शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

काबिल - चित्रपट रसग्रहण

ह्रत्तिक रोशन आणि यामी गौतम यांचा काबिल हा पिक्चर काल पाहिला. मला एकंदरीतच असे पिक्चर पहाताना भयपटांहूनही जास्त भीती वाटते. चित्रपटाचं कथानक आणि दिग्दर्शकाने ज्याप्रमाणे ते हाताळलं ते चांगलं होतं पण अधिक चांगलं करता आलं असतं असं वाटतं.
रोहन भटनागर (ह्रत्तिक) आणि त्याची बायको (यामी) हे अंध जोडपं. एकमेकांवर निरातिशय प्रेम. पण देखण्या आंधळीवर एका राजकारण्याच्या भावाची नजर पडते. संधीसाधून एके दिवशी तो त्याच्या मित्राबरोबर तिच्या घरात घुसतो आणि तिच्यावर अतिप्रसंग करतो. रोहन नेहमीप्रमाणे घरी परततो आणि बायकोशी सवयीने गप्पा मारायला लागतो त्यावेळी तिच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हातपाय पलंगाला बांधून रेपिस्ट त्याचा हेतू साध्य करून फरार झालेला असतो. अंध रोहनला ही अवस्था स्पर्शानी, तिच्या तडफडीनी कळते. तो तिला कसंबसं सोडवतो आणि पोलिसांकडे धावतो. पिक्चरमधले पोलीस ते .. नेहमीप्रमाणे हीरोलाच अर्थात रोहनलाच फ्रॉड ठरवतात. दरम्यान 24 तास तिला किडनॅप केलं जातं तेव्हा रोहनची तडफड ह्रत्तिकनी सॉलिड रंगवली आहे. त्यानंतर तिला ते समुद्रात सोडून देतात आणि हिरो तिला कसंबसं वाचवतो. 24 तासांच्या आत डॉक्टरकडे पोचू न शकल्याने डॉक्टरही नो सच एव्हीडन्स असा रिपोर्ट देतो. पोलिसांकडून मदत मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर ती दोघं गपगुमान घरी येतात. ती हिंमत न हरता पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करूया असं त्याला आपलं बळ एकवटून सांगते आणि तुला मान्य नसेल तर मी माझा एनजीओचा जॉब करत जगेन असाही पर्याय देते. त्याक्षणी तो बिचारा काहीच बोलू शकत नाही. विचारमग्न अवस्थेत निघून जातो. जेव्हा घरी परततो तेव्हा नव्याने जगणं सुरू करण्याची आशा मनात घेऊनच येतो .. नेहमीच्या सवयीच्या बिछान्यावर बसून तो तिच्याशी बोलायला लागतो आणि तितक्यात तिच्या पायांचा त्याच्या पाठीला जोरदार धक्का बसून स्पर्श होतो ... त्याच्या काळजात चर्र होतं .. त्याला जाणवतं आणि ते दुर्दैवाने खरच असतं .. तिने आत्महत्या केलेली असते. त्याच्या अपरोक्ष रेपिस्ट पुन्हा घरात घुसतात आणि तिच्यावर दुसऱ्यांदा रेप करतात.. मरता मरता तिने त्याच्यासाठी चिठ्ठी लिहीलेली असते .. तिने लिहीलेलं असतं, एकदा जे झालं ते विसरून मी पुन्हा नव्याने सुरूवात केलीही असती कदाचित पण आता दुसऱ्यांदाही हेच झालंय .. आणि आता हा खेळच समजून त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवला तर मी काय करू .. त्यापेक्षा जीवन संपवलेलंच बरं या विचाराने मी मरण कवटाळते आहे .. मी दोन घड्याळं ठेवतेय, त्यापैकी एक जाळून टाक आणि एक पुरून टाक .. हा आपल्या मारेकऱ्यांविषयीचा क्ल्यू ती पत्राद्वारे जाता जाता त्याच्यासाठी ठेवून जाते आणि मग त्याआधारे अंध हीरो नंतर अत्यंत हुशारीने सगळ्यांचा सूड उगवतो.
पिक्चर सॉलिड आहे पण अजून चांगला बनवता आला असता असे वाटत रहाते. तरीही एकंदरीतच अशा कथा पाहिल्या की मन विषण्ण व्हायला होते. समाजात असेही सराईत गुन्हेगार आहेत याची जाणीव राहून राहून होते आणि केवळ अंगावर सरसरून काटा येतो.
आज जेव्हा बलात्काराच्या घटना एवढ्या प्रमाणात वाढल्या आहेत अशा वेळी हा देखील एक विचार मनात येतो, की शारीरिक वा मानसिक द्रुष्ट्या अक्षम असलेल्या मुली, बालिका आणि महिलांच्या सुरक्षेचं काय ? जिथे सुदृढ, सशक्त मुलींच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्यांच्या अब्रूची लक्तरे काढणारे राक्षस एवढे मुजोर झाले आहेत तेव्हा या अशा अक्षम मुलींना तर किती पट अधिक सुरक्षा मिळायला हवी ...
- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश