बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

स्पंदन - माझा पहिला कथासंग्रह आला आहे !

नमस्कार मित्रमैत्रिणींनो 

आणि अपरिचित समस्त वाचकहो, 

आपल्याला कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की माझा पहिला वहिला कथासंग्रह ' स्पंदन ' हा पुण्यातील नामांकित प्रकाशन संस्था 'लोकव्रत प्रकाशन'तर्फे प्रकाशित झाला आहे. 

2010 सालापासून अगदी गांभीर्याने सुरू असलेल्या माझ्या लेखन प्रवासास लागलेले हे पहिले सुंदर मधुर फळ आहे असे मला वाटते. माझ्या ब्लॉगवर आपण माझे विविध विषयांवरील लेखन वाचत आलेला आहातच आणि वेळोवेळी त्यास सुंदर प्रतिक्रिया देखील अनेकांनी आजवर दिलेल्या आहेत, त्यामुळेच आपण माझे लेखन आणि ब्लॉगर म्हणून माझी असलेली ओळख केव्हाच स्वीकारली होतीत, त्याचीच पुढची पायरी म्हणजे आता प्रत्यक्ष पुस्तक लिहून ते तुमच्या सर्वांच्या हाती देताना आणि यानिमित्ताने लेखिका म्हणून पहिली इयत्ता उत्तीर्ण झाल्याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे. 

माझ्या या पहिल्या पुस्तकाच्या यशात आमच्या नुक्कड या कथेशी संबंधित असलेल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून मा.लेखक श्री. विक्रम भागवत आणि समस्त नुक्कड परिवाराचा अतिशय मोठा वाटा आहे. तेथील जाणकार मंडळींनी जर माझ्या कथांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले नसते तर कदाचित मी कधीच कथा लिहून त्यात पुन्हा प्रगती करण्याचे धाडस करू शकले नसते, त्यामुळे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मनोमनी कायमच मानत राहीन यात शंका नाही.

लोकव्रत प्रकाशनाचे मा.श्री. शिरीषजी कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अॅड. वर्षाताई माडगुळकर तसेच लोकव्रतची संपूर्ण टीम म्हणजे माणिक घारपुरे, भैरवी देशपांडे, श्रेया सरनाईक, गायत्री मुळ्ये आदींनी माझ्या पुस्तकावर जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. माझ्या पहिल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ माझ्या मनातील स्वप्नवत साकारले ते म्हणजे शिरीष सरांनीच ! सोबत पुस्तकाची छायाचित्र जोडत आहे, ती पाहून आपल्याला पुस्तकाच्या सुंदर डिझाईनचा, आकर्षक रंगसंगतीचा अंदाज येईल आणि आपण माझे पुस्तक नक्कीच तातडीने खरेदी कराल याची मला खात्री आहे.  

लेखकाने जे लिहीले ते प्रकाशकाला जेव्हा पूर्णतः कळते तेव्हाच खरंतर लेखक आणि प्रकाशकाचे सूर जुळतात आणि मग सुंदर पुस्तकांची निर्मिती होते. आजच्या घडीला आपल्या देशात जवळपास प्रत्येक लहानमोठ्या प्रकाशकांशी नाळ जुळलेले लेखक आहेत आणि ते वर्षानुवर्ष त्याच प्रकाशन संस्थेशी संलग्न आहेत याचे कारणच हे आहे की त्यांचे सूर जुळलेले आहेत.

असेच माझेही सूर लोकव्रत प्रकाशनाशी कायम जुळलेले राहोत हीच आज यानिमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना...!

धन्यवाद

मोहिनी घारपुरे - देशमुख 

संपर्क - 8668289992 

पुस्तक ताबडतोब, घरपोच, ऑनलाईन मागविण्यासाठी या लिंकवर क्लिक करा ( शुल्क फक्त 125 रूपये )

https://lokvrat.in/10132 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

Should Art meet us Halfway?