( नुक्कडकथाविश्व अंतर्गत पर्व १ साठी पाठवलेली माझी कथा )
दाराबाहेर एक गरीब बाई, सुलभा तिचं नाव .. ती कडेवर आपल्या पोराला घेऊन आली तशी त्या घरच्या गृहिणीनं झटकन स्वयंपाकघरातून सगळं शिळंपाकं आणलं. दाराच्यापल्याड समोर जमिनीवर ठेऊन दिलं नि झटक्यात घरात शिरून दार बंद करून घेतलं. सुलभाच्या मनाला असंख्य यातना झाल्या पण समोर दिसत असलेले चार घास आता तिला हवेच होते.. साऱ्या सकाळपासून तिला खायला काहीच मिळालं नव्हतं. चार घरची धुणीभांडी करत आपल्या तान्ह्याला वाढवणं तिच्यासाठी हल्ली फार अवघड झालं होतं. तिला कुणीच नव्हतं या पोराशिवाय.. म्हणून बिचारी पोराला कडेवर घेऊन झेपेल तितक्या घरची कामं करत दिवस काढत होती.. पण अचानक कोरोनाचं संकट आलं आणि बिचारीच्या चालत्या गाड्याला खीळच पडली. कामं बंद झाली.. लॉकडाऊननी तर तिची अवस्था आणखी बिकट झाली. आता या क्षणी पुढ्यात पडलेलं अन्न तिला खुणावत होतं ते तिनं झट्दिशी उचललं पुढं जाऊन एका झाडाखाली बसून चार घास जेवली. एका झाडाच्या कुशीत निजली. तान्ह्याला छातीशी घेतलं तशी ते मुटूमुटू दूध प्यालं आणि आईच्या ऊबेत निवांत झोपी गेलं.
....
रजनी ऑफीसातून घरी आली. आज घरात कोणीच नव्हतं. तिनं बिछान्यावर अंग टाकलं नि निवांत विसावली. एरवी घरात येताच छकुलींनं घातलेली लडीवाळ मिठी तिला तेव्हा आठवली. तिचा हा काही वेळेचा दुरावाही तिला त्याक्षणी असह्य झाला पण पुढच्याच क्षणी तिला जरा बरंही वाटलं. सतत लडीवाळपणाने जवळ जवळ करणारी मुलगी, येताजाता प्रेमानेच का होईना पण अंगाशी झोंबणारा नवरा .. या कोणत्याच स्पर्शाशिवाय त्याक्षणी शरीराला मिळालेला असा निवांतपणा तिला फार फार सुखावून गेला. स्पर्शांनी गजबजलेलं 'घरपण' एरवी हवंच पण कधीतरी असा मोकळेपणाही हवाच त्याचीच जणू तिला त्याक्षणी ओढ लागली होती. स्वतःच्या शरीराची आणि मनाची अशी निवांत अनुभूती घेताना ती आज एक वेगळीच शांतता अनुभवत होती. तब्बल अर्धा तास ती तशीच निवांतपणे बिछान्यावर पहुडली होती.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तिच्या ऑफीसच्या कामाचे तास कमी झाले होते पण तिला अधेमधे ऑफीसात चक्कर टाकावीच लागत असे.. आणि खरं पाहिलं तर कामाचे तास कमी केवळ म्हणायलाच झाले होते कारण, घरातील कामाची जबाबदारी आता संपूर्णपणे तिच्या एकटीवर येऊन पडली होती. घरचं झालं थोडं .. तशी अवस्था या कोरोनानं तिची, आणि तिच्यासारख्या अनेकींची करून टाकली होती. म्हणूनच .. आज घरात कोणी नसल्यानं हा आराम आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या शरीराचं अस्तित्व, 'स्वतःचं' अस्तित्व ती अनुभवत होती.
समोर स्वयंपाकघरात भांड्यांचा डोंगर खुणावत होता पण तरीही तिनं त्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं.. तिला मोकळेपणा हवा होता.. निवांतपणा हवा होता..
.......
टीव्हीवर सुरू असलेल्या आपल्या मालिकेतील एक अभिनेत्री अकारणच फार त्रास देऊ लागल्यानं तिला सिरीयलमधून काढून टाकलं आणि एकेकाळच्या फार मोठ्या अभिनेत्री असलेल्या आणि आता त्या सिरीयलच्या निर्मात्या म्हणून जबाबदारी पहाणाऱ्या मालतीबाई फार अडचणीत सापडल्या. शेवटी त्यांनी त्या नव्या अभिनेत्रीची आणि तिच्या कुटुंबियांची अरेरावी बंद व्हावी म्हणून स्थानिक नेत्याला भेटायचं ठरवलं. भेटीच्या दिवशी मालतीबाई त्याच्या ऑफीसात गेल्या तेव्हा नेत्यानं आधी सोशल मीडियासाठी व्हिडीओचं फूटेज घेण्यासाठी कॅमेरा ऑन केला. मालतीबाईंना जरा बिचकल्यासारखंच झालं पण लोकांसमोर आपली बाजू पोचावी म्हणून त्या काही न बोलता उगी जे जे होईल ते ते पाहू अशा आविर्भावात तिथं रेंगाळल्या. नेतेसाहेबांनी आपल्या बाजूच्या खुर्चीत मालतीबाईंना बसवलं अन् थाटात भाषण सुरू केलं .. "आज या 'ताई' मला अमुक एक कारणासाठी भेटायला आल्या आहेत" अशी सुरूवात करत चक्क त्यांनी मालतीबाईंच्या खांद्यावरच हात टाकला. मालतीबाईंना एक क्षण शिसारीच आली पण अडला हरी .. या नात्याने त्यांना त्या सगळ्या राजकीय नाट्यात गप्प बसण्याखेरीज व आपला हेतू साध्य करून घेण्याखेरीज पर्यायच उरला नव्हता. नेते महाशयांनी मात्र पाच दहा मिनीटं ताईंची भूमिका कशी योग्य.. नवोदित अभिनेत्रीचं कसं चुकतंय वगैरे भाषणबाजी करताना या देखण्या, आणि पूर्वाश्रमीच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला अकारणच चार पाच वेळेला स्पर्श करून घेतला..
...........
दारावरची बेल वाजली तशी रजनीनं दार उघडलं.
दारात मालतीबाई ..
मालतीबाई म्हणजे रजनीच्या सासूबाई. त्यांना एकाएकी तिथं आलेलं पाहून रजनीला जरा आश्चर्यच वाटलं.
"आई .. या ना .. बसा.. आज अत्ता तेही न कळवता .. का हो काही झालं का..?" रजनीने प्रश्नमालिका सुरू केली.. अन् मालतीबाईंच्या डोळ्यात हलके अश्रू दाटून आले. एकाएकी त्यांच्या डोळ्यात दाटून आलेलं पाणी पाहून त्यांच्या निम्म्या वयाच्या रजनीला काही कळेचना.. तिनं चटकन त्यांना घट्ट मीठी मारली.. त्यांना थोपटलं आणि पाच मिनीटं मोकळं होऊ दिलं. त्याही तिच्या कुशीत पाच मिनीटं ढसाढसा रडल्या.. थोडा वेळ तसाच गेला.. निःशब्द .. अन् मग मालतीबाई बोलू लागल्या, " रजनी, आज मी त्या अशोकरावाकडे गेले होते गं मदत मागायला, तर मेल्यानं वयाचा मानबिन न ठेवता मला असे सहेतूक स्पर्श केले. शिसारी आली मला पण सांगणार कोणाला नं.. तिथून निघाले तशी सारखे डोळे भरून यायला लागले माझे.. अगं, 'बाई' ..आणि त्यातून ती अभिनयाच्या क्षेत्रात काम करणारी असली की काय वाटतं गं या अशा विकृत लोकांना..? माझं वय काय, मी या इंडस्ट्रीत किती वर्ष काम करतीये पण आजवर हे असले स्पर्श करण्याची कोणाची हिंमत झाली नाही मला आणि आज या वयाला हा असा अनुभव यावा. गाडीत बसले नि वाटलं, आपल्याला समजून घेणारी लेक नसली तरी तुझ्यासारखी सून आहे नं.. ती नक्कीच समजून घेईल आपल्याला. म्हणून थेट इथेच आले बघ तुझ्याशी मन मोकळं करायला.." असं म्हणत मालतीबाईंनी पुन्हा एकदा डोळ्याला पदर लावला.
रजनीला हे सगळं ऐकून फार बरं वाटलं होतं त्याक्षणी. आपल्या सासुबाईंना व्यक्त होण्यासाठी आपल्याजवळ यावसं वाटलं हेच लाख मोलाचं होतं तिच्यासाठी. ती तशीच उठली नि आतून कॉफी घेऊन आली. तिनं पुन्हा एकदा मालतीबाईंना जवळ घेतलं. त्यांना थोपटलं. तशी मालतीबाईंना बरं वाटलं. खरंतर रजनीलाही अचानक मालतीबाईंचा सहवास मिळणं तेव्हा सुखावहच झालं होतं. कारण आता तिलाही घरात कोणाचंतरी अस्तित्व असावं असं अर्ध्या पाऊण तासानंतर वाटायला लागलं होतंच.. आणि अशातच मालतीबाई तिथे अवतरल्या होत्या.. सुखावहच होतं हे रजनीसाठी.शिवाय आज रजनीची भूमिका मालतीबाईंपेक्षा क्षणभर मोठी झाली होती याचा आनंद तर आणखीनच निराळा ..
मग दोघींनी कॉफी घेत घेत त्या अशोकरावासारख्या विकृत पुरूषांना दूषणं देत मनं मोकळी केली. संध्याकाळ कलली तशी मालतीबाई त्यांच्या घरी जायला निघाल्या.
"रजनी .. बेटा.. फार बरं वाटलं बघ तुझ्याशी तासभर गप्पा मारून.. आणि मुख्य म्हणजे इतकी डिस्टर्ब झाले होते नं मी या विचित्र अनुभवानी पण आता या वयात हे असले अनुभव कोणाशी व्यक्तसुद्धा करता येत नाहीत गं आपल्याला.. पण आज जशी तूच माझी 'औटघटकेची आई' झालीस बघ.. मी अगदी तुझ्या कुशीत शिरून रडले आणि मन मोकळं झालं. आता मात्र निघते. तिकडे बंगल्यावर तुझ्या सासरेबुवांचा खोळंबा झाला असेल जेवायचा.. "
असं म्हणताना त्यांचं लक्ष रजनीच्या स्वयंपाकघराकडे गेलं. भांड्यांचा डोंगर पहाताच त्यांना ओशाळल्यागत झालं. "ओह अगबाई आज तुझ्यापुढ्यात एवढं काम होतं आणि मी तुझा वेळ घेतला बघ. आता काय करशील ? नाहीतर अविनाश घरी आला की मस्त बाहेर जा कुठेतरी आज जेवायला.." त्यांच्या या सल्ल्यावर रजनी छानसं हसली नि म्हणाली.. " अहो आई, आजचा प्रसंग वेगळा. आज तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवलात तीच तर माझी कमाई. बाकी कामं काय ती तर रोजचीच आहेत हो.. मी आवरायला लागेनच आता.. तुम्ही मात्र आता कोणतेही विचार करू नका. झालं गेलं गंगेला मिळालं म्हणा आणि अशाच हसत्या रहा. तुमचा आशीर्वाद आम्हाला असाच सदैव मिळो " असं म्हणत ती नमस्कार करायला वाकली तशी पुन्हा एकदा मालतीबाईंनी तिची पाठ थोपटली.
ड्रायव्हरला हाक मारीत त्या गाडीत बसल्या.. गाडी पुढे निघाली.. मात्र, रजनीला केवढंतरी आवरायचं आहे अजून हे सारखं मनात राहिलंच होतं त्यांच्या.. तितक्यात पुढच्या वळणावर झाडाखाली बसलेली सुलभा त्यांना दिसली.
"ड्रायव्हर गाडी बाजूला घ्या.." असा आदेश सोडताच गाडी थांबली. मालतीबाईंनी काच खाली करून सुलभाला हाक मारली. अशा अंधाऱ्या वेळी आपल्याला कोण हाक मारतंय .. तेही नावानिशी.. म्हणून सुलभानं त्या दिशेनं पाहिलं.. मालतीबाईंना तिनं क्षणात ओळखलं.
"ताई .. तुम्ही ..इथे..?"
"हो .. पण तू इथे काय करतीयेस ..? तेही एवढ्या उशीरा..?"
"ताई.. तुमच्याकडचं काम सुटलं तेव्हापासून माझी ही अशीच अवस्था आहे पहा. हाताला काम नाही आणि पोटाला भूक .. मग काय दारोदारी दिवसभर फिरते जे मिळेल ते खाते आणि मग पाय फरपटत कशीबशी रोज रात्री घरी पोचते. कधी लांबवर आली असेल तर घर गाठायला माघारी जाणंही अशक्य होतं बघा.. मग अशी एखाद्या आडोशाला थांबते नि रात्र सरली की मग घरी जाते. लई भ्या वाटतो अंधाराचा पण काय करू ..!" असं म्हणत सुलभाच्या डोळ्यातून गंगायमुना वहायला लागल्या.
मालतीबाईंच्या पोटात कालवाकालव झाली.. मनात अपार माया दाटून आली.
मालतीबाईंनी पुढच्याच क्षणी सुलभाला तिच्या पोरासह गाडीत बसायला सांगितलं. तिला थोपटून शांत केलं. तिच्या अवघड परिस्थितीत माया देणारं तर सोडाच पण कुणी तिच्याकडे पहाणारंही नव्हतं. गेला महिना दोन महिने तिच्या तान्हुल्याखेरीज तिला कोणी स्पर्शही केला नव्हता.. मालतीबाईंच्या स्पर्शातलं प्रेम, माया आणि सहवेदना सुलभाला मिळताच तिला आईची, आपल्या माहेराची आठवण झाली.
पण आता सुलभाचं काय करायचं हा प्रश्न मालतीबाईंपुढे होताच. त्यांनी दोन क्षण विचार केला नि पुन्हा रजनीला फोन लावला.
"हॅलो रजनी, तुझं काम आटपलं का..?"
पलिकडून रजनी उत्तरली, "आई .. अहो इतकी भांडी आहेत .. आज तर माझी पाठ भरून आलीये बघा.. पण करणार काय..!"
मालतीबाई झटकन म्हणाल्या.. "थांब.. मी पुन्हा येते तुझ्याकडे बेटा..!" आणि गाडी माघारी फिरवत त्यांनी रजनीचं घर गाठलं.
बेल वाजवली.
आता दारात आईंबरोबर आणखी कुणीतरी आलेलं पाहून रजनीच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह दिसलं.
" रजनी, ही सुलभा.. पूर्वी बंगल्यावर कामाला होती. मधल्या काळात तिनं काम सोडलं होतं आणि त्यातचं आता कोरोना .. तिच्या हाताला आता काही काम नाही बघ.. आणि पदरात हे तान्हुलं देखील आहे. सुलभाला आता इथे आणलं ते तुझ्या मदतीला.. तिला आधी काहीतरी खायला दे नि मग ती तुला मदत करेल."
रजनीला बरं वाटलं. तिनं गरमागरम पोह्यांची प्लेट सुलभाला देऊ केली. सुलभानीही अधाशासारखे ते खाल्ले कारण बरेच दिवसात तिला असं अन्न मिळालंच नव्हतं खायला. मुख्य म्हणजे कोणीतरी प्रेमाने दिलेलं अन्न .. आज रजनी आणि मालतीबाईंकडून सुलभाला ते प्रेम मिळालं होतं. सुलभाचं तान्हं रडू लागलं तशी रजनीनं त्यालाही दूध दिलं आणि दोघीही त्याच्याशी दोन घटीका खेळल्या, तितक्यात सुलभानं रजनीची भांडी, गॅस, ओटा स्वच्छ आवरून दिलं.
तासाभरातच सगळं आवरून मालतीबाई पुन्हा घरी जायला निघाल्या.. सुलभालाही आता त्या पुन्हा आपल्यासोबत बंगल्यावर कामासाठी घेऊन जाणार होत्या. तिची पुढची सगळी सोय आता त्याच बघणार होत्या.. तिची माय बनून.. आणि त्या लेकराची आजी बनून ..
रजनीनं गॅलरीतून त्यांना बाय केलं आणि मालतीबाईंची गाडी पुढच्या वळणांनी भरधाव निघाली..
प्रेमाच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या त्या तिघीजणींच्या चेहऱ्यावर आता एक निराळीच तृप्तता झळकत होती.
- मोहिनी घारपुरे - देशमुख
©मोहिनी घारपुरे देशमुख