शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

मराठी भाषेचा आग्रह की दुराग्रह ?

काल मी एक मराठी शुद्धलेखनाविषयी पोस्ट टाकली होती. त्यानंतर आज अचानक एक इंग्लिश शब्द जो चुकीचा स्पेल केला होता तो वाचनात आला आणि माझ्या मनात द्वंद्व सुरू झाले. माझ्या मनातील हा विचार इंग्लिश आणि मराठी भाषेचा तुलनात्मक आहे ..
आपण मराठी शुद्धलेखनाच्या बाबतीत आग्रही आहोत.. वेलांटी, उकार,
-हस्व, दीर्घ यात जराशीही चूक आपण खपवून घेत नाही.
पण हल्ली इंग्लिशमध्येही शब्दांची मूळ स्पेलिंग्स बदलून वापरायला सोपी आणि अर्थ पोचेल अशी स्पेलिंग्स करण्याचा एक ट्रेण्ड फोफावत चाललेला दिसतो.. उदाहरणार्थ,
You च्या ऐवजी सर्रास U लिहीणे
There च्या ऐवजी सहज Thr लिहीणे
Could च्या ऐवजी Kud असं झटकन लिहून मोकळं होणे..
असे आणखी अनेक शब्द आहेत.
आपण विशेषतः मोबाईलवर टेक्स्ट मेसेज करताना किंवा सोशल मीडियावर चॅटींग करताना, पोस्ट लिहीताना इंग्लिश भाषेचे असे मोडतोड केलेले पण वापरण्यास सोपे असे शब्द लिहून मोकळे होते..
काही जाहीरातींमध्येही चुकीची स्पेलिंग जाणीवपूर्वक, ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी केल्याचीही अनेक उदाहरणं आहेत..
तर मुद्दा असा आहे की,
इंग्रजी भाषाही मराठीइतकीच समृद्ध आहे.. परंतु असे असतानाही इंग्रजी भाषेतील मोडतोड जगभरात होत असूनही आजवर असे शब्द लिहीण्याने या भाषेचा अपमान झाला, -हास झाला अशी मतं कधीही कानावर पडलेली नाहीत. किंवा कोणीही त्याचा एवढा विचारही केलेला नाही..
मात्र, मराठी भाषेत मात्र हा विषय आपण अत्यंत गंभीरपणे घेतो .. मराठी भाषा नष्ट होईल की काय अशी भीती व्यक्त करतो, व्याख्यानं घेतो, परिसंवाद घेतो, शुद्धलेखनाच्या चुका करणाऱ्यांना सोडत नाही ..
इंग्रजी आणि मराठी या दोन्हीही भाषाच आहेत.. या भाषांना एक इतिहास आहे.. मराठीपेक्षाही जगभरात इंग्रजी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.. असे असताना शुद्धलेखन व व्याकरणाबाबत इंग्रजी भाषेने , इंग्रजी भाषिकांनी कधी फार आग्रह धरल्याचे ऐकीवात नाही .. मराठी भाषिकांनी मात्र या उलट भूमिका घेतलेली आहे ..
हा फरक का असावा .. ?
सहजता आणि प्रवाहीपण याबाबत मराठीपेक्षा इंग्रजी अधिक लवचिक आहे असा याचा अर्थ होऊ शकतो का ..?
की मराठी भाषेच्या समृद्धीविषयी आपण मराठी भाषिक जास्त तत्पर, गंभीर आहोत आणि त्यामुळेच मराठी भाषा टिकून राहील असा आपला विचार आहे ?
जर इंग्रजी भाषा अधिक लवचिक असल्याचे या धोरणात दिसून येत असेल तर मग आपणही मराठीच्या शुद्धलेखन आणि व्याकरणाबद्दल एवढं आग्रही असणं सुसंगत आहे का ?
असे अनेक प्रश्न मनात उपस्थित झाले आहेत ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश