बुधवार, ४ एप्रिल, २०१८

जळगाव आकाशवाणीच्या माझ्या रम्य आठवणी

रूढ अर्थाने प्रत्येकाच्याच आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ जरी बालपण असला तरीही माझ्या मते मात्र खरा आनंदाचा काळ तोच, ज्या काळात नशीबाचा वरदहस्त आणि तुमचे कष्ट एकत्रितपणे तुम्हाला भरभरून देतात आणि तुम्हीही कोणत्याही विवंचनांशिवाय आपल्या झोळीत परमेश्वराकडून मिळालेल हे अपार सुख अगदी क्षणक्षण आणि कणकण जगता. प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एक काळ नक्कीच येतो, मग तो जीवनचक्राच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतो आणि जीवनात किमान एकदातरी आणि कमाल कितीही वेळा येऊ शकतो असं मला वाटतं.
तर, माझ्याही आयुष्यात हा असा काळ आला होता जेव्हा माझे शालेय जीवन सुरू झाले. लहानपणापासूनच मी तशी हुशार, धिटुकली आणि मल्टीटॅलेंटेड. तसंच समजूतदारपणा, चांगला स्वभाव, नेतृत्वगुण, मोठ्यांचा आदर आदी गुण असलेली आणि भरपूर मित्रमैत्रिणी असलेली मुलगी. त्यामुळे शाळेतल्या विविध उपक्रमात नेहेमी पुढे असायची. दरवर्षी माझे वर्गमित्र मला वर्गप्रमुख म्हणून हमखास निवडून देत. शिवाय माझं वक्तृत्व चांगलं होतं, आवाज गोड आणि वाचनाची (मोठ्याने वाचनाची) आवड तसेच वाचन चांगले त्यामुळे वर्गात धडे वाचायला बरेचदा मला संधी मिळे. मला आजही चांगलं आठवतं,  एकदा धडा वाचायला सांगितल्यावर मी तो वाचिक अभिनयासकट इतका सुंदर वाचला होता की त्यानंतर आमच्या सरांनी माझं प्रचंड कौतुक केलं होतं. माझ्या बाजूला बसणाऱ्या मैत्रिणींनी तर अंगावर शहारे आल्याची कबूलीही दिली होती.
तर असे माझे कौतुकाचे, आनंदाचे, अभिमानाचे शालेय दिवस सुरू असतानाच सहावीच्या वर्गात असताना एक खूपच छान संधी मला मिळाली. आमच्या शाळेच्या तत्कालिन पर्यवेक्षिका मा. रोहिणी बलंग बाईंनी मला बोलावलं. मी त्यांच्या समोर हजर झाले तर तिथे आणखी एक बाई बसल्या होत्या. गोऱ्या, सुंदर आणि अत्यंत टापटीप आणि काहीशा कडक व्यक्तिमत्त्वाच्या या बाई काही कार्यक्रमासाठी चांगला अभिनय करणाऱ्या, चुणचुणीत मुलामुलींच्या शोधात होत्या. या बाईंच नाव होतं मीनल सौदागर. बलंग बाईंनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली आणि मला त्यांच्यासमोर काही उतारे वाचून दाखवायला सांगितले. माझ्यासाठी वाचन काही अवघड गोष्ट नव्हतीच त्यामुळे मी लगेचच तो उतारा वाचला.. आणि सौदागर बाईंनी मला क्षणार्धात सिलेक्ट केलं. नेमकं आपल्या आयुष्यात काय चाललय हे कळायचं वगैरे ते माझं वयच नव्हतं. ते वय होतं जगावर विश्वास ठेवण्याचं, शिकण्याचं आणि मोठ्या माणसांकडून चांगल्या कामाचं कौतुक करून घेण्याचं, त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळवण्याचं...
सौदागर बाईंनी अगदी सहाव्या वर्गात असलेल्या मला सिलेक्ट केलं आणि खूप मोठा विश्वास ठेवला तसंच माझ्या मनातही आत्मविश्वासाची ज्योत पेटवली. सौदागर बाईंनी जळगाव आकाशवाणीसाठी आरोग्यविषयक एका दीर्घ मालिकेचं लेखन केलं होतं. या मालिकेत दोन शालेय विद्यार्थ्यांची  (एक मुलगा आणि एक मुलगी)  पात्र कायम होती आणि काही पात्र त्या त्या भागापुरती होती. या दोन कायमस्वरूपी पात्रांमधल्या मीनलच्या पात्राकरीता बाईंनी मला निवडलं होतं.
मग काय दर महिना दोन महिन्यानी जळगावला आमचं रेकॉर्डींग असायचं आणि दर आठवड्याला त्याची पूर्वतयारी सौदागर बाई त्यांच्या घरी करून घ्यायच्या. शाळेनंतर उरलेल्या वेळेत आम्ही बाईंकडे जमायचो.. बाई स्क्रिप्ट हातात द्यायच्या... त्यावरचं बाईंच हस्ताक्षर आजही माझ्या डोळ्यांसमोर तसंच आहे. बाई आम्हाला स्पष्ट उच्चार आणि वाक्यांचा टोन कसा असावा हे नीट समजावून सांगत. तसंच वाक्य कुठे तोडायचं, कुठे थांबायचं, श्वासाचा आवाज कसा नियंत्रित करायचा हे सगळं छान समजावून सांगायच्या. मग आम्ही ते आत्मसात करायचो आणि रेकॉर्डींगला जायचो.
जळगाव आकाशवाणीच्या स्टुडीयोत प्रत्यक्ष रेकॉर्डींगच्या वेळी त्यामुळे फारशा चुका व्हायच्या नाहीत. वेळ वाचायचा आणि पुन्हा नाशिकला परतायचो. मला वाटतं, किमान दोन वर्षतरी ही मालिका सुरू होती.. आरोग्याचं गाव असं काहीसं या मालिकेचं नाव होतं.
माझा वाचिक अभिनय तर बाईंना खूपच आवडायचा. त्यामुळे माझं भरभरून कौतुकही शाळेत आणि सर्वत्र होत होतं. अशातच एकदा आमची ही मालिका ज्येष्ठ लेखक तथा नाटककार वसंत कानेटकरांनी ऐकली आणि त्यांनी बाईंना पत्राद्वारे मालिका उत्तम सुरू असल्याचं कळवलं. एवढच नव्हे तर नाशिक आकाशवाणीवर तुमच्या मालिकेतील प्रमुख दोन पात्र साकारणाऱ्या मोहिनी व आशुतोषने माझी मुलाखत घ्यावी असंही त्यांनी म्हटलं होतं... हे पत्र म्हणजे आमचे पाय जमिनीवर न ठेवणारा क्षण.. मग काय बाईंनाही कोण आनंद, बलंग बाईंनीही आमचं खूप कौतुक केलं आणि मला एवढ्या लहानपणी एवढा मोठा क्षण जगता आला.. खरंतर त्या लहान वयात कानेटकर कोण हे देखील माहीत नव्हतं त्यामुळे बाईंनी त्यांच्याहीबद्दल आम्हाला सांगितलं, मुलाखतीचे प्रश्न काढून दिले आणि आमची तयारीही करून घेतली होती..
माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं म्हणता येईल  एवढं बाळबोध आणि तरीही तितकच पवित्र असं यश म्हणजे हा क्षण होता. याचाच अर्थ, केवळ चांगलं काम केल्यानेच पुढच्या यशाचे मार्ग आपोआप उघडे होत जातात असाच लावता येऊ शकतो आणि आजही, अगदी प्रत्येकाच्याच बाबतीत ते खरं आहे.  माणसं जेव्हा प्रामाणिकपणे मेहनत घेतात, झोकून देऊन आणि निरपेक्ष बुद्धीने काम करतात तेव्हा यश मिळतेच यात शंका नाही. पण हा सगळा पाया ज्ञान आणि साधनेच्याच बळावर उभा राहू शकतो हे देखील खरे. हे लिहीण्याचं कारण एवढंच की हल्ली प्रचंड वाढत्या स्पर्धेत प्रत्येकालाच चमकून दाखवायचं आहे आणि त्यासाठी तो काहीही करण्याची तयारी दाखवतो, पण या काहीहीचा अर्थ इतरांशी कपट करून, खोटेपणा करून पुढे जाणे असा नाही हे त्याला समजत नाही.. मग त्याची पावलं चुकतात.. आणि त्याचं यश त्याला जसं मिळतं तसं क्षणार्धात विरूनही जातं. याचं कारण एकच, माणसाने ज्ञान वाढवण्यासाठी अभ्यास करायला हवा, साधना करायला हवी ..पण तरीही जगरहाटी काही निराळीच आहे, केवळ ज्ञानसाधना पुढे जाण्यासाठी पुरेशी नसते तर माणसाला स्वतःला आपले पांडीत्यही दाखवावे लागते, मग या विसंगत चक्रात पुढे जाणं सगळ्यांनाच शक्य होत नाही तेव्हा ते वेगवेगळे मार्ग अवलंबतात आणि पुढे जाण्याचा आभास यशस्वीरित्या निर्माण करतात हे माझे निरीक्षण आहे.
जळगाव आकाशवाणीच्या या दिवसांनी मला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं. नंतर केव्हाही जळगावला जाणं झालं आणि रस्त्यातून जाताना आकाशवाणी केंद्र दिसलं तरीही जुने दिवस आठवल्यावाचून रहायचे नाहीत.
हे दिवस अत्यंत मजेचे, आनंदाचे आणि सुखाचे होते. नवीन शिकण्याचे आणि करून बघण्याचे होते. या दिवसांच्या आठवणी म्हणूनच आजही माझ्या मनात अगदी मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणे दरवळत आहेत ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश