मराठी रंगभूमीनं आपल्याला जे काही दिलंय त्याचं ऋण शब्दात फेडणं निव्वळ अशक्य.. एकेक अफलातून विषय आणि त्यावर आधारित नाटकं. कधी जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी, कधी समाजातील चुकीच्या रूढीपरंपरा, विषमता, भेदाभेद यावर घणाघाती टीका करणारी, कधी जीवनमूल्यांना प्रकाशझोतात आणणारी तर कधी हलकीफुलकी विनोदी .. औटघटकेची करमणूक देऊन आपल्याला आपल्या दैनंदिन समस्यांपासून चार घटका मुक्त करणारी ..
मराठी माणसानं मराठी नाटकांवर इतकं भरभरून प्रेम केलं आहे याचं कारणही हेच आहे की या रंगभूमीला मराठी माणसांचं जीवन, त्याची मूल्य, त्याचं जगणं, त्याचे दोष आणि गुणही, त्याची सुखदुःख आणि स्वप्न हे सारं सारं कळलं आहे. ही रंगभूमी आपल्या या लेकरांना म्हणूनच आपलं मन जाणणारी माय न वाटली तरच नवलं..
या रंगभूमीवर वावरणारे एक से एक कलाकार, नटश्रेष्ठ आणि मराठी माणसाचं मन.. त्यांचं जगणं ज्यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या कुशलतेने कागदांवर उतरवलं ते लेखक .. त्यांच्या लेखणीला तर त्रिवार सलाम.. मग या लेखणीने साकारलेली नाटकं प्रत्यक्षात जेव्हा ताकदवान अभिनेते, अभिनेत्री मिळून पडद्यावर साकारतात तेव्हा त्या नाटकाचं सोनं झाल्याशिवाय रहात नाही..आणि अर्थातच ते सोनं व्हावं यासाठी अहोरात्र झटणारे समस्त लहानमोठे पडद्यामागचे कलाकार.. त्यांच्या कष्टाचे आणि त्यांच्या प्रतिभेचे ऋणही फेडणे अशक्य..
असंच एक या रंगभूमीवर तुफान गाजलेलं नाटक .... 'बॅरिस्टर'
जयवंत दळवी लिखीत हे नाटक त्यांच्याच 'अंधाराच्या पारंब्या' या कादंबरीवर आधारित आहे. हे नाटक ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पूर्वी साकारयचे. त्यानंतर हे नाटक माझे अत्यंत आवडते असे ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी साकारले.
सचिन खेडेकर या अत्यंत श्रेष्ठ कलाकाराविषयी लिहीताना लेखणीचे शब्द अपुरे पडावेत.. पण तरीही मी तो प्रयत्न करणार आहे. एरवीही एखाद्या साध्याशा चार ओळींच्या कवितेला सचिनजींचा परीसस्पर्श होतो आणि ती कविता उजळून निघते मग या नाटकातील बॅरिस्टरची मध्यवर्ती भूमिका तर किती उजळून निघाली असेल याचा वाचकांना सहज अंदाज बांधता यावा.. हे संपूर्ण नाटक आपल्या अभिनयाच्या ताकदीवर एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं श्रेय या नाटकातील अन्य कलाकारांनाही तितकंच जातं खरं, पण तरीही मध्यवर्ती पात्राच्या एकूण एक छटा ज्या ताकदीने सचिनजींनी साकारल्या आहेत त्याला मात्र तोड नाही.
ही कथा साधारण 1920 सालातली असावी.. तो काळ जेव्हा हिंदू धर्मात विधवा विवाहाला मान्यता नव्हती. विधवेचा जन्मतःच मिळालेला सुंदर दिसण्याचा अधिकारही सक्तीने काढून घेण्यात येई, तिचे केशवपन करणे, तिच्या साजशृंगारावर बंधनं घालणे, आलवणात लपवलेला तिचा देह की ज्याचे कोणतेही लाड तिने नवऱ्याच्या मृत्यूपश्चात करायचे नाही, चवीढवी मारायच्या.. स्वखुशीने तसंच देहाच्या नैसर्गिक वासनांनाही मारून टाकायचं.. कधी मनाविरूद्ध सक्तीने तर कधी आपलंच नशीब म्हणत गप्प बसायचं. एकीकडे स्त्रियांची ही कथा तर पुरूषांनाही धर्म पालनाची सक्ती. मोठाल्या पिळदार मिशा ठेवायच्या, डोक्यावर शेंडी, गळ्यात जानवं, धोतरपगडी हाच एकमेव पोषाख. असं सगळं समाजातलं चित्र.
अशा सामाजिक परिस्थितीत त्या काळी विलायतेहून शिकून आलेले बॅरिस्टर .. ( राऊ .. अर्थात सचिन खेडेकर ), त्यांचा एक छान चौसोपी वाडा, वाड्याबाहेर बॅरिस्टरांनी मुद्दाम आवर्जून फुलवलेली बाग, बॅरिस्टरांनी जग पाहिलंय म्हणून ते सुधारणावादी झालेले.. जीवनाकडे सुंदरतेने बघण्याची त्यांची दृष्टी विकसीत झालेली, इथल्या रूढी परंपरा आणि स्त्रियांना मिळणारी काहीशी अमानवीय वागणूक या सगळ्या सगळ्याप्रती त्यांच्या मनात काहीसा संताप, तिडीक .. याला कारणं तसं म्हटली तर अनेक.. पण महत्त्वाचं कारण म्हणजे, अगदी लहान वयातच त्यांची विधवा झालेली मावशी ( इला भाटे ) .. या मावशीवर जेव्हा आभाळ कोसळतं तेव्हा राऊ लहान असतो. पण तरीही नवऱ्याच्या मृत्यूपश्चात होणारा आपल्या मावशीचा छळ त्याला तेव्हाही पहावत नाहीच म्हणून तो तिच्या सासऱ्याशी अगदी मारामारी करून मावशीला आपल्या घरी घेऊन येतो. त्याची खूप इच्छा असते की मावशीनं असं आलवणात (लाल रंगाचं अंगवस्र) वावरू नये, तिनं केशवपन करू नये.. त्यापेक्षा तिनं तिचं जीवन पुढे फुलवावं, तो तिचा.. नव्हे तमाम विधवा महिलांचा हक्कच आहे, कारण नवरा मेला यात त्यांचा काय दोष .. पण छे.. मावशीला हे सगळं पटलं तरीही धर्माविरूद्ध उभं राहून पुढे जाण्याची तिची काय बिशाद .. म्हणून ती बिचारी विधवेचा धर्म स्वीकारूनच राऊकडे रहात असते. राऊचे वडील .. आप्पा .. तेही कोर्टातील मातब्बर असामी.. पण अचानक एके दिवशी त्यांना कसलंतरी वेड लागतं, तेच आणि तसंच वेड राऊच्या मोठ्या भावाला म्हणजे नानासाहेबांनाही कालपरत्वे लागतं. सतत वाड्यातल्या एका खुर्चीवर ही दोन वेडी माणसं समोरासमोर बसलेली पाहून राऊच्या उमलत्या मनाला भय न वाटलं तरच नवल.. तीच भीती वारंवार त्यांना छळत असते. एकीकडे प्रवाहाविरूद्ध वागण्याचं, जमल्यास प्रवाहाला आपल्या दिशेने नेण्यासाठी मनाची धडपड आणि त्यात ही अगतिक भीती की न जाणो .. भविष्यात आपल्यालाही आपल्या वडिलांसारखं, भावासारखं वेड लागेल की काय .. याचा कळत नकळत फार खोल परिणाम बॅरिस्टरांवर होत असतोच.. पण हे सगळं मनातलं वादळ खरं तेव्हा बाहेर पडायला लागतं, जेव्हा त्यांचे भाडेकरू असलेले भाऊराव ( अनिकेत विश्वासराव ) आपल्या नव्या नवरीला, मनोरमा ऊर्फ राधाक्काला ( सुजाता जोशी ) घेऊन वाड्यावरच्या आपल्या खोलीत बिऱ्हाड थाटतात.
जातीवंत सुंदर असलेली, विनम्रतेने, मर्यादेने वागणारी राधाक्का बॅरिस्टरांच्या एकदम डोळ्यात भरते. याचं कारणही कुठेतरी त्यांच्या भूतकाळात दडलेलं असतं. विलायतेला जिम नॉर्टन नावाच्या त्यांच्या मित्राच्या बहीणीबरोबर, ग्लोरियाबरोबर एक अलवार नातं बॅरिस्टरांचं जुळतंही पण त्यांचं खरं प्रेम मात्र इथे, मायदेशी असलेल्या देवयानी गोरेवर असतं.. तिच्याशी त्यांना लग्न करायचं असतं म्हणून ते ग्लोरियाचं प्रेम स्वीकारत नाहीत आणि पुढे भविष्यात मात्र देवयानीशीही त्यांचं लग्न होऊ शकत नाही कारण बॅरिस्टरांच्या घराण्यात असलेलं वेड ..
अशा एकट्याने वाढलेल्या या बॅरिस्टरांना काय तो आधार फक्त मावशीचा. घरात दिवसभर नानासाहेबांचं ते एकासुरात सतत, दत्त दत्त .. दत्ताची गाय.. गायीचं दूध .. दूधाची साय ... ही टकळी दर थोड्या थोड्या वेळाने सुरू.. अशा घरात बॅरिस्टरला मुलगी तरी कोण देणार..?
खरंतर विलायतेहून आल्याने बॅरिस्टरांचे शौकही फारच उच्च दर्जाचे.. उच्च दर्जाची अत्तरं, सुकामेवा, बागेतली सुगंधी फुलं .. या साऱ्या साऱ्याबरोबरच त्यांचा रूबाब, एटीकेट्स मॅनिरिझम यांनीही त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व नि विचार छान बहरलेले.. पण तरीही नशीब मात्र काहीस जणू त्यांच्यावर रूसलेलं..
म्हणूनच आपल्यासमोर दिसणारी राधाक्का त्यांना आकृष्ट करत असते पण तरीही त्यांनी स्वतःची मर्यादा कधीही ओलांडलेली नसते. भाऊरावांची ते निरलसपणे.. एखाद्या मित्राने करावी तशी थट्टा करत असतात, राधाक्कांना रोज आनंदाने बागेतली सुवासिक फुलं देत असतात पण त्या सगळ्यात कधीही वासनेचा स्पर्शही नसतो.
अशातच एकदा बॅरिस्टरांना विलायतेहून पत्र येतं आणि त्यात ग्लोरियाला वेड लागल्याचं कळवलेलं असतं. या पत्राने बॅरिस्टर सैरभैर होतात.. त्यांचा मानसिक तोलच ढळतो, अगदी बिथरल्यासारखी त्यांची अवस्था होते .. मग भाऊरावांशी मोठ्यामोठ्याने आक्रंदत ते आपलं मन मोकळं करत जातात आणि अखेरीस धाय मोकलून रडतात. जीवनाचं हे विद्रुप रूप बॅरिस्टरांसारख्या हळव्या मनाच्या माणसाला पचवणं निव्वळ अशक्य.. पण त्यापुढे ते असहाय्य होत असतात वारंवार आणि त्यानंच त्यांचं मन त्यांना खात असतं. अखेर त्यांच्या मनातलं मळभ थोड्या वेळानं दूर होतं.. नि दिवस पुढे जात रहातात.
