'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ..' असा उद्गार सहज तोंडातून निघेल,अशी एक व्याकूळ करून टाकणारी कथा असलेला चित्रपट ... सुशीला .. !!
'शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे' इथपासून सुरू झालेली सुशीलाची कथा अखेरीस 'जीवन इसका नाम है प्यारे .. तुझे है आगे चलना रे' हा संदेश देऊन जाते आणि आपण प्रेक्षक अक्षरशः मनातून हालतो.
जीवनाचे रंग कुणाला कळले आहेत .. ? इतके अशाश्वत असलेले हे जीवन ..! कधी क्षणात आनंद देते तर कधी पुढल्याच क्षणी माणसावर दुःखाचे पहाड कोसळवून सगळा तमाशा आनंदाने पहात रहाते. एका क्षणी देवत्व जिथे गवसतं तिथेच पुढल्या क्षणी या जीवनाचं एक नरभक्षक रूप माणसाला हादरवून सोडतं... पण तरीही माणूस जगण्याची जिद्द सोडत नाही हेच माणसाचं श्रेष्ठत्व .. एकवेळ सुख नाही मिळालं तरी चालेल .. पण आपण जगण्याच्या संघर्षात कमी पडणार नाही यासाठी माणूस आला दिवस काढत जातो.. कधी सुख, कधी दुःख .. कधी पोटभर अन्न .. कधी कणभर अन्नालाही पारखा होतो पण एक ना एक दिवस आपला येईल ही आशा मनात सतत बाळगत जीवनाचं चाक पळवत रहातो.
अशीच एक असते सुशीला ..
एका गावातल्या शाळेत शिक्षिकेच्या नोकरीवर रूजू झालेली .. विद्यादानाचं श्रेष्ठ कार्य हाती घेऊन उज्ज्वल भविष्य, स्वतःचं आणि आपल्या विद्यार्थ्यांचंही घडवायला निघालेली .. पण तिचं नशीब काहीतरी वेगळाच खेळ तिच्याशी खेळतं.
वर्गातल्या एका मुलाला नटनट्यांचे फोटो पहाताना सुशीला (रंजना) पहाते आणि चांगलीच समज देऊन त्याला वर्गाबाहेर काढते. काहीशी करारी, तडफदार आणि देखणी सुशीला .. तिच्या बोलण्यात चांगलीच जरब. मुलगा वर्गातून निघून घरी जातो नि लगेचच मोठ्या भावाला (अविनाश मसुरेकर) घेऊन शाळेत येतो. हा मोठा भाऊ पेशाने वकील.. तो सुशीलाला जाब विचारतो तशी सुशीला त्याचीही चांगलीच कानउघडणी करते. वकीलसाहेब आपल्या भावाची चूक कळल्यावर तिथून निघून जातात खरे पण झाल्या प्रकाराने काहीसे दुखावलेलेच असतात... तरीही त्यांच्या मनात तिच्याबद्दल आकस वगैरे खरंतर राहिलेला नसतो, ना त्यांच्या मनात तिच्यासारख्या देखण्या स्त्रीबद्दल काही निराळे विचार असतात. पण नंतर त्यांच्यात आणि सुशीलामध्ये योगायोगानेच ज्या काही विचित्र घटना घडतात, त्या घटनांचा एकच थेट अर्थ जो एरवीही कोण्याही स्त्रीने लावला असता तोच सुशीलाही लावते.. तिला वाटायला लागतं, हे वकीलसाहेब आता या ना त्या कारणाने आपल्याला त्रास द्यायला लागले आहेत .. आपल्या मागे लागले आहेत.. आणि या समजामुळेच खरंतर, आधीच प्रचंड करारी, धीट नि तडफदार, सडेतोड स्वभावाची असलेली सुशीला प्रत्येकवेळी वकीलसाहेबांचा अपमान करत सुटते.. दोन चार प्रसंगानंतर शेवटी वकीलसाहेबांचा आत्मसन्मान दुखावला जातोच पण ते इतके चिडतात की रागाच्या भरात सुशीलाच्या घराचं दार तोडून तिच्यावर अतिप्रसंग करतात. सुशीलाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होतं ते कायमचंच ..
सुशीलाच्या आयुष्याची वाताहत होते..
एका गावातून दुसऱ्या गावी भणंग भिकाऱ्यासारखी फिरण्याची वेळ तिच्यावर येते..एका चांगल्या सन्मानानं जगणाऱ्या सुशीलासारख्या एका शिक्षकी पेशा असलेल्या स्त्रीचं जीणंही शेवटी तिच्या अब्रुपाशीच ठेचकाळतं.. अरेरे ..
दुसऱ्या गावी विषण्ण मनोवस्थेत पोहोचत नाही तोच तिला कुणीतरी अनोळखी स्त्री मदत करण्याच्या बहाण्याने थेट धंद्याला लावायला निघते तो बिचारी सुशीला तिथून पळ काढते. तिचा पाठलाग करत ती कुंटणखाना चालवणारी माणसं निघतात .. तर सुशीला एका रस्त्यालगतच्या खोपटात शिरते आणि तिथे तिला भेटतो एक भणंग माणूस, ज्याचा एक हात तुटलेला आणि जो त्या खोपटात हातबट्टीच्या दारूचा व्यवसाय करत जीवन जगत असतो. काळोख्या रात्रीला आपल्या दारात आलेल्या बेसहारा बाईला संरक्षण देण्याइतका पुरूषार्थ या अपंग, भणंग माणसात ठासून भरलेला असतो आणि म्हणूनच तो त्या माणसांशी अक्षरशः जीवावर उदार होत हातापायी करून अखेरीस सुशीलाला वाचवतो.
आता खोपटात ती दोघंच उरतात .. दारूचा ग्लास तिच्या हाती देणारा तो (अशोक सराफ) क्षणात तिच्याशी भावाचं नातं जोडतो आणि त्याची कर्मकहाणी ऐकवतो.. आणि सुशीलाची कहाणी ऐकताना त्याचे डोळे भरून येतात. आता सुशीला त्याच खोपटात आपल्या मानलेल्या भावाबरोबर राहू लागते.. अशातच एके दिवशी सुशीलाला कळतं, की तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगामुळे निसर्गानं आपला धर्म चोख बजावला आहे, ती आई होणार आहे .. हे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकते पण तरीही हा मानलेला भाऊ तिला आधार द्यायला भक्कम असतो. बाळाचा जन्म होतो आणि अगदी नेमकी त्याच दिवसांत पोलीसांची धाड या खोपटावर पडते. भाऊ ओल्या बाळंतिणीला विनवतो आणि घाईघाई सांगतो, की काहीही झालं तरी बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ देऊ नकोस .. आणि स्वतः पोलीसांपासून लपण्यासाठी थोडावेळ घरातून निघून जातो. इकडे पोलीस येण्याची चाहूल लागते तशी सुशील बाळाच्या तोंडावर घट्ट हात ठेवते.. पोलीस खोपटाची झडती घेतात आणि आल्यापावली निघून जातात पण तेवढ्या वेळात इकडे बाळाची प्राणज्योत खुद्द आईच्याच हातानी मालवली जाते.. या बाळाच्या रूपानी कदाचित सुशीलाच्या जीवनाला नवी दिशा मिळणार असते .. पण हाय रे कर्मा .. पुन्हा एकदा सुख सुशीलाला हुलकावणी देऊन जातं..
 |
कुण्या गावाचं आलं पाखरू गाण्यात रंजनाजींची एक भावपूर्ण अदा
|
अखेरीस नशीबापुढे हात टेकून पुन्हा जगण्याचं चाक फिरवण्यासाठी सज्ज झालेल्या सुशीलावर आता जगण्यासाठी अक्षरशः ब्लॅकने तिकीटविक्रीचा धंदा करायची वेळ येते.. पाकीटमारी, उचलेगिरी करणंही त्याला जोडून येतंच.. ती अक्षरशः रस्त्याच्या कडेला संसार मांडते.
अशातच, एका संध्याकाळी त्याच थिएटरमध्ये चित्रपट पहायला ते वकीलसाहेब ( ज्यांनी सुशीलावर ही वेळ आणली ) त्यांच्या पत्नीला घेऊन येतात आणि बाहेर सुशीलाला या भणंग अवस्थेत हे असलं काम करताना पाहून अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आपल्या भूतकाळातील चूक एक जीवन उद्ध्वस्त करून जाईल याची सुतराम कल्पनाही त्यांना त्यांच्या तारूण्याच्या भरात आलेली नसते .. आणि म्हणूनच त्यांना सुशीलाचा विचारही तोवर कधी आलेला नसतो. आज जेव्हा स्वतःचा भूतकाळ असा क्रूरपणे वाकुल्या दाखवत त्यांच्यासमोर त्यांना दिसतो तेव्हा त्यांना जाणवतं की त्यांनी रागाच्या भरात किती मोठा अपराध केला आहे ते.. मग काय, त्या क्षणापासून वकीलसाहेबांचं चित्त थाऱ्यावर रहात नाही. आपल्या चुकीचं प्रायश्चित्तं घ्यायला हवं हे जितक्या तीव्रतेनं त्यांचं मन त्यांना सांगायला लागतं, तितकंच, सुशीलाची अशी अवस्था कशी झाली हे देखील आता त्यांना जाणून घेण्यासाठी चुटपूट लागून रहाते. मग ते वेळीअवेळी तिचा पाठलाग करत, तिचा शोध घेत रहातात.. आणि अर्थातच ती त्यांना टाळत रहाते. पाकीटमारी, ब्लॅकचा धंदा सोडून आपल्या भावासह दुसऱ्या गावी जाते. तिथं एका तमाशाच्या कंपनी लावणीनृत्य शिकते आणि फडावर नाचायला लागते.. पण वकीलसाहेब तिथवरही तिचा पाठलाग करत येतात.. कारण त्यांचं मन त्यांना दिवसरात्र खात असतं.
अखेरीस एक दिवस, ते तिला गाठतात नि आपल्याला प्रायश्चित्त म्हणून तुझ्याशी लग्न करायचंय, तुझं जीवन मार्गावर आणायचंय असं तिच्यापुढे कबूल करतात. तिची मनधरणी करून तिला घरी आणतात.. पण दारात त्यांची पत्नी (उषा नाईक) तिला अडवते.. आणि जे सहाजिकच असतं. खरंतर, त्याचदरम्यान सुशीलावर पाकीटमारीबद्दल कोर्टात केस सुरू असते पण ती एकाही तारखेला कोर्टात हजर राहीली नसल्याने नेमकं त्याचवेळी वकीलसाहेबांना तिच्यावतीने कोर्टात हजर रहायला लागणार असतं. ते आपल्या पत्नीला लग्नात दिलेल्या वचनाची आठवण करून तिला सुशीलाला घरात थांबू देण्याची गळ घालतात आणि स्वतः कोर्टात निघून जातात. इकडे सुशीलाच्या मानलेल्या भैय्याने या वकीलाबद्दल जेव्हापासून कळलेलं असतं, तेव्हापासून सूडाच्या भावनेपोटी, वकीलाच्या पत्नीचीही सुशीलासारखी, आपल्या बहीणीसारखी अवस्था एक ना एक दिवस करू अशी शप्पथ घेतलेली असते.. आणि आता ती शप्पथ जणू पूर्ण करण्याची ही आयती संधी आहे असं वाटून तो सुशीलाचा माग काढत वकीलसाहेबांच्या घरी जातो. घरात वकीलसाहेब नाहीत हे पाहून तो आता इरेला पेटतो आणि त्यांच्या बायकोवर अतिप्रसंग करून आपल्या बहीणीचा सूड घ्यायला सरसावतो. सुशीला त्याला हात जोडून विनवत असते नि थांबवत असते पण तो .. तो आता मागे हटणं शक्यच नसतं.. अखेर जवळच पडलेल्या फळांच्या टोपलीतला धारदार सुरा दिसताच, सुशीला त्या क्षणी त्या पतिव्रतेला वाचवण्यासाठी आपल्या मानलेल्या भावावर सुऱ्याने वार करते नि तो जागीच कोसळतो...
हाय रे .. ज्या माणसाने सुशीलाला संकटातून वाचवले .. आज त्याच माणसाचा खून करण्याची वेळ तिच्यावर आली ... किती ते दुर्दैव ..!!
अर्थातच पुढे या खुनामुळे कोर्टात खटला चालतो. सरकारी वकील निरनिराळ्या प्रकारे कोर्टापुढे, सुशीला ही किती चवचाल आणि बनेल बाई आहे हे सिद्ध करत जातात आणि सुशीलाची बाजू घेऊन तिची कर्मकहाणी, तिच्यावर ही वेळ ज्यांच्यामुळे आली ते वकीलसाहेब कोर्टाला कथन करतात.. आपल्या पापाची कबूली देतात.
कोर्टाचा निकाल येतो.. सुशीलाला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा मिळते आणि जाताजाता ती पुन्हा आपल्या गळ्यात वकीलसाहेबांनी घातलेलं मंगळसुत्र त्यांच्या पत्नीच्या गळ्यात बांधून निघून जाते...
पुढे तिच्या चांगल्या वागणुकीमुळे तिची शिक्षा कमी होते पण एक उद्ध्वस्त जीवन पुन्हा फुलणार का ..? बहरणार का ..? ही सगळी प्रश्नचिन्ह मागे ठेऊन .. ' जीवन इसका नाम है प्यारे .. तुझे है आगे चलना रे ' हा संदेश देत चित्रपट संपतो.
सुशीलाची कहाणी पाहिल्यानंतर अक्षरशः कापरं भरतं.. मन विषण्णं होतं. एकीकडे वाटतं, कदाचित हेच तिचं नशीब असावं, तर दुसरीकडे वाटतं, कदाचित तिच्या स्वभावामुळे तर तिच्यावर ही वेळ आली असावी का ..
तिला माणसं ओळखता आली नाहीत हे तर सुरूवातीच्या काही प्रसंगातूनच कळतं .. पण खरंच, ज्या माणसाने तिच्यावर अतिप्रसंग केला, तो तर मुळात सज्जन होता नं.. मग त्यानेही एवढ्या टोकाचा राग आणि तोही अशा पद्धतीने का म्हणून प्रदर्शित करावा.. ? म्हणजे कितीही पदव्या घेतल्या तरीही सभ्यता, स्त्रीयांचा सन्मान हे पुन्हा वेगळं शिकवायलाच लागतं का ? आणि त्याहीपेक्षा, 'पौरूषार्थ' म्हणजे काय हे जर एखाद्या मुलाला त्याच्या उमलत्या वयातच कुणी नीट समजावून सांगितलं नसेल तर तो अशाप्रकारे वर्तन करून कोणत्याही स्त्रीचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त करूनच स्वतःचं पौरूषत्व, स्वतःचा अहंकार कुरवाळत, त्याचा अभिमान बाळगत राहील असं जाणवलं. आज समाजात ज्या अशा घटना घडतात, त्यामागे महत्त्वाचं कारणंच हे आहे, की अनेक घरांमध्ये कुणी मुलांना उमलत्या वयात 'पौरूषार्थाचा' नेमका आणि योग्य अर्थ समजावून देणारंच नाही, त्यांच्या दुर्दैवानेच कदाचित ..!!
असो, तर असा हा सुशीला चित्रपट.. 1978 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अनंत माने तर जगदीश खेबुडकर यांची गीते आणि राम कदम यांचं संगीत .. ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ..
चित्रपट कित्तीतरी वेळा पाहिला आणि कित्तीतरी वेळा लेख लिहायला घेतला पण ही ह्रदयद्रावक कथा शब्दात उतरवताना मन कितीतरी वेळा थरथरलं... हात अडखळले .. आणि डोळ्यात पाणी दाटलं..
एका सुंदर स्त्रीची ही करूण कहाणी.. तिच्या या प्रवासात तिला ज्यांनी साथ दिली त्या भैय्याइतकंच आणखी एक पात्र फार भाव खाऊन जातं, ते म्हणजे मजनूचं पात्र आणि ते साकारणारे कलाकार म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर ..
हा मजनू म्हणजे सुशीलाचा आशीकच .. पण त्या सुशीलाचा जी आता ब्लॅकनं तिकीटं विकायला लागलेली असते.. थिएटरच्या बाहेरच या मजनूचा टीस्टॉल असतो. चहा विकता विकता तो सुशीलावर भाळतो.. पण त्याचं तिच्याप्रती वाटलेलं प्रेम किती खरं असतं हे चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात आपल्याला कळतं. जेव्हा सुशीलाला शिक्षा ठोठावली जाते तेव्हा पोलीस तिला घेऊन जायला लागतात, तो कोर्टाच्या दारापाशी हा मजनू , नेहमीप्रमाणे त्याही दिवशी सुशीलासाठी कपभर चहा घेऊन , आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत उभा असतो... सुशीला त्याला तिथे तसा पहाते आणि तिला गदगदून येतं.. अखेरीस .. ज्याचा त्याचा मार्ग ठरलेला असतो आणि जो तो माणूस, मग तो आपल्याला कितीही प्यारा असो वा नसो .. तो त्याच्या मार्गाने पुढे जाणार असतो हेच खरं..
रंजनाजी, अशोक सराफजी आणि अन्य सगळेच कसलेले कलाकार .. या सगळ्यांनी मिळून एक अत्यंत उच्च दर्जाची शोकांतिका सुशीला या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यापुढे मांडली आहे.. हा चित्रपट आता तसा कालौघात मागे पडला असणं स्वाभाविक .. पण तरीही यातून दिला गेलेला खरा संदेश पुढे पोहोचणं हे महत्त्वाचं .. सहज म्हणून या चित्रपटाखाली यूट्यूबवर आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या तर त्या वाचताना मी स्वतःही क्षणभर संदीग्ध झाले होते... कारण, अनेकांनी सुशीलाच कशी वाईट ..तिला कशी माणसं ओळखता आली नाहीत वगैरे वगैरे टिप्पणी केल्याचं वाचलं .. म्हणजे काळ बदलला तरीही नव्या पिढीतली माणसंही अजून स्त्रीयांनाच बोल लावायला टपलेली .. पण कुणीही चित्रपटातील वकीलसाहेब ज्याने रागाच्या भरात एक भडक कृती केली .. ज्याने सुशीलाचे शीलहरण केवळ, स्वतःच्या अहंकारापोटी केले त्याला दूषण देताना दिसले नाहीत... हाच तो आपला समाज, हेच ते आजही जुनंच, कीडलेलं आणि विषमतापूर्ण समाजमन .. जे कितीही आधुनिक म्हणून मिरवलं तरीही मनातून कायम स्त्रीयांना दुय्यमच समजणार आणि जमेल तेव्हा, जिथे जमेल तिथे स्त्रियांना भेदभावाने वागवणार .. !!
असो, तर असा हा रंजनाजींनी आपल्या अत्युच्च अभिनयाने आणि अत्यंत ताकदीने साकार केलेला चित्रपट..
आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बरेच दिवसापासून मनात असलेले या चित्रपटाविषयीचे माझे रसग्रहण, आणि ते लिहीताना अडखळलेले माझे हात, आज जणू झपाटल्यागत लिहीते झाले..
माझ्याकडून रंजनाजींना हीच श्रद्धांजली ...
- मोहिनी घारपुरे - देशमुख
(सर्व फोटो गुगल साभार)