मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

माझे आकाशवाणीचे दिवस

मी काही वर्षांपूर्वी नाशिक आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमाकरीता खेळ बुद्धीचा हा एक कार्यक्रम तयार केला होता. हा कार्यक्रम तरूणांसाठी प्रश्नमंजुषेचा होता. एकूण तेरा भागांचा हा कार्यक्रम मला सुचला व मी लगेच माळोदेंची भेट घेतली. त्यांनीही लगेच मला दाद दिली व मी कामाला लागले. मी तेव्हा दिव्य मराठीमध्ये नोकरीही करत होते. त्यामुळे साडेदहाचं पंचिंग असायचं. तत्पूर्वी सकाळी आठ वाजताच मी आकाशवाणीत जायचे. तिथे आम्ही रेकॉर्डींग करायचो आणि मग धावतपळत मी ऑफीस गाठायचे.
माझ्याकडे तेव्हा दिव्य मराठीने तरूण व महिला हे बीट सुपूर्द केले होते. त्यामुळे मी ठिकठिकाणची कॉलेजेस हिंडायचे. रोज किमान चार ते पाच कॉलेजेसमध्ये जाऊन तिथल्या वेगवेगळ्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांशी वगैरे भेटीगाठी घेऊन बातम्या शोधायचे. त्यातच मी वेगवेगळ्या कॉलेजमधील ग्रुप्स हेरून त्यांना माझ्या या आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारत असे. मग त्यापैकी इच्छुक मुलांना रेकॉर्डींगसाठी बोलवत असे.
मी प्रश्नमंजूषेचे स्वरूप काहीसे असे ठेवले होते... एकूण तीन फेऱ्या. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक गटाला सामान्य ज्ञानावर आधारीत दोन दोन प्रश्न विचारले जात. दुसरा म्यूझिक राऊंड. यामध्ये एखाद्या ऑडीओ क्लिपवर आधारित प्रश्न विचारला जाई. त्यात कधी एखादं गाणं, कधी एखाद्या सेलिब्रिटीचा आवाज ऐकवला जाई व त्याअनुषंगाने प्रश्न विचारले जात. तिसरा राऊंड रॅपिड फायरचा होता. यामध्ये प्रत्येक गटाला पाच पाच प्रश्न विचारले जात व त्याची त्या त्या गटाने लगोलग उत्तरे देणं अपेक्षित असे. एकूण गुणसंख्या मोजल्यानंतर दर भागाचे विजेते घोषित केले जात.
प्रत्यक्ष सहभागी मुलांपेक्षा दरवेळेला आमच्या टीमचीही तितकीच कसोटी लागत असे. प्रश्न शोधण्याकरिता, शोधलेल्या प्रश्नांतील सत्यता, योग्यता व दर्जा पडताळून पहाण्यासाठी नाशिक आकाशवाणीचे सध्याचे प्रमुख व तत्कालिन युवा व विज्ञान विभाग प्रमुख शैलेश माळोदे सरांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे काम एकटीने करणे तर केवळ अशक्यच होते, त्यामुळे मी एक टीम तयार केली होती. स्पर्धकांच्या एन्डला जेवढी मजा येत असे त्याच्या कैकपट अधिक मजा आमच्या टीमने केली यात शंका नाही.
कार्यक्रमाची संकल्पना, त्यात लागणारे सहभागी स्पर्धक या सगळ्याची अरेंजमेंट मी करायचे. कार्यक्रमाकरिता तज्ज्ञ मंडळामध्ये सध्याचे नाशिक आकाशवाणीचे मुख्य शैलेश माळोदे सर नेहमी हसतमुखाने, तत्परतेने मार्गदर्शन करायचे. माझ्याबरोबर सहनिवेदक म्हणून लौकीक प्रभुणे, चंद्रमणी पटाईत काम पहात आणि सुनेत्रा महाजनही सहनिवेदन व कार्यक्रमाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळत असे.
कार्यक्रमाच्या रेकॉर्डींगच्या वेळेला तर इतकी धम्माल चालत असे. कधी कोणी मोठ्याने डायलॉग बोले तर कधी शब्दच न सुचल्याने अडखळायला होई. कधी बोलता बोलता कोणाची बोबडी वळत असे आणि एकच हशा पिकत असे. विशेषतः जे स्पर्धक होते त्यांना आकाशवाणीची तशी काहीच सवय नसे हे ओघाने आलंच त्यामुळे ते एकूणच वातावरणाला थोडेसे गांगरलेले असत. काही काही धिटुकले मात्र मस्त मौके पे चौका मारून घेत.
रेकॉर्डींग झालं की आमची टीम सगळे मिळून मस्तपैकी चहा प्यायला जवळच्या टपरीवर जात असू. रेकॉर्डींग आटपलं की प्रत्येकालाच आपल्या दिवसभरच्या कामाला लागायचं असल्याने खूपच धावपळ होत असे पण तरीही आम्ही सगळे आपापला वेळ आणि जबाबदारी छान मॅनेज करत असू. दोन अडीच महिने हा कार्यक्रम आकाशवाणीवर चालला. आठवड्यातून एकदा तो प्रसारित व्हायचा. अवघ्या वीस मिनीटाच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी आठव़डा आठवडा मी तयारी करायचे. मुलं निवडणं, त्यांच्याशी संपर्कात राहून प्रत्यक्ष रेकॉर्डींगच्या दिवशी त्यांची उपस्थिती असावी यासाठी फॉलोअप घेणं, प्रश्न काढणं, प्रश्न रिपीट होऊ नयेत याची काळजी घेणं, कार्यक्रमाचं लेखन, प्रश्नांबाबत माळोदे सरांबरोबर सल्लामसलत करून मग योग्य प्रश्न व त्याचे चार पर्याय निवडणं, बाकी सहकाऱ्यांशी कोऑर्डीनेट करत रहाणं ही आणि अशी सगळी लहानमोठी कामं मी अत्यंत आनंदाने व जबाबदारीने पाहिली.
आकाशवाणीसाठी एवढी मोठी जबाबदारी पेलण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. शिवाय संकल्पना सुचून नंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आकाशवाणीनेही मला खूप सहकार्य केलेच तसेच मला एवढी मोठी संधी दिली होती. आणि मला ही संधी दवडायची नव्हती तर त्यातून शिकत पुढे जायचं होतं. आणि मी हे करू शकले याचं कारण लौकीक, सुनेत्रा, चंद्रमणी आणि प्रत्यक्ष माळोदे सर यांचे मिळालेले सहकार्य..
तर असे माझे आकाशवाणीचे दिवस.
खरंतर माझ्या शालेय जीवनापासूनच आकाशवाणीशी माझा थेट संपर्क आला आहे. कसा, कुठे, कोणामुळे असे बरेच प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले असतील ना .. मी ही नक्कीच या सगळ्याबद्दल लिहीणार आहे .. पुढच्या लेखात ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश