शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

गृहप्रवेश



शांत, संथ गतीने सुरू असलेली एक कथा शेवटाकडे जाता जाता किती वळणदार आणि गतीमान होत जाते याचे उदाहरण म्हणजे गृहप्रवेश हा हिंदी चित्रपट .. 1979 साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य 
तर कथेची मुख्य पात्र रंगवणारे तीनच कलाकार.. संजीव कुमार, सारीका आणि शर्मीला टागोर..
 तसं पाहिलं तर कथा अगदी नेहमीचीच .. नवरा बायकोच्या सुखी संसारात आलेल्या तिसऱ्या व्यक्तिमुळे नात्यात येणारा तणाव .. पण तरीही या साध्याशा कथेलाच नवा आयाम देण्यात दिग्दर्शकाला यश आलं याचं कारण कथेचा संपूर्णतः निराळा दृष्टीकोण आणि निराळी सहज मांडणी.. 

लग्नानंतर बाई, गृहिणी झाली की ती तिच्यातील सौंदर्य विसरून जाते. सुंदरतेपेक्षा जबाबदारीच्या ओझ्याने अगदी निस्तेज होऊन जाते.. नवराही हळूहळू तसाच होत जातो... अशातच जर आर्थिक परिस्थितीही फार चांगली नसेल तर आणखीनच ओढाताण.. मग संसारगाडाच सर्वात जास्त महत्त्वाचा होतो आणि त्यापुढे आपल्या अस्तित्वाची, स्वप्नांची, स्वतःविषयीच्या कल्पनांची केव्हा माती होत जाते हे आपलं आपल्यालाही कळत नाही. रोज चाकोरीबद्ध आयुष्य जगता जगता नात्यातला रसदारपणा हरवत जातो. अशातच नवऱ्याच्या जीवनात एखादी नवयुवती  यावी आणि नवऱ्याने तिच्याकडे आकृष्ट व्हावे किंवा बायकोच्या आयुष्यात एखादा उमदा तरूण यावा आणि तिला त्याची भूल पडावी हे सहज शक्य आहे, पण तरीही अशा अवघड वाटांवरूनच नातं पुढच्या वळणावर न्यायचं असतं, स्वतःला सावरायचं तसंच पाय घसरलेल्या जोडीदाराली सावरायचं काम दोघांपैकी एकाने करायलाच हवं असतं नाहीतर घर कसं टिकणार, नाही का ..

अशीच काहीशी कथा होते अमर (संजीव कुमार) आणि मानसी (शर्मिला टागोर) यांच्या संसाराचीही..तो अगदी साधा नोकरदार मनुष्य आणि ती त्याची साधीशी बायको. लग्नानंतर ती दोघं भाड्याच्या घरात आपला संसार थाटतात. सुरूवातीपासूनच लहानसहान गोष्टींसाठी तिला तडजोड करावी लागत असते पण तिची तक्रार नसते. फक्त एकच स्वप्न असतं, स्वतःचं घर घ्यायचं... लग्नाला सात आठ वर्ष होतात तेव्हा तिची ही आंतरिक इच्छा फारच तीव्र व्हायला लागते.. तिला तिचं स्वतःचं घर हवं असतं. आणि तो ..तोपर्यंत तो त्याच्या चाकोरीत पूर्णतः अडकून गेलेला असतो. ती घराच्या चाकोरीत आणि तो त्याच्या चाकोरीत .. एव्हाना मुलगाही मोठा झालेला असतो.. शाळेत जात असतो .. वरवर पाहिलं तर सगळंच सुरळीत चालू असतं. अशातच त्याच्या ऑफीसमध्ये सपना (सारिका) टायपिस्ट म्हणून रूजू होते. ती फारच बोल्ड .. शिवाय स्वकेंद्री .. सतत लोकांनी आपल्याबद्दल बोलावं, आपलं तारूण्य न्याहाळावं, यासाठी मनोमनी धडपडणारी .. अर्थात ऐन वयात आलेल्या कोणाही मुलीला असंच वाटत असतं नाही का .. ते नैसर्गिकच .. त्यात चूक ते काय ..
पण त्यामुळे ऑफीसच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे वरीष्ठांच्या लक्षात येताच ते तिची रवानगी या बोअरींगशा अमरच्या केबिनमध्ये करतात. आणि अर्थातच सपना तिच्या तारूण्यसुलभ हलचालींनी त्याचं लक्ष वेधून घेत जाते.. सुरूवातीला भाव न देणारा तो हलकेच तिच्या प्रेमात पडत जातो. 
इकडे मानसी, घर शोधत असते .. तिला तिचं घर हवं असतं..आणि नवरा अमर दुसऱं घर करण्याच्या नादी लागलेला असतो.. 
शेवटी एकदा सपना त्याला लग्नाबद्दल विचारते आणि लवकर काय ते सांग असं ठणकावते.. तोही विचारात पडतो. बायकोला कसं सांगायचं .या विचाराने आलेली अस्वस्थता आणि नेमका तो रविवारचा दिवस .. रेडीओवर गाणं सुरू, बात निकलेगी तो फिर दूरतलक जाएगी .. आता सगळ्या कथानकाचा प्राण या दृष्यांपाशी एकवटतो .. संजीव कुमारची अस्वस्थता .. नवरा घरी असल्याने सुट्टीच्या दिवशीची नेहमीची कामं करत करत शर्मिलाचं घरातलं वावरणं .. तो तिला सांगायचा प्रयत्न करतो पण .. वेळ .. वेळच चुकत असते सारखी .. हा सगळा अभिनय  निव्वळ अप्रतिम .. होता होता रात्र होते .. आणि शेवटी बिछान्यात तो तिला म्हणतो, मै ... मै तुमसे प्यार नहीं करता .... 
या वाक्याने तिची रिएक्शन काय येईल असं आपल्याला वाटतं .. पण ती .. ती निव्वळ प्रश्नार्थक नजरेनी बघते .. विचारते .. जाणून घेते .. आणि एवढे दिवस हे सगळं सुरू होतं आणि आपल्याला कळलंही नाही याचं तिला आश्चर्य वाटतं .. 
आता तिला आलेली अस्वस्थता .. 
एकाच बिछान्यावर दोघेही असून आता त्यांच्यातलं नातंच गोठून गेलेलं असतं ..
रात्र सरते .. दिवस उजाडतो
ती मोठ्या हुशारीनं की हिंमतीनं त्याला म्हणते, आज तिला भेटायला आण घरी .. मला एकदा पाहू तर दे ती कोण आहे .. मी एवढी वर्ष आईसारखी तुझी काळजी घेतली आता किमान तू जिच्याशी लग्न करणार तिला मला या अधिकारानी भेटू तर दे .. ती विनवते .. तो नकार देतो .. ती म्हणते, सपना ने तुम्हे सिर्फ ऑफीसमें देखा है .. घर में नहीं .. तू घरात जसा असतोस ते तिने पाहिलं तर कदाचित तिला तू आवडणारही नाहीस .. म्हणजे मग तिला आणि तुला दोघांनाही तुमच्या भावना खऱ्या आहेत की नाहीत हे तपासायला मिळेल .. तो म्हणतो, बघेन .. तिला विचारून .. आली तर घेऊन येईन घरी ..
तो कामावर जातो आणि मुलगाही शाळेत जातो..
ही घरी एकटी .. 
काहीतरी विचारचक्र सुरू होतात .. आणि हळूहळू ठाम होत जाते.. 
घराच्या भिंती केव्हापासून घासून ठेवलेल्या असतात पण रंग द्यायला वेळच झालेला नसतो ... एका माणसाला बोलावते, आणखी चार माणसं घेऊन ये आणि चार वाजेच्या आत घराला रंग करून दे असं सांगते.. जसं काही तिला खात्री असते, सपना येणार .. नक्की येणार .. 
इकडे घराला रंगकाम सुरू होतं आणि तिकडे ही स्वतः चक्क ब्यूटीपार्लरमध्ये जाते.. स्वतः सुंदर दिसावी यासाठी काय काय करून घेते .. आणि मुलगा घरी येईपर्यंत घरी येते .. आता या क्षणी घराला रंग चढलेला असतो, तिला स्वतःला रंग चढलेला असतो .. ती आणि तिचं घर निव्वळ अप्रतिम दिसत असतात .. 
मुलगा येतो तर चक्रावून जातो .. घर पाहून .. आणि आईला पाहून म्हणतो, तुम बोहोत बुरी हो माँ .. तुम रोज ऐसी सुंदर क्यों नहीं रहती ..ती फक्त हसते ..
संध्याकाळी नवरा येतो आणि त्याची प्रेयसीही आलेली असते .. 
नवरा क्षणभर अवाक् होतो .. हे आपलंच घर आहे ना .. ही आपलीच बायको आहे ना .. असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर उभा रहातो .. क्षणभर .. आणि तो ते अवघडलेपण घेऊन आता वावरतो .. 
सपना तशीही बोल्डच .. 
एकंदरीतच शेवटचा प्रसंग ज्या पद्धतीने तिघांनीही वठवला आहे .. तो अफाटच म्हणायला हवा ..
एक गाठ बसणार असते आणि तितक्यात नेमका धागा हातात येतो आणि आपण क्षणार्धात सारा गुंता सोडवून टाकतो असा हा शेवटचा प्रसंग ..
काही वेळ त्याच्या घरात घालवल्यावर ती निघते .. त्याची बायको त्याला म्हणते, तिला एकटं जाऊ देऊ नकोस .. तू तिला सोडायला जा .. ती नको म्हणते पण मानसी आग्रह करते .. ती दोघं निघतात .. तो तिला सोडायला जातो .. थोड्याशा अंतरावर जाईपर्यंत त्याचं अवघडलेपण, अस्वस्थता आणि गोंधळ सारं सारं आणखी तीव्र होत जातं .. एका सिग्नलपाशी ती पोहोचतात .. सिग्नल लाल होतो .. ती पुढे निघून जाते आणि तो मागेच थांबतो ..
सर्वात शेवटच्या या सीनसाठी दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी मार्क प्रेक्षक देऊन मोकळा होतो आणि विचारचक्र सुरू होऊन आपल्या मनाची पावलं पुन्हा आपल्या घरापाशी आपल्याला घेऊन येतात.

इतकं साधं कथानक पण संवाद आणि एकेका दृश्याच्या मांडणीतून चित्रपट एवढा मोठा अर्थ मांडून जातो की आपल्यासारखी संवेदनशील मंडळी आतून हलल्यावाचून रहात नाहीत. 
मला हा चित्रपट यातल्या गतीसाठी आवडला.. यातल्या दृश्यांसाठी, दिग्दर्शकांच्या मास्टरस्ट्रोक्ससाठी आवडला. शिवाय, बोलीये सुरीली बोलीया हे गाणं आणि लोगोंके घर में रहता हू हे गाणं .. बात निकलेगी ही जगजीतजींची गझल ... ही सगळी गाणी चित्रपटात इतकी सुंदर वाटतात की प्रेक्षक त्या चित्रपटात या गाण्यांमुळे सहजच अधिक गुंतत जातो ..

असे साधे सहज आणि आशयघन चित्रपट असंही मला नेहेमीच फार आवडतात. 
गृहप्रवेशही त्यातलाच एक चित्रपट ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख 



तो राजहंस एक ...

गोरी गोरी पान फुलासारखी छान आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख यासारखी एक से एक अजरामर गाणी संगीतबद्ध करणाऱ्या श्रीनिवास खळे काकांच्या स्मृतिदिनानिमित्त (2 सप्टेंबर 2018) ..


असंच एकदा काही दिवसांपूर्वी मी खळे काकांवर झी मराठीने केलेल्या नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद यूट्यूबद्वारे घेत होते. माझ्या मनात चलबिचल झाल्यावाचून राहीले नाही.
म्हणतात ना, मोठं होण्यासाठी संघर्ष कुणालाही चुकलेला नाही, आणि ध्येयाच्या उंचीवर पोचण्याकरिता अनेक मानअपमान, हालअपेष्टांचा सामना करावा लागतोच.. याची तंतोतंत प्रचिती खळे काकांची जीवनी ऐकताना येते.
अत्यंत हळव्या मनाचे, संवेदनशील, कृतज्ञ आणि निगर्वी असे खळे काका आजन्म संगीत कलेत रमले. आपला मुलगा छंद म्हणून गाणं जपतोय हे एकवेळ ठीक पण मुलाला नाटक्या करायचं नाही यावर त्यांचे वडील आग्रही होते..एकदा तर खुद्द बालगंधर्वांनी, हा मुलगा मला द्या.. हा पुढे मोठा गायक होईल असे उद्गार काढले पण तरीही खळे काकांच्या वडीलांनी त्यांस चक्क नकार दिला.
पुढे खळे काकांनी एका बँकेत नोकरी केली पण अवघ्या काही तासात सोडली. मग रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून अजमेरला नोकरी लागली पण काकांच्या मनातल्या गायकाला, संगीत सुरांच्या सान्निध्यातून जगरहाटीत अडकवणे कदाचित खुद्द देवालाही मंजूर नसावे.. म्हणूनच की काय, शांताराम रांगणेकर यांच्यासारखे बालमित्र खळेकाकांच्या मदतीला धावून आले आणि खळे काका त्याच्यासह, त्याच्या शब्दावर आणि आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेऊन मुंबईला पळून आले.. शांताराम यांनी आपल्या घरी त्यांची सोय केली. रांगणेकरांचं घर अवघं दोन खोल्यांचं आणि त्यात रहाणारे एक दोघे नव्हे तर तब्बल 17 कुटुंबीय.. अशातही या मोठ्या मनाच्या, दिलदार मित्राने खळे काकांना आपल्या घरात प्रेमभरे आश्रय दिला. व्हरांड्यात झोपायची सोय केली.. संगीताचंच जगणं असणाऱ्या खळे काकांनी तशा अवस्थेतही आनंदाने निभावलं. व्हरांड्यात झोपलं की रात्रीच्या वेळी उंदीर, घुशी अंगावर येत.. पाऊस वारा झोडपून काढत असे पण खळे काकांनी कधीही तक्रार केली नाही आणि आपल्या ध्येयापासून विचलीत झाले नाहीत.
मुंबईत डीपी कोरगांवकर यांचेकडे संगीत सहाय्यक म्हणून काम मिळालं त्यातूनच शिकणं सुरू झालं. तिथेच पहिली स्वतंत्र रचना करण्याची संधी मिळाली.. ते गाणं गुजराथी होतं आणि तलत मेहमूद यांनी ते गायलं. म्हणतात ना, एका कामातून दुसरं काम मिळतं .. एका कामातून पुढील संधी आपोआप मिळत जाते. अगदी याच न्यायाने, नंतर एकदा एक गृहस्थ खळे काकांना भेटायला आले. आपण स्वतः लक्ष्मीपूजन नावाचा चित्रपट काढणार असून त्याची कथा, पटकथा, संवाद, गाणी गदीमा करणारेत आणि आपण त्यातील गाण्यांना संगीतबद्ध कराल का असा प्रस्ताव घेऊन आले. अर्थातच, खळेंनी अत्यानंदाने लगेचच रूकार भरला. पण आठच दिवसात ते गृहस्थ पुन्हा येऊन म्हणाले, खळे आपल्या नावाला गदीमांनी नकार दिलाय पण तरीही मी त्यांना तुम्हीच ही गाणी करणार असे ठामपणे सांगितले आहे. मग राम गबालेंना घेऊन ते गृहस्थ खळे काकांकडे गेले, सगळी गाणी एक से एक झाली पण दुर्दैवाने चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.
सुरूवातीला गदीमांनी नाकारलेलं असलं तरीही खळे काकांच्या या सर्व गाण्यांना त्यांनी भरभरून दाद दिली. गदीमांनीच या सर्व गीतांची तू स्वतंत्र रेकॉर्ड का करत नाहीस असं सुचवलं आणि एचएमव्हीकडे पाठवलं. ही सर्व गाणी पुढे भावगीते म्हणून आशाबाईंच्या आवाजात पाच सहा वर्षांनी रेकॉर्डच्या स्वरूपात बाजारात आली आणि गोरी गोरी पान, आणि एका तळ्यात होती या दोन गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली .. ती अगदी आजही तश्शीच आहे. हेच काकांचं श्रेय ..
खळे काकांनी आजवर एक से एक गाणी केलेली आहेत..
- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
- निळा सावळा नाथ
- कळीदार कपूरी पान
- कुणी कुणाचे नाही
- वेगवेगळी फुले उमलली
ही यादी प्रचंड मोठी आहे.
पंडीत भीमसेन जोशी म्हणतात, एखादं गाणं वाईट झालं तर खळे बोलत नाहीत, पण त्यांचा चेहरा बोलून जातो आणि तेच गाणं नंतर चांगलं झालं की खळे भरभरून दाद दिल्याशिवाय रहात नाहीत.
तर राम गबाले सांगतात, खळे काका इतके हळवे आहेत की आपण त्यांना भेटलो तर सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते ..
असे आपले खळे काका ..
खळे काकांच्या गाण्यात रंगून जात नाही असा माणूस विरळाच. खळे काका, बाबुजी आणि गदीमा या त्रयींनी आपल्यासारख्या गानरसिकांपुढे जी सांगितिक मेजवानी वाढून ठेवली आहे त्याच्या रसास्वादात पुढील कित्येक पिढ्या न्हाऊन निघतील यात शंका नाही..

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ..

- मोहिनी घारपुरे -देशमुख

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

ताईसाठी थोडसं ..


मोठी बहीण असली की आपसुकच आपल्या वाट्याला मायेची काकणभर जास्तच ऊब येते. म्हणजे आईच्या मायेनं, आईनंतर आपलं कोणी करत असेल तर ती म्हणजे ताई..
ती जीव लावते पण तिचा धाकही असतो. ती भांडते, अधिकार गाजवते, पण तरीही त्यामागचं प्रेम लपत नाही. ती आपल्यापेक्षा वयानी फार मोठी नसते पण तरीही आईच्या सावलीसारखी ती आपली काळजी घेत रहाते. लहानपणी एकत्र खेळताना आपण धडपडलो तर तिचा इवलासा जीव घाबरतो खरा पण आपल्याला ती ते कळू देत नाही. तिच्या वयानुरूप आणि समजेनुसार प्रथमोपचार करून मोकळी होते.. आपल्याला साधी सर्दी झाली तरीही सतत उगी उगी करेल, खोकला झाला तर पाठीवरून हात फिरवेल आणि ताप आला तर सतत थोड्या थोड्या वेळाने आपल्या जवळ येऊन कपाळावर हात ठेऊन चेक करत राहील ..
ताई मोठी होते, सासरी जाते पण तिचं आपल्याप्रती जराही दुर्लक्ष होत नाही. ती सासर आणि माहेरची माणसं सहजी धरून ठेवते, आता तिची माया या सगळ्या माणसांनाही मिळत असतात, पण ती आपल्याला विसरत नाही .. अशावेळी खरंच तिचं कौतुक वाटतं.
नंतर आपण मोठे होता होता आपापल्या विश्वात रमून जातो.. मैत्रिणी वगैरे तर मागच्याच कुठल्यातरी वळणावर सुटून गेलेल्या असतात .. मग उरतो आपण एकटे .. पण तरीही ही मोठी बहीण, ताई , आपली हक्काची मैत्रीण बनून आपल्या आयुष्यात जणू जीनीसारखी इन्व्हीझीबल मोडमध्ये वावरत असते. आपल्याला हवं तेव्हा आपण एकमेकींशी बोलू शकतो हेच या नात्याचं सर्वात मोठं सुख..
अगदी छोटी मोठी आठवण, आयुष्यातली सुखदुःख आपण हक्काच्या मैत्रिणी एकमेकींसह वाटून घेत जातो .. आणि पुन्हा आपल्याला आयुष्यात रममाण होऊन जातो ..
या नात्यातले असंख्य पदर असेच तरल, सुखद आणि संस्मरणीय ..
ताई असली तरीही तिची किंमत कळत नाही असेही अनेक भाऊबहीण ( महाभागच म्हणायला हवं खरं तर यांना) आहेत , त्यांना पाहून वाईट वाटतं..
म्हणून तुमच्याकडे एखादी अशी काळजीवाहू, प्रेमळ, गुणी आणि सतत ताईगिरी करणारी ताई असेल तर तिला जपा, तिला जीव लावा, आणि कधीही अंतर देऊ नका हेच सांगेन ..
- मोहिनी

पक्षीमित्र गाडगीळ नाना



खरंतर तुमची लेखनिक म्हणून आयुष्यात पहिली कमाई मिळाली . भविष्यात मीही कधी लिहीती होईन असं वाटलं नव्हतं तेव्हा पण आज लेखनाच्या क्षेत्रात नाव कमवत असताना ते जुने दिवस आठवल्याशिवाय रहात नाहीत .तुमच्याकडे मी यायचे उन्हाळी सुट्टीत तेव्हा कदाचित मी सातवी आठवीत असेन. माझं अक्षर छान, शुद्धलेखन देखील बऱ्यापैकी चांगलं होतं पण तरीही तुमच्याकडून डिक्टेशन घेत लिहीताना चुका व्हायच्याच. फक्त तासभराच्या लिखाणाचे कागद नंतर तुम्ही तपासून ठेवत. मी दुसऱ्या दिवशी आले की त्या चुका पाही .. काका तुम्ही आणि कधीमधी काकूंनीही लाल पेनाने चूक दुरुस्त करून दाखवलेली असे .. हळूहळू माझ्या लिखाणात प्रगती होत गेली त्याचा पाया म्हणजे तुमच्याकडले हे दिवस म्हणायला हवेत .
नंतर काही वर्षांनी तुम्ही इंटरनेट घेतलंत, तेव्हा मी कॉलेजला होते आणि सुट्टीत तुमच्याकडे पुन्हा लेखनिक म्हणून येत होते. मीही नुकतीच इंटरनेट शिकले होते .. मग तुम्ही अगदी सहजपणे मला इंटरनेट च्या शंका विचारायचात , तेव्हा मला फार विशेष वाटे. काका, तुम्ही सर्वार्थाने माझ्यापेक्षा फार फार मोठे पण त्या वयातही तुमची नवी गोष्ट शिकण्याची धडपड, उत्सुकता आणि माझ्यासारख्या लहान व्यक्तीकडूनही नवीन गोष्ट शिकण्याची सहजता हे सगळे तुमचे व्यक्तिमत्त्व विशेष !
लेखनाचा तास झाला की काकूंनी टेबलावर तुमच्यासाठी तांब्याभर ताक अनेकदा ठेवलेलं असे. चाट मसाला किंवा काळं मीठ घातलेलं हे ताक आणि सोबत सीझनल फ्रुट्स म्हणजे पेरू किंवा आंब्याच्या फोडी कित्तीदा तर मीही तुमच्या बरोबर खाल्ल्याचे आठवते.
सगळ्यात टेस्टी आणि पहिल्यांदाच चाखलेला पदार्थ म्हणजे काकूंच्या हातचं, चित्रान्नं ! हा प्रकार मला जामच आवडला होता तेव्हा .. त्याची चव आजही जीभेवर आहे.
काका, अशा अनेक आठवणी आहेत तुमच्या बरोबर माझ्या ..
खरंतर बरेचदा मनात हे सगळं लिहावं असं वाटलं होतं पण निमित्त सापडत नव्हतं. आज फेसबुकच्या या व्हिडीओमुळे सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि मी भराभर लिहून मोकळी झाले.
काका, तुमचं वय, तुम्ही जपलेले छंद आणि तुमचं काम हे फार मोठं आहे .. तो प्रेरणेचा झरा अनेकांना मार्गदर्शक ठरत राहील यात शंका नाही .. !
सविनय नमस्कार
कळावे,
आपली (बाल)मैत्रीण / नात
मोहिनी

स्वामी - #मला_भावलेला_चित्रपट


किती छोटीशी कथा, किती मोठासा आशय .. किती भावपूर्ण आणि किती मोहकतेने मांडलेलं कथानक ..
सावत्र विधूर मुलगा, त्याच्याशी होणारा दुजाभाव, त्याची दुसरी बायको (कथेची नायिका) तिच्या पूर्वायुष्यात अल्लड आणि दुसऱ्याच कुठल्यातरी मुलाच्या प्रेमात पडलेली .. परिस्थितीमुळे लग्न नायकाशी होतं आणि मिळालेला स्वामी खऱ्या अर्थानी तिचा जीवनसोबती ठरतो. किती साधा नायक गिरीश कर्नाड यांनी उभा केलाय.. साधेसहज संवाद पण किती अर्थपूर्ण आशय मांडत जातात.
हा चित्रपट एक नवा विचार घेऊन आला. चित्रपटाची नायिका, मिनी (शबाना आझमी) चित्रपटाच्या शेवटी जे म्हणते ते खरंच प्रत्येक माणसाने शिकायला हवं असंच आहे, दया, क्षमा आणि शांती हे शब्द पुस्तकातच वाचले आहेत पण परस्पर व्यवहारात या शब्दांचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे या शब्दांचा प्रत्यक्ष वापर केल्यानंतरच तुम्ही जाणू शकता .. हा तो विचार ..
शिक्षणाने माणूस समृद्ध होतो पण व्यवहारात शिक्षणाबरोबरच मोठं मन आणि चांगल्या भावना यांची गरज असते. बरेचदा शिकलेली माणसं आपल्या ज्ञानाच्या अहंकारात हे विसरून जातात. आपणच मोठे हा भ्रम होतो आणि त्या भरात कधीच पाय जमिनीवरून घसरून जातात. माणूस म्हणून आपण किती थिटे आहोत हे अशा वेळी एखादा साधासा माणूसही आपल्यासमोर त्याच्या कृतीतून दर्शवून देतो.
चित्रपटाचं मूळ कथानक भारतीय संस्कृतीचं रूप दर्शवणारं .. भारतातील विवाहसंस्थेनुसार स्त्रीसाठी तिच्या नवऱ्याचं घरच तिचं घर.. आणि जिला नवऱ्याचा भक्कम आधार तिला कोणा दुसऱ्याचं मिंधेपण घ्यायची वेळ येत नाही. पण म्हणूनच हा नवरा मुळात कसा असावा हे स्वामी चित्रपटातला नायक आपल्याला दाखवून जातो.
सच्चे मनसे माफी माँगने के बाद गुन्हा, गुन्हा नहीं रेह जाता
एवढा मोठा व्यापक विचार करणारा माणूस जेव्हा नवरा म्हणून मिळतो तेव्हा त्याच्या सहवासात थोडेच दिवस राहिलेली कथेची नायिकाही माणूस म्हणून चार पायऱ्या आपोआपच वर चढते.
चित्रपटाच्या शेवटी तिचा प्रियकर तिच्या घरी येतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि घरच्यांसमोर हे सगळं उघड होतं.. नवऱ्याच्या कानावर गोष्ट जाते पण तरीही तो हलत नाही, स्थिरबुद्धी ठेवतो.. सासू वाट्टेल ते बोलत असते तेव्हा शेवटी नायिकेकडूनही रागाच्या भरात सासूला बोललं जातं, तेव्हा शांतपणे तो म्हणतो, तुला जायचं असेल तर जा पण तुला आईची माफी मागूनच जावं लागेल.. त्याची आई खरंतर सावत्र, शिवाय ही जाणार असेल तर दागिने ठेऊन जा म्हणून त्याच्यामागे तगादा लावते... नायिकेच्या कानावर ते शब्द पडतात, तिरीमिरीत ती सगळे दागिने घरात फेकते, नवरा घरातून शांतपणे निघून जातो.. ती तरातरा बॅग भरते आणि चक्क प्रियकराबरोबर निघून जाते, माफी वगैरेचा तर प्रश्नच उरत नाही .. रेल्वेस्टेशनवर रेल्वेची वाट पहात असताना ती शांत बसते आणि तिला आपली चूक लक्षात येते .. पतीचे शब्द आठवतात, जराजरासी बात पर इतना गुस्सा नही होते, माफ करनेके बाद गुन्हा गुन्हा नहीं रेह जाता, जिसे अपना सबकुछ दे दिया हो उसे कुछ और देकर ही तो खुश किया जा सकता है ... त्याची एकेक वाक्य आठवतात आणि तिला मनोमनी जाणवत रहातं, खरंच आपला पती किती श्रेष्ठ दर्जाचा माणूस आहे .. आता रेल्वेची घंटा झालेली असते, प्रियकर तिला म्हणतो, आता तुला एकच मार्ग आहे, तू थोडे दिवस आईकडे रहा आणि मग मी तुला घ्यायला येईन, मग माझ्या घरी जाऊया .. ती अचानक म्हणते, मला वाटतंय मी माझं घर सोडून तुझ्याबरोबर यायला निघाले ती चूक केलीये .. प्रियकर म्हणतो, पण मला नाही वाटत तुझा नवरा तुला आता परत त्या घरात घेईल ..
आता रेल्वे येते, प्रियकर सामान चढवण्यामागे लागतो .. ही विषण्ण बसलेली पण इतक्यात कथेचा नायक, हिचा पती साक्षात समोर उभा रहातो .. ती बघतच रहाते.. तो तिला म्हणतो, चल .. घरी चल, एका बाईला तिच्या पतीच्या घराशिवाय अन्य जागा नाहीये ..
आता ती निःशब्द होते .. आणि पुढचच वाक्य तो म्हणतो, मी आईला तुझ्या या प्रियकराबद्दल समज दिली आहे .. मलाही तर सगळं आधीच माहीत होतं .. तुझ्या मामांनी मला सगळं सांगितलं होतं
आणि त्याच्या या उद्गारांनी तिचा बांध फुटतो .. खरंच सगळं माहीत असूनही त्याची पुसटशीही जाणीव या माणसाने आपल्याला होऊ दिली नाही .. किती उदात्त, किती श्रेष्ठ .. खऱ्या अर्थानी नरोत्तम असा हा आपला स्वामी ..
आणि क्षणार्धात ती त्याचा हात धरून पुन्हा त्याच्या मागे परत आपल्या घराच्या रस्त्याने निघते ..
चित्रपट संपतो आणि जाता जाता आपल्या मनाची कवाडं उघडून जातो.
भारतात अलिकडे बायकांनी कसं वागावं, कसं बोलावं याविषयी सतत चर्चा झडत असताना, पुरूषांनी कसं असावं आणि स्त्रीची कशी साथ द्यावी हे खरंतर हा चित्रपट सांगून जातो असं मला वाटलं.
ज्या नवऱ्यासाठी बायका त्यांच घरदार, शहर, देश, बालपण, मायबाप, सखेसोबती, खरंतर आपला सारा भूतकाळच सोडून येतात त्या नवऱ्याने स्वतः माणूस म्हणून स्वतःला किती अर्थपूर्ण घडवलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी चित्रपटातील गिरीश कर्नाड यांनी रेखाटलेला नायक ..
हा चित्रपट स्त्रीने कसं असावं यासाठी पाहूच नये तर पुरूषाने कसं असावं हे समजून घेण्यासाठी पहावा असं मी जाता जाता नक्की सांगेन..!

 - मोहिनी घारपुरे - देशमुख

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

रूई का बोझ


हा एक अत्यंत सुंदर चित्रपट आज योगायोगाने आणि यूट्यूबकृपेने पहायला मिळाला आणि मन भावविभोर झाले. असं म्हणतात, म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, पण हे दुसरं बालपण तितक्याच कौतुकाने साजरं मात्र होत नाही. कारण म्हाताऱ्या माणसांचा अनेक घरांमध्ये रागराग केला जातो. त्यांच्या सवयी, त्यांचा स्वभाव, त्यांच्या वस्तू, रहाणीमान, त्यांच्यावर होणारा खर्च अगदी कोणतंही निमित्त या कटकटीसाठी पुरतं. अनेक कृतघ्न मुलं तर आपल्या आईवडीलांना अशा उतारवयात मारझोड करतात, अक्षरशः हाकलून देतात .. अशा घटना ऐकून आपल्यासारख्या संवेदनशील लोकांचा बांध फुटल्यावाचून रहात नाही.
तर, असंच काहीसं कथानक घेऊन रूई का बोझ हा चित्रपट समोर आला. पंकज कपूर, रिमा लागू आणि रघुवीर यादव या जातीवंत अभिनेत्यांनी या चित्रपटाचं अक्षरशः सोनं केलं आहे. 1997 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चंद्र किशोर जैसवाल यांच्या गवाह गैरहाजिर या कादंबरीवर आधारित आहे. सुभाष अग्रवाल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटाची कथा अगदी प्रेडीक्टेबल आहे पण तरीही ती ज्या सुंदर पद्धतीने अभिनीत करून मांडली गेली आहे त्यामुळे चित्रपटाचा दर्जाची उंची फार फार वाढते.
एका खेड्यातलं किसन सहानी (पंकज कपूर) या ज्येष्ठाचं कुटुंब. त्याची तीन मुलं आणि तीन सुना .. दरदिवसाआड काही ना काही कारणावरून घरात होणारे तिन्ही सुनांचे वाद पहाता एके दिवशी तो तिघाही मुलांना समोरासमोर बसवतो आणि वाटणी करून टाकतो. आपण कोणाबरोबर रहायचं हा निर्णय मुलांवर सोपवून देतो. मुलही एकमताने वडीलांनी लहान मुलाबरोबर राहावं कारण त्याला अजून वडीलांची गरज आहे असा निर्णय देतात. लहान मुलगा (रघुवीर यादव) आणि वडील दोघंही खूश होतात.. ही धाकटी सून (रीमा लागू) देखील खूशच असते.. सगळं कसं छान वाटतं.. पण प्रत्यक्षात सगळी घडी बिघडतेच..
काही चूक वडीलांची आणि काही चूक मुलगा, सून आणि नातवंडांची ..
सून काहीशी रागीट, स्वार्थी आणि लोभी तर मुलगा भोळा आणि थोडाफार सुनेच्या आहारी गेलेला..
नातवंड प्रेमळ पण काहीशी उद्धट आणि आगाऊ ..
आणि म्हातारा आडमुठा .. शिवाय चार पावसाळे जास्तच पाहिलेला असल्याने सगळ्यांचे बरेवाईट हेतू मनात ओळखून अधिकच डिवचलेला, आणि उतारवयाने शरीराने हळूहळू साथ सोडल्याने काहीसा अगतिक झालेला..
आता ही अशी परिस्थिती म्हणजे घरात सतत काय काय नाट्य घडत असणार हे तुमच्याही लक्षात आलंच असेल.. हेच नाट्य पंकज कपूर आणि रीमा यांनी एवढं जबरदस्त दाखवलं आहे की लहानसहान प्रसंगही आपल्याला चटका लावून जातात.
एकीकडे आदर दाखवत दुसरीकडे लोभी वृत्तीने वागणारी सून रीमाजींनी अप्रतिम वठवली आहे. दिवसभर घरात सासरे आणि सून व नातवंड .. मग लहानसहान कामं, जसं भाजी आणून देणं, हरवलेल्या बकरीला शोधून आणणं, घरातल्या वरच्या कामांची अपेक्षा सासऱ्याकडून .. सासराही चांगलाच खमका आणि काहीसा लहरी... सूनेनी भेंड्या सांगितल्या तर यांनी लक्षात न राहिल्याने वांगी आणणं, हरवलेली बकरी शोधायला गेला आणि भलतीच कोणाची बकरी पकडून आणली, दारावर पकोडेवाले आला तर लगेच गरमगरम पकोडे घेऊन खाणं असे अनेक प्रसंग मुख्य कथानकाला पूरक ठरतात..
पंकज कपूरनी तर हा अभिनय इतका अप्रतिम वठवला आहे की म्हाताऱ्या माणसांची व्यथा, त्यांना येणाऱ्या लहानसहान अडचणी आणि त्यांना जाणवणारा कुटुंबीयांचा स्वार्थ हे सारं प्रेक्षकांना जाणवल्यावाचून रहात नाही.
एकदा तर किसनजींना अंथरूणातच लघुशंका होते, बिचारे अपरात्री उठून ती चादर धुऊन वाळत टाकतात, तोच सुनेचं लक्ष जातं.. ती ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने मुलाला सांगते .. आणि त्याला वडीलांविषयी तिटकारा वाटून जातो. आणखी एका दृश्यात, किसनजींना घरात बनलेली मक्के दी रोटी जेवायला हवी असते म्हणून ते मागतात .. तर सून कसली जहांबाज .. चक्क त्यांना मक्के दी रोटी खायला नाही म्हणते, सासराही हट्टी .. सूनही हट्टी .. ती नातवंडाकरवी सासऱ्याला दहीभाताचं ताट पाठवून देते. सासऱ्याचा विरस होतो, तो ते ताट खोलीत तसंच ठेवतो आणि झोपून जातो .. तर त्या वासाने रात्री मांजर तिथे घुटमळायला लागते.. त्यामुळे वैतागलेला सासरा पुन्हा उठून ते ताट स्वयंपाकखेलीत नेऊन ठेवतो.. सकाळी सून उठते आणि तिला ते झाकलेलं अन्न दिसतं.. तिला राग येतो.. एकीकडे बडबडत, की आता जर हे न जेवल्याने मेले तर मलाच हा दोष लागणार, लोक मलाच नावं ठेवणार .. असं म्हणत कामाला लागते.. तिकडे सासरा नेहमीची वेळ होऊन गेली तरी झोपलेला .. नातू जातो, आजोबा उठा म्हणून हाका मारतो पण काहीच हालचाल होत नाही. नातू धावत जाऊन आईला आणि भावंडांना सांगतो की आजोबा देवाघरी गेले.. सूनेच्या डोळ्याच टचकन पाणी येते ती धावत जाते..नातवंड धावतात आणि आजोबांना हलवतात .. सेकंदभर काहीच हालचाल होत नाही, आपल्याला वाटतं, गेले वाटतं किसनजी .. पण, तितक्यात डोळे चोळत किसनजी उठतात आणि इकडे सूनेच्या मनातला त्यांच्याबद्दलचा राग पुन्हा मनातून उफाळून येतो.
