शनिवार, ७ एप्रिल, २०१८

मी - एक "कॅज्युअल रायटर"

जवळपास गेली आठ- दहा वर्ष झाली, मी सातत्याने लिहीत आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, दिव्य मराठी, तरूण भारत या आघाडीच्या दैनिकांसाठी मी लिहीलंय, तसंच मनोविश्व, तनिष्का या मासिकांसाठी, ऊर्जा , लोकमत ऑनलाईन या वेबसाईटसाठी, दिवाळी अंकासाठी, पुरवण्यांसाठी मी लिहीलंय.. अनेक जाहीरातींचं भाषांतर केलंय, रेडीओसाठी कार्यक्रमाचं लेखन केलंय, शिवाय कथा लिहीतेय, कविता लिहीतेय आणि आता ब्लॉगवरही लिखाण करतेय.. पं. हरिप्रसाद चौरसिया, बेगम परवीन सुल्ताना, कांचन गडकरी, झीनत अमान, डॉ. गिरीश ओक, विष्णू मनोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक नामांकित लोकांच्या मुलाखती घेऊन मी त्या शब्दबद्ध केलेल्या आहेत, अनेक पुरवण्यांकरीता मिळालेल्या कोणत्याही ललित विषयावर अवघ्या काही मिनीटात मी लेख लिहून दिलेले आहेत. गेल्या वर्षीपासून मी फॅशन विषयावर लोकमत ऑनलाईनसाठी अभ्यासपूर्ण सदर चालवले आहे, तरूण भारत नागपूरसाठी वर्षभर क्रीडवर (न्यूज एजन्सीजकडून आलेल्या बातम्यांवरून आपल्या दैनिकाच्या पॉलिसीनुसार बातम्या लिहीणे), दोन तीन महिन्यासाठी पुरवणी संपादिका या पदापर्यंतही मी काम केलं आहे. हे काम करताना, महिलांसाठीची आकांक्षा पुरवणी आणि तरूणांसाठीची फुलऑन पुरवणी पूर्णतः नव्याने प्लॅन करून नव्या नव्या संकल्पना तिथे राबवल्या, तर रविवार विशेष आसमंत ही आठ पानी पुरवणी अत्यंत जबाबदारीने संपादीत करून तिचा दर्जा वाढवण्यात भर घातली आहे.  आणि तरीही मी एक "कॅज्युअल रायटर" आहे. 
माझा न्यूज सेन्स चांगला आहे, मला बातमी कळते आणि मी झपाटल्यासारखं काम करते, एकेकाळी तर खूप खूप काम केलं आहे. आपल्याकडलं बीट कमी महत्त्वाचं की जास्त महत्त्वाचं वगैरे विचार न करता जो विषय मिळेल त्यावर रिपोर्टींग करायचं, ठिकठिकाणी जायचं, महत्त्वाच्या लोकांना - सामान्य माणसांना भेटायचं आणि बातमी आणायचीच अशा वृत्तीने प्रामाणिकपणे मी काम केलं आहे. 
असं असलं तरीही, माझ्या मते, माझं लिखाण ललित अंगाने जास्त बहरतं, तसंच काही हलक्याफुलक्या परंतु तितक्याच महत्त्वाच्या विषयांवर मी झट की पट लिहून देते. माझ्याकडे नातेसंबंध, पर्यावरण, तरूण, महिला, सोशल मीडिया, इंटरनेट, फॅशन, नवीन ट्रेण्ड्स यापैकी कोणत्याही विषयावरील लेख मागा, कितीही तातडीने त्या विषयावर मी लिहून देऊ शकते.  कोणत्याही दैनिकातून मला फोन येतो, मॅडम ( किंवा, मोहिनी ) , अमक्या एका विषयावर लेख पाहिजे आहे, अगदी आजच पाहिजे, किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत हवाय, द्याल ( किंवा देशील ) का .. ? मग मी क्षणभर माझ्यासमोरील त्या दिवसाच्या पूर्वनियोजित कामांचा विचार करते आणि दिवसभराच्या कामातून लेख लिहिण्यासाठी वेळ कसा मॅनेज करता येईल याचं मनातल्या मनात पटापट नियोजन करते आणि पुढच्या काही मिनीटातच मी समोरच्याला होकार देऊन मोकळी झालेली असते. मग काम करता करता त्या विषयाचं चिंतन बॅक ऑफ द माईंड सुरू होतं. आणि जसा वेळ मिळेल तसं लॅपटॉपसमोर बसून मी मनातला विचार सलग लिहून मोकळी होते. या संपूर्ण प्रोसेसला मला फार वेळ लागत नाही, कारण माझा टायपिंगचा स्पीडही अत्यंत उत्तम आहे. टायपिंगचा स्पीड कसा आणि कधी वाढला याची एक अत्यंत सुंदर आठवण आहे.

त्याचं झालं असं की, मी दिव्य मराठीत नोकरी पत्करली आणि पहिल्याच दिवशी आम्हाला मराठी टायपिंग ऑफीसमध्ये शिकवले जात होते. तोवर मी गुगलच्या मेलबॉक्समध्ये मराठी शब्द इंग्लिश कीबोर्डवर उमटवून मग योग्य तो शब्द उमटवण्याचं कसब आत्मसात केलं होतं त्यामुळे मला मराठी टायपिंगची फार गरजच नव्हती. त्यामुळे मी कधी त्या भानगडीत पडलेच नव्हते. तर दिव्य मराठीत मला पहिल्या दिवशी स्वतःच्या मेंदूला तोवर जी मराठी टायपिंगची सवय लावली होती ती पुसून नव्याने, वेगळ्या की वर वेगळं अक्षर ही सवय लावणं अत्यंत कठीण जात होतं... मी लॅपटॉपच्या कीजशी झटापट करत होते, इतक्यात आमचे सिनीयर रिपोर्टर मला सगळ्यांसमोर चिडवत म्हणाले, काय तू एवढी बीएससी, पीजीडीबीएम, एम-ए एमसीजे  झालेली मुलगी, आणि एवढी सोपी गोष्ट येत नाहीये तुला... झालं, मी ते बोलणं फारच मनावर घेतलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा टायपिंगला बसले तेव्हा अवघ्या पंधरा मिनीटात मला तो नवा मराठी कीबोर्ड लीलया वापरता यायला लागला होता... मग त्या कालच्या सिनीयरनी माझे लॅपटॉपवर चाललेले हात पाहून लगेचच पुन्हा सगळ्यांच्या देखत माझं कौतुक केलं तेव्हा मला अत्यानंद झाला. मग प्रत्यक्ष माझा रिपोर्टींगचा जॉब जेव्हा सुरू झाला तेव्हा कंपनीने आम्हा सर्व रिपोर्टर्सना मिनी लॅपटॉप दिलेले होते, माझा लॅपटॉप आणि सायबर शॉट कॅमेरा घेऊन मी कॉलेजेसमध्ये फिरायचे, सांस्कृतिक कार्यक्रमांना जायचे आणि फील्डवरून लॅपटॉपवरून बातमी तयार करून पाठवून द्यायचे, कार्यक्रमांचे फोटो  काढायचे आणि दिव्य मराठीचं सिटीचं पान 2, आणि पान 6  निम्म्याहून अधिक बातम्यांनी भरून टाकायचे. 
"कँपस राऊंड अप" हे माझ्या सिटीच्या पानातल्या कॉलमचं नाव होतं आणि काही विशेष उपक्रम कॉलेजेमध्ये झाले असतील तर अशा वेळी दैनंदिन रिपोर्टींगबरोबरच "कँपस हॅपनिंग्स" नावानी मी रिपोर्टींगचं सदर चालवायचे. फील्डवर तासन्तास फिरून रिपोर्टींग करायचे, तरूणांच्या महोत्सवांचे फोटोजही अनेक वेळा स्वतःच क्लिक करायचे. फॅशन शो असो वा युथ फेस्टिव्हल अनेकवेळा मी काढलेल्या फोटोजच कौतुक आमच्या ऑफीसमधल्या माझ्या सिनीयर्सनी आणि खुद्द छायाचित्रकारांनीही केलं आहे. तसंच मी लिहीलेल्या विशेष बातम्या दिव्य मराठीच्या जॅकेटला तब्बल पाच वेळा लागल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरीत होऊन दैनिक भास्करच्या निरनिराळ्या आवृत्त्यांमध्येही छापल्या गेल्या आहेत.. 
करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांत स्वतःशी प्रामाणिक राहून जे जे काम केलं त्याचा मला माझ्या करिअरमध्ये प्रचंड फायदा झाला आहे आणि तेव्हा वाढलेला माझा  टायपिंगचा स्पीड आजही कायम आहे, कारण मी सातत्याने गेली आठ - दहा वर्ष लिहीत आहे.
आज हे सांगण्याचं कारण असं की, हल्ली, अनेकजण अशा हलक्या फुलक्या विषयांवर सातत्याने लिखाण करताना दिसतात. दैनिकांच्या मुख्य पानांवर या माझ्यासारख्या लेखकांना क्वचितच स्थान मिळतं पण उरलेली जी पानं असतात ती अशाच लेखकांच्या लेखांनी, बातम्यांनी भरून गेलेली असतात. पण राजकारण, न्यायालयं, मनपा, जिल्हा परिषद या महत्त्वाच्या बीट्सच्या खालोखाल नातेसंबंध, फॅशन, महिला, तरूण वगैरे विषयांची क्रमवारी लागते.. आणि मग असे विषय लिहीणाऱ्या लेखकांना तुलनेने दुय्यम स्थान आपोआपच मिळते.
पण, मंडळी, मी कोणत्याही विषयावर प्रामाणिकपणे आणि सातत्याने लिखाण करतेय हेच माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेक लेखकांसाठी महत्त्वाचं असतं. वर्तमानपत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे बीट्स आणि ते सांभाळणारे लोक महत्त्वाचे असतात पण वाचकांच्या दृष्टीने सर्वच विषय महत्त्वाचे असतात. त्यामुळे दैनिकाला कोणत्याही एकाच विषयावर फोकस करून चालत नाही तर दैनिकांना सर्व विषय आणि ते लिहीणारे सर्व प्रकारचे लेखक हवे असतात. त्यामुळे तसं पाहिलं तर दुय्यम असं काहीच नसतं..
माझ्या मते तर, सतत मनात येणारे विचार, आजवर आलेले बरे वाईट अनुभव, स्वतःची झालेली जडणघडण, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि आपल्या लेखनामुळे लोकांपर्यंत आपला विचार नेणे जास्त महत्त्वाचे.. मग दैनिकात असो वा नसो, दैनिकात आपला लेख छापून येवो न येवो, त्याने फार फरक पडत नाही. आज आपण जे लिहू ते कधी ना कधी प्रकाशझोतात येईल आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू या विश्वासाने मी लिहीत जाते, लिहीत जाते.. अगदी व्हॉट्सअॅपवरून माझी कविता शेअर करतानाही मी स्वतःच्या भावनांशी तितकीच प्रामाणिक असते आणि फेसबुकवर एखाद्या विषयावर लहानशी पोस्ट लिहीतानाही मी स्वतःशी तितकीच प्रामाणिक असते. एखादी कथा लिहीताना म्हणा किंवा एखादा गंभीर लेख लिहीतानाही मी माझ्याशी प्रामाणिक असते. त्याशिवाय मला लिहीताच येत नाही हे विशेष. अमका विषय किती महत्त्वाचा व त्यानुसार आपले शब्दलालित्य वापरण्याचे चातुर्य मला आजवर जमलेले नाही, कारण मनातल्या भावना, आणि एखाद्या विषयावर आपले विचार खरेखुरे, प्रामाणिकपणे मांडणे हे मी बिनचूक करत असते, लिहीत असते, लिहीत असते ... बसं ... 
म्हणूनच, मी कदाचित कोणाला "कॅज्युअल रायटर" वाटत असेन तर ठीक आहे, मी तर अभिमानाने सांगते, की मी एक "कॅज्युअल रायटर" आहे ...!

- मोहिनी घारपुरे - देशमुख



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश