बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

घर परतीच्या वाटेवरती ...

एक गाण आवडलं की ते मन भरेस्तोवर ऐकत बसायचं या कॅटेगरीतली काही ठार वेडी माणसं या जगात आहेत आणि मी त्यांपैकीच एक आहे याचा मला अभिमान आहे. गाण्याचे शब्द, त्या गाण्याचं संगीत .. या धुंदीतच रहायचं मग .. दुसरे कुठलेही आवाज नकोत.. कोणाशी काही संभाषण नको.. मस्त एक आपली अशी जागा.. कम्फर्टेबल पोझिशन घ्यायची, जमल्यास चहा किंवा कॉफीचा मग उगाच आपला .. विशेषतः बाहेर पाऊस पडत असताना किंवा कडाक्याची थंडी असताना घरात आपण आपला असा षड्ज आळवत नि मनात घोळवत रहायचा.
मला कमाल वाटते या संगीतकार मंडळींची की त्यांना कसं समजतं नं की कोणत्या गाण्याला कशी चाल लावली .. कोणत्या कवितेतले शब्द कशापद्धतीने गायले तर ते काळजाला भिडतील .. तसंच कोणत्या गीताला कसे संगीत द्यायला हवे .. आणि नेमकी कोणती वाद्य समाविष्ट करायची.. आणि हा सगळा मेळ पुन्हा त्या कवितेच्या मीटरला साजेसा .. खरंच कमाल वाटते. मराठी मातीशी ईमान राखणारे सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं एक गाणं जे शांताबाई शेळके यांनी लिहीलेलं आहे ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा त्या गाण्याने मला अक्षरशः मुग्ध करून टाकलं. ते गाणं म्हणजे, 

घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे
घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीर्ण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा
घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसें
अश्रुत चाहूल येते कानीं.. एक हुंदका, एक हसे
घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके
घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हें
कुरवाळिती मज स्‍नेहभरानें विसरून माझे लाख गुन्हें...

- शांता शेळके.
संगीत - कौशल इनामदार
स्वर - साधना सरगम 
अल्बम - शुभ्र कळ्या मूठभर

बाहेरच्या उन्हाने पोळलेल्या आपल्याला संधीकाली सुखद गारवा कितीही आनंद देत असला तरीही जेव्हा कानावर अशी तरल कविता पडते तेव्हा माझ्यासारख्या एखाद्या सासुरवाशिणीला माहेराची आठवण आल्यावाचून रहात नाही आणि मग हे शब्द जणू आपल्याच आयुष्याला भूतकाळाच्या वाटेवर खेचून नेत आहेत असं वाटत रहातं. 
आपण माहेरी जातो नि तिथून परत सासरी यायला निघतो.. तेव्हा हे गाणं जणू कानात रेंगाळतं नि आपल्या मनाचे शब्दच आपल्याला या गीतातून पुन्हा ऐकू येत जातात.
 
घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे

जणू माहेराहून सासरी जाणारी मुलगी .. तिला माहेरच्या असंख्य आठवणी हव्याहव्याशा वाटतात पण एक मन आता सासरी खेचत असतानाच या आठवणींची धूळ मात्र सतत मनाभोवती फेर धरते.. 

घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीर्ण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा
घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसें
अश्रुत चाहूल येते कानीं.. एक हुंदका, एक हसे

तिला तिचं बालपण आठवतं, ते सगळे दिवस .. जिथे ती खेळली, बागडली, रूसली, हसली .. ते सारं आठवून गहीवरायला होतं.. आणि आज ते सगळं भवताली नाही पण तरीही मनाला मात्र त्या साऱ्याची आठवण येऊन डोळे पाणावतात. 
वाटतं पुन्हा धावत माघारी जावं, आपल्या घरी निवांत रमावं, आईबाबांनी लाड करावेत, शाळेच्या रस्त्याने वाट तुडवत मैत्रिणींसंगे पुन्हा एकदा रमत गमत घराकडे यावे, पुन्हा त्या ओळखीच्या रस्त्यांवरच्या ओळखीच्या खाणाखुणा डोळ्यांत साठवून घ्याव्या .. आणि या आठवांनी एकाच क्षणी ओठावर हसू येते आणि डोळ्यांतून पाणी ओझरायला लागते. 
त्या ओळी आहेत नं, बीती ना बिताई रैना गाण्यातल्या ... 
बीती हुई बतिया कोई दोहोराए .. भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए 
अगदी तसंच काहीसं वाटायला लागतं. लाख आठवणींचा कोलाज डोळ्यापुढे फेर धरतो आणि त्यातच रमून जावसं वाटतं. 

घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके

मग कधीतरी ती सासुरवाशीण मुलगी स्वतःच स्वतःला आपल्याच बालपणीच्या नावांनी हाक मारून बघते. ती विशिष्ट हाक कोणी तिला मारायचं .. मग ती व्यक्ती कोणीही असू देत .. तिचे आईवडील तिला लाडाने जी हाक मारायचे ती किंवा एखाद्या खट्याळ मैत्रिणीने तिला दिलेलं नाव.. किंवा एखाद्या प्रीय व्यक्तीने तिला एखाद्या चुकार क्षणी मनापासून मारलेली हाक .. हे सारं त्या सासुरवाशिणीला आठवतं. आज जरी ती कोणाची प्रिय पत्नी असली तरीही भूतकाळात तिने ही सगळी नाती जगलेली असतातच .. त्या नात्यांच्या आठवणी कुठं पुरायच्या तिनं .. मग त्या अशा मनाच्या खोलखोल कप्प्यात तिनं कुलुपबंद ठेऊन दिलेल्या असतात.. एखादी अशी पद्यरचना, एखादं असं गीत मग थेट मनाचा तो खोल कप्पा उघडतं आणि असं हळवं करून जातं. 
असं ते माहेर .. सुखाचं .. प्रेमाचं आणि नात्यांच्या सुंदर रेशमी धाग्यांचं.. 
पण ते माहेर सोडून ती आता सासरी नांदते आणि मनोमनी माहेर जपते. या माहेराने तिला काय दिलं नाही .. सगळं दिलं.. सासरीही सगळंच तर मिळतंय .. पण जीवनाची जी वाट ती जगली ती वाट तिला पुन्हा परतून कधीच भेटणार नसते हे जेव्हा जेव्हा तिला जाणवतं अशा वेळी तिला फक्त आणि फक्त कृतज्ञताच वाटते.. तेव्हा तिला जणू वाटतं, 

घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हें
कुरवाळिती मज स्‍नेहभरानें विसरून माझे लाख गुन्हें...

आता जरी मी सासरी असले तरीही माहेराची ही आठवण म्हणजे फार फार व्याकूळ करणारी .. आणि त्या व्याकूळ होण्याने माझ्या मनात या मलूल पण प्रेमळ भावनांची आता गर्दी झाली आहे.. माझे लाखो गुन्हे म्हणजे लहानसहान चुकाही जिथे सहजी माफ झाल्या अशा माहेराची मला आता ओढ लागली आहे.. 
खरंतर .. ही कविता, एखाद्या अशा व्यक्तीलाही चोख लागू (रिलेट) होईल जो कोणत्यातरी चुकीच्या मार्गाला भरकटून आता पुन्हा योग्य मार्गाने जगायला लागला आहे.. पण मला मात्र या कवितेचा अर्थ हा असा वाटला. 
एकच गाणं पण ते कित्तीप्रकारे मनाला भिडतं. मनाच्या आत तरंग उमटवत जातं.. एखादा दिवस एखाद्या गाण्याचा असतो हेच खरं.. 
घर परतीच्या वाटेवरती ... धूसर धूसर धूळ उडे ... 
अशी भावपूर्ण गाणी ऐकायची आणि अक्षरशः ढसाढसा रडून घ्यायचं .. अगदी मनभर रडून घ्यायचं हे देखील एक वरदानच आहे देवानं दिलेलं.. ! (की कवी आणि संगीतकारांनी आपल्याला मुक्तहस्ते दिलेलं देणं ? जे आपण त्यांना कधीही परत देऊ शकणार नाही .. कदाचित ..)


- मोहिनी घारपुरे - देशमुख



२ टिप्पण्या:

Translate

Featured Post

अमलताश