शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

कोण कोणास तुमच्याबद्दल काय म्हणाले ?

कोण माझ्याविषयी काय म्हणाले हे मला ऐकवणाऱ्या माणसांना मी फारसं एंटरटेन करू शकत नाही ..!
मला वाटतं, हे असं सांगणारा मनुष्य रिकामाच असला पाहिजे. कारण, या नसत्या उठाठेवी सांगितल्यात कोणी करायला ..?
हा, आता एखादी माझ्या क्षेत्रातली मोठी, महत्त्वाची व्यक्ती माझ्याविषयी माझ्यामागे काही चांगलं वाईट बोलली आणि ते माझ्या कानावर कोणी घातलं तर अशा व्यक्तीचे मी निश्चितच आभार मानेन. कारण, त्याने मला ही माहिती पुरवण्याने माझ्या कामाचे निश्चितच कौतुक अथवा योग्य टीका मला ऐकायला मिळेल आणि त्यामुळे मी माझ्यात सुयोग्य बदल करू शकेन.. तसंच एखादा माझ्याविषयी प्रामाणिक भावना असलेला मनुष्य माझ्या चुका सोदाहरण सांगून, मला समजावत असेल तर नक्कीच मी वेळ काढून ते ऐकेन, वेळ काढून त्याच्या सांगण्यावर विचार करेन, स्वतःत कालपरत्त्वे अपेक्षित बदलही करण्याचा मनापासून प्रयत्न करेन ..
पण उगाच कोणीही उठसूट, त्याला आलेल्या अनुभवांतून काहीबाही बरळला आणि अशा माणसाचं माझ्याविषयीचं बोलणं कुणी आणखी तिसरा मला कोणत्याही हेतूने ऐकवू लागला तर मला त्यात फारसा रस नसतो.. कदाचित मी दरवेळेला अशा माणसाला उडवून लावेनच असं नाही, पण त्याने पुरवलेल्या या माहितीमुळे मला जराही फरक पडणार नाही हे मात्र खरे .. एका कानाने ऐकेन दुसऱ्या कानाने सोडून देईन, किंवा अगदीच वाईट काहीतरी बरळलं असेल तर नक्कीच खडसावेन, किंवा कौतुकाचे दोन शब्द असतील तर छानपैकी ती दाद घेईन .. पण उगाचच काहीतरी सांगायला लागलं ना कोणी, तेही तिसऱ्याच कोणीतरी आपल्या माघारी आपल्याविषयी बोललेलं की मला चालतंच नाही हे मात्र खरे ..
याबाबत एक कथा कुठेतरी वाचनात आली होती. कथा माझ्या शब्दात आणि मला आठवते तशी सांगते.. 
एकदा एका विद्वानाला एक मनुष्य असंच कोण त्या विद्वानाविषयी काय म्हणत होता ते सांगू लागला. तेव्हा त्याने त्या माणसाला पहिल्याच वाक्यावर अडवले. विद्वानाने त्या माणसाला म्हटले, की अरे तू मला अमका माझ्याविषयी काय म्हणाला हे सांगण्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे दे .. 
माणूस लगेच तयार झाला. यावर विद्वान व माणसाची जी प्रश्नोत्तरे झाली ती काहीशी अशी -
विद्वान - काय तू मला जे सांगणार आहेस, ते स्वतःच्या कानाने ऐकले आहेस का ?
माणूस - 'नाही'
विद्वान - माझ्याविषयी त्या अमक्या व्यक्तीने जे विधान केले ते सकारात्मक आहे का ?
माणूस - 'नाही '
विद्वान - माझ्याविषयीचे ते विधान नकारात्मक आहे का ?
माणूस- ' होय' 
विद्वान - "अरे मित्रा, हे प्रश्न विचारून मला एवढेच समजले आहे, की जी गोष्ट तू स्वतः ऐकलेली नाही, त्यातूनही ती माझ्याविषयी नकारात्मकच अधिक आहे, ती ऐकून मी काय करू.. ? ते विधान ऐकल्याने मला त्रासच जास्त होणार आहे आणि जरी ते विधान सकारात्मक असते तरीही ते ऐकून मला गर्व होण्याचीच शक्यता जास्त, त्यामुळे तू एवढे कष्ट घेऊन मला जे सांगणार आहेस, ते ऐकून मला काहीही मिळणार नाहीये हे माझ्या या प्रश्नोत्तरातून मला समजले आहे. त्यामुळे तू  माझ्याविषयी ऐकलेल्या गोष्टी तुझ्यापाशीच ठेव.. !"
असे बोलून विद्वान पुढे चालू लागला...

या कथेत त्या विद्वानाचे जे म्हणणे आहे ना, तेच मला योग्य वाटते. कोण माझ्याविषयी कोणाजवळ काय बोलले, ते किती महत्वाचे आहे, ते नेमकं कोण व किती महत्त्वाच्या व्यक्तीचं मत आहे, ते मत ऐकून मला काही फायदा खऱ्या अर्थानी होणार आहे का ? या प्रश्नांची उत्तर जर माझ्या मनाला पटली तरच मी अशी विधानं ऐकून घेते. आणि मग त्याचा मनावर किती परिणाम करून घ्यायचा ते ठरवते. उगाच उठसूट कोणीही केलेल्या टिप्पण्या ऐकण्यात आपला वेळ कशाला दवडा नाही का ?
मला वाटतं, हल्ली आपल्यावर सतत हाच एक ताण जास्त प्रमाणात दिसतो. लोक काय म्हणतील यापेक्षा माझी इमेज, माझ्याविषयीचं समोरच्याचं मत काय याचा अनेक मंडळी अतिविचार करतात. हा विचार तेव्हाच महत्त्वाचा जर, सगळ्यांचंच मत तुमच्याविषयी एकसमान होत असेल तर ...उदाहरणार्थ, तुम्ही उद्धट आहात असं सगळेचजण बोलायला लागले तर तुम्ही स्वतःत बदल करायला हवा हे निश्चित.. पण काही लोक प्रसंगानुरूप त्यांची तुमच्याविषयी मतं बनवत असतात, त्यांना तुम्ही खरे कसे आहात याच्याशी काहीही देणं घेणं नसतं, प्रसंग बदलला, तुमचं वागणं वेगळं दिसलं की यांचं तुमच्याविषयीचं मत बदलतं. मग अशा लोकांच्या मतांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायला हवं..
अन्यथा, चार फुटकळ लोकांची फुटकळ मतं ऐकून आपण सतत स्वतःला क्रिटीसाईजच करत राहू आणि जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातकच आहे. 
याउपर, कोणाचं मत तुम्हाला सांगण्याचे कष्ट जर मधलाच कोणी घेऊ लागला तर मला तर त्यांना स्पष्टच सांगावसं वाटतं, "तुमची नकारात्मक मतं तुमच्याजवळ ठेवा, कारण त्याने माझ्या सकारात्मक कामात तुम्ही खीळ घालता आहात .. "
एवढं साधं सहज मला वागता येऊ शकतं.. पण जेव्हा मी असं स्पष्ट बोलते , तेव्हा तर आणखीनच राग येतो समोरच्याला .. अशा वेळी मी तितकच सहज स्वतःला समजावते, की आला राग एखाद्याला तर येऊ देत कारण मी नंतर संधी मिळताच तो राग काढू शकते आणि संधी नाही मिळाली तरीही असली उठाठेव करणाऱ्या माणसाला वेळीच थांबवलेलं मला जास्त योग्य वाटतं. 
कारण, कोण माझ्याविषयी कोणास काय म्हणाले हे ऐकत बसण्यापेक्षा मला माझं काम जास्त महत्त्वाचं वाटतं... 
मी जे लिहीते, मी जे वाचते त्यावर लक्ष केंद्रीत करणं हे कोणाच्या माझ्याविषयी हवेत मारलेल्या फुंकरींपेक्षा अधिक महत्त्वाचं नाही का ?
सो, तुम्हीही जर कोणाच्या असल्या बोलण्याने वारंवार दुखावले जात असाल तर बेटर स्टॉप दॅट पर्सन राईट अवे ...  अशा माणसांना एंटरटेनच करू नका .. आपलं जगणं, आपलं व्यक्त होणं अशा बुडबुड्यांमुळे जर खराब होत असेल तर ते बुडबुडे वेळीच फोडलेले बरे (म्हणजे शब्दशः नाही बरं का, तर अशा माणसांपासून लांब राहिलेलेच बरे ..) ... !
- मोहिनी घारपुरे - देशमुख 
bla bla bla bla bla
bla bla bla bla bla bla

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश