शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

मला उद्ध्वस्त व्हायचंय - मलिका अमर शेख #पुस्तकातून भेटलेली माणसं


'मलिका अमर शेख' यांचं 'उद्ध्वस्त व्हायचंय मला' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक मी पूर्ण वाचलं. पुस्तक लहान आहे पण जीवनाचं विद्रुप रूप दर्शवणारं आहे. मलिका शेख या शाहीर अमर शेख यांच्या कन्या आणि ललित पॅंथर संघटनेचे सर्वेसर्वा तथा कवी नामदेव ढसाळ यांची बायको...
पण ही त्यांची ओळख नाही... किंबहुना मलिका यांनी स्वतःला लवकर ओळखलं असतं तर कदाचित त्यांना या अन्य ओळखीची गरजच पडली नसती. पण माणसाचं आयुष्य त्याच्या स्वतःच्या हातात नाही त्यामुळे बुद्धीला कितीही गोष्टी कळल्या किंवा कळल्या नाहीत तरीही घडतं तेच जे घडणार असतं ! मी हे पुस्तक वाचताना त्या त्या टप्प्यावर मला जे जे वाटलं ते लिहितेय पण यात कोणावरही टीकाटिप्पणी नाही, गेलेल्या माणसावर तर अजिबातच नाही... फक्त एक त्रयस्थ वाचक, संवेदनशील व्यक्ती म्हणून मला हे प्रश्न पडले आणि अर्थातच त्याची उत्तरंही मला ठाऊक आहेतच ...
मलिका यांनी नामदेव यांच्याशी मुळात लग्न करताना काहीच कसा विचार केला नाही याचंंच मला आश्चर्य वाटलं. नामदेव ढसाळ यांची वर्तणूक किती जास्त ' ढिसाळ ' होती ..एक नेता म्हणून मिरवणाऱ्या माणसानं वैयक्तिक आयुष्य इतकं किळसवाणं, अविचारी आणि बेधुंदपणे जगावं ही विसंगती खरोखरच अशक्य आहे. या माणसांनी मुळात लग्नच करू नये, यांना बायका पोरांची गरज नसते मग कशाला ही लोढणी ते गळ्यात बांधून घेतात कोणास ठाऊक?
पुस्तक वाचताना क्षणाक्षणाला मलिका यांच्या कोमल भावनांचा एका वळूने कसा चक्काचूर केला याची प्रचिती येते. एका टप्प्यावर तर मलिकाने लिहीलंय की 'नामदेवसाठी माझ्या मनातून तळतळाट निघत' ते वाक्य वाचताना स्त्री म्हणून मी तिच्या सगळ्या भावना समजू शकले.
कधी कधी वाटतं, हे असे पुरूष स्वतःला काय समजतात? ही अशी कुटुंब ज्यांच्या घरात हे असे दिवटे जन्माला येतात त्या कुटुंबाच्या संस्कारातच गडबड असते आणि ते खरंही आहे. मलिका यांनी पुस्तकात आपल्या सासू सासऱ्यांचं जे वर्णन केलंय ते वाचताना अंगावर काटा येतो अक्षरशः!!
किती एखाद्या बाईच्या स्वप्नांची, भावभावनांची होळी ... अरेरे... आणि तरी ही बाई त्याला शेवटी दवाखान्यात घेऊन जाते, त्याच्या शेवटच्या काळात त्याचं सगळं करते. शिकून सवरूनही माणुसकीच्या नात्याने आणि स्वतःवर झालेल्या संस्काराने आपल्या बाजूने पत्नी धर्म निभावते... हे सगळं थोर आहे. कदाचित कोणत्याही भारतीय नारीचा हाच चॉईस असतो.
'पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर दाद कोणाकडे मागायची?' या उक्तीप्रमाणे अजूनही भारतीय संस्कृती ही अशीच 'चालते'. बायकोने नवऱ्याचा आधार होत कुटुंब सांभाळायची ...मुलं वाढवायची आणि कुटुंब आणि मुलं नवरा यातच इतिकर्तव्यता मानायची हे असले विचार.
नाही, पण मग बाईनं जन्माला येताना जो मेंदू दिलाय देवानं तो कधी वापरायचा? जे मन दिलंय ज्या जाणीवा दिल्या आहेत त्यांचं काय करायचं?

मुळात आपण मशीन नाही माणसं आहोत ...हा फरक ' जबाबदारी चा ' जो इथे खेळ रंगतो, त्या खेळाला मान्य नाही, इथेच सगळा घोळ आहे असं कधीतरी मला वाटतं.

मलिका आपण खूप भोगलंत ...
पण खरंच ..‌. मला प्रश्न पडला की हे सगळं सोडून मोकळ्या का नाही झालात?
पण तसं मोकळं होण्याचं ठरवूनही त्यात किती अडचणी तुम्हाला आल्या तेही कथन केलंय तुम्ही...
आपली जीवन कहाणी वाचून खूप खूप 'मळमळलं' ... हो नुसतं भरून नाही आलं तर सगळं अंतरंग ढवळून निघालं माझं !

तुमच्या जीवन जगण्याच्या ऊर्मीला मात्र मनोमनी सलाम....

थांबते
- मोहिनी घारपुरे देशमुख

( हे पुस्तक माझे लेख वाचून केवळ एक छान भेट म्हणून मला ज्यांनी पाठवलं त्या मुंबईच्या स्पर्श बुक शॉपचे विजय यांचेही आभार... मला आत्मचरित्र वाचायला आवडतात हे सांगितल्यावर त्यांनी स्वतः निवडून हे छोटंसं पुस्तक मला भेट म्हणून पाठवलं होतं. )

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

‘पानगी’ ते ‘कियांती’.... डॉ.वंदना बोकील –कुलकर्णी

मला हा लेख अतिशय आवडला म्हणून मी वंदना ताईच्या पूर्वपरवानगीने हा लेख माझ्या ब्लॉगवर माझ्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहे. या लेखाचे सर्व हक्क मूळ लेखिकेचे आहेत, तरी हा लेख त्यांच्या परवानगीशिवाय कुठेही कोणत्याही स्वरूपात वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- मोहिनी घारपुरे देशमुख 
.......


‘पानगी’ ते ‘कियांती’
डॉ.वंदना बोकील –कुलकर्णी
९८२२०३३५६२ 

लहानपणीच्या बाळ गाण्यांमधली ती ‘उ’ ची गोष्ट आठवते नं... 
एक होती उ
तिला झाली टू
आणि मग पुढे ती बाजारातून भाजी आणते. 
चिरते कशी...
शिजवते कशी...
खाते कशी.. वगैरे स्वयंपाकातल्या सगळ्या क्रियांची ओळख देणारी गंमतीची गोष्ट. 
किंवा ‘दत्त दत्त दत्ताची गाय...’ हे गाणंदेखील. दूध, दही, लोणी, तूप, बेरी... सगळा प्रवास उलगडत नेणारं... आज वाटतं, नुसते बडबडगीत होते ते की सोन्यासारख्या दुधाची अखेर माती होते पण त्यातून पुन्हा दत्त आकाराला येतोच... असं काही ते गाणं सांगू पाहत होतं का... 
तसं तर लहानपणीच्या बडबडगाण्यातला धम्मक लाडू आणि चापट पोळी अधूनमधून मिळाली होती. ’पाडवा गोड झाला’ ह्या धड्यातली ताई शिळ्या भाकरीचा गूळ घालून लाडू करते आणि धाकट्या भावंडाना खाऊ घालते, आत्यंतिक गरिबीतही सणावाराला त्यांचे तोंड गोड करते, हा शिळ्या पोळीचा किंवा भाकरीचा लाडूही मध्यमवर्गीय घरातून मिळेच खायला. शिवाय ‘मामाची बायको सुगरण... रोज रोज पोळी शिकरण’ यातला उपरोध काही समजला नसला तरी रोज शिकरण मिळण्याच्या कल्पनेतही आनंदच आनंद होता. मुक्ताबाईनं ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजल्याची गोष्ट अद्भुत वाटली खरी पण त्या वयात मांडे हा काय पदार्थ असावा याचं कुतूहल अधिक होतं. शिवाय मनात मांडे खाणे... हा वाक्प्रचारही होताच कानावर पडलेला. आता सरसकट सगळे पदार्थ नाक्यावरच्या मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात, त्यामुळे त्यांचं काही विशेष अप्रूप नाही. पण बेळगावी मांडे चाखेपर्यंत ते मनाच्या एका कोपऱ्यात होतंच जागा अडवून बसलेलं. मग भोंडल्याच्या गाण्यात समजलेली सपीटाची करंजी आणि ‘अश्श्या करंज्या सुरेख बाई माहेरी धाडाव्या’ मधला टोमणा कळायचं वय नसलं तरी ‘तबकात शेल्यानं झाकलेल्या’ करंज्याचं भलतंच आकर्षण होतं.ते साहजिकच नव्हतं का? फक्त गौरीच्या सणाला आणि दिवाळीत करंजी करायचा काळ तो.
शिवाय ‘कारल्याचा वेल लाव ग सुने’ या गाण्यातली ती कारल्याची भाजी आणि ‘हरीच्या नैवेद्याला केलेली जिलबी कशी बिघडली’ नि त्या बिघडलेल्या जिलबीचे काय काय केले, ते गाणं म्हणता म्हणता पदार्थ बिघडण्याची मुभा असते, तेही वेळीच समजलं! 
शाळेच्या भूगोलात अनेक ठिकाणचे लोक कोणता आहार घेतात, त्याची माहिती असायची. बदायुनी लोक वाळवंटात राहातात. त्यांच्या आहारात खजूर, दूध, शेळी-मेंढीचे मांस असते, हे शिकताना बालबुद्धीला वाटे जेवणाच्या ताटात खजूर घेऊन खात असावेत. किंवा कॅलीफोर्निया हा फळफळावळांचा प्रदेश, तिथल्या लोकांच्या आहारात भरपूर फळे असतात वगैरे. त्यामुळे हरतालिकेच्या उपासाला आम्ही फळफळावळांचा उपास म्हणत असू.

‘गोधूम वर्ण तिचा हरिणाच्या पाडसापारी डोळे’... असं वर्णन असणारी कवी चंद्रशेखर यांची ‘जिऊ’ नावाची एक कविता शाळेत होती. त्या कवितेत तिच्या पाककौशल्याचं वर्णन मोठं बहारदार होतं.
कातीव सूत ऐशा येत तिला शेवया वळायाला,
ह्या फेण्या! म्हणुनि तिच्या लोकभ्रम कुर्डयांवरी झाला.
लावोनी गुळवणी वा पुरण करी सार ती मजेदार
ऐसे की ते सेवुनी हुशार व्हावा मनुष्य बेजार.

वर्षातून कमीतकमी तीन वेळा घरी मऊसुत पुरणपोळ्या होत होत्या तेव्हा. श्रावणात, नवरात्रीत आणि होळीला. पण ‘हुशार व्हावा मनुष्य बेजार’ ही गंमत मात्र बरीच उशिरा समजली.

पुढे ‘हद्दपार’ ही श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी कॉलेजात अभ्यासाला नेमलेली होती. त्यातले राजेमास्तर अर्थातच आठवतात. त्यांची ती मुलांना शाळेत घेऊन जाण्याची अनोखी पद्धत आठवते. त्यांचा स्वाभिमानी पीळ, त्यांचं पुरोगामित्त्व हेही लक्षात आहे. पण पुरुष लेखकाच्या साहित्यात प्रथमच खाद्यपदार्थाचं वर्णन वाचलं ते यात! विशेषतः पानगी! ती पानगी इतकी काही डोक्यात बसली की कधी ती जिभेवर उतरते असं झालं आणि योगायोग म्हणा की जबरदस्त इच्छाशक्ती म्हणा त्या वर्षीच्या दिवाळीच्या सुट्टीत कोकणात जायला मिळालं. आणि ती पानगी खाल्लीही. तर पुस्तकातून जिभेवर आलेला हा पहिला पदार्थ. म्हणजे आठवणीतला पहिला. पुढे स्वयंपाक आणि त्यात प्रयोग करायचं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा करूनही पाहिली ही पानगी. शहरात राहून अट्टाहासानं केळीची पानं पैदा करुन केली.  

आशा बगे यांच्या लेखनातली आलं घालून केलेली कॉफी, फुलके आणि कोबीचा रस्सा, ‘महावस्त्र’ कथेतला अख्ख्या बटाट्याचा रस्सा, रोहिणी कुलकर्णी यांच्या कथेत येणारं ते मुगाचं बिरडं, सामिष पदार्थ, ‘बटाट्याच्या चाळी’ मधल्या त्रिलोकेकरांच्या मांडीला झोंबणारा गोडी बटाटीचा रस्सा... जीभ चाळवणारी ही वर्णनं वाचत असताना कधीतरी ते पदार्थ करुन पाहण्याची इच्छा मनात असे. पुढे मग त्यातलं बरंचसं केलंही! ‘रुचिरा’च्या आधी त्यांची ओळख झाली ती मात्र मराठी साहित्यातून.

थोडं पुढच्या वयात कवितेतही भेटले कितीतरी पदार्थ. अनुराधा पोतदारांच्या एका कवितेत ‘वरणाला फोडणी खमंग पडली...’ म्हणून खुशालून जाणारा ‘तो’ आहे. कुणाचं मन जिंकायच्या या युक्त्या पुढे फोल वाटल्या तरी त्या आहेत अजूनही अनेकांच्या मनात. 

‘द्रोण’ या अरुण कोलटकरांच्या कवितेत रावणावर विजय मिळवल्यावर रामानं दिलेल्या जंगी पार्टीतले एकेक नामी पदार्थ नुसत्या वर्णनानेही आवंढे गिळायला लावतात.

"आणि खाद्यपदार्थांची रेलचेल
तर काय तिथं म्हणजे
विचारूच नका.
जिभेचे चोचले पुरवायचे
जेवढे म्हणून पदार्थ आहेत जगात,
भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोष्य,
म्हणजे चाखायचे, चाटायचे, चोखायचे
चावायचे, चघळायचे,
कुरतडायचे, गिळायचे, ओरपायचे,
भुरके मारायचे म्हणा
किंवा तोंडात आपोआप विरघळणारे,
ते सगळे होते तिथं."

आणि पुढे कोलटकर त्या पदार्थांची जी काय जंत्री सादर करतात ना... कमाल वाटते, त्यांच्या अभ्यासाची आणि कल्पनाशक्तीचीही.
साधं पाणी ते काय... पण आपल्याकडे ते पाणी किती प्रकारचं प्यायलं जाई ते पाहिलं म्हणजे माणसाच्या जिव्हालौल्याविषयी आदर वाटू लागतो. याच द्रोण कवितेत पहा- 

"शृंगवेरांबू,
म्हणजे आपलं सुंठीचं पाणी,
वाळ्याचं पाणी, नागरमोथ्याचं पाणी,
कोऱ्या मडक्यात रात्रभर
चांदण्यात ठेऊन थंडगार केलेलं
कर्पूर सुगंधित पाणी"

कसं निवांत आणि स्वस्थ आयुष्य असेल आपल्या पूर्वजांचं असं वाटतं हे वाचून.
खाद्यपदार्थांमध्ये स्थळ,काळ, संस्कृती आणि सामाजिकता यांचं प्रतिबिंब कसं स्पष्ट प्रकटतं ते पाहणंही जाणिवांच्या कक्षा रुंदावणारं आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या कथांमधून त्यांची पात्रं काय खातात ते बघा. त्यांचा धर्मा रामोशी तांबड्या रंगाची भाकरी आणि उकडलेल्या पालेभाजीचा लगदा खातो... त्यांच्या एका कथेत पारधी लोक निवेदकाला गिधाड मारून देण्याची गळ घालतात. रानावनात फिरून वनविद्येत माहीर झालेल्या या लेखकाला प्रश्न पडतो की गिधाडाचं काय करणार हे लोक. मिठू शिपाई म्हणतो, “खाणार. तव्यावर उलिसं तेल टाकून मीठ मिरची टाकून भाजायचा. मस्त कोंबडीवाणी लागतो!” चितूर, पकुर्डया वगैरे पक्षी खाण्याचे उल्लेख या गिधाडापुढे मग अगदीच सपक वाटायला लागतात. त्यांच्या कितीतरी कथाकादंबऱ्यात सामिष पदार्थ त्यांच्या वासासह घमघमतात.

 ‘पाडस’मधलं बॅकस्टर कुटुंब हरणाचं, अस्वलाचं मांस, खारीचा पुलाव, अस्वलाच्या चरबीत तळलेलं बेकन असं काय काय खाताना दिसतं. शाकाहारी असून ह्या कुठल्याच पदार्थांनी कधीच शिसारी आली नाही हे विशेष. ही देखील साहित्याचीच देन.

हिरा बनसोडे यांच्या ‘सखी’ कवितेत मात्र जेवणाचं वर्णन आणि त्याचा अनुभव चटका लावणारा आहे... कवितेतली मैत्रीण सवर्ण सखीला जेवायला घरी बोलावते. ‘माणसाला दुभंगणाऱ्या जातीच्या दऱ्या ओलांडून’ सखी जेवायला आली म्हणून ती हरखून जाते.

"शबरीच्या भोळ्या भक्तीनेच मी तुझं ताट सजवलं,
किती धन्य वाटलं मला!
पण… पण ताट बघताच तुझं चेहरा वेडावाकडा झाला,
कुत्सित हसून तू म्हणालीस,
”इश्श! चटण्या, कोशिंबिरी अशा वाढतात का?
अजून पान वाढायलाही तुला येत नाही
खरंच, तुमची जात कधीच सुधारणार नाही!”

‘आठवणींचे पक्षी’ या प्र. इ. सोनकांबळे यांच्या आत्मचरित्रातला बिदवा –म्हणजे गुरांचे शेण गोळा करुन त्यातील धान्याचे कण वेचून, धुवून खाणारा, चड्डीच्या खिशात भाकरीचे तुकडे ठेवून पाण्याच्या घोटाबरोबर ते खाणारा लहानगा पल्या पोटात अक्षरशः कालवाकालव निर्माण करतो.
अशीच ‘भूक’ ही बाबूराव बागुलांची कथा. तापानं फणफणलेली आई आपल्या लहानग्यांच्या तोंडात अन्न पडावं म्हणून भर पावसात जाळं घेऊन समुद्रावर जाते. तिला जाळ्यात मोठासा मासा गवसतो. आनंदानं घरी येऊन मिणमिण उजेडात ती तो शिजवून मुलांना खाऊ घालते. दुसऱ्या दिवशी उजेडात पाहते, तो मासा नसून साप असल्याचं कळतं! भीतीनं आणि काळजीनं तिचा जीव उडून जातो. वाचताना अंगावर सरसरून काटा येतो, अशी ही कथा. गावकुसाबाहेरच्या जगण्याचं भान ही साहित्यानं दिलं. तसं जगभरात रांधण्याचा मक्ता बाईकडेच आहे याचीही जाणीव साहित्यानंच आधी करुन दिली. 
गौरी देशपांडे यांच्या लेखनात तर असंख्य देशी - परदेशी पदार्थ हजेरी लावतात. तिची ’रोजमेरी फॉर रिमेमब्रंस’ आठवते. ’एकेक पान गळावया’ तली राधा युगोस्लावियात एका म्हातारीकडून ब्रेड करायला शिकते. “ती विचारे, मग पीठ किती घेऊ, यीस्ट किती घालू नि तेल किती घेऊ. म्हातारी म्हणे, घे अंदाजानं. पिठाचं पोत बघून घे जास्तकमी. तिला काही उमजेना. म्हातारी शिकवायची पीठ कसं मळायचं ते. निष्णात तबलजीसारखा तिचा हात चाले. एका हातानं पीठ दुमडून गुद्दा लगावायचा, दुसऱ्या हातानं पीठ ओढून फटकन दुमडता दुमडता तीस अंशात वळवायचं. तिला चपात्यांची सवय, मुळीच जमेना. म्हातारी म्हणे, अगं, तालात करावं. बघ, एक- दोन –तीन- चार! म्हातारीला ताल जमे. शेजारच्या घरुन ऐकायला येई, म्हातारी ब्रेडचं पीठ बडवायला लागली की! अखेर तिला म्हणाली, हसत हसत, “तुझी ब्रेड कशी होईल मला माहितीय! देवाचं नाव घेऊन टाक भट्टीत. कधी फुगेल, कधी बसेल. फुगलीच तर खा. बसून दगड झाली तर धुणी बडव तिच्यावर!” आता ब्रेड हा भारतातला नेहमीचा पदार्थ झालाय,पण हे वाचलं तेव्हा वाटलं जगभर ब्रेड नाहीतर भाकरी... बायांचं काम काही सुटत नाही. इथे आता देशोदेशीचे पदार्थ सहज मिळू लागलेत. पण वेगवेगळे चीजचे प्रकार आधी चाखले गौरीच्या लेखनात. ‘मध्य लटपटीत’ मधली निर्मला भावासाठी लोणची मसाले बांधून देते ते असेच सगळे भन्नाट. गोवा करी मसाला, डिंगऱ्याचं लोणचं, विंडालु चटणी, लसणीची चटणी, आंबोशीचं लोणचं. ही विंडालु चटणी काही मला अजून खायला मिळाली नाहीये. पण माईन मुळ्याचं लोणचं मात्र बेळगावी चाखायला मिळालं.
‘दुस्तर हा घाट’ मधले हरीभाई पितात तो कोरा चहा! ’जिभेवर जरा मिरमिरणारा, सुगंधी, किंचित मातकट –सांगताच यायचा नाही अशा स्वादाचा. आणि त्याचा तो रंग! तांबूस-तपकिरी आणि पारदर्शक. मधासारखा.’ आणि तो चहा तयार करण्याची त्यांची ती खास पद्धत, नमूसारखीच आपणही ती नवलाईनं पाहतो. “उकळी आलेल्या पाण्याने एक किटली विसळून घेऊन त्यांनी तिच्यात एकच चमचा लांब लांब पत्तीचा चहा टाकला. आणि वर भरपूर उकळते पाणी ओतून ती, दोन कप आणि खास नमूच्या सन्मानार्थ आणलेली खारी बिस्किटे.” या कोऱ्या चहाचं प्रस्थ आताशा किती बोकाळलं आहे. पण ८५-८६ साली नमूच्या मावशीला वाटलं तसं ते आम्हा वाचकांनाही चमत्कारिक वाटलं होतं खरं.
लेमन टी, भाज्यांचं सूप आणि ब्रेड! आतून मऊमऊ, फुललेली आणि बाहेरून खरपूस. तिळाची नक्षी असलेली. गौरीच्या लेखनातून अशा कितीतरी अनोख्या पदार्थांची ओळख झाली. आता सर्रास खातो त्या नुडल्स ‘एकेक पान गळावया’त प्रथम वाचल्या. ‘एकेक प्लेट शेवया घेऊन राधा आणि माधव फ्लॉरेन्समध्ये जेवतात...’ .तेव्हा कळलं नव्हतं हा काय पदार्थ असावा... नंतर कधीतरी नुडल्स समजल्या. म्हटलं हात्तिच्या.

‘रारंगढांग’ या प्रभाकर पेंढारकर यांच्या कादंबरीमध्ये हिमालयात, सैन्याच्या शिस्तीतून थोडासा उनाडपणा करुन ‘पुट्टू’ हा खास केरळी पदार्थ बनवला जातो… गुरुचरणसिंग या गॅरेजमध्ये मशिनरी दुरुस्त करणाऱ्या सहकाऱ्याला सांगून कॅ. मिनू खंबाटा त्याच्याकडून बांबूची नळकांडी तयार करुन घेतो. बिनधास्तपणे नारळही मशिनरीच्या यादीत टाकून रामपूरहून मागवून घेतो आणि मग एके दिवशी डिनरला कॅ. नायरच्या देखरेखीखाली हा ‘पुट्टू’ तयार होतो. “मिनूनं एक नळकांड आडवं धरलं आणि खालची गोल चकती पुढं ढकलून आतला पुट्टू प्लेटमध्ये काढला. तांदूळपीठ आणि नारळ यांची ती अफलातून चीज! त्या लांब ‘पुट्टू’चा एक तुकडा त्यानं तोंडात टाकला आणि त्या चवीनं तो खुश झाला.” मिनू या पात्राच्या जीवन रसरसून जगण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकणारा हा प्रसंग त्या ‘पुट्टू’नं अधिक चविष्ट झाला हे नक्की.

‘भात पिठल्याची गोष्ट’ असं नाव असलेली विजया राजाध्यक्ष यांची कथा आहे एक. खाण्यापिण्याचे अवाजवी लाड करुन बिघडलेल्या भीमाची गोष्ट आहे ती. कढीत काय घाला नि आमटीत काय नको... अमुक भाजी असेल तर तमुक तोंडीलावणे हवेच... असल्या सूचना पुरुष माणसांकडून ऐकायची सवय नसल्याने या भीमाची बायको नाराज होते. तिची नाराजी आता सहज समजू शकते. 

‘चुलत सासूची सेवा..’ म्हणून मंगला गोडबोले यांचा अप्रतिम लेख आहे... चुलत सासू म्हणजे चूल. चुलीशी बाईचं असणारं नातं एक आदिम बंधच आहे! जन्म देणं आणि भरणपोषण करणं ह्या निसर्गदत्त जबाबदाऱ्यांचा. तोच चूल आणि बाई यातही दिसतो. बारकाईनं विचार करणारीला आणि स्वयंपाक करण्याचा आनंद घेणारीला काय काय मिळू शकतं, याचा चविष्ट आलेखच त्या लेखात आहे.  
‘किचन पोएम्स’ म्हणून एक कवितासंग्रहच आहे. धीरुबेन पटेल या गुजराती कवयित्रीच्या कवितांचे उषा मेहता यांनी केलेले हे भाषांतर म्हणजे स्वयंपाकघर केंद्राशी असलेल्या विविध भावनांचा गोफ आहे. स्त्री आणि स्वयंपाकघर यांची अतूट सांगड कोण जाणे कोणत्या काळात बसली. पण आजही ती तशी आहे. काही जणींना तो तुरुंग वाटू शकतो तर काहींना अपार आनंद देणारी स्वतःची जागा. काहींना इतर अनेक अपरिहार्य कामासारखी एक बाब. स्वतःचा अवकाश. प्रेम, निराशा, गुलामगिरी, तोचतोचपणा, कंटाळवाणेपणा अशा कितीतरी अनुभवाचं विश्व या १०० कवितांमधून उलगडत गेलं आहे. मुदपाकखान्यात शिजणारे विषप्रयोग, कारस्थानं ते तिथे मिळणारी अधिकाराची जाणीव, अभिमान इथपर्यंत सर्व काही त्यात आहे.

"बंधमुक्त झालेल्या त्या स्त्रीला
नोकरी होती, मित्रमैत्रिणीही खूप
बँकेतली ‘जमा’ व्यवस्थित
आणि तिचं छोटंसंच स्वयंपाकघर
स्वच्छ, नीटनेटकं
आवडेल तेच करायचं
नाहीतर बाहेर खाऊन यायचं
परिपूर्ण वाटावं, असंच हे आयुष्य.
तरीही... एक दिवस रडू कोसळलं तिला
आईच्या हातच्या स्वयंपाकाच्या आठवणींनी..."

आईच्या हातचा स्वयंपाक ही तर बहुधा सगळ्यांच्याच मनातली हळवी आठवण असते म्हणा.
केवढी मजा असायची तेव्हा
स्वयंपाकघरात बसायचं जमिनीवर मांडी ठोकून
हसायचं, खिदळायचं, बडबड करायची
त्याचवेळी वाट पहायची उत्सुकतेनं
नेम धरुन फेकलेला तो फुग्यासारखा टम्म फुलका
कसा पडतोय पानात एकेकाच्या पाळीपाळीनं
जेवण संपेपर्यंत चालत असायची ही धमाल
 
धूसर होत चालल्या आहेत आठवणी ...
तरीही लपेटून आहेत, आयुष्याला
तलम धाग्यांच्या कोळ्याच्या जाळ्यासारख्या
आईचं ते हसू
अजून रेंगाळत राहिलंय त्या विरळ धाग्यांमध्ये"

कितीतरी जुन्या साहित्यकृतींमधून, कवितांमधून उल्लेख आलेले अनेक पदार्थ, वस्तू यांचे संदर्भ काळाच्या ओघात आता पुसट झाले आहेत. आणखी काही वर्षांनी ते अदृश्यच होतील. 
"दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट. 
घडविला जडविला चंदनाचा पाट"
या कवितेत ‘दुधात हा कालविला जिरेसाळ भात’ असा उल्लेख आहे. आता हा जिरेसाळ तांदूळ जनजीवनातून हद्दपारच झालाय. पण हा एक विशिष्ट तांदूळ आपल्याकडे पिकत होता, या वस्तुस्थितीचं हे दस्तऐवजीकरण समजावं का... ज्ञानदेवांनी ‘दहीभाताची उंडी’ देऊ करुन शुभवर्तमान सांगणाऱ्या काऊचं ऋण व्यक्त केलंय, तो दहीभात तर अनेक गाण्यात भेटला, अनेक संदर्भात भेटला. 

कोणत्या ऋूतूमध्ये काय खावं, याचे कितीतरी संकेत प्रत्येक समाजात असतात. स्वाभाविकपणेच ते साहित्यातही उतरले आहेत. पावसाळी हवा म्हणजे आल्याच्या, गवती चहाचा उल्लेख येणारच. भजी, वडे हवेतच जोडीला. तसंच माळव्यातल्या थंड रात्री आणि कडक उन्हाळे यांची वर्णनं आली की हमखास वाळा घातलेल्या पाण्याचे किंवा कैरीच्या पन्ह्याचे उल्लेख येणार! आंबील येणार.
कसं, कुठे, कोणासह जेवण यांचेही किती रंजक तपशील आहेत. बाळकृष्णानं गोपसख्यांसह रानात केलेलं वनभोजन, चोरलेलं दही, दूध, लोणी, गोपाळकाला यांची वर्णनं आहेत. वनवासात द्रौपदीला जेऊ घालावं लागलं त्या दुर्वासांची गोष्ट आहे आणि ती द्रौपदीची थाळी, ते सुदाम्याचे पोहे... शोध घेऊ पाहिलं तर बरंच काही हाती लागत जातं. हा शोध सुफळ संपूर्ण होतो तो मुखशुद्धीनं. म्हणजे विड्यानं. 
तांबुल, विडा, पान, पानपट्टी... पदार्थ एकच. पण आशय कसा बदलतो पहा. त्रयोदश गुणी विडा म्हणजे कात, चुना, लवंग, वेलदोडा वगैरे तेरा पदार्थांनी युक्त असा विडा. ’कळीदार कपुरी पान…’ या लावणीत तो शृंगाराचा संकेत आहे, तर तांबुल म्हटलं की रामदास किंवा पेशवाईवरच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आठवणारच. तिथे मग पैजेचे विडे आहेत, निरोपाचे विडे आहेत, स्नेहभावदर्शक विडे आहेत. भाऊ पाध्ये आणि श्री. दा. पानवलकर यांनी ३४० आणि काय काय नंबरची पानं पण परिचयाची करुन दिली म्हणा. ते त्यांचा उल्लेख नुसता नंबराने करतात किंवा मग पट्टी! 

जेवाणाजेवणातही किती प्रकार! बसायला पाट, ताट किंवा केळीच्या पानाखाली पाट, केळीच्या रसरशीत हिरव्या पानावर वाढलेलं भात वरण, साजूक तुपाची धार आणि भोवती इतर असंख्य पदार्थ. चांदीची ताटंवाट्या, उदबत्त्या, रांगोळ्या असा राजेशाही थाट. शिवाय आवळीभोजन, वनभोजन, सहभोजन, प्रीतीभोजन (हे राजकीय भोजन), डोहाळजेवण, उष्टावण, मातृभोजन, रुखवताचं,... किती प्रकार आणि अखेरचं तेराव्याचं जेवण. शिवाय पंगती आहेत. उभ्या उभ्या चार घास खाणं आहे. नाश्ता आहे, दुपारचं खाणं आहे. पुन्हा जोड्याही आहेतच. पिठलं - भाकरी आहे, भाजी - पोळी आहे. पुरणपोळी - कटाची आमटी आहे. लाडू - चिवडा आहे. चकली - करंजी आहे. श्रीखंड – पुरी, खीर – पुरी, शिरा - पुरी वगैरे कितीही मोठी होईल ही यादी. प्रदेशागणिक पसरत जाईल.

कितीतरी पदार्थ आपल्या भाषेत वेगळ्याच गोष्टी सूचित करण्यासाठी वापरले आहेत. अर्ध्या हळकुंडानं पिवळं काय होतात, हळद पिऊन गोरे काय होतात, नाकानं कांदे सोलतात आणि मूग गिळून बसतात, तुरी देऊन निसटतात, ताकाला जाऊन भांडं लपवतात, टाळूवरचं लोणी खातात. साखर खाण्यासाठी मुंगी व्हायला सांगतात. भ्रमाचा भोपळा फुटतो आणि अंगाचा अगदी तिळपापड होतो.

निव्वळ खाद्य पदार्थांनी किती शब्द बहाल केलेत भाषेला. विविध प्रक्रिया, विविध प्रकारची, आकाराची भांडी आणि म्हणी, वाक्प्रचार, क्रियापदे. यादी करायला बसायचं तर खरेच दमछाक होईल.

खरं म्हणजे मी ‘फुडी’ म्हणतात तशी नाही. मग हे एवढे पदार्थ त्यांच्या नावपत्त्यासह कसे काय मुक्कामाला आले आठवणीत ? मजेचा भाग सोडून देऊ पण ’कशासाठी पोटासाठी’ हा नारा तर कानावर असतो. ज्या गोष्टी आपल्या जगण्याचा अत्यावश्यक घटक आहेत त्यांच्या उल्लेखाशिवाय कोणतंही व्यक्तिदर्शन,समाजदर्शन अपूरंचं रहाणार. समग्र जीवनदर्शन घडवताना लेखकांना या चित्रणाची अपरिहार्यता जाणवली, म्हणूनच नं ते साहित्यात अवतरले? संस्कृतीचं महत्त्वाचं अंग म्हणूनच ते आपल्याही लक्षात राहिले असावेत. या संस्कृतीदर्शनाचा एक भाग म्हणून तर ती ‘कियांती’ ही लक्षात राहिली असावी जशी ती ‘पानगी’ राहिली.
विविध प्रकारची मद्य फार प्राचीन काळापासून आहेत आपल्याकडे... नावं तरी किती बहारदार त्यांची! कादंबरी, वारुणी, सुरा, मदिरा, मैरेय, माधवी,... ही आपली प्राचीन मद्य विशेषांची यादी. आणि ‘अपेयपान’ या निर्देशाने ज्यांचे अस्तित्व ऐतिहासिक कादंबऱ्यातून सुचवलेले आढळते ती मद्यं नंतर मराठी साहित्यात सर्रास दिसू लागली. केवळ पुरुष लेखकांच्या नव्हे तर लेखिकांच्याही! वाइन, बियर, विस्की, रम पासून कोनॅक, काम्पारी पर्यंत अनेक. त्यातलीच ही कियांती. गौरीच्या ‘गोफ’ या कादंबरीत ही विशिष्ट इटालियन मद्याची बाटली वेताच्या वेष्टणात अवतरली. इटलीच्या आमच्या सहलीत एका हॉटेलमध्ये अचानक ही बाटली दिसली आणि ‘ब्रेन वेव्ह’ यावी तशी मी पटकन म्हणून गेले, कियांती...! बरोबरचे सगळे अवाक! आणि मी ही! ही कशी माहिती आपल्याला?? अगदी मद्याचा शौक असावा तशी ही माहिती मेंदूत कधी आणि कुठून जमा झाली? तर बाख आणि मोत्झार्तसह गौरीनं बऱ्याच पाश्चात्य पदार्थांची, संगीताची, चालीरीतींची ओळख दिली करुन त्यातली ही कियांती! आणि हा साहित्यानं मला घडवलेला खाद्यप्रवास. पानगी ते कियांती!
____**____

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

मुगाचे आप्पे पाककृती



हा एक इतका सोपा पदार्थ आहे की अक्षरशः पाच दहा मिनीटात तयार होतो. शिवाय थंडीच्या दिवसात एवढा पौष्टिक पदार्थ गरमागरम खायला मजा येते. मी माझी रेसिपी देतेय खाली पण यातही अनेक अँडीशन्सला भरपूर स्कोप आहे .. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार भरपूर इनग्रेडीयंट्स, भाज्या वगैरे यात अँड करू शकता !

पाककृती - 
१. आख्खे मूग चार पाच तास भिजवा आणि वेळ असल्यास मोडही आणून मग वापरलेत तरीही छानच.
२. आता हे चांगले भिजलेले किंवा मोड आलेले मूग मिक्सरमध्ये घाला.
३। आता चवीनुसार त्यात मीठ, हळद, मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर घाला
४. हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्या.. थोडंस पाणी घालून हे मिश्रण साधारण डोसाबँटर प्रमाणे जरासं सरसरीत करा.
५. आप्पेपात्रात थोडं तेल लावून मग हे बँटर घाला
६. मंद आचेवर दोन्ही बाजूने आप्पे खमंग भाजा
७. सॉस किंवा चटणीबरोबर गरमागरम खा 
८. सोडा घालण्याची गरज पडत नाही.

- मोहिनी घारपुरे-देशमुख

फोटो - स्वतःच
रेसिपी - स्वतःच 

तुम्ही माझ्या नावासह ही रेसिपी शेअर करू शकता !

रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

'Sometimes It NEVER Ends ...!' - औरोमें कहाँ दम था ( चित्रपट रसग्रहण )

हल्लीच्या काळात एक अशी तरल प्रेमकथा घेऊन एखादा चित्रपट समोर येतो आणि माझ्यासारख्या संवेदनशील मन असलेल्या प्रत्येकाच्याच थेट काळजाला हात घालतो. कितीही टीका झाली, कितीही नकारात्मक परिक्षणं छापून आली तरीही मला मात्र 'औरोमें कहाँ दम था ' हा चित्रपट आवडून गेला. विशेष म्हणजे या कथेची मांडणी, यातील गाण्यांचे शब्द, संवाद आणि कास्टींग इतकं सही झालेलं आहे की बघताना माणूस त्या कथेत हरवून गेल्याशिवाय रहात नाही. 

तर कथा सुरू होते ती कृष्णा या पात्रापासून. तब्बल पंचवीस वर्ष जेलमध्ये असलेल्या कृष्णाची ही कथा. 

अजय देवगण या कृष्णाच्या भूमिकेत आहे आणि अजय देवगणचा यंग एजमधला अपिअरन्स शंतनु माहेश्वरी नामक एका उमद्या अभिनेत्याने अगदी चोख साकारला आहे. त्याचं ते पडद्यावर निरागस वावरणं, स्वप्नाळू वृत्ती आणि आपल्या भावनांशी प्रामाणिक रहात आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी काय वाट्टेल ते करून जाण्याचा एक वेडा, भोळसट स्वभाव ... सारं सारं काही या अभिनेत्याने एकदम परफेक्ट दाखवलंय.  

कृष्णा त्याच्या ऐन तारूण्यात वसू नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. चाळीतच रहात असलेली वसू रोज येता जाता दिसत असते. हा वसूसाठी वेडा झालेला असतो. वसूही मग त्याच्या प्रेमात पडते. लग्न, संसार, करिअर, आयुष्य याच्या आणाभाका घेत हे स्वप्नाळू दिवस एकमेकांना डेट करण्यात सुखाचे चाललेले असतात. अशातच एक भयंकर वादळ या दोघांवर येतं. पक्या नावाचा मुलगा कृष्णावर खुन्नस काढण्यासाठी मित्रांच्या सहाय्याने एका रात्री वसूवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करायला लागतो. खरंतर वसू आणि कृष्णाच्या आयुष्यातली ती संध्याकाळ फार फार सुरेख ठरलेली असते. कृष्णाला दोन वर्षांसाठी कंपनीतर्फे जर्मनीला पाठवण्यात येणार असतं आणि हीच गुडन्यूज त्याने वसूला सांगून ती संध्याकाळ भविष्याचं सुंदर प्लॅनिंग करण्यात आणि आता दोन वर्ष भेटणार नाही या काहीशा खंतावल्या अवस्थेत एकमेकांसोबत घालवलेली असते. रात्री उशीरा कृष्णाबरोबर वसू चाळीच्या गल्लीपाशी येते आणि कोपऱ्यावर उतरून कोणी पाहू नये म्हणून पायी पायी झरझर घरी चाललेली असते, आणि तेव्हाच पक्या आणि त्याचे ते टपोरी मित्र वसूवर झडप घालून तिला चाळीलगतच्या एका गोदामात नेतात. गल्लीच्या टोकावर उभ्या असलेल्या कृष्णाला याची काहीच कल्पना नसते. तो निवांत तिथे उभा असतो. वसू घरी पोचल्याचा अंदाज घेतला की मग तो तिथून गाडीवर चाळीत शिरणार असतो, कोणाच्याही नकळत. पण हाय रे, तो दिवसच काहीसा दुर्दैवी असतो. कारण काही दिवसांपूर्वीच कृष्णाने पक्याला त्यांच्या गल्लीतल्या पारसी चाचाच्या बेकरीत चाचाला लूटमार करणाऱ्या तिघांच्या टोळीतला एक पक्या असल्याचे ओळखून नंतर त्या पक्याला चांगलंच थोबडवलेलं असतं. कृष्णाचा चांगुलपणा आणि पक्याचा नीचपणा... अखेर पक्या सूडबुद्धीने वागतोच आणि वसुला त्या रात्री गाठतोच. 

पुढे काय होतं... कृष्णाला या सगळ्यात तुरूंगवास का भोगावा लागतो, आणि त्यातही पुढे वसूचं काय होतं... ती लग्न करते का, तिचा नवरा कोण असतो... या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा चित्रपट पहायलाच हवा... किमान एकदा तरी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 

मला आवडलं ते म्हणजे या कथेची गुंफण. 

मधेच आजचा कृष्णा, मधेच भूतकाळातला कृष्णा... यांची छान साधलेली सरमिसळ. कथा छान फुलवत नेताना मधेमधे पेरलेली संवादसदृश गीतं... ही गीतं नुसतीच काहीतरी शब्दयोजना केलेली नाहीत तर ही गीतं कथानक आणखी सुंदर करतात, प्रेमात पडलेल्या आणि पुढे दुर्दैवाचे दशावतार पाहिलेल्या या प्रेमिकांची मनं, त्यातला शब्द न् शब्द, व्याकूळता सारं काही या गीतांमधून व्यक्त होतं. Sometimes it Never Ends ...या टॅगलाईनसह संपलेला हा चित्रपट मनात कित्तीतरी वेळ रेंगाळत रहातो. बॉलीवूडला नेहमीच हॅप्पी एन्डींगची सवय आहे, त्यामुळे असा वेगळ्या वळणावर थांबवलेला, संपवलेला की पॉझ दिलेला हा चित्रपट अनेकांच्या पचनी पडला नसावा असे मला वाटते. 

तब्बूचं पूर्ण पात्र इतकं तरल दाखवलंय... तिची वेशभूषा, तिचे हावभाव सगळ्यातून तिची तरलता आणि एखाद्या कवितेसारखी गेयता असलेली सुंदर मुलगी इतकी विलोभनीय पद्धतीने दाखवलीये की आहा ... तरूण वयातली वसू सई मांजरेकरने साकारलीये. महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मुलगी सई वसूच्या भूमिकेत सुंदर दिसलीये. फक्त मला असं वाटलं की तब्बूच्या चेहऱ्याशी हीचा चेहरा साधर्म्य राखत नाही, त्यामुळे हे कॅरेक्टर जरा मनात प्रस्थापित व्हायला वेळ लागला. त्याऐवजी एखाद्या उभट चेहऱ्याची आताच्या काळातली अभिनेत्री या भूमिकेसाठी घेतली असती तर तब्बूच्या चेहऱ्याशी नंतर आपण प्रेक्षक जास्त कनेक्ट करू शकलो असतो असे वाटले.

 पण अर्थात, सई मांजरेकरचा अभिनय उत्तमच आहे आणि ती दिसायलाही सुंदर आहे. या भूमिकेत ती नवतरूणी, सुंदर, स्वप्नाळू आणि पुन्हा मी म्हटलं तसं फार लिरीकल अशी लोभस दिसलीये. त्यामुळेच कदाचित तिची निवड झाली असणार यात शंका नाही. वसुची जी व्यक्तिरेखा दाखवलीये ना ती अशी काही सुंदर आहे की अगदी कोणीही त्या व्यक्तीरेखेच्या प्रेमातच पडेल आणि तसाच तो कृष्णा. तारूण्यातला अवखळ कृष्णा आणि नंतर परिस्थितीने दगडासारखा कठीण होत गेलेला कृष्णा हा या व्यक्तीरेखेचा मोठा परीघ अजय देवगण आणि त्या नव्या उमद्या शंतनु माहेश्वरी दोघांनीही इतका सुंदर दाखवलाय की पहायलाच हवा. 

जाता जाता, वसूच्या नवऱ्याच्या भूमिकेतल्या जिमी शेरगीलचा आणि कृष्णाला कैदेत असताना भेटलेल्या एका भाईच्या भूमिकेत असलेल्या सयाजी शिंदेंचा उल्लेख तर करायलाच हवा. या दोघांनाही अचानक चित्रपटात पहाताना एकदम मस्त वाटलं आणि जिमी शेरगिलचा नवा आणखी मच्युअर अवतार पहाणं हे आताच्या काळात, म्हणजे ज्यांनी तारूण्यातल्या जिमी शेरगिलला पाहिलंय त्यांच्यासाठी फार मस्त अनुभव ठरेल यात शंका नाही.

माहिती नाही, या चित्रपटाला इतक्या नकारात्मक प्रतिक्रिया का आल्या...

कदाचित प्रेमकथा कळण्यासाठी स्वतः सुद्धा कधीतरी एवढ्या तरल आणि पवित्र प्रेमाची अनुभूती घ्यायला लागते तेव्हाच अशा सुंदर प्रेमकथा मनापासून कळू शकतात...

नक्की पहा आणि मला कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

- मोहिनी घारपुरे देशमुख 


(Photo Credit - Bollywood Hungama)


सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

' फुल्याफुल्यांचा कोपरा '

मला चांगलाच आठवतोय तो दिवस .. ज्या दिवशी मी पहिल्यांदा आणि एकदाच नाशिकमधल्या वेश्यावस्तीतल्या एका वेश्याग्रुहात गेले होते. तिथे जाऊन तिथल्या प्रत्यक्ष स्थितीवर मला एक लेख लिहायचा होता. 
मी आत गेले तर उग्र दर्प शिरला नाकात .. क्षणभर अस्वस्थ व्हायला झालं. मधल्या मोकळ्या हॉलमध्ये एक फळा ठेवलेला होता. तिथल्या लहान मुलांना शिकवायला कोणी तिथे येत असल्याचं कळलं..
मी अवघडून बसले होते पण मी निरीक्षण करत होते. इतक्यात दोन तीन त्रुतीयपंथी तिथे आले. तिथे सामाजिक कार्यकर्त्या आसावरीजी होत्या त्यांची मी वाट बघत होते. या तिघांनी मला किससे मिलना है विचारलं .. आणि माझं नाव विचारलं आणि माझं नाव ऐकताच ते सूचक हसले एकमेकांकडे पाहून ! मग एकजण म्हणाला, ' मुझे तो मेरी मोहिनी की याद आ गयी ..!' आणि ते हसले पुन्हा सगळे ..
अधेमधे इकडून तिकडे ये जा करणाऱ्या बायका दिसल्या. त्या शरीराने, मनाने पूर्ण थकलेल्या होत्या हे त्यांचे चेहरेच सांगत होते .. 
ती वेळ साधारण दुपारी अडीच ते चार अशी होती .. मी तिथल्या अंधाऱ्या खोलीची .. उग्र दर्पाची आणि उदासवाण्या दुपारीची काहीकाळ साक्षीदार झाले होते.. नंतर ऑफीसला आले आणि मनापासून जे सुचलं ते टाइपत गेले .. 
शहराने फुल्या मारलेल्या कोपऱ्याची कथा माझ्या शब्दात मांडली ... फुल्याफुल्यांचा कोपरा हे मी दिलेलं शीर्षक नंतर संपादकीय प्रक्रीयेत बदलून घायाळ कोपरा असं केलं गेलं .. जे मला फारसं रूचलं नव्हतं तेव्हाही .. पण ठीक आहे .. 'चालसे' .. !
आज जुनी कात्रणं पहात असताना हा माझा लेख सापडला आणि या आठवणी जाग्या झाल्या .. खरंतर या आठवणी विसरणं शक्यच नाही .. !
- मोहिनी
( From my facebook memory)

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

*प्रवीण आणि उल्का मानकर ... थेट विषुववृत्तावरून लाईव्ह ...!*

 भूगोलाच्या पुस्तकातलं कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त आपण कधी प्रत्यक्षात पाहू हा विचारही जिथे माझ्यासारख्या कोणाही सामान्य माणसाच्या मनाला शिवणार नाही तिथे माझे बॅकपॅकर मित्र प्रवीण आणि उल्का मानकर थेट याची देही याची डोळा पृथ्वीचं विषुववृत्त पाहून आले, त्यावर चालून आले, तिथे फोटो काढून आले आणि धम्माल करून आले. मी या जोडप्याची अधिकृत पीआर नाही, पण माझा जनसंपर्कच नसेल तर मी हे काम करूच शकत नाही. म्हणूनच, माझ्या जीवनात देवाने मला कदाचित असे एक से एक मित्रमंडळी दिले आहेत ज्यांच्याशी माझे सूर आपसूकच जुळतात, आपोआपच ही माणसं माझ्या आयुष्यात येतात आणि मी त्यांच्या सहवासातून मला जे वेचायचंय ते सहज वेचत रहाते. इट इझ ऑल अबाऊट हार्ट टू हार्ट ... इथे पैसा नाही लागत, मन कळावं लागतं, माणूस समजावं लागतं ... हा आहे माझा गाभा.

जेव्हा प्रवीण काकांची ही व्हॉट्सअप पोस्ट मला आली, तेव्हा मी ती खरोखरच आधी इग्नोर केली होती. इग्नोर यासाठी की मला हे माहीत आहे की ते सध्या युगांडात फिरत आहेत आणि तिथून ते आपल्याला तिथलं जनजीवन त्यांच्या शैलीत दाखवत आहेत त्यामुळे बघू सगळं निवांत असा विचार करत दैनंदिन कामाला रहाटगाडग्याला जुंपलेली मी ... दर दोन तीन दिवसांनी दोन तीन आधीच्या पोस्ट वाचत होते, वाचते आहे आणि थक्क व्हायला होतंय. या दंपतीच्या अमेझिंग प्रवासाच्या खऱ्याखुऱ्या अनुभवाची साक्ष होताना अंगावर रोमांच उठल्याशिवाय रहात नाहीत.

मी हे लिहीते कारण मला ह्युमन इंटरेस्ट स्टोरीजमध्ये रस आहे आणि माझ्यासारखाच तो अनेकांना असतो. प्रवीण काका माझी ही भूक भागवत आहेत. घरबसल्या, ऑनलाईन माध्यमातून गुगल सर्च करताना युगांडाचं जे थ्रिल तुम्हाला मिळणार नाही ते थ्रिल ... तो अनुभव देण्याचं महत्कार्य प्रवीण आणि उल्का दांपत्य तिथून करत आहेत.

आपल्याला आपल्या माणसांची काहीच किंमत नसते, पण माझं तसं नाहीये. मेरे लिये ... हर एक फ्रेंड जरूरी होता है हे सत्य आहे.

तर चक्क विषुववृत्त कसं आहे कुठे आहे हे युगांडाच्या या व्हिडीओत तुम्हालाही बघायला मिळेल. त्यावरून चालताना काय रोमांच उठले असतील या दोघांच्या शरीरावर याची मी इथे बसून कल्पना करू शकते.

बॅकपॅकींग करणाऱ्या माणसाला कसली भीती नसते. ते कोणातही मिसळू शकतात, कुठेही भटकू शकतात, काहीही खाऊ शकतात... पण हेच तर माणूस म्हणून अपेक्षीत आहे ना... माणूस म्हणून आपण भेदाभेद विसरून एकमेकांबरोबर असलं पाहिजे. रंग, भाषा, धर्म, जात, पंथ याचा अभिमान आपल्या मनाच्या मर्यादेत ठेवता आला पाहिजे आणि त्यापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही याच मुद्द्यांनी आदर ठेवता आला पाहिजे हे खरे जीवनमूल्य असे मला वाटते. अनेक माणसं हेच विसरतात, ते सतत मनामनात निरनिराळ्या मुद्द्यांना घेऊन द्वेष, विखार पसरवत जातात. एकमेकांच्या प्रती मनात आकस वाढवत जातात. हे करून आपण आपलीच कक्षा किती छोटी करत जातोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. जीवन यापेक्षा खूप अर्थपूर्ण आहे, हे जग आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे आणि ही पृथ्वी आपल्यावर सगळ्यांना समानतेने वाढवण्यास किती अर्थाने सक्षम आहे हे आपापल्या कल्पनेच्या आणि विचारांच्या खुराड्यात रहाणाऱ्या लोकांना कधीच कळणार नाही.

चला, आपण या चौकटींच्या पलीकडे जाऊया. एक नवं आकाश शोधत आणि त्यातल्या माणसांना सहजतेने आपलंस करत पुढे चालत राहूया. जीवनाला नवा अर्थ देऊया.

*धन्यवाद प्रवीण आणि उल्का.*

*- मोहिनी घारपुरे देशमुख*


सोबत दिलेली व्हिडीओची लिंक नक्की नक्की पहा...

https://youtu.be/D-idRTSKlwQ?si=odcgSE7ZB50U5a5g

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

प्रो पर्सन पीआर तर्फे ऑनलाईन संस्कृत संभाषण वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरू... आजच प्रवेश घ्या !

नमस्कार, 

देवांची भाषा... सर्व भाषांची जननी भाषा म्हणजे अत्यंत सुमधुर अशी संस्कृत भाषा.
आपल्याला या भाषेत किमान चार सहा वाक्यही वापरून संभाषण करता आले तर किती छान नं?

म्हणूनच, प्रो पर्सन पीआरच्या माध्यमातून मी ओळख करून देत आहे सौ. शुभदा विनय धांडे यांची. गेली अनेक वर्ष त्या ऑनलाईन मोफत संस्कृत संभाषण वर्ग घेत आहेत. निरपेक्ष भावनेने त्यांनी हे कार्य हाती घेतलेले आहे. त्या स्वतः एम ए मराठी असून निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांनी आजवर अनेक अबालवृद्धांना संस्कृत भाषा संभाषण कौशल्य शिकवले आहे तसेच सध्या त्या संस्कृत भाषेतून श्यामची आई हे पुस्तकही ऑनलाईन मोफत स्वरूपात विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. केवळ स्वतःची आवड म्हणून त्यांनी सुरू केलेले हे कार्य खरोखरच आपल्या सर्वांसाठी अत्यंत मोलाचे आहे.

प्रो पर्सन पीआरच्या फॉलोअर्स आणि वाचकांसाठी 1 ऑक्टोबरपासून पुढीलप्रमाणे या वर्गामध्ये सहभाग घेता येणे सहज शक्य होणार आहे.

वर्गाचा तपशील पुढीलप्रमाणे -

सोमवार ते शुक्रवार

सकाळी 11.30ते 12.30 प्रारंभिक संभाषणवर्ग

आणि

रात्री 9.30 ते 10 शामस्य माता ह्या पुस्तकाचा सर्वांगीण अभ्यासवर्ग

नोंदणी शुल्क - 300 रूपये प्रतिव्यक्ती ( one time )

माझा जीपे नंबर - 8668289992 हा असून या नंबरवर आपले शुल्क भरून त्याचा स्क्रीनशॉट, आपले संपूर्ण नाव, शहर आणि ईमेल आयडी ही माहिती मला व्हॉट्सअप करावी. त्यानंतर आपल्याला गुगल मीटची लिंक पाठवली जाईल.

आपल्या संस्कृत संभाषण कौशल्याच्या विकासासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !

धन्यवाद

......................................

'प्रो पर्सन पीआर' काय आहे? कोण आहे? काय नेमकं काम करत आहेत?

तर मंडळी, आपल्या माहितीकरिता ही छोटीशी पोस्ट - 

प्रो म्हणजे प्रोफेशनल अर्थात व्यावसायिक 
पर्सन म्हणजे अर्थातच व्यक्ती 
आणि पीआर म्हणजे पब्लिक रिलेशन अर्थात जनसंपर्क 

प्रो पर्सन पीआर म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्तींना जनसंपर्कासाठी मदत करणारी समन्वयक 
आणि ही समन्वयक व्यक्ती म्हणजे मी ( नेहमीप्रमाणे 😀 ) एकटीच ... मोहिनी घारपुरे देशमुख.

माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील कामाने मला दिलेला मौल्यवान ठेवा म्हणजे समाजातील विविध स्तरातील माणसांशी संवाद आणि संपर्क!

आजवर अनेकांना इतरांशी सहज जोडून देण्याचे काम माझ्या हातून झालेले आहे. तेव्हा असं लक्षात आलं की हे काम माझ्याइतकंच इतरांसाठीही उपयोगी ठरू शकेल म्हणून काही महिन्यांपूर्वी 'प्रो पर्सन पीआर' नावाने मी या कामाची सुरुवात केली. 

मी काय करते?
 सोशल मीडिया पीआर अर्थात समाज माध्यमातून माझ्या ग्राहकांची प्रतिमा लेखन,ग्राफीक्स, व्हिडिओ आदी नानाविध प्रकारे झळकवत ठेवणे जेणेकरून ही बुद्धीमान प्रतिभावान मंडळी अधिकाधिक व्यासपीठावर आपले ज्ञान ,प्रतिभा दर्शवण्यात अग्रणी रहातील. माझ्या माध्यमातून बुद्धिमान, व्यावसायिक व्यक्तींना काम मिळेल आणि सामान्य लोकांना अशा व्यक्तींपर्यंत माझ्या माध्यमातून पोचणे सहज शक्य होईल.
तर असा दुवा बनण्याचं काम मी स्वतःहून पुढाकार घेऊन सुरू केलं आहे. 
आपण सोबत आलात तर निश्चितच माझ्यासारखी एक फ्रीलान्सर' आणि 'जॅक ऑफ ऑल' ...यापुढे 'मास्टर ऑफ वन' म्हणून ओळखली जाईल आणि माझ्या गुणवत्तेचा मला स्वतःला आणि आपल्या देशातील लोकांना आणि पर्यायाने देशाला निश्चितच योग्य उपयोग होईल असा मला विश्वास आहे 😊 🙏🏽 

कळावे
मोहिनी घारपुरे देशमुख
8668289992
mohineeg40@gmail.com


गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

हा माझा मार्ग एकला ...

 

तसं पहायला गेलं तर 'हा माझा मार्ग एकला' हे तर प्रत्येकाच्याच जीवनाचं सत्य आहे. कदाचित म्हणूनच इथे जन्माला आलेल्या नवजात अर्भकापासून ते अगदी जर्जर झालेल्या वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणावरही कधीही वाईट दिवसांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, आणि येतेही!

ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून काम केलेला आणि तुफान गाजलेला हा पहिला चित्रपट, आणि म्हणूनच 'हा माझा मार्ग एकला' पहाण्याची मला खूप उत्सुकता होती ती अलीकडेच यूट्यूब कृपेने पूर्ण झाली. काहीही म्हणा हे जुने श्वेतश्यामल चित्रपट फार खोल असा काहीतरी जीवनाचा आशय आपल्यापुढे सुंदर आणि सहजतेने उलगडून ठेवतात यात दुमत नाही. 

लहानगा मुलगा ... अतुल त्याचं नाव. त्याची आई त्याला जन्म देताच देवाघरी जाते. अतुलला आई मिळावी म्हणून अतुलचे वडील लवकरच दुसरं लग्न करतात. सावत्र आई घरी येते आणि नात्याप्रमाणेच या छोट्याशा बालकाशी मनातून आकस ठेवते. याच्या जबाबदारीचं लोढणं आपल्या गळ्यात नको, मग यापासून सुटका कशी करून घेता येईल या हेतूने निरनिराळे कट रचून सावत्र आई अतुलला खूप त्रास देते. वर घरात कांगावा की हा वाया जाईल, मोठा झाला की चोऱ्या करील म्हणून आपण याला शिस्त लावण्यासाठी अशा वागतो. 

एक दिवशी सावत्र आई लहानग्या अतुलला काहीतरी क्षुल्लक कारणावरून उपाशीच ठेवते. वडील तिला समजावयला जातात तर ती लगेच त्यांना माहेरी जाण्याची धमकी देते. वडील गरीब बिचारे गप्प बसतात, वर म्हणतात, 'तुम्हा माय लेकरांच्यात मी इथून पुढे कधीच पडणार नाही'. मग काय, आईला आणखीनच बरं होतं. रात्री वडील आपल्या पोराला लपून छपून दोन पेढे आणि पाणी आणून देतात, बाळ खाऊन घे म्हणतात, पण मुलगाही स्वाभिमानी... तो ठामपणे नकार देतो. 

दुसऱ्या दिवशी त्याची वरच्या खोलीत रहाणारी चिमुकली मैत्रीण त्याला बोलवायला येते. ती म्हणते, "अतुल चल ना, माझ्या बाबांनी मला नवी झुकझुकगाडी आणलीये, ती कशी चालते मी तुला दाखवते." अतुल म्हणतो, "नको, आईला आवडणार नाही मी आलेलं..." तशी अलका म्हणते... "हे काय रे अतुल ... तुला नै दाखवली तर मला पण मजा नै येणार... चल की ..." इवलुसा अतुल तिच्या या गोड बोलण्याचा मान ठेऊन भरकन तिचा हात धरून तिच्या घरी जातो. अलका आईला सांगते, "आई अतुलला दाखव ना माझी नवी आगगाडी, आई म्हणते आणते हं, तुम्ही बसा इथे खेळत... "आई स्वयंपाकघरात जाते मुलांसाठी खायला आणायला आणि आगगाडी आणायला तर इकडे अतुलचं लक्ष फोनकडे जाते. तो अलकाला विचारतो, "अलका हे काय आहे गं ?" अलका सांगते "अरे यावरून माझे बाबा लांब लांब कोणाशी तरी बोलत असतात. हा फोन आहे." अतुल म्हणतो, "अलका, यावरून माझ्या देवाघरी गेलेल्या आईशीपण बोलता येईल का गं ?" अलका म्हणते ..." हो ... येईल की ...!"

दोघं झटक्यात पुढे होऊन फोनवरून काहीतरी नंबर डायल करतात. जुन्या काळी दोन नंबर जोडून देण्याचं काम फोन ऑपरेटर्स करत असत. तसा हा फोन एका ऑपरेटरला येते. पलीकडून अतुल बोलतो, "मला की नै माझ्या देवाघरी गेलेल्या आईशी बोलायचंय..." ऑपरेटर आपल्या सहकारी मैत्रीणीला कुजबुजत सांगते... "बघ ना.. दोन छोट्या मुलांनी खेळाखेळात फोन लावलाय आणि मुलगा म्हणतोय त्याला त्याच्या आईशी बोलायचंय .. ती देवाघरी गेलीये..." ही मैत्रीण गमतीत लगेच म्हणते, "हो .. आण मी बोलते त्याच्याशी ..." आणि मग ती चिमुकल्या अतुलशी त्याची देवाघरी गेलेली आई बनून बोलते. तो सांगतो, "आई तू का गेलीस देवाघरी...? नवी आई मला खूप त्रास देते, उपाशीच ठेवते, मारते. ती वाईट आहे... मला तू हवीयेस आई ... परत ये ना...!" त्याच्या व्याकूळ आर्त सादेला उत्तरं देताना ही टेलीफोन ऑपरेटरही द्रवते. तिला जणू मायेचा पाझर फुटतो, फोन ठेवताक्षणी तिच्या डोळ्यातून आसवं ओघळू लागतात. 

इकडे सावत्र आई अतुलला शोधत कानोसा घेत वरती आलेली असते. लहानगा अतुल अलकाच्या आईनं आग्रहाने दिलेला खाऊ खात आईविषयी काहीतरी सांगायला लागतो तोच सावत्र आई आत शिरते आणि अतुलला, "इथे येऊन माझ्या काड्या करतोस काय रे ?" म्हणत पुन्हा चांगला चोप द्यायला लागते. अतुल बिचारा भुकेला, मार खाल्लेला घरी येतो. संध्याकाळी वडील येतात, त्यांच्यापुढे पुन्हा ही आई त्याच्याशी गोड वागते पण खायला देत नाही, त्याला घराबाहेर उंबरठ्यावर झोपायला लावते. वडील आपले बायकोवेडे... मधे पडत नाहीत. 

