शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

सूर राहू दे


शं.ना.नवरे लिखीत आणि मंगेश कदम दिग्दर्शित 'सूर राहू दे' हे अप्रतिम नाटक मी यूट्यूबवर पहिल्यांदा पाहिलं आणि मग पुढे कित्येकदा या नाटकाची पारायणं केली.

मराठी साहित्य आणि त्यातही मराठी नाटकं आपल्याला जीवनातील किती कंगोरे दाखवून शहाणं करतं नै असा सहजभाव यानंतर माझ्या मनात उमटला.
तसं म्हणाल तर या नाटकाची कथा आजच्या काळात तुम्हाला घिसीपिटी वाटू शकेल कारण याच स्टोरी लाईनवर बरीच कथानकं पुढे आलेली आहेत. पण तरीही सूर राहू दे हे नाटक फार उंचीवर जाऊन पोचतं याचं कारण म्हणजे यातील आशयघन संवाद, सुरेख भाषा आणि यातले नटश्रेष्ठ संजय मोने, शुभांगी गोखले, सुनील बर्वे आणि अन्य सहकलाकार यांचा सुरेख अभिनय!
डॉक्टर ( संजय मोने ) आणि त्यांची पत्नी अरूंधती ( शुभांगी गोखले) हे लग्नानंतर दोन वर्ष मुंबईत संसार करतात पण डॉक्टरांना आपल्या मूळ गावी राहून तिथल्या गोरगरीब लोकांसाठी काम करण्याचा ध्यास लागतो आणि ते तिथे शिफ्ट होतात. पाच वर्ष गावात राहून ते मनोभावे काम आणि नेटका संसार करत असतात पण त्यांची पत्नी अरूंधती मात्र गावाकडे रमत नसते. तिला मुंबईतील आपल्या सुखलोलुप आणि लक्झरीअस जीवनाची सतत ओढ लागून ती तिथे परत जाण्यासाठी व्याकूळ झालेली असते. पाच वर्षांत संसार वेलीवर उमललेल्या फुलाला, आपल्या मुलाला त्यांनी शिक्षणानिमित्त बोर्डींग स्कूलला ठेवलेलं असतं. त्यांच्या संसारात खरंतर सगळंच छान चाललेलं असतं. घरात बेला नावाची एक गावातलीच मुकी मुलगी मदतनीस म्हणून कामाला असते. एक कंपांऊंडर ( निखील रत्नपारखी) असतो जो अगदी डॉक्टरांचा सखा असल्याप्रमाणेच रहात असतो. अरूंधतीचा भाचा ( अनिकेत विश्वासराव) त्यांच्याकडे डॉक्टरांबरोबर कामात मदत करून शिकण्यासाठी रहात असतो...
शिवाय गावाकडची माती, तिथली माणसं आणि भरभरून मिळणारं निसर्ग सान्निध्य! अहो जगायला याहून वेगळं काय हवं असतं ?
पण ...
तरीही अरूंधतीला तिथे रहाण्यात फार काही स्वारस्य वाटत नसतं. तिचं मन मुंबईकडे ओढ घेत असतं. अशातच एकाएकी तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर ( सुनील बर्वे) जो आता एका ट्रॅक्टर कंपनीचा डीलर झालेला असतो तो एका मोठ्या कार्यक्रमानिमित्त गावी येतो. त्याला डॉ. आपल्या घरी आदराने बोलावतात. खरंतर अरूंधतीनेच त्याला काही दिवसांपूर्वी गुपचूप पत्र पाठवून तिला इथून घेऊन जाण्याची विनंती केलेली असते.
आणि मग ... पुढे जे काय होतं ते तसं म्हणाल तर उघड सत्य! पण तेच सगळं पहाण्यासारखं आहे. कलाकारांचे अभिनय आणि पदोपदी आपल्याला माणूस कसा कसा चुकतो आणि त्याने जगताना स्वतःचा तोल किती राखला पाहिजे हे सारं सारं एकेका संवादातून आपल्या मनावर कोरलं जातं!
नाटकाचा शेवट पहाताना आपलं मन सुन्न होतं.
इथे स्त्री पुरुष असा भेद न करता माणूस म्हणून आपल्याला विचार करायला हे नाटक अंतिम टप्प्यात भाग पाडतं... आणि तेच या नाटकाचं यश आहे असं मला वाटतं.
मराठी नाटकांसाठी मराठी प्रेक्षक जीव टाकतो ते का याचं कारण या अशा सुंदर कलाकृती आहेत हेच खरं!
नाटक यूट्यूबवर आहे, नक्की पहा.

- मोहिनी घारपुरे देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

Should Art meet us Halfway?