एकेक सीन अत्यंत बोलका, अत्यंत स्पष्ट..
त्यांचे एक मित्र नेहेमी त्यांना येऊन सुनेशी मुलाशी जुळवून घे आणि गोडीत रहा असा सल्ला देतात, याचे ग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न करतात पण म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा .. अगदी तशीच या म्हाताऱ्याची कथा असते.
चित्रपटात नातवंडही ज्या पद्धतीने वागतात, आणि हा खट म्हाताराही ज्या पद्धतीने वागतो ती दृश्य फार बोलकी आहेत.
शेवटी, एकदा सून मुलाला लक्षात आणून देते, की सासऱ्यांच्या खोलीत फार दुर्गंधी येते कारण ते तिथेच कोपऱ्यात जमीनीवर बहुधा लघुशंकेला बसतात.. आपण त्यांना मागच्या अडगळीच्या खोलीत आता ठेऊया असं सुनेचं मुलाचं ठरतं.. पण म्हाताऱ्याला ते मान्य कसं होणार, तो नकारच देतो .. हे ऐकून मुलगा चिडतो आणि म्हाताऱ्या बापाशी भांडतो.. गाव गोळा होतं.. वडील मुलावर हात उचलतात आणि आता या मोठ्या झालेल्या मुलालाही तितकाच राग येतो, मुलगा रागाच्या भरात वडीलांना धक्का देतो .. म्हातारा कोलमडून खाली पडतो.. गावकरी शेपूट घालून पळतात.. सून नातवंड घरातच लपून रहातात, मुलगा रागात निघून जातो .. पडलेल्या म्हाताऱ्याला उचलायलाही कोणी येत नाही.. शेवटी थोड्यावेळाने हतबल म्हाताऱ्याला शुद्ध येते.. एकटाच उठतो आणि गुमान मुलगा म्हणत होता त्या अडगळीच्या खोलीत जातो ..
दुसऱ्याच दिवशी ठरवतो, आता येथे रहायचं नाही. बैलगाडीवाल्याला निरोप धाडतो आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या देवस्थळी जायला निघतो.. कायमचं.. आता मुलाला सुनेला आपली चूक लक्षात आलेली असते खरी पण वडीलांचा स्वभाव माहीत असतो.. म्हणून त्यांना ते थांबवत नाहीत .. दोन दिवसांनी जाऊन त्यांना घेऊन येऊ असं ठरवतात. सूनही कबूल होते, की आपण स्वार्थीपणे वागलो, आपण लोभी झालो होतो .. आता सासरे रहाणार नाहीत तर आपल्या घराची मूळंच (घर की नीव) हरवली असं तिला वाटायला लागतं..
इकडे सासरा निघतो, मजल दरमजल करत बरच अंतर बैलगाडीवाला जातो .. तेव्हा सासऱा एकटा मागे बसलेला, विचारचक्र सुरू होतं .. मित्रांची बोलणी, समजावणं आठवायला लागलेलं असतं .. काही झालं तरी आपण एकटे आता त्या अज्ञात ठिकाणी काय करायचं , त्यापेक्षा कसे का असेना आपले नातू, सुना आपल्याबरोबर तर होते असं वाटायला लागतं.. एकदा हळूच तो गाडीवाल्याला चल परत जाऊ असं म्हणतोही.. पण ते गाडीवाल्याला ऐकू जात नाही.. आता काही अतंरावरच देवस्थान आलेलं असतं पण मधे नदी लागते.. गाडीवाला म्हणतो, थांबा मी नदीतून रस्ता नेमका कुठून आहे ते पाहून येतो .. रस्ता सापडतो आणि इकडे, सासऱ्यालाही मनातला आवाज स्पष्ट ऐकू येतो.. परत फिरावं हाच रस्ता त्याला योग्य वाटतो आणि तत्क्षणी गाडीवाल्याला तो हुकूम सोडतो .. म्हणतो, अरे .. ही नदी ओलांडून वगैरे कशाला जायचं त्या देवस्थळी.. त्यापेक्षा चल, पुन्हा घरी जाऊया .. आपल्या माणसांजवळ राहीन मी .. आणि गाडी परत फिरते... घराच्या दिशेने..
चित्रपट संपतो .. आणि आपल्याला हायसं वाटतं..
यानिमित्तानी, घराघरातल्या ज्येष्ठांचे प्रश्न इतके थेट मांडले आहेत. शिवाय एक इतकी सुंदर कलाकृती आपण पहातो की मनोरंजनाबरोबरच बरंच काही आपल्याला गवसतं.
म्हातारपण सगळ्यांनाच येतं हे प्रत्येकानेच लक्षात ठेवायला हवं.. त्यामुळे आपल्या घरातल्या ज्येष्ठांना मान आणि प्रेम द्या, त्यांच्या लहानसहान इच्छा वेळीच पूर्ण करा, त्यातच आपला आनंद आहे हे इथे शेवटाकडे जाताना आपल्याला उमगल्या वाचून रहात नाही.
शेवटी, म्हातारा बाप म्हणजे कापसाच्या ओझ्याप्रमाणेच .. सुरूवातीला जड वाटत नाही पण नंतर म्हाताऱ्या बापाचा स्वभाव ओल्या कापसाप्रमाणेच आडमुठा होत जातो आणि मग त्याला सांभाळणं मुलासाठी दिवसेंदिवस जड होत जातं.. म्हणूनच कोणीही मुलगा म्हाताऱ्या माणसाला सांभाळायला पुढे येत नाही... हरकोई बस फेक देना चाहता है .. अशी वास्तव स्थिती चित्रपटाच्या नावातूनच मांडली आहे ती आजघडीला खरी ठरते आहे हे दुर्दैवच ..


- मोहिनी घारपुरे-देशमुख


#मला_भावलेला_सिनेमा









Translate

Featured Post

अमलताश