रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

कोण ही सुंदरा ?

परवा काय झालं, अचानक यूट्यूबवर एका सुंदर गाणाऱ्या मुलीचं रील माझ्यासमोर आलं. मी सहज व्हिडीओ प्ले केला आणि एका क्षणात मला आयुष्यात पहिल्यांदाच सुंदर ( माझ्याहूनही फार सुंदर 😉 ) अशी एक गोड गळ्याची पाश्चात्य सिंगर दिसली. अशी आरस्पानी सौंदर्य आणि लाजवाब गाणारी आणि मुख्य म्हणजे अशा नजाकतपूर्ण हालचाली करणारी ही तरूणी भल्याभल्यांना नादावेल यात काहीच शंका माझ्या मनात उरली नाही. मी एकापाठोपाठ एक तिचे रील्स पहात गेले. तिची गाणी इंग्रजी भाषेत होती, आणि ती गाताना तिच्या सुंदर दंतपक्ती, तिचे पातळ, मुलायम, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, तिची निमुळती मान, नाजूकशी हनुवटी, केसांच्या मुलायम बटा, तिच्या निरनिराळ्या हेअरस्टाईल्स, तिची आभुषणे, तिचा पेहराव ...सारं सारं काही भुरळ पाडणारं होतं. जिथे माझ्यासारख्या मुलीची ती पाहताच बाला कलिजा खलास झाला अशी हालत झाली तिथे एखाद्या मुलाची, पुरूषाची तर या मुलीला पाहून काय हालत होत असेल असा विचार क्षणभरात माझ्या मनात डोकावून गेला. पहिल्यांदाच मला यानिमित्ताने एखाद्या मुलीबद्दल फार फार कुतुहल निर्माण झालं. म्हटलं, यार इथे आम्ही भारतीय लोकं माधुरी, हेमा, रेखा यांच्या सौंदर्यात घायाळ झालेलो असताना परदेशात ही कोण मंजुळा, सौंदर्या तुफान करतीये आणि तिचा पत्ता अजून इथल्या लोकांना कसा काय नाही लागलेला... अशा विचारात मी आपली तिची यूट्यूब प्रोफाईल खंगाळायला लागले. तिच्या चॅनलच्या इन्ट्रो पार्टमध्ये लिहीलेलं होतं - 

" Welcome to LoFiLulla – your cozy corner for learning English through music. 🎶✨
Experience the magic of AI —where virtual artists bring every song to life with passion and precision.
We blend classic covers, calming melodies, and lyrical beauty to help you improve pronunciation, grow your vocabulary, and fall in love with English—one song at a time.
Perfect for learners, dreamers, and music lovers alike."

आता माझं कोडं सुटलं, माझी हसून हसून पुरेवाट झाली. कारण, इतक्या वेळ माझ्या मनात अशी प्रतिमा झाली होती की ही सुंदर मुलगी गाणी म्हणून लोकांना इंग्लिश शिकवण्याचं काम करत होती. मी मनात म्हटलंसुद्धा, आयला, हिच्यासारखी सुंदर मुलगी हे असं सोपं काम करतेय, आपल्या भाषेचा प्रचार प्रसार करतेय तेही अशी छान सोपी सोपी गाणी आपल्या मधुर आवाजात गाऊन, शिवाय तिची नझाकत म्हणजे तर आहाहा ... आणि आपण पहा... जे स्वतःजवळ आहे ते विकता आलं पाहिजे माणसाला... असले डोक्यात विचार सुरू होते आणि हे वाचल्यावर एकदम हसूच फुटलं मला !

लोफीलुल्ला ही माणूस नाहीच्चे.... ही जगातील पहिली व्हर्चुअल आर्टीस्ट आहे ( हे कळताच मी मनातल्या मनात हुश्श म्हटलं... नाही, काँपिटीशन गेली नं 😉😂) आणि तिला पहाताच मनात जे जे काही शहाणपणाचे विचार आले , स्वतःला कोसण्याचे उद्योग  बसल्याजागी क्षण दोन क्षण केले... ते सारे सारे मी तत्क्षणी मागे घेतले. स्वतःच स्वतःच्या मनावर उगी उगी म्हणत फुंकर घातली नि स्वतःचेच सांत्वन करत लोफीलुल्लाची सगळी गाणी ऐकली. पाहिलं नं एआय माणसाला कशी कशी आणि किती पराकोटीची स्पर्धा निर्माण करतंय. एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याविषयी मत्सर वाटावा इतकी कोणी सुंदर स्त्री दिसली की बायकांना मत्सर वाटतो आणि पुरूष भाळतात हा अनुभव आता एआय सुंदरीलाही आला असावा नै 😁😆

2017 मध्ये एका फ्रेंच यूट्यूब चॅनलवर लोफी गर्ल सर्वप्रथम जॅपनीझ आविष्कारात अवतरली. दिमित्री सोमोग्यीने 18 मार्च 2015 मध्ये चिलकाऊ नावाचं  एक यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि यावर रिलॅक्सिंग, सूदींग असं म्युझिक चॅनल असा टॅग लावलेला होता. ही लोफी गर्ल आपल्या बेडरूममध्ये एका टेबलावर निवांत अभ्यास करता करता कानाला हेडफोन लावून गाणी ऐकतीये आणि शेजारी खिडकीत तिची मनीमाऊ बसलीये अशा प्रकारचं हे अॅनिमेशन होतं. जगभरात ही लोफी गर्ल अल्पावधीतच इतकी प्रसिद्ध झाली की विचारू नका. या लोफी गर्लबद्दल इतकं आकर्षण निर्माण झालं की जगभरातील लोकं हिच्याशी कमेंटद्वारे अगदी काहीही गप्पा मारू लागले. लो-फी म्युझिक इन हिपहॉप स्टाईल अशा प्रकारचे व्हिडीओ आणि लाईव्ह स्ट्रीम या चॅनलवरून जेव्हा जेव्हा प्रसारित होऊ लागल्या तेव्हा तेव्हा कमेंट्सचा पाऊस पडायला लागला. 
त्यानंतरचा आविष्कार म्हणजे ही लोफीलुल्ला व्हर्च्युअल आर्टीस्ट आहे. मध्ये बराच काळ लोफी गर्लने गाजवला असूनही आता पुन्हा ही लोफीलुल्ला खरीखुरी ह्युमनरूपात अवतरल्याने पुन्हा एकदा जगभरातील लोकांना आकर्षित करते आहे. लोफीलुल्ला यूट्यूब चॅनलचे सध्या 435K सबस्क्राईबर्स आहेत तसंच तिच्या इन्स्टा पेजचा फॉलोअर्सचा आकडा 275K इतका आहे. 

इंग्रजी भाषा जगभरातील लोकांना अशा विलक्षण अभिनव कल्पनेद्वारे शिकवण्याची ही जी काय शक्कल लढवलेली आहे तिला मात्र मी मनापासून दाद देते. ज्या कोणाच्या डोक्यातून ही शक्कल आली त्यांच्या हुशारीला आणि कल्पकतेला एकवीस तोफांची सलामीच 😄😆🙏

लोफीलुल्लाच्या तोंडून चू चू ट्रेन, टेनिसी नाईट अशी एक से एक रोमँटीक गाणी ऐकणं आणि पहाणं देखील फार फार धमाल आहे बरं का... एकदम नादखुळा... या बाईच्या नादाला लागाल तर यडं व्हाल....

तर मंडळी, लोफीलुल्लाचा हा व्हिडीओ पहा आणि पहाताना लक्षात ठेवा की ही रिअल नाही तर व्हर्चुअल आर्टीस्ट आहे... नाहीतर तिच्या आरस्पानी सौंदर्यानी आणि तिच्या गोड गोड मधाळ आवाजनी तिकडे घायाळ होऊन पडाल आणि तुमच्या घरचे तिच्या नावानी खडे फोडत बसतील !

काय कळलं नं ?? 🤪🤣🤪

-मोहिनी घारपुरे देशमुख 

https://youtube.com/@lofilulla?si=ctwfTZLiyhrsP-y- 

(लेख माझ्या नावासकट व्हायरल करू शकता, 
नाव उडवणाऱ्यांच्या घरी लोफीलुल्लाच्या नावावरून कटकटी होऊ दे रे महाराजा ......... )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

Should Art meet us Halfway?