गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

टीव्ही झाला मित्र

मी तरूण भारत या विदर्भातील नामांकित वर्तमानपत्रात कार्यरत असताना मला एकदा एका आजींचा फोन आला होता. त्यांना माझी त्या दिवशीची कव्हरस्टोरी वाचून माझ्याशी खूप बोलायचं होतं. सैराटमधल्या आर्चीचं शिक्षण थांबल्याच्या काही बातम्या आल्यानंतर मी तो लेख लिहीला होता. आर्ची लहान असल्याने लोकांनीही थोडं थांबावं आणि तिच्या कौतुकासाठी रांगा लावण्यापेक्षा तिला शाळेची वाट मोकळी करून द्या असा त्या लेखाचा आशय होता. त्या संध्याकाळी या आजींचा फोन आला, माझ्या लेखाचं कौतुक केलं त्यांनी आणि मग जरासं स्वतःविषयीही बोलल्या. आजी एकट्याच रहात होत्या.. मिस्टर वारल्यानंतर त्यांनी स्वेच्छेने मुलांकडे जायला नकार दिला आणि आपल्या आहे त्या घरातच त्या एकट्या रहाणे पसंत करत होत्या. घरात टीव्ही हा एकमेव सोबतीला... दिवसभर तसं कोणी येणारं जाणारं नाही, पण आपला दिनक्रम तर आपल्याला पाळावाच लागतो.. मग काय मी आपली टीव्ही लावून ठेवते दिवसभर.. आणि मला असंही टीव्ही पहायला खूप आवडतो अगदी आधीपासूनच..
आजी सांगत होत्या आणि मी ऐकतानाच भूतकाळात रमत होते.. एक काळ होता जेव्हा टीव्ही हवा नको , टीव्ही नकोच, लहान मुलांनी तर पाहूच नये, म्हाताऱ्यांनाही टीव्ही कशाला हवा असल्या चर्चांचे फड रंगायचे.. कुठे तो काळ आणि कुठे हा आजचा काळ .. टीव्ही आहे तसाच आहे, आहे तिथेच आहे, प्रत्येकाच्या घरातलं आपलं स्थान टिकवून आहे... पण आपण मात्र टीव्हीचं आपल्या मनातलं स्थान बोलबोलता किती पक्क करत गेलो नै .. आज आपलं असं कोणी मागे उरलं नसताना टीव्हीचीच एखाद्या आजीला सोबत वाटत असेल तर टीव्हीला नावं ठेवण्याची पूर्वीचीच चूक तुम्ही तरी कराल का ?
- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश