अनेक व्यावसायिक आणि त्याचबरोबर अनेकजण आपल्या वैयक्तिक वापरासाठीही हल्ली डिजिटल मार्केटींग करत असतात. डिजिटल मार्केटींगची कल्पना वरवर पहाता फार सोपी वाटते परंतु ती प्रत्यक्षात उतरवताना अनेक उत्तमोत्तम व्यावसायिकही शेकडो चुका करतात. बरेचदा, या माध्यमांचा नीट अभ्यास आणि मार्केटींगच्या बाबत आवश्यक ते संशोधन न केल्यामुळे ही गोची होते.. म्हणूनच हे टाळण्यासाठी व स्वतःचे वा आपल्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी डिजिटल मार्केटींग करताना या चुका टाळायलाच हव्यात -
1. लाईक्स आणि शेअर्सचा फार जास्त विचार करू नका -
हे कितीही खरं असलं की सोशल मीडियावर तुम्ही लोकांचं लक्ष वेधत आहात हे ओळखण्याची सर्वात पहिली आणि प्रभावी खूण म्हणजे तुमच्या कंटेंटला मिळणाऱ्या लाईक्सची आणि शेअर्सची संख्या. ती जितकी जास्त अधिक तितकं तुमचं कंटेंट ( आणि पर्यायाने तुम्हीही ) अधिक आवडतंय हे समीकरण. मात्र, असे अनेक अभ्यासांती लक्षात आलेले आहे, की बरेचदा लाईक्स आणि शेअर्सची संख्या कमी आली तरीही तुमचं कंटेंट लोक वाचत असतात, त्याची दखल ते मनोमनी घेत असतात.
2. व्यावसायिक मदतीशिवाय तयार केलेली तुमच्या व्यवसायाची वेबसाईट -
बरेच ग्राहक एखादी वेबसाईट ही प्रोफेशनल आहे की अमॅच्युअर दिसतेय हे क्षणार्धात ओळखतात. ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या व्यवसायाच्या प्रतिमेवर होऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या व्यवसायाची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत व तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या उत्तम वेबडेव्हलपरकडूनच तुमच्या व्यवसायाची वेबसाईट तयार करून घ्या.
3. तुमच्या मार्केटींग कँपेन्सच्या निकालांवर लक्ष ठेवा -
अनेकजणं डिजिटल मार्केटींग तर मोठ्या झोकात करतात पण त्यानंतर त्याचे परिणाम काय झालेत, त्याचा इफेक्ट काय व कसा आणि कोणाकोणावर झालाय हे सगळं तपासायचं त्यांच्याकडून राहूनच जातं. हे अत्यंत गंभीर असू शकतं. याचं कारण, तुम्ही ज्यासाठी एवढा खर्च करून असं डिजिटल मार्केटींगचं कँपेन केलंत तोच उद्देश तुम्ही विसरून गेलात.. आणि व्यावसायिकांसाठी अशी पैशांची उधळपट्टी बरी नाही.
4. सोशल मीडियावर फक्त ब्रॉडकास्ट करण्यासाठी नव्हे तर लोकांना एंगेज ठेवण्यासाठी कंटेंट बनवायला हवं.
सोशल मीडिया हे केवळ एकतर्फी संवादाचे साधन नाही, तर इथे मास कम्युनिकेशन अर्थात जनसंवाद केला जातो. त्यामुळे तुम्ही केवळ तुमचा कंटेंट क्रिएट करून तो येथे व्हायरल करून त्यापासून अलिप्त राहणं हे योग्य नाही तर त्यापेक्षा तुम्ही तुमचा कंटेंट क्रिएट करून त्यावर आलेल्या लोकांच्या कमेंट्स वाचणं, त्यांना योग्य तिथे रिप्लाय करणं हे फार महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया मार्केटींग करणाऱ्या प्रत्येकाने हा भाग सवयीचा केला पाहिजे. किमान लोकांच्या प्रतिसादावर लाईक्स तरी दिले पाहिजेत.
5. अति प्रमोशन करणे टाळा -
डिजीटल माध्यमं आपल्या अगदी हातातच असल्याने बरेचदा आपल्याला आपल्या व्यवसायाच्या किंवा आपल्या कामाच्या जाहीराती सतत करण्याचा फार अनावर मोह होतो. पण इथेच तर चुकतं. कारण कोणत्याही गोष्टीचं अति प्रमोशन केलं तर ग्राहकांचा त्यातला रस कमी होत जातो. तसंच, सतत एखाद्या वस्तूबद्दल वा एखाद्या सेवेबद्दल जर लोकांना थेट सांगत राहिलं तर कदाचित त्याचा रिव्हर्स इफेक्ट म्हणजे, त्या वस्तूविषयी वा सेवेविषयी ग्राहकांच्या मनातलं कुतूहल कमी होत जातं.
कंटेंट मार्केटींगची खासियतच ही असते की तुम्ही तुमची सेवा वा उत्पादन याविषयी थेट माहिती न देताही तुमचा ब्रँड प्रमोट करून तुमच्याकडे ग्राहकवर्गाला आकर्षित करू शकता. कंटेंट मार्केटींग करताना तुम्ही ग्राहकोपयोगी माहिती, टिप्स आणि ट्रिक्स, महत्त्वाच्या बाबी, सावधानी याविषयी तुमच्या लेखांमधून वेळोवेळी बोललं पाहिजे. अशा लेखांमधून ग्राहकांना, जे इथे तुमचे वाचक असतात, त्यांना काहीतरी उपयुक्त असं दरवेळी मिळालं पाहिजे. तरच, ग्राहक तुमच्या ब्रँडकडे आकर्षित होईल व तुमची सेवा घेईल.
6. सतत खरेदी करण्याचे आवाहन करण्याची गरज नाही -
एरवी इतर माध्यमातून होणाऱ्या जाहिरातींमध्ये एखाद्या उत्पादनाविषयी वा सेवेविषयी ग्राहकांना सतत ते खरेदी करण्याचे आवाहन निरनिराळ्या पद्धतीने केलेले असते. मात्र, डिजीटल मार्केटींगमध्ये असं थेट आवाहन सतत करण्याची गरज नसते. बरेचदा, डिजीटल मार्केटींग करताना,“buy now” चं बटन क्रिएट केलेलं असतं. पण, असं करण्याऐवजी जर तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये बॅकलिंक दिलीत (म्हणजे तुमच्या सेवा वा वस्तू पुरवणाऱ्या थेट वेबसाईटची लिंक त्या त्या संबंधित आर्टीकलमध्ये पेस्ट करणे) तर त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम मिळू शकतो.. मात्र, जर तुम्ही बॅकलिंकशिवायच सतत कंटेंट मार्केटींग करत राहिलात तर मात्र तुमचं संपूर्ण डिजीटल मार्केटींग पॉईंटलेस ठरू शकतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण, शेवटी कोणत्याही प्रकारच्या मार्केटींगचा हेतू हा ग्राहकांनी तुमचं उत्पादन वा सेवा खरेदी करण्यासाठीच केलेलं असतं आणि त्यासाठी ग्राहकांना तुमच्या मार्केटींगमुळे तुमचे उत्पादन वा सेवा खरेदी करण्याची कृती करावीशी वाटली आणि त्यांनी तसं केलं तरच तुमचं मार्केटींग यशस्वी झालं असं म्हणू शकतो.
7. लोकांना सतत तुमच्या ब्रँडसह एंगेज ठेवता आलं पाहिजे -
जेव्हाही कोणताही लेख तुम्ही सोशल मीडियावर प्रसिद्ध करता त्यानंतर तुम्हाला तुमच्या वाचकांना त्या लेखासह कनेक्ट करता आलं पाहिजे. जेणेकरून, हेच वाचक तुमच्या ब्रँडसह सतत एंगेज रहातील.
तुमच्या लेखाला प्रतिक्रिया मागवून किंवा जनमत चाचणी वगैरे दर थोड्या थोड्या अवधीनंतर सुरू ठेऊन तुम्ही वाचकांना तुमच्याशी जोडून ठेऊ शकता.. किंबहुना तसं करायलाच हवं. तसंच, लोकांच्या प्रतिक्रियांना उत्तरं देणं, प्रतिसाद देणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. एखादी चर्चा घडवून आणणं, ग्राहकांना जोडण्यासाठी निरनिराळे उपक्रम सोशल मीडियावर सतत करत रहाणं हे देखील फार गरजेचं आहे, यामुळे लोकांच्या मनात तुमच्या ब्रँडविषयी एक विश्वासार्हता निर्माण होते.
8. फक्त लेखांद्वारेच डिजिटल मार्केटींग पुरेसं नाही -
अनेक जण केवळ लेख लिहून किंवा अन्य लिखीत माध्यमातूनच आपल्या उत्पादनाची वा सेवेची जाहिरात डिजीटल माध्यमावर करत असतात. मात्र, इथे या माध्यमावर केवळ तितकंस पुरत नाही. त्यामुळेच लेखांबरोबरच अन्य अनेक प्रकारांना तुम्ही तुमचं मार्केटींग केलं पाहिजे, त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल.
यासाठी तुमच्या ब्रँडविषयी माहिती देणारे, तुमच्या उत्पादनांविषयी वा सेवांविषयी माहिती देणारे, रंजक असे व्हिडीओज तयार करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायला हवेत. त्याचबरोबर तुम्ही स्लाईड प्रेझेंटेशनचाही वापर करू शकता आणि हल्ली प्रचलित होत असलेला प्रकार म्हणजे पॉडकास्ट .. तुम्ही पॉडकास्टद्वारेही मार्केटींग करू शकता.
डिजीटल मार्केटींग करताना सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, सतत एकाच पद्धतीने मार्केटींग करणे टाळायला पाहिजे. या इंटरॅक्टीव्ह माध्यमाचा योग्य वापर करून ग्राहकांना सतत निरनिराळ्या प्रकारे तुमच्या ब्रँडकडे आकर्षित केलं पाहिजे. आऊट ऑफ बॉक्स विचार करता आला पाहिजे.
आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ज्यावेळी एखादी काँसेप्ट इथे फेल जाईल, त्यानंतर लगेचच नवी काँसेप्ट घेऊन त्या पद्धतीने मार्केटींग करत आपल्याशी ग्राहकांना सतत जोडून ठेवता आलं पाहिजे. अकारण लाखो रूपये खर्च करून डिजीटल मार्केटींग करणं, ज्याचा प्रत्यक्षात काहीच उपयोग होताना दिसत नसेल तर ते करणं थांबवलंच पाहिजे.
हेन्री फोर्ड म्हणतो नं, 'जर तुम्ही नेहमी तेच केलंत जे तुम्ही आजवर करत आलेला असाल, तर तुम्हाला नेहमी तेच आणि तेवढच मिळेल जे तुम्हाला आजवर मिळत आलेलं आहे ' !
धन्यवाद
- मोहिनी घारपुरे - देशमुख