दुसरा दिवस उजाडतो. आता अंतिम डाव. आई अतुलला गोड बोलून किराणा आणायला लावते. लहानगा अतुल ओझं कसंबसं उचलून पायऱ्या चढत वर येत असतो तर सावत्र आई समोर येते आणि त्याच्या हातातलं ओझं घेऊन त्याच्याशी गोड बोलू लागते. आता लवकर हातपाय तोंड धुवून घे म्हणजे छान गरम जेवायला वाढते असं बोलून त्याला आत पाठवते. तो इवलुसा पोर मातेच्या त्या शब्दांनी हुरळून जातो. आतमध्ये जाऊन आवरायला लागतो, तो इकडे कारस्थानी आई काय करते माहितीये ... दोरीवर लहानग्या अतुलची चड्डी वाळत असते त्याच्या खिशात दहा रूपयाची नोट ठेऊन देते आणि अतुलला कपडे बदलायला देताना जाणीवपूर्वक ही चड्डी घालायला देते. वडील घरी येतात तो ही कांगावा करू लागते, "सकाळी तुम्ही मला दिलेली दहा रूपयाची नोट हरवली, कुठे सापडत नाही." वडील चटकन अतुलला विचारू लागतात, "तू तर नाही ना घेतलीस... ?" आई मुद्दाम नाटक करते म्हणते ... "काय आता याची झडती घ्याल का तुम्ही ...?" तर वडील तिच्या बोलण्यात अडकतात आणि रागात अतुलची झडती घेण्याच्या उद्देशाने त्याच्या खिशात हात घालतात, तो त्याच्या खिशातून ती नोट बाहेर येते. आईचा कट चांगलाच यशस्वी होतो. अतुलला बिचाऱ्याला त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून रात्रभर घराबाहेर झोपावं लागतं. रात्री आईवडील आपापसात बोलत असतात तेव्हा आई म्हणते असते, "उद्या की नै पोलीस बोलवा आणि त्याला पोलीसांच्याच ताब्यात द्या, म्हणजे तो सुधारेल, बघा.. नाहीतर मोठा होऊन अट्टल गुन्हेगार होईल तो... " अतुलच्या कानावर हे शब्द पडतात आणि त्या रात्री तो चिमुकला रडत रडत घरातून पळून जातो. 

आता पुढे काय ...?

म्हणतात ना, देवासारखं कोणीतरी पाठीशी उभं रहातंच लेकरांच्या...अगदी त्याच न्यायाने अतुलला एक घर दिसतं. तो त्या घराच्या अंगणात झोपलेल्या माणसाला पाहतो. ही व्यक्तीरेखा साकारलीये, ज्येष्ठ अभिनेते राजा परांजपे यांनी...

नशेत धुंद असलेल्या त्या माणसाच्या खाटेखाली आपल्या अंगाची मुटकुळी करून अतुल बिचारा झोपतो. सकाळ होताच माणूस उठतो, खाट उचलून ठेवायला जातो तो खाली हा दिसतो. हा कोण छोटा आला म्हणून त्याची चौकशी करतो. दोन दिवस पोटात अन्नाचा कणही नसलेल्या अतुलला चहा आणि पाव खायला देतो. हळुहळू अतुलची गोष्ट त्याला कळते. त्याच्याही मनात या चिमुकल्यासाठी मायेचा पाझर फुटतो. पुढे एका प्रसंगात उलगडा होतो की हा माणूस अतुलच्या खऱ्या आईचा लग्नापूर्वीचा प्रियकर असतो. अतुल आपल्या प्रेयसीचा मुलगा आहे हे कळताच आता या माणसालाही जीवनाची दिशा सापडते. या मुलाचा नीट सांभाळ करायचा, त्याला शाळेत घालायचं या विचारात हा माणूस स्वतःचं जीवनही मार्गी लावतो. त्यात राजा परांजपेंचा एक जवळचा मित्र म्हणून ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकरांचीही भूमिका आहे. मग एकदा ते या मुलाचं दैव आझमावून पाहू म्हणून मुलाच्या हातानी लॉटरीचं तिकीट काढतात. 

उत्तरार्धात चित्रपटाचं कथानक ज्या काही बऱ्या वाईट वळणांनी पुढे नेलं आहे ते शब्दात मांडणे खरंतर सोपे आहे, पण त्यातील माधुर्य अनुभवण्यासाठी, बालकलाकार सचिनचा गोंडस अभिनय पहाण्यासाठी हा चित्रपट पहायलाच हवा.

अखेर चिमुकल्या जिवाला उदंड प्रेम लाभतं आणि सगळं नीट होतं असा सुखांत असलेला हा चित्रपट मराठीतला मैलाचा दगड न ठरला असता तरच नवल.

या चित्रपटाचा उल्लेख जर बाबुजींचं स्मरण न करता झाला तर ते फारच अयोग्य ठरेल. चित्रपटाचे शीर्षक गीत, हा माझा मार्ग एकला ऐकताना आणि जर अलीकडेच तुम्ही स्वरगंधर्व हा बाबुजींच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहिला असेल तर त्यातील आर्तता, बाबुजींच्या स्वरात किती आणि कशी उमटली आहे याची जाणीव होईल आणि तुमचेही डोळे भरून आल्यावाचून रहाणार नाहीत. तुमचंही मन क्षणात द्रवेल हे निश्चित.

जीवनाचं चाक कोणाचं कोणत्या दिशेनं जाईल हे सांगू शकत नाही, म्हणूनच, हा माझा मार्ग एकला हे त्रिकालाबाधीत सत्य आहे !

मित्रांनो, 

आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत. माझा ब्लॉग अनेक लोकं वाचतात, पण आपण जर कमेंट करून खाली आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, आपली ओळख मला कळवलीत तर ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या प्रामाणिक वाचकांपर्यंत पोचण्याचा माझाही एकला मार्ग एक नवी दिशा आणि ओळख माझ्या आयुष्याला देण्यात यशस्वी ठरेल. 

म्हणूनच, ब्लॉग वाचलात आणि आपल्याला तो आवडला किंवा आवडला नाही तरीही मला कमेंट करून जरूर कळवत रहा. तसंच इतरांनाही ब्लॉगची लिंक शेअर करा जेणेकरून ब्लॉगमधील विचार इतरांपर्यंत पोचतील.

धन्यवाद

- मोहिनी घारपुरे देशमुख

mohineeg40@gmail.com

( Photo Credit - Google and Times of India )


गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

कुछ याद उन्हे भी करलो, जो लौटके घर ना आए ...

सीमेवर उभे असलेले आपले जवान...

थंडी, ऊन, पाऊस, वारा ... कशाचीच पर्वा न करता ते अविरत तिथे पहारा देत असतात. 

कोणासाठी तर आपल्यासाठी ... 

आपण सुरक्षित रहावं म्हणून त्यांचं जीवन त्यांनी पणाला लावलेलं असतं.

आणि आपण ...

साधं देशात सुख, शांती, समाधान, एकोपा आणि प्रेमाचं वातावरणही ठेऊ शकत नाही ! 

सतत जातीय द्वेष पसरवतो, सणावाराच्या निमित्तानं ( हल्ली तर वाढदिवसाच्या निमित्तानंही ) डीजे वर जोरदार गाणी लावून परिसरात ध्वनिप्रदूषण पसरवतो. साधं आपली गाडी नीट चालवत नाही, जेणेकरून सतत ट्राफीक जाम आणि अपघातांना निमंत्रण देत रहातो. कचरा आणि ई-कचऱ्याचा प्रश्न आपण सोडवू शकलेलो नाही. रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत आपण दरवर्षी ओरडत रहातो पण प्रशासन कमी च पडतं. एक ना अनेक ... हजारो समस्या आपल्यापुढे ... आणि त्यातल्या अनेक समस्या या केवळ मानवनिर्मित ... म्हणजे आपणच निर्माण केलेल्या ! 

या समस्यांचं समाधान शोधायला आपण एकटे अपुरे आहोत. पण सगळे एकत्र एकजुटीने राहिलो तर निश्चितच आपण आपल्या समस्यांचं समाधान शोधू शकतो आणि देशात ठोस बदल घडवू शकतो. 

पण इथे बदल हवेत कुणाला नै ?

जो बदल घडवायला जातो तो वेडा ठरतो. जो सिस्टीम बदलायचा प्रयत्न करतो त्याला सिस्टीम बाजूला काढून टाकते. 

ना माणसं बदलतात, ना सिस्टीम बदलते.

इंग्रजीत एक म्हण आहे, If you do same things as you did yesterday ...you will get same results as you got yesterday ! अर्थात् ... तुम्ही जर काल जे केलंत तेच आज करत असाल तर तुम्हाला काल जे हाताशी लागलं तेच आज लागेल... याचा अर्थ परिणाम तोच राहील. बदल कधीच घडणार नाही. 

म्हणूनच, बदल घडवायचा असेल तर आधी बदलायला हवं.

आधी स्वतःला आणि त्यासोबतच वर्षानुवर्ष आपण फॉलो करत असलेल्या या देशातील कार्यपद्धतीला ! 

जोवर हे बदलणार नाही तोवर कोणा व्यक्तीला, कोणा नेत्याला दोष देत बसून काही उपयोग नाही. 


आपला देश बदलायचा तर तरूणांना हाताशी घ्यायला हवं. त्यांना त्यांच्यातील ऊर्जा आणि मुख्य म्हणजे कल्पकता, आऊट ऑफ बॉक्स विचार पद्धती वापरून नवं काहीतरी घडवू द्यायला हवं. 

तेच ते आणि तेच ते च्या रटमधून त्यांची सुटका करायला हवी. 

नवे रोजगार निर्माण करायला हवेत. नव्या संधी निर्माण करायला हव्यात. 

देश तेव्हा स्वतंत्र होईल जेव्हा इथल्या तरूणाईला सकारात्मकतेने देशात बदल घडवण्याचं स्वातंत्र्य मिळेल. 

जोवर हा देश बडेबुढे नेता आणि घराघरातील बडेबुढे ज्येष्ठ नागरिक चालवत आहेत तोवर बदल घडणं निव्वळ अशक्य आहे असं मला वाटतं ! 

देशातील तरूणांना नुसतं सैनिकांची आठवण करून देत बसणं पुरेसं नाही, तरूणांना त्यांच्या अंगातील सळसळता उत्साह या देशासाठी वापरू देणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं या देशात तरूणांंबरोबर इतकं राजकारण खेळलं जातं की ही मुलं त्या राजकारणाचे बळी ठरतात. नोकरीच्या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून काढून टाकण्यापासून ते कामावर बॉसच्या तोंडातून सतत लहानसहान कारणावरून मिळणाऱ्या शिव्यांनी हे तरूण निराश होत जातात. 

स्लो पॉयझनिंगसारखं हे सगळं त्यांच्यावर काम करत रहातं. त्यांच्या मनावर घाव घालत रहातं. आपण काहीतरी करून दाखवू या विचाराने प्रेरीत झालेली हीच तरूण मंडळी मग दिवसागणिक हताश होत जातात ... कारण काम मिळत नाही, मिळालेल्या कामात कोणी ना कोणी वरिष्ठ घाणेरडं राजकारण खेळत यांना मानसिक त्रास देत रहातो, घरीदारी अपमान होतो, अतीश्रम वाट्याला येतात. मुलगी असेल तर शरीरसुखाची अपेक्षा, तशा पद्धतीने तिला मानसिक त्रास, शारिरीक त्रास दिला जातो. ती बरेचदा मुक्याने तो सहन करते नाहीतर त्या सिस्टीममधून बाहेर पडते आणि आपल्या कोशात स्वतःला बंद करून घेते.

प्रत्येक इंडस्ट्रीच्या निराळ्या व्यथा आहेत. 

मुद्दा हा आहे की तुम्ही देशातील तरूणांना कधी संधी देणार आहात ? 

त्यांचे उमेदीचे दिवस संपल्यावर मग मिळालेल्या संधीचं ते काय करू शकतील सांगा बरं ? 

हल्ली तर मानसिक त्रासाचेच इतके प्रकार झालेले आहेत की कोणावर विश्वास ठेवणं हीच चूक झालेली आहे. मन मोकळं बोललं म्हणजे लगेच लोकांच्या त्रासाला आमंत्रण असं समीकरण झालेलं आहे.

हा देश ... हा आपला देश असा कसा झाला ? 

जिथे वारं नेहमी प्रेमाचं एकोप्याचं वहायचं तिथे आता फक्त स्पर्धा आणि विखाराचं वारं वाहतंय ...

साधं परजातीत लग्न केलं म्हणून जीव घेतला जातोय ... अरेरे ...

आपली खोलवर असलेली, रूजलेली सुसंस्कृतता, सभ्यता आपण अशी कशी वाऱ्यावर सोडून दिलीये ?

आपली संवेदनशीलता... माणूस म्हणून असलेली प्रगल्भता आपणच उधळून लावलीये.

पूर्वीची माणसं शहाणी होती ... आताची माणसं 'शहाणी' झाली आहेत. 

सीमेवरचा जवान ... ज्याच्याबद्दल स्व.लतादीदींनी गायलंय... कुछ याद उन्हे भी करलो ... जो लौटके घर ना आए ... आणि देशातला तरूण ... त्याचीही एका अर्थाने हीच हालत आहे, पण तो दिशाहीन भटकतोय.. व्यसनांच्या आहारी जातोय.. का, कारण त्याला जो विश्वास हवाय, त्याला ज्या आणि जशा संधी हव्या आहेत त्या देण्यासाठी आपण असमर्थ आहोत.

बदलायलाच हवंय हे चित्र ... आणि आपला देश ...

जय हिंद 

- मोहिनी घारपुरे देशमुख 



सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

Do you Want to learn Mandolin?


मेंडोलिन वादनात विशारद ही पदवी घेतलेले जगभरातील एकमेव कोण तर ते म्हणजे माझे मित्र शरद जोशी काका ! 

मेंडोलिन सारखे अत्यंत गोड वाद्य ते मोठ्या तळमळीने आणि मनापासून शिकले. त्याकरता त्यांनी मेंडोलिन शिकवणारे कित्तीतरी गुरू केले, मनापासून या वाद्यांची साधना केली आणि त्यानंतरच ते मेंडोलिन वादनात उच्च पदवी मिळवू शकले.
 
सिव्हिल इंजिनिअर ते कॉन्ट्रॅक्टर ते बिझनेसमन आणि आता पूर्ण वेळ मेंडोलिन आर्टिस्ट आणि शिक्षक हा त्यांचा जीवनप्रवास अचंबित करणारा आहे. 
अनेक अडथळे पार करत शरद काकांनी आजचे हे यश मिळवले आहे.
मेंडोलिनवर केवळ हिंदी मराठी गाणी वाजवण्यापलिकडे काका शास्त्रीय संगीत सुद्धा लीलया वाजवतात हे त्यांचे आणखी एक विशेष! 
तर मंडळी,
तुम्हाला जर शरद काकांच्या मेंडोलिन वादनाचा कार्यक्रम तुमच्या सामाजिक/सांस्कृतिक परिघात आयोजित करायचा असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. तसंच फिल्म आणि संगीत क्षेत्रातील मंडळींनाही जर आपल्या कलाकृतीत या वाद्यांचे सुमधुर सूर शरद काकांनी वाजवावेत असे मनात आले तर वेळ न दवडता मला किंवा शरद काकांना संपर्क करा.
आणि हो ... जर ही माझी पोस्ट वाचल्यानंतर हे (तसं) युनिक वाद्य शिकायची तुमची इच्छा झाली तर तुम्हाला म्हणून सांगते ... काका पुण्यात कोथरूड भागात मेंडोलिनचे क्लासही घेतात. त्यामुळे मेंडोलिनच्या क्लाससाठीही तुम्ही शरद काकांना माझी ओळख देऊन संपर्क करू शकता... अगदी आज आत्ता ताबडतोब ☺️ आणि आजपासून केव्हाही ☺️☺️👍👍

धन्यवाद 
मोहिनी घारपुरे देशमुख 

संपर्क क्रमांक - 
मोहिनी घारपुरे देशमुख - +91 86682 89992
शरद जोशी - +91 94227 69492



बुधवार, ३१ जुलै, २०२४

स्वरगंधर्व सुधीर फडके - चित्रपट रसग्रहण

गंधर्व म्हणजे शापीत देव. 

'स्वरगंधर्व' ही उपाधी लाभलेले आपले सगळ्यांचे लाडके बाबुजी अर्थात श्री.सुधीर फडके यांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून पाहिला आणि जाणवलं खरोखरच, ते गंधर्वच होते. जीवनभर इतके भोग भोगूनही ज्यांच्या गळ्यातली सरस्वती तशीच कायम तिथे विराजमान राहिली आणि भोग सरताच पुन्हा बाबुजींच्या गळ्यातून प्रकटली, याला काय म्हणावे ?

सरस्वतीचा साक्षात वास ज्यांच्या गळ्याठायी होता त्या माणसाला जीवनात असे आणि इतके अपरिमीत भोग भोगावे लागले. का ...? 

कर्माचा सिद्धांत... दुसरं काय !

आपणा माणसांची तोकडी बुद्धी, तिला प्रश्न पडतात, पण अनेक प्रश्नांची उत्तरे तिला सापडलेलीच नाहीत. जेवढं मोठं यश मिळतं, त्या यशापूर्वी काही काही माणसांच्या वाट्याला इतके भोग येतात की आपली बुद्धी दैवाच्या या गणितापुढे हार मानते. 

बाबुजींचा चित्रपट बघताना क्षणाक्षणाला हे जाणवत होते.

कित्ती लहान वयापासून त्यांना असलेली संगीताची आवड. बड्या बड्या गायकांची गाणी ऐकण्यासाठी सांगलीतील घरानजीकच्या हॉटेलबाहेर ताठकळत उभं राहून आपली संगिताची भूक भागवणारे लहानगे बाबुजी. सामान्य लोकांना वाटे हा छोटा मुलगा काहीतरी फुकट खायला मिळेल म्हणून आशेने रोज हॉटेलबाहेर उभा रहातो. लोक नावं ठेवू लागतात आणि मग त्याला आत जाऊन बसायला सांगतात तेव्हा लहानगे बाबुजी उत्तरतात, 'मला संगीताची भूक आहे ती मी इथे उभं राहून हॉटेलमध्ये लावलेल्या बड्या दिग्गज गायकांच्या रेकॉर्ड्स ऐकून शमवतो...' लोकं या उत्तरावर अवाक् ! 

असा हा गंधर्व... पुढे आयुष्य किती खाचखळग्यांनी भरलेलं. 

बाबुजींचं आयुष्य बघताना मन द्रवलं, डोळे पाणावले.

कित्तीतरी प्रसंग पाहून पोटात तुटलं.

एकाकी अवस्थेत वणवण फिरताना कधी अक्षरशः लोकांपुढे दोन वेळच्या जेवणासाठी हात पसरायची वेळ आली त्यांच्यावर, कारण पाठीशी कुणी नाही. केवळ काही दोन चार निष्ठावान खरे मित्र, पण ते ही कितीसे पुरणार नै...

अशा परिस्थितीत जीवन संपवून टाकण्याचाही प्रयत्न त्यांनी करणं कदाचित स्वाभाविकच. 

पण म्हणतात ना, या जगात देव आहे. आपले गतजन्मीचे भोग सरले की तो आपल्याला भरभरून देतो आणि जे देतो ते पुन्हा परत कधीच कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. 

बाबुजींची आणि गदिमांची भेट हा एक सुंदर योगायोग ज्या दिवशी घडला तो खरा सोनियाचा दिनु. 

मग बाबुजींच्या प्रतिभेला आणि कलेला कोंदणात बसवणारा जोहरी म्हणजे गदिमा, आणि दोघांनी पुढे आपल्याला जे दिलं ते अद्वितीयच ठरलं. 

बाबुजींच्या प्रत्येक सुरातली आर्तता आणि व्याकूळता, भावविभोर होणं हे सगळं किती सच्चं आहे हे त्यांच्या संघर्षाकडे पहाताना आपल्याला जाणवतं. 

कला ही एकमेव अशी गोष्ट आहे जी माणसाच्या जीवनात जितका सच्चेपणा आहे त्यानुरूप त्याच्या वाट्याला येते, त्याच्या जीवनात प्रतिभेच्या रूपाने प्रसवते. हे भाग्य फार थोड्या लोकांच्या वाट्याला येतं याचं कारणंच त्यांचा स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा..

बाबुजी असे होते... प्रामाणिक... सच्चे

असे चित्रपट पहाताना आपण त्याची समीक्षा करायचे नसते असं मला वाटतं, तर या चित्रपटांनी सांगितलेली कथा ऐकायची असते, ती अनुभवायची असते. त्या कलाकाराचं जगणं आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्या जगण्यातून त्याने जे न बोलता दिलंय ते आपल्याला वेचता आलं पाहिजे. 

शेवटी जाता जाता, एक गोष्ट खूप जाणवली, की संपूर्ण चित्रपटात बाबुजींबरोबर लतादिदी एकदाही का दाखवल्या नाहीत याचं कारण माझ्या अल्पमतीला, किंवा अज्ञानापोटी कळलं नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. 

दुसरं म्हणजे, पात्र निवडताना जे कलाकार निवडले त्यांची निवडले ते त्यांच्या दिसण्याशी साम्य साधणारे नव्हे तर व्यक्तिमत्वाशी साम्य साधणारे असे कास्टींग डिरेक्टरने माध्यमांना सांगितले, पण तरीही असे वाटले, की जे कलाकार निवडले ते तितकासा न्याय त्या भूमिकांना देऊ शकले नाहीत.

त्याचबरोबर संहिता ही अधिक भावपूर्ण लिहीता आली असती. काही काही प्रसंग अधिक परिणामकारक रितीने दाखवता आले असते असे वाटले. पण ठीक आहे. काही ना काही कारण असेलच, जेणेकरून दिग्दर्शकाने तसे करण्याचे टाळले आहे. 

एकंदरीतच... चित्रपट सुंदर आहे. बाबुजींवरील प्रेमाखातर आपल्यासारख्या रसिकांनी तो अधिक मायेने पहाणं हे अपरिहार्यच होतं. 

सुनील बर्वेंनी बाबुजी उत्तम साकारले आहेत... तरीही बाबुजींचे स्मरण झाल्याखेरीज रहात नाही हे सुनील बर्वेंचे यश की अपयश म्हणावे ... सांगणे कठीण आहे !

- मोहिनी घारपुरे देशमुख 

Translate

Featured Post

अमलताश