अंकीता आज खूश होती. ती सनीच्या प्रेमात पडली होती त्याला एक वर्ष आज पूर्ण झालं होतं. लपूनछपून भेटीगाठी गेलं वर्षभर होत होत्या आणि कुणालाही अजून त्यांचं प्रेमप्रकरण माहित झालं नव्हतं. त्यामुळेच तर तिला आणखी आनंद झाला होता. सनीनं तिला गेल्या महिन्यात लॅपटॉपही गिफ्ट केला होता तिच्या वाढदिवसानिमित्त ..
ती दोघंही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असल्याने, आता लवकरच आपल्या या प्रेमप्रकरणाबद्दल आईबाबांना सांगू आणि मग आपण सनीशी लग्न करून सुखाचा संसार करू अशा मनोराज्यात अंकीता रोज बुडालेली असायची.
रोजच कॉलेजमधून घरी परतल्यावर सनी आणि अंकीता हळूहळू आवाजात एकमेकांशी फोनवर तासन्तास बोलत बसत. आई घरी असेल त्यावेळात हळूहळू असलेल्या गप्पा, आई ऑफीसला गेल्यावर सगळं घर मोकळं मिळाल्याने थेट व्हीडीओ चॅटींगपर्यंत येत.
सनी तसा बरा मुलगा होता. म्हणजे अभ्यासात बरा, दिसायला स्मार्ट आणि वागायला बोलायलाही एकंदरीत चांगला. त्यामुळेच अंकीताला तो आवडायला लागला होता.
त्या दिवशी अंकीता जेव्हा खुशीखुशीत आनंदाने कॉलेजमधून घरी आली तेव्हा तिच्या मोबाईलवर सनीने एक मेसेज केला होता. "आज व्हीडीओ चॅटींगवर मला तुला पहायचंय .. माझ्यावर प्रेम करायला आज मी तुला शिकवणार आहे.."
त्याचा तो मेसेज पाहून अंकीता क्षणभर बावरली, लाजली आणि मनात धडधड वाढत असतानाच दुसरीकडे ती आई ऑफीसला जाण्याची वाट बघत राहिली. आईनं नेहमीप्रमाणे आवरासावर करून बारा वाजताचं ऑफीस गाठण्यासाठी साडेअकराला घर सोडलं. अंकीतानं दार लावलं आणि ती सनीच्या फोनची वाट पाहू लागली. सनीलाही तिचं सगळं रूटीन माहित होतंच, तिच्या घरच्यांच्याही वेळा, कामाची व्यस्तता याविषयी तो जाणून होता. त्यामुळे साधारण साडेबाराच्या सुमारास सनीने अंकीता आता घरात एकटी असणार हे जाणून व्हिडीओ कॉल केला.
अंकीताच्या मनात धाकधुक होतीच आणि सनीने थेट मुद्द्यालाच हात घातला. तो तिला व्हिडीओ कॉलवर तिचं सौंदर्य दाखवण्यासाठी मिनतवाऱ्या करू लागला. "तुझं निर्वस्त्र रूप मला पाहू दे अंकीता .. एकदाच .. बघ मी तुला किती सुखी ठेवेन .. आपण लग्न करणारच आहोत ना .. प्लीज एकदाच .."
त्याच्या अशा आचरट मागण्यांनी ती एकदम घाबरलीच. तिला काही कळेचना की काय करावं..आणि अर्थातच तिने त्याला नकार दिला. पण तरीही पलीकडून सनी तिला अत्यंत भावूक होत गळ घालतच राहिला.
आणि अखेर एका चुकार क्षणी अंकीताचा संयम सुटला आणि ती त्याला बधली. तो सांगत गेला ती तसंतसं करत गेली .. आणि अखेर केव्हातरी ती दोघं भानावर आली. व्हीडीओ कॉल संपला. अंकीताला तिची चूक लक्षातच आली नाही. पुढे काही दिवस दोघांनीही एकमेकांना टाळलं. आई वडीलांपासून अंकीता नजर चोरत होती तशी सनीपासूनही थोडीशी जाणीवपूर्वक लांब रहात होती. कदाचित आपण काय करून बसलो याचा पश्चात्ताप तिला मनोमन छळत होता. आपलं काहीतरी चुकलंय हे तिला सतत बोचणी देत होतं तसंच सनीने आपल्याला आता काही निराळाच त्रास दिला तर .. काय करायचं आपण ? अशा शेकडो विचारांनी तिच्या मनात थैमान घातलं होतं.. आणि हाय रे .. सनी नालायक निघालाच. त्याने अंकीताच्या त्या व्हीडीओ फूटेजमधून काही क्लिप्स आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आणि तिला आणि तिच्या कुटुंबियांना धमकावायला सुरूवात केली. भलीमोठी रक्कम अंकीताच्या आईवडीलांकडून लुबाडण्यासाठी आता तो सरसावला होता. त्याने अंकीताला आता फोनवर धमकी देण्यास सुरूवात केली. "तुझे हे फोटोज आणि व्हीडीओ फूटेज मी आता सोशल मीडियावर टाकणार .. आणि जर तुला ते थांबवायचं असेल तर मला पुन्हा एकट्यात भेट अशी धमकी देऊ लागला."
अखेरीस अंकीताने आईवडीलांना विश्वासात घेऊन आपल्या हातून झालेल्या घोर अपराधाची कबूली रडत रडत दिली.. आणि मग कुटुंबीयांनी सायबर पोलीसांना तातडीने या भयंकर घटनेबद्दल माहिती दिली. सायबर पोलिसांनी सापळा रचून अखेरीस त्या सनीला अटक केली आणि एका अत्यंत हुशार वकील ताईची मदत घेऊन सनीला या संपूर्ण अपराधाबद्दल चांगलीच शिक्षा देण्यात अंकीताच्या आईवडीलांना यश आले.कायद्यान्वये सनीला तुरूंगवास ठोठावण्यात आला. त्याला शिक्षा झाल्यानंतर कुठे अंकीताची मनःस्थिती रूळावर आली. तोवर या प्रचंड संकटामुळे तिच्यावर जणू आभाळच कोसळलं होतं. गेले कित्तीतरी दिवस ती प्रचंड मानसिक त्रासातून गेली होती. आता जेव्हा अपराध्याला कायद्याच्या कचाट्यात अडकलेलं पाहिलं त्यानंतरच तिने सुटकेचा निःश्वास सोडला. यापुढे आपण असं वर्तन कधीही करायचं नाही असा विश्वास तिने मनोमनी जागवला व आपल्या आईवडीलांना तशी खात्री दिली. अंकीताच्या जीवनात आता नवा सूर्य उगवला होता.. अंकीताचं आयुष्य पुन्हा सुरळीत मार्गाला लागलं.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
(ही कथा सत्यघटनेवर आधारीत परंतु संपूर्णतः काल्पनिक आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. सायबर अपराधांविषयी वाचकांना माहिती कळावी, सायबर गुन्हे कसे व कोणत्या पद्धतीने घडू शकतात, आपण त्यात कसे अडकले जातो, किंवा आपल्या हातून झालेले एखादे कृत्य हा गंभीर सायबर अपराधही कसा ठरू शकतो याविषयी प्रबोधन होण्याकरीता मी या कथा आपल्या कल्पनेने रचून लिहीत आहे. मात्र, या अशा स्वरूपाच्या घटना भवताली थोड्याफार फरकाने घडत आहेत व म्हणूनच याविषयीचे प्रबोधन निरनिराळ्या पद्धतीने करण्याचा माझा हा निखळ प्रयत्न आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. तसेच या कथा कोठेही प्रसिद्ध करायच्या असतील तर माझी लेखी परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. )