त्यानंतर याच विषयावर आधारित नुकतीच एक अशीच सुंदर शॉर्टफिल्म यूट्यूबवर पहाण्यात आली आणि त्याविषयी आवर्जून लिहावसं वाटलं.
'स्पर्श' असं या शॉर्टफिल्मचं बोलकं नाव !
ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची ही फिल्म आहे. फिल्मचा मुख्य विषय बाललैंगिकशोषण असला तरीही त्यासह या फिल्ममध्ये वयात येणाऱ्या मुलांच्या लैंगिक जाणीवा विकसित होत असल्याने त्यांच्याशीही घरातल्या मोठ्या माणसांनी किती छान संवाद साधायला हवा याचं एक उत्तम उदाहरण दाखविण्यात आलं आहे.
मला कथानक सांगण्याऐवजी कथानकाविषयी इथे लिहायचं आहे, कारण, एरवी असा विषय पडद्यावर मांडतांनासुद्धा बालकलाकारांना उगाचच विचित्र , अवघड प्रसंग दिग्दर्शकाबरहुकूम वा कथानकाची गरज म्हणून रंगवावे लागतात. परंतु, या फिल्मचं हेच वैशिष्ट्य आहे की यातील बालकलाकार मुलीकडून अजिबात असे कोणतेही 'अवघड' प्रसंग करवून घेतलेले नाहीत.. आणि याबद्दल किंवा याचसाठी सुमित्रा भावे यांचे मनोभावे ( प्रेक्षक या नात्यानेच केवळ ) खूप खूप कौतुक आणि आभार. एखादी व्यक्ती ज्येष्ठ का होते ते अशा कसोटीच्या कलाकृती सांगून जातात व त्या व्यक्तीच्या मोठेपणावर शिक्कामोर्तब करतात.
दुसरी महत्त्वाची उल्लेखनीय बाब म्हणजे या फिल्ममध्ये शोषणकर्ता असलेला मुलगा आणि त्याच्याशी जाणीवपूर्वक साधलेला संवाद. तो संवाद साधण्याची जबाबदारी घेणारे डॉक्टर दांपत्य आणि मुळात तो संवाद घडवून आणण्यासाठी शोषित चिमुरडीच्या आईनेच खुद्द घेतलेला पुढाकार ! हे सगळं फार छान पद्धतीने मांडलेलं आहे. म्हणजे आपल्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला मारझोड नाही की आईचं हतबल होणं वगैरे नाही, किंवा घाबरून रडून गोंधळ घालणं नाही .. तर ही आई योग्य दिशेनी विचार करते आणि मुलीला तर मायेच्या पंखाखाली घेतेच पण शोषणकर्त्या मुलाचं वय, त्याची मानसिक स्थिती , त्याच्यात होणारे शारीरिक बदल या सगळ्याबद्दल संवेदनशील राहून त्याला योग्य ती शिकवण योग्य त्या व्यक्तीच्या माध्यमातून देते ही या कथानकाची आणखी एक उजवी बाजू !
प्रत्यक्षात असे शोषणकर्ते नेहमीच इतके 'कोवळे' असतातच असे मात्र नाही परंतु या फिल्म बद्दल बोलायचं झालं तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे ज्यामुळे ही फिल्म अतिशय परिणामकारक ठरते.
स्पर्श .. हवेसे आणि नकोसे ..
मोठ्या माणसांनाही बरेचदा हे नकोसे स्पर्श टाळता येत नाहीत तिथे चिमुकल्यांची काय कथा !
नुकतंच याच विषयावर आधारित मीना कर्णिक यांनी अनुवाद केलेलं 'बिटर चॉकलेट' हे पुस्तक देखील वाचलं. त्यातील सत्यघटना हादरवून टाकणाऱ्या आहेत.
बाल लैंगिक शोषण या विषयाची निराळ्या व प्रभावी पद्धतीने मांडणी करणारी ही फिल्म म्हणूनच आवर्जून पहायला हवी व या विषयाबद्दल 'भान' व 'जाणीव' जागृती विस्तृत पातळीवर व्हायलाच हवी .. ही काळाची गरज आहे.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
(https://youtu.be/ti87QIoa40E)
Thought provoking article. Keeep it up!
उत्तर द्याहटवा