सारं कसं छान सुरू असतं.. राधाक्का भाऊरावांच्या संसारात छोटा गोड बाळ जन्माला येतो तशी वाड्यावर बॅरिस्टरांच्या आणि मावशीबाईंच्याही जीवनात एक नवी दरवळ पसरते. छोट्या बाळाचं अगदी मायेने करण्यासाठी जणू बॅरिस्टर, मावशीबाई आणि राधाक्काची चुरसच चाललेली असते.. पण वरवर दिसणाऱ्या या निखळ प्रेमामागे प्रत्येकच पात्राची राहिलेली अपूरी इच्छा त्या बाळाच्या माध्यमातून पुरी होत असल्याचं प्रसंगानुरूप कळतं तेव्हा आपल्या मनात कालवाकालव होते. एकदा राधाक्काची नजर चुकवून मावशीबाई बाळाला आपल्या पदराखाली धरतात नि ममतेचा पाझर फुटतो का हे देखील तपासून पहातात. नंतर खुसुखुसु हसत जेव्हा ते राधाक्काला ही गोष्ट सांगतात तेव्हा राधाक्काला क्षणभर कसनुसंच होतं.. पण एक स्त्री म्हणून ती मावशीबाईंना शब्दानेही दुखावत नाही उलट मनावर दगड ठेऊन समजूनच घेते.
अशातच एके दिवशी वाड्यातून नानासाहेब कुठेतरी निघून जातात नि घराच्या सुखाला सुरूंग लागतो. बॅरिस्टर नि मावशी हादरतात. आपल्या मोठ्या भावासाठी बॅरिस्टरचं मन तळमळतं. त्यांचा शोध घेणं सुरू होतं. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस असतात. बॅरिस्टरांचे मित्र भाऊसाहेब देखील नानासाहेबांच्या शोधासाठी तब्बल आठवडाभर पावसापाण्यात कुठे कुठे फिरत रहातात आणि अखेरीस तेच आजारी पडतात. अक्षरशः तडकाफडकी पुढल्या अवघ्या दोनच दिवसात भाऊसाहेबांचा मृत्यू होतो. साऱ्या घरादारावर अवकळा पसरते. आता राधाक्का आणि बाळाचं कसं होणार या काळजीने मावशीबाई नि बॅरिस्टर फार फार अस्वस्थ होतात.. पण तरीही ते तिची साथ देणार असतात.. आणि अशातच भाऊरावांचे वडील तात्याराव पोरगा आजारी आहे कळताच गिधाडासारखे राधाक्कावर नजर ठेऊन वाड्यावर आलेले असतात.
तात्याराव तसा काही फार बरा माणूस मुळातच नसतो. बाई बाटली यांना सोकावलेला तात्याराव .. त्याच्या याच अवगुणांमुळे भाऊराव त्याच्यापासून दूर इथे वाड्यावर स्वतंत्र बिऱ्हाड थाटून रहात असतात. राधाक्कालाही आईवडील नसतात त्यामुळे आज जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तिच्या पाठीशी मावशीबाई आणि बॅरिस्टरांशिवाय कोणीच नसतं. तात्याराव फारच बनेल आणि रंगेल माणूस.. बॅरिस्टरांची आणि मावशीबाईशी आल्या दिवशीच भांडण काढतो नि आपल्या मार्गातील अडथळा मोठ्या शिताफीनी बाजूला करतो.
दुसऱ्या दिवशी वाड्यातील शांतू न्हाव्याला गुपचुप खोलीवर बोलावतो नि राधाक्काचं केशवपन करून टाकतो. बॅरिस्टरांना हे मुळीच खपत नाही.. राधाक्काचा आक्रोश ऐकून बॅरिस्टर व्याकूळ होतात .. कारण असंही या सगळ्या हिंसक, अमानुष प्रथांवर त्यांचा राग असतोच पण तरीही त्या क्षणी ते असहाय्य झालेले असतात. आता पुढल्या दोन दिवसातच तात्याराव राधाक्का आणि बाळाला घेऊन जाणार आणि पुढे राधाक्काचं कसं मातेरं करणार याची चाहूल मावशीबाई, बॅरिस्टर आणि खुद्द राधाक्काला लागलेली असतेच...
दुसऱ्याच दिवशी उत्तररात्रीला राधाक्का स्नानासाठी विहीरीवर जाते तेव्हा अर्धवट झोपेतून उठून तिचा सासरा तिच्यापाठी जाऊन उभा रहातो. "तू आंघोळ कर .. पण मी तुला बघनार .. मी तुझ्यावर नजर ठेवनार .. तू कुठं पळून गेलीस म्हंजे .." असलं काहीतरी अर्धवट झोपेत मद्यधुंद अवस्थेत तो बरळतच राधाक्कावर हात टाकतो आणि राधाक्का त्याच्या डोक्यात कळशीच घालते नि त्याला ठार करते. बॅरिस्टर आणि राधाक्कानी मिळून हा कट रचून आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढलेला असतो. राधाक्का आणि बाळाला आता वाड्यावरून कोणीही हलवू शकणार नसतं, तसंच लोकांची तोंडही आपसूकच बंद रहाणार हे आता उघड असतं.
पुढे तीन चार महिने होतात.. एकाकी असहाय राधाक्काला आता केवळ बॅरिस्टरांचा आणि मावशीबाईंचाच आधार असतो.. तसंच मावशीबाईलाही आपल्या या वाड्याची आणि बॅरिस्टरची काळजी वाटत असतेच .. तितकंच स्वतःचं असं अर्धवट राहिलेलं आयुष्य .. त्यालाही राधाक्का सून म्हणून आली तर अर्थ येईल असं वाटून ती एके दिवशी राधाक्काला बॅरिस्टरशी लग्न करायचा सल्ला देते. बॅरिस्टरनी विचारलंच तर नाही म्हणू नकोस पोरी .. असं ती सांगायला आणि त्याच दिवशी सकाळी बॅरिस्टरनं राधाक्काला मागणी घालायला अगदी बोलाफुलाची गाठ पडते..
बॅरिस्टरांना असं भुंड डोकं केलेली विधवा, असं विद्रूप झालेली स्त्री अजिबात आवडत नाही हे जाणून राधाक्का केस वाढवायला लागलेली असते, हातात बांगड्या घालायला लागलेली असतेच.. आणि अशातच आता मावशीबाईंचाही आपल्याला विरोध नाही हे लक्षात येऊन ती बॅरिस्टरांना लग्नासाठी रूकार भरायला विषय काढते..पण हाय रे .. नियतीचा खेळ काही निराळाच असतो असं म्हणतात ना..
आजही तेच होतं.. राधाक्काशी लग्न करायचं, बाळाचं बाप व्हायचं, पुढे राधाक्काला घेऊन परदेशात जायचं, ग्लोरियाच्या समाधीवर फुलं अर्पण करायची हे सारं सारं स्वप्न जेव्हा सत्यात उतरवण्याची वेळ येते तेव्हा हळव्या मनाच्या बॅरिस्टरांना ते झेपतच नाही.. त्यांना आजवर जी भीती असते तीच खरी ठरते... नानासाहेबांची खुर्ची जणू बॅरिस्टरांना खुणावत असतेच आणि नेमक्या याच क्षणांनी दगा देत बॅरिस्टरलाही अखेर वेड लागतं..
प्रभु मजवरी कोपला ... या आर्त सुरांनी नाटकाची सांगता होते आणि आपल्या मनात मात्र एक व्याकूळ सूर दाटून रहातो..
माणसाची स्वप्न, माणसाचं मन नि नियतीचे क्रूर गुंतागुंतीचे खेळ या साऱ्यासाऱ्यापाशी आपलं भावविश्व ठेचकाळत रहातं.
- मोहिनी घारपुरे - देशमुख