भरा आणि मधे एक किसमिस ठेवा. ( तुम्हाला आवडत असल्यास यात ओल्या नारळाचा चवही घालू शकता, त्यामुळे कोफ्त्याची चव अधिक रूचकर होईल हे नक्की .. )
6. आता ही स्टफ केलेली पारी नीट हलक्या हाताने गोल गोल वळत कोफ्ता तयार करा.
7. साधारण सात ते आठ कोफ्ते तयार झाले की एकीकडे तेल तापत ठेवा.
8. आता हे कोफ्ते कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून मध्यम आचेवर तळा. कोफ्ते छान सोनेरी रंगावर तळून एका बाऊलमध्ये ठेऊन द्या. 






करीची रेसिपी -

साहित्य -

1. कांदे ( 2 मध्यम आकाराचे, किंवा 1 मोठा )

2. टोमॅटो ( 4 ते 5 मध्यम आकाराचे )

3. आलं ( लहान तुकडा )

4. लसूण ( 4 ते 5 कळ्या )

5. हिरवी मिरची ( 1 लहान )

6. साखर ( 1 टेबलस्पून ) (किंवा चवीनुसार)

7. हळद (पाव ते अर्धा टेबलस्पून)

8. तिखट (अर्धा ते एक टेबलस्पून)

9. धणे व जीरे पूड आणि गरम मसाला ( प्रत्येकी अर्धा ते एक चमचा )

10. दूध आणि दूधाची साय (अर्धा ते एक कप)

11. आवडत असल्यास खडा मसाला

12. मीठ चवीनुसार

13. तेल ( दोन ते तीन टेबलस्पून )

14. हिंग चिमूटभर

15. पाणी एक ग्लासहून थोडंस जास्त

कृती

1. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची या सगळ्याचे लहान तुकडे करून ते मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्या.

2. आता गॅस ऑन करून आता त्यावर एक पॅन ठेवा.

3. या पॅनमध्ये तेल घ्या व त्यात मोहोरी, जिरं घालून फोडणी करा. मोहोरी तडतडली की त्यात हिंग व हळद घाला.

4. आता मिक्सरमधली पेस्ट या फोडणीत घालून ती छान भाजून घ्या.

6. पेस्ट जेव्हा तेल सोडायला लागेल तेव्हा त्यात थोडं थोडं करत पाणी घाला.

7. आता ही करी छान उकळू द्या. ती उकळत असतानाच त्यात मीठ, तिखट, साखर, धणे जिरे पूड व गरम मसाला घाला. आवडत असल्यास खडा मसालाही घालू शकता.

8. सर्वात शेवटी करीला रिचनेस येण्यासाठी त्यात दूध व फेटलेली दुधावरची सायही घाला.

9. आता एक उकळी आली की गॅस बंद करून करी झाकून ठेवा.

10. गार्निशिंगसाठी त्यात थोडेसे किसमीस घाला व वरून कोथिंबीर भुरभुरवा. तसंच, थोडीशी सायही फेटून वरून क्रीमप्रमाणे लेयर करू शकता. 

तवा नानसाठी साहित्य -

1. मैदा दोन ते तीन वाट्या ( किंवा व्हीट तवा नान आवडत असल्यास तुम्ही मैद्याऐवजी कणीकही घेऊ शकता)

2. मीठ अर्धा चमचा

3. बेकींग सोडा पाव चमचा

4. दही दोन ते तीन टेबलस्पून

5. तेल दोन ते तीन टेबलस्पून

6. तीळ, कलौंजी प्रत्येकी एक ते दोन चमचे

7. कोथिंबीर

8. पाणी

कृती -

1. मैदा, मीठ, दही व बेकींग सोडा एकत्र करून त्यात थोडं थोडं करत पाणी मिसळून छान गोळा मळून घ्या.

2. या गोळ्याला तेलाचा हात लावून गोळा दहा ते पंधरा मिनीटं झाकून ठेवून द्या.

3. पंधरा मिनीटानंतर गोळा पुन्हा एकदा मळून घ्या आणि मग त्याच्या लाट्या करा.

4. आता एकेक लाटी घेऊन ती नान च्या आकारात लाटा.

5. लाटलेल्या नानच्या वरच्या बाजूला पाणी लावून ती बाजू ओली करून घ्या.

6. दुसरीकडे तवा गरम करायला ठेवा, आणि मग तवा गरम झाल्यावर नानची ही ओली केलेली बाजू तव्यावर खाली चिकटेल अशा पद्धतीने नान तव्यावर भाजायला ठेवा.

7. आता नानची जी बाजू वरती असेल त्या बाजूला थोडेसे तीळ, कलौंजी आणि कोथिंबीर पाण्याचा हात लावून चिकटवून द्या.

8. आता मध्यम आचेवर दोन ते तीन मिनीटं नान एका बाजूने भाजला गेला की तव्याचं हँडल धरून तवा नानसह उलटा करून फ्लेमवर दुसऱ्या बाजूने भाजा.

9. तवा फ्लेमवर सतत फिरवत ठेवत नान सर्व बाजूनी छान भाजून घ्या.

10. तयार झालेल्या नानवर बटर किंवा आवडत असल्यास गार्लिक बटरही लावू शकता. 

मी बनवलेले गव्हाच्या पीठाचे (कणकेचे) तवा नान

सर्व्हींगसाठी सूचना -

1. आता एका डीशमध्ये हे बटर नान ठेवा.

2. तर सोबत एका बाऊलमध्ये वा प्लेटमध्ये तयार केलेले दोन कोफ्ते ठेवा.

3. या कोफ्त्यांवर तयार केलेली ग्रेव्ही घाला आणि वरून मलाई व कोथिंबीरीने गार्निश करून मस्त सर्व्ह करा किंवा किसलेले चीझ पनीर घालूनही गार्निश करू शकता. 

फोटो जुना आहे .. यात कोफ्त्याबरोबर पराठे आहेत.


- मोहिनी घारपुरे - देशमुख

(सर्व फोटो मी स्वतः काढलेले आहेत. ते अन्यत्र कोठेही माझ्या परवानगीशिवाय वापरण्यास माझी मनाई आहे